Monday, December 28, 2020

बल्गेरियात राज कपूर भेटले

 

  • ३५ वर्षांपूर्वी बल्गेरियात राज कपूर भेटले आणि त्यांचे ‘मेरा जूता है जपानी...’सुद्धा! 
    कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
    कामिल पारखे
    • राज कपूर यांच्या ‘मेरा जूता है जपानी...’ या गाण्यातील विविध भावमुद्रा
    • Mon , 14 December 2020
    • कला-संस्कृतीहिंदी सिनेमाराज कपूरRaj Kapoorमेरा जूता है जपानीMera Joota Hai Japaniआवारा हूँAwara Hoon

    हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीची ही एक जुनी आठवण...

    ..................................................................................................................................................................

    ही जवळपास ३५ वर्षांपूर्वीची घटना आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टने १९८६ साली आम्हां भारतीय पत्रकारांसाठी बल्गेरियात पत्रकारितेचा कोर्स आयोजित केला होता. १९८०च्या दशकात अमेरिका आणि रशियामध्ये चालू असलेल्या शीतयुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ जर्नालिस्टतर्फे रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपियन ब्लॉकमध्ये म्हणजे पूर्व जर्मनी, पोलंड, इटली वगैरे व्हर्साय करारात सामिल असलेल्या देशांत भारतीय पत्रकारांसाठी असे अभ्यासक्रम दौरा आयोजित करत असे. त्या वर्षी बल्गेरियाने भारतीय प्रतिनिधींसाठी पत्रकारिता अभ्यासक्रम आयोजित केला होता आणि गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचा सरचिटणीस म्हणून मीही या अभ्यासक्रम दौऱ्यात सहभागी झालो होतो.

    दररोज संध्याकाळी सात वाजता रात्रीचे जेवण झाल्यानंतर जवळच्या रेस्त्रामध्ये वाईन किंवा व्होडका पित संगीताचा आणि नृत्याचा अनुभव आम्ही घेतू असू. त्या वेळी तेथे पारंपरिक बल्गेरियन पोशाखातील गायक-वादकांचा चमू अंधुक प्रकाशात आपली कला सादर करत असे. त्या गार्डन रेस्त्रामधील काही ग्राहक मध्येच आपले टेबल सोडून मध्यभागी असलेल्या डान्स फ्लोरवर नृत्यात सामील होण्यासाठी जात असत.

    बल्गेरियात महिनाभरापेक्षा जास्त काळ घालवल्यामुळे आता डान्स फ्लोरवर चाललेल्या नृत्यामध्ये सामील होण्याइतकी आम्हा भारतीयांचीदेखील भीड चेपली होती. डान्स फ्लोरवर अनोळखी लोकांसह नाचगाण्यात सहभागी होण्यास तिथल्या तरुण मुली आणि स्त्रियांची काहीच हरकत नसायची, हे आता अनुभवाने आम्हाला समजले होते! मात्र सभ्यतेने वागायचे, अशी किमान अपेक्षा असायची. 

  • तर त्या दिवशी व्होडका (बल्गेरियन उच्चार ‘बोदका’) पीत असताना तेथील भिंतीवरील एका छायाचित्रावर माझी नजर गेली आणि क्षणभर मी चमकलो. भिंतीवरचे ते कृष्णधवल छायाचित्र अगदी परिचित होते. पण त्या छायाचित्राबद्दल खात्री करण्यासाठी मला माझ्या भारतीय मित्रांचे लक्ष वेधून घ्यावे लागले. सुरुवातीला काहींनी अविश्वास व्यक्त केला, मात्र काही क्षणांतच त्या छायाचित्राबद्दल आम्हा कुणालाही शंका राहिली नाही. ते छायाचित्र हिंदी चित्रपट अभिनेता राज कपूर यांचे होते, यात कसलाच वाद नव्हता.

    बल्गेरियात राज कपूरचे छायाचित्र कसे काय, याचे आम्हाला आश्चर्य वाटत होते!

    आमच्यातील काही पत्रकार त्यांची उत्सुकता दाबू शकले नाहीत. त्यांनी रिसेप्शन काऊंटरकडे धाव घेतली. तेथील लोकांना इंग्रजी समजत नव्हते, परंतु हावभाव आणि काही शब्दांच्या मदतीने आम्हाला कळले की, राज कपूर बल्गेरियातही खूप लोकप्रिय आहेत!

    मात्र आमच्या आश्चर्याची मालिका अजून संपायची नव्हती. आम्हा भारतीय पत्रकारांच्या त्या छायाचित्राबाबतच्या सुरुवातीच्या कुजबुजीचे उच्च स्वरातील संवादात रूपांतर झाले होते. तोपर्यंत तिथल्या वाद्यचमूने आपले एक गाणे संपवून आमच्याकडे पाहत दुसरे गाणे सुरू केले. आपली छडी वरखाली करत कॉयर मास्टर आपल्या वाद्यचमूला मार्गदर्शन करत असला तरी त्याचे पूर्ण लक्ष आमच्याकडेच होते. कारण आता वाजवले जाणारे गीत होते – ‘मेरा जूता है जपानी...’ 

    वाद्यचमूतल्या एकाने राज कपूरच्या ‘त्या’ खास शैलीत पदन्यास करत नाचणे सुरू केले, तेव्हा तर त्या रेस्त्रामधील लोकांनी टाळ्यांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. मग आम्हाला समजले की, राज कपूरचे हिंदी चित्रपट आणि ‘आवारा हूं...’ सारखी त्यांची गाणी रशिया आणि पूर्व युरोपियन देशांमध्येही लोकप्रिय आहेत.

    रेस्त्रामध्ये आम्ही इतरांशी बोललो, तेव्हा आम्हाला कळले की, राज कपूर हे फक्त बल्गेरियातच नव्हे तर सोव्हिएत रशिया आणि रशियाचा प्रभाव असणाऱ्या पूर्व युरोपियन राष्ट्रांमध्येही एक घरगुती नाव आहे.

    या दौऱ्यादरम्यान मला कळाले की, सोव्हिएत रशियामध्ये दोन भारतीय सर्वांत लोकप्रिय होते. त्यापैकी पहिली म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दुसरी, अभिनेता राज कपूर. आमच्या मॉस्कोच्या दौऱ्यात एका महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या चौकात इंदिरा गांधींचा पूर्ण-आकाराचा पुतळा मी बसमधून पाहिला होता.

    याशिवाय बल्गेरियात आणखी एक भारतीय नाव लोकप्रिय होते. ती तिसरी व्यक्ती म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते कवी रवीन्द्रनाथ टागोर. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रवीन्द्रबाबू टागोर बल्गेरियात आले होते. त्यांच्या कवितांचे बल्गेरियन भाषेत अनुवाद झाले आहेत.

    एके दिवशी आम्ही बल्गेरियातील एका शहरातील कापड कारखान्यास भेट दिली. तिथून परतताना तिथला एक मध्यमवयीन कर्मचारी आमच्याकडे लिफ्टपाशी आला. डोक्यावरची आपली हॅट त्याने हातात घेतली आणि राज कपूर यांच्या खास शैलीत पदण्यास करत तो ‘आवारा हूं, आवारा हूं....’ या गाण्याची धून गाऊ लागला!

    आम्ही आवाक् झालो. राज कपूर यांच्या देशातले लोक म्हणून आमच्याशी हस्तांदोलन करून तो राज कपूरचा चाहता आपल्या कामाकडे वळला.

    (काही वर्षांपूर्वी युरोप दौऱ्यात पॅरिसमधील एका सुपरमार्केटमध्ये एका तरुण कॅशियरशी मी बोलत होतो. माझ्या मुलीने त्या संभाषणाच्या ओघात सांगितले की, आम्ही भारतीय पर्यटक आहोत. तेव्हा त्या पोरगेल्या कॅशियरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती – ‘शाहरुख खान्स इंडिया!’ त्याचे ते उद्गार आमच्यासाठी सुखद आश्चर्य होते. त्या तरुणाला फारसे इंग्रजी येत नव्हते, परंतु तरीही संभाषण करण्यात आम्ही यशस्वी झालो. तो म्हणाला की, ‘एसआरकेचा चाहता आहे, शाहरुखचे हिंदी चित्रपट, नाचगाणे आणि संगीत मला आवडते.’ फ्रेंच भाषेतील सब-टायटल्स वाचली नाही तरी त्याला शाहरुखच्या चित्रपटाची कथा समजत होती. हृतिक रोशन, आमिर खान आणि इतर भारतीय कलाकारांचे हिंदी चित्रपटही त्याला आवडतात असेही त्याने सांगितले.

    भारतीय चित्रपट अभिनेत्यांनी आपल्या राष्ट्रीय, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा पार केल्या आहेत. किंग खान आणि हिंदी चित्रपट कलावंतांच्या नव्या पिढीने राज कपूरचा ‘भारताचा सांस्कृतिक राजदूत’ होण्याचा वारसा खरोखरच चालू ठेवला आहे.)

    बल्गेरियातला पत्रकारिता अभ्यासक्रम कोर्स संपल्यानंतर सोफिया येथून मॉस्कोमार्गे आम्ही भारतात परतत होतो. हवाई प्रवासात ताश्कंदला काही काळ थांबलो. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ताश्कंद या शहरात अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या शहरात पाऊल ठेवताक्षणी कुणाही भारतीयाला शास्त्रींची आठवण येतेच. पहाटे आमचे विमान नवी दिल्लीत पोहोचले. नव्यानेच बांधण्यात आलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नुकतेच झाले होते. परंतु त्या काळात प्रवाशांना विमानापासून चेक-इन काउंटरपर्यंतचे लांब पल्ल्याचे अंतर पार करण्यासाठी हल्लीच्या सरकत्या पट्ट्यासारखे कोणतेही साधन नव्हते. आम्ही सहकारी त्या बंद कॉरिडॉरमधून चेक-इन काउंटरकडे चालत जात होतो, तेव्हा अचानक माझी नजर एका वयस्कर सह-प्रवाशावर पडली.

  • जास्त वजनाच्या सूटकेस विमानाच्या कार्गो विभागात पाठवता येत नसल्याने माझ्या अंगावर आणि हातात जड, उबदार कपडे व इतर सामान होते. त्या गोऱ्यापान, लालबुंद चेहऱ्याच्या स्थूल वृद्ध प्रवाशाकडे मात्र बिलकूल सामान नव्हते. थोड्या वेळाने जवळून जात त्या वृद्ध प्रवाशाला मागे टाकले, तेव्हा ते थोडे थकल्यासारखे दिसले. त्या कॉरिडारमध्ये रांगेत असलेल्या रंगीबेरंगी बकेट सीटस होत्या, त्यापैकी एका खुर्चीत ते मटकन बसले. थकल्यामुळे त्याचा अतिशय गोरा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता.

    मी अचानक थबकलो.

    ते राज कपूर होते. सोव्हिएत रशिया किंवा इतर पूर्व युरोपियन देशांचा दौरा करून ते मॉस्कोमार्गे विमानाने आमच्याबरोबरच प्रवास करत दिल्लीला परतत होते.

    या महान चित्रपट अभिनेत्यापासून काही फूट अंतरावरच मी उभा होतो. काय करायला हवे होते, तेही परदेशात या कलावंताची लोकप्रियता अनुभवल्यावर? मला आजही असे वाटते की, भारतीय चित्रपटसृष्टीच्या या महान कलावंताबरोबर मी किमान हस्तांदोलन करायला हवे होते. रशिया आणि बल्गेरियात त्यांच्यामुळे आम्हा भारतीयांना अभिमानाची वागणूक मिळाल्याबद्दल त्यांच्याविषयीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करायला हवी होती. पण यापैकी मी काहीही करू शकलो नाही. त्याचे कारण म्हणजे स्वत:चा लाजाळूपणा आणि सेलिब्रिटी व्यक्तीच्या खासगीपणाचा भंग करून त्यांना त्रास न देण्याची इच्छा.


Wednesday, December 9, 2020


 माझी पहिली राजकिय बातमी

''हं, तर मग, काय बोलल्या शशिकलाताई काकोडकर?''

पणजीत एका शाळेच्या कार्यक्रमावरुन मी परतल्यावर न्यूजरुममधील माझ्या टाइपरायटरवर बातमी टाईप करुन मी स्पेलिंग चेक करत होतो. तेव्हाच माझे ज्येष्ठ वार्ताहर सहकारी रवि प्रभुगावकर यांनी आपल्या खास शैलीत सिगारेटची राख अँश ट्रेमध्ये झटकीत मला हा प्रश्न विचारला.
आमच्या नवहिंद टाइम्सच्या खास गोवन शैलीच्या त्या जुन्या एकमजली कौलारीं ऑफिसात एका छोटयाशा रूममध्ये दोन ज्येष्ठ वार्ताहारांचे स्वतंत्र टेबल होती. तिथेच मोठ्या टेबलापाशी मुख्य उपसंपादक आणि त्याच्या समोर दोन उपसंपादक बसायचे आणि एका कोपऱ्यात सर्वांत ज्युनियर असलेल्या माझा टेबल आणि टाईपरायटर होता. माझा हा टेबल आणि टाईपरायटर तसे डेस्कवरचे इतर जणही वापरायचे. माझ्यासमोरच प्रभुगावकरांचा टेबल होता.
मी कॅम्पस, क्राईम आणि कोर्ट या बिट्सवर काम करत असल्याने साधारणतः मी काय बातमी देतो आहे याची आमचे मुख्य वार्ताहार प्रमोद खांडेपारकर किंवा प्रभुगावकर कधी विचारत नसत. पण आज रविवार असल्याने खांडेपारकर सुट्टीवर होते आणि गोवा, दमण आणि दीवच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर मुख्य पाहुण्या असलेल्या कार्यक्रमाची बातमी करण्यासाठी मी गेलो होतो. राजकारण हा त्या माझ्या दोन्ही वरीष्ठ वार्ताहारांचा खास प्रांत असल्याने प्रभुगावकर काकोडकरांच्या बातमीविषयी असा प्रश्न विचारणे साहजिकच होते.
यासंदर्भात ही घटना घडली त्याकाळच्या म्हणजे १९८२च्या दरम्यानच्या राजकिय संदर्भाची आणि घडामोडींची थोडी ओळख करून देणे आवश्यक ठरेल. डिसेंबर १९७९च्या राष्ट्रीय निवडणुकीबरोबरच गोव्यातही विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. देशात इंदिरा गांधीं पुन्हा सत्तेवर आल्या होत्या तर गोव्यात आणि संपूर्ण देशात फक्त गोव्यातच इंदिराजींच्या प्रतिस्पर्धी म्हणजे यशवंतराव चव्हाण, के ब्रह्मानंद रेड्डी यांच्या काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली होती. त्याआधी गोव्यात शशिकला काकोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची म्हणजे मगो पक्षाची अनेक वर्षे सत्ता होती. मात्र देशात इंदिरा गांधींची सत्ता आणि लाट आली आहे हे पाहून गोव्यातील रेड्डी काँग्रेस काँग्रेसच्या प्रतापसिंह राणे, बाबू नायक आणि डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी गोव्यात सत्तेवर आलेला आपला विधिमंडळ पक्ष इंदिराजींच्या पक्षात विलीन करून टाकला. (या पक्षाच्या प्रतापसिंह राणे यांनी मग सलग अकरा वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही केला.)
विधानसभा निवडणूक हरलेल्या आणि सत्ताभ्रष्ट झालेल्या शशिकला काकोडकर यांनीही काही महिन्यातच आपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीन केला होता. मात्र रमाकांत खलप आणि बाबुसो गावकर यांनी मगो पक्षाचे अस्तित्व राखले होते. काँग्रेस पक्षात सामिल झाल्यावर काकोडकर यांची गोव्यातील पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती.
आणि या काँग्रेस उपाध्यक्ष शशिकलाताई आज काय बोलल्या याविषयी प्रभुगावकरांना औत्सुक्य होते !
त्या दिवशी काकोडकर मराठी भाषेत बोलल्या होत्या. माझ्या नोटपॅडकडे आणि टाईप केलेल्या बातमीकडे एक नजर टाकत काकोडकर काय बोलल्या हे मी त्यांना सांगितले. ते ऐकताच प्रभुगावकरांनी माझ्या बातमीचे कागद आपल्याकडे घेतले आणि दुसरी एक फोर स्क्वेर सिगारेट शिलगावत काळजीपूर्वके ती बातमी वाचू लागले. त्यांच्या जाड चष्म्याच्या आड त्यांचे डोळे विलक्षण आनंदाने चमकत होते हे मला दिसत होते.
''कामिल, तू तुझ्या नोट्स चांगल्या घेतल्या आहेस ना? दुसरे कोण बातमीदार होते या कार्यक्रमाला ? ''
रविवारची सुट्टी असल्याने आणि त्याशिवाय शाळेचा कार्यक्रम असल्याने ड्युटीवर असलेले इतरही बातमीदार या कार्यक्रमाला आले नसणार असे मी सांगितले. इतर कुणी जोडीदार पत्रकार नसल्याने मीही पत्रकारांसाठी राखीव असलेल्या पहिल्या रांगेत बसलो नव्हतो हेही मी प्रभुगावकरांना सांगून टाकले.
''ओह, दॅट एक्सप्लेन्स इट !''
सिगारेटची बट अँश ट्रेमध्ये विझवून टाकत त्यांनी लगेचच वृत्त संपादक एम, एम. मुदलियार यांच्या घरी लॅण्डलाईनवरून फोन लावला. काकोडकरांच्या भाषणाची मी काय बातमी दिली आहे याची त्यांनी मुदलियार यांच्याशी चर्चा केली आणि पाच मिनिटातच फोन खाली ठेवला, तेव्हा ते खूष होते हे सांगण्याची गरज नव्हती.
''कामिल, युवर स्टोरी इज ऑन होल्ड ! उद्या सोमवारी संपादक बिक्रम व्होरा आणि मुदलियार तुझ्याशी बोलतील !'' असे त्यांनी मला सांगितले.
याबाबत वाद किंवा चर्चा करण्याचे काही कारण नव्हते. बातमीदारीत येऊन मला जेमतेम एकदोन वर्षे झाली होती. नवहिंद टाइम्स हे गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक असल्याने बातमीला जागा मिळण्याची नेहेमीच मारामार असायची. त्यामुळे बातमी राखून ठेवण्याचे प्रकार कायम असायचे.
दुसऱ्या दिवशी वृत्तसंपादक मुदलियार यांनी प्रभुगावकर यांच्या उपस्थितीत माझ्याशी काकोडकरांच्या भाषणाविषयी चर्चा केली.
काय वादग्रस्त मुद्दे होते काकोडकरांच्या भाषणात ?
शाळेच्या त्या कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्षा शशिकला काकोडकरांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख घेतले होते. कुणाचेही नाव न घेता मुख्यमंत्री राणे आणि इतर पक्षनेत्यांच्या कारभारावर आणि पक्षावरही सडकून टीका केली होती.
त्या चर्चेच्या अखेरीस माझ्या बातमीचे मुद्दे कायम ठेवत बातमीचे पुर्नलेखन करण्यात आले आणि कंपोझिंगसाठी बातमी पाठविण्यात आली .
मुदलियार आणि प्रभुगावकर यांच्यांशी झालेल्या बैठकीत मला तोपर्यंत ठाऊक नसलेल्या काही राजकिय संदर्भाचा उलघडा झाला. त्यांची सत्ता गेल्यानंतर शशिकलाताई काँग्रेसमध्ये आल्या होत्या तरी त्यांचे आणि काँग्रेसमधील इतर नेत्यांशी त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. शशिकलाताईंचे वडील दयानंद बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री. पोर्तुगीजांच्या सत्तेतून १९६१ साली मुक्त झालेला गोवा महाराष्ट्रात विलीन करणार अशी घोषणा देऊन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोव्यात सत्तेवर आला होता. मात्र १९६७ साली देशात झालेल्या पहिल्यावहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव सार्वमतात गोमतकातील जनतेने महाराष्ट्रात विलीनीकरांच्या विरूद्ध कौल देऊनसुद्धा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षच सत्तेवर कायम राहिला होता. बांदोडकरांच्या अकस्मात निधनानंतर काकोडकर मुख्यमंत्री झाल्या होत्या.
खुद्द मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे हे मूळचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आणि मगोच्या राजवटीत काकोडकरांच्या मंत्रिमंडळात होते, शिक्षणमंत्री हरीष झांटये हे सुद्धा मूळचे मगोचे ! तात्कालीन सत्ताधारी काँग्रेसमधील डॉ. विली डिसोझा आणि बाबू नायक हे मूळचे युनायटेड गोवन पक्षाचे म्हणजे युगोचे. १९८०च्या आधीचे गोव्यातील राजकारण अशाप्रकारे मगो आणि युगो दोन्ही पक्षांतच चालायचे. गोव्यात काँग्रेसचे नामोनिशाणही नसायचे. बहुसंख्य हिंदू समाज आणि अल्पसंख्य ख्रिस्ती समाज असाही एक पदर या राजकारणाला तेव्हा असायचा, आजही तो आहेच. तर आता काँग्रेसमध्ये आपल्याला सन्मानाने वागवले जात नाही याची खंत शशिकलाताईंनी आपल्या भाषणात बोलून दाखविली होती. शशिकलाताई नव्या पक्षात खूष नव्हत्या हे माझ्या बातमीवरुन दिसत होते.
दुसऱ्या दिवशी आतल्या पानात पण ठळकपणे ती बातमी नवहिंद टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली. आणि छोटयाशा गोव्यात एक कमी रिश्टर स्केलचा पण जाणवण्याइतपत हलकासा राजकिय भूकंप झाला.
त्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवारी गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी आपण काँग्रेसला सोडचिट्ठी देत आहोत असे जाहीर केले.
पत्रकारितेच्या माझ्या चार दशकांच्या कारकिर्दीतील ही माझी पहिलीवहिली राजकिय बातमी !

समाजवादी नेते नानासाहेब गोरे




मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला नुकताच रुजू झालो होतो आणि शहरातील बातमीच्या वातावरणाची आणि संस्कृतीची ओळख करून घेत होतो. नोव्हेंबर १९८९ चा हा काळ. स्थानिक बातमीसाठी आणि बाहेरील बातम्यांसाठी स्थानिक जोड किंवा आशय देण्यासाठी सर्वच क्षेत्रांतील पुण्यात खूप लोक आहेत हे लक्षात आले. गोव्यात बातमीदारी करताना ज्येष्ठ्य स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर, मार्क्सवादी नेते जॉर्ज वाझ, नारायण देसाई वगैरे मंडळींचा अशा कामांसाठी मदत व्हायची. औरंगाबादमध्ये लोकमत टाईम्सचे काम करताना मराठवाडा स्वात्रंत्र्यसेनानीं गोविंदभाई श्रॉफ, सुभाष लोमटे, कॉम्रेड भालचंद्र कानगो, ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर वगैरेंशी बोलून बातमी तयार व्हायची.
पुण्यात तर अशा लोकांचे मोठे भांडारच होते. तर अशा आपापल्या क्षेत्रांतील ज्येष्ठ आणि तज्ज्ञ असलेल्या मंडळींमध्ये समाजवादी नेते नानासाहेब गोरे आणि ग. प्र. प्रधान, माजी मंत्री आणि पर्यावरणवादी मोहन धारीया, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, विद्या बाळ, डॉ निलम गोऱ्हे, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि गोविंद स्वरुप अशी भलीमोठी यादी होती.
या सर्व ज्येष्ठ मंडळींमध्येही काही जणांचे व्यक्तिमत्व अगदी उठून दिसायचे ते त्यांच्या ज्ञान आणि अनुभवांच्या शिदोरींमुळे. ना. ग. (नारायण गणेश) किंवा नानासाहेब गोरे हे अशांपैकी एक व्यक्तिमत्व. काही वर्षांपूर्वीच लोकसभेवर निवडून आल्यानंतर जनता पक्षाच्या राजवटीत इंग्लंडमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी केलेले काम हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अगदी अलिकडचे पद. त्याआधी कितीतरी वर्षे देशातील एक आघाडीचे समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, लेखक अशी त्यांची अनेक रूपे होती. त्यामुळे इंडियन एक्सप्रेससारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकासाठी बातम्या लिहितांना त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची नेहेमी गरज पडायची आणि नानासाहेबांनी कधी नाही म्हटले वा विशिष्ट कारणांमुळे 'कोट' देण्याचे टाळले असे मला आठवत नाही.
नानासाहेब गोरे यांच्या आडनावाची इंग्रजी स्पेलींग Gore असे नसून Goray अशी आहे हे इंग्रजी वृत्तपत्राच्या पुण्यात नव्यानेच आलेल्या बातमीदाराला बजावले जायचे. त्याकाळात एखादी मोठी घटना घडली की त्यात्या क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तीला त्यांच्या घरी व ऑफिसांत लँडलाईनवर फोन करुन त्यांचे मत विचारायचे अशी पद्धत होती. बातमीदार लोक आताही असेच पण मोबाईलवर वा ईमेलवर प्रतिक्रिया विचारतात. ( रिऍक्शन देणारे म्हणून रिऍक्शनरी लोक, असे काही पत्रकार गंमतीने म्हणत ).
नानासाहेब गोरे ज्या पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्याविषयी मला आजही नवलमिश्रीत अचंबा वाटतो. त्याचे कारण म्हणजे नानासाहेबांना फोन करुन त्यांची प्रतिक्रिया विचारली की ते लगेच म्हणायचे, ''हं , घ्या लिहून...! '' त्यांना फोन करण्याआधी बातमीदाराने पेन आणि नोटपॅडसह तयारीत असणे गरजेचे असायचे. अन त्यानंतर काही मोजक्याच वाक्यांत अगदी मुद्देसूदपणे कुठलेही पाल्हाळ न लावता नानासाहेब आपले मत अक्षरश: डिक्टेट करायचे. दोनतीन पॅराग्राफची ती प्रतिक्रिया कसलाही बदल न करता अगदी जशीची तशी वापरण्यासारखी असायची. एक शब्द जास्त नाही आणि एक शब्द कमी नाही. नेहेमीच्या अनुभवामुळे आणि एखादी घटना घडल्यावर नानासाहेबांचा फोन दिवसभर खणखणत राहणार हे ठरले असायचे. नानासाहेबांनी वाढत्या वयातही प्रतिक्रियेला नकार देऊन कुणाही पत्रकाराला नाराज केले नव्हते.
काही काळानंतर नानासाहेब गोरे यांच्या सदाशिव पेठेतील एकमजली वाडेवजा जुन्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेतली. त्यानंतर या भेटीगाठी वाढत गेल्या. या सदाशिव पेठेत त्यावेळी अनेक समाजवादी नेतेमंडळी राहत होती. मी पुण्यात येण्याआधीच एस. एम. जोशी यांचे निधन झाले होते. नानासाहेबांच्या घराच्या आसपास राहणाऱ्या इतर समाजवादी साथी मंडळींमध्ये शिरुभाऊ लिमये आणि ग. प्र. प्रधान यांचा समावेश होता. नानासाहेबांना भेटण्यासाठी एक चिंचोळा जिना चढून जावा लागत असे. त्यांची मुलगी परदेशात असल्याने या घरात नानासाहेब एकटेच राहायचे, त्यांचे जेवणखाण करण्यासाठी केअरटेकर होती. नानासाहेबांची वामकुक्षी झाल्यानंतर दुपारी साधारणतः तीननंतर मी त्यांना भेटायला जायचो. बहुतेक वेळेस पूर्वसूचना नसायची, मात्र भेटण्यासाठी ही कधीही अट नसायची.
एकदा आम्ही बोलत असताना चारच्या सुमारास केअरटेकरने आवाज दिला, तसे नानासाहेब जागेवरुन उठले आणि समोरच्या डायनिंग रुममध्ये गेले.
भिंतीला असलेल्या बिनागज वा पडदे नसलेल्या खिडकीतून ते तिथे दुपारचा चहाबिस्कीट घेत होते हे मला दिसत होते. पाचच मिनिटांत नानासाहेब परतले आणि आमची मुलाखत पुन्हा सुरु झाली. नानासाहेब एकटेच राहत असल्याने आणि माझ्यासारखे अनेक उपटसुंभ व्यक्ती त्यांना दररोज भेटायला येत असल्याने त्यांनी या सर्वांनां चहापाणी वा इतर आदरातिथ्य करावे अशी अपेक्षा करणेच चुकीचे होते. मात्र काही पत्रकारमंडळी ''जरा थांबा, मी चहा घेऊन येतो..!'' या पुणेरी वाक्याने नानासाहेबांची चेष्टाटवाळी करत असत हे मी अनुभवले होते. मात्र नानासाहेबांच्या घरच्या परिस्थितीचीं जाणिव झाल्यावर मला या वागणुकीत गैर दिसले नाही.
हीच गोष्ट स्वतःचे फोटो देण्याबाबतची. नानासाहेबांना एकदा मी एका लेखाबरोबर वापरण्यासाठी त्यांचा एक फोटो मागितला. त्यावर ''फोटोग्राफर बोलवा, नवा फोटो काढा, मी तयारच आहे !'' असे ते म्हणाले. पत्रकारांची मुलाखतीसाठी रांग लागलेली असताना प्रत्येक बातमीदाराला ब्लॅक अँड व्हाईट का होईना पण फोटो देणे त्यांना शक्य नव्हते आणि काही गरजही नव्हती. मुलाखत दिल्यावर त्या पत्रकाराने त्या लेखाचे कात्रण द्यावे अशीही अपेक्षा ते ठेवत नसत.
याच्या अगदी उलट अनुभव नानासाहेबांचे जवळचे शेजारी आणि गोवा मुक्तिसंग्रामात नानासाहेबांबरोबरच कारावासाची शिक्षा झालेल्या शिरूभाऊ लिमये यांचा. नानासाहेबांच्या तुलनेने शिरुभाऊ तसे 'लो प्रोफाईल' नेते वा कार्यकर्ते. शिरुभाऊंची मी मुलाखत घेतल्यानंतर मी त्यांच्याकडे एखादा फोटो देण्याची मागणी केली तेव्हा भोळ्या सांबाप्रमाणे त्यांनी मला गोव्याच्या आग्वाद तुरुंगातील आणखी एका नेत्याबरोबरचा एक दुर्मिळ कृष्णधवल फोटोच माझ्यापुढे ठेवला ! टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे प्लस पुरवणीत गोवा मुक्तिसंग्रामाबद्दलच्या माझ्या लेखात नानासाहेब गोरे आणि शिरुभाऊंच्या मुलाखतीसह तो दुर्मिळ फोटो प्रसिद्ध झाला.
नानासाहेब गोरे यांच्या मुलाखतीवर आधारीत लेख मी गोव्यात 'गोमंतक'ला पाठवला तेव्हा गोमंतक'चे संपादक नारायण आठवले यांनी गोव्याच्या मुक्ती सोहोळ्यानिमित्त काढलेल्या खास पुरवणीत तो लेख कव्हर स्टोरी म्हणून वापरला होता.
या ज्येष्ठ विचारवंत आणि राजकिय नेत्याशी एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी बोलताना मी माझ्या अल्पमतीनुसार एक शंका मांडली होती आणि तेव्हा रागाने भडकलेले नानासाहेब मला अजूनही चांगले आठवतात. समाजवादी, साम्यवादी अशा वैश्विक, मानवतावादी आणि पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाषेच्या आणि प्रादेशिक मुद्यावर संकुचित भुमिका का घ्यावी आणि त्यासाठी १०५ लोकांना हौतात्म्य पत्करावे लागले असा माझा बाळबोध प्रश्न होता.
संतापलेल्या नानासाहेबांनी त्यावेळी ‘’कामिल, आपण चांगला, नीट अभ्यास करुन प्रश्न उपस्थित करावे’’ असे त्यावेळी मला सुनावले होते. ‘’तुम्ही लिहित असलेला हा लेख छपाईला पाठविण्याआधी मला दाखवा’’, असेही त्यावेळी त्यांनी मला बजावले होते.
अलिकडेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वर्यू आचार्य अत्रे यांच्या खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि भारतसुद्धा सोडून परदेशातच स्थायिक झालेल्या एका कन्येचे वृदापकाळाने निधन झाले अशी बातमी वाचली तेव्हा नानासाहेबांबरोबर उडालेल्या या छोट्याशा खडाजंगीची मला आठवण झाली होती. त्यानंतर काही दिवस नानासाहेबांची भेट घेणे मी टाळले होते.
नानासाहेबांच्या त्या अगदी छोट्याशा गढीत प्रवेश करताना आणि धोतर, सदरा पेहेरावात असलेल्या नानासाहेबांशी बोलताना त्यांच्या साधेपणाचे मला नेहेमी आश्चर्य वाटायचे. त्याकाळात मी डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोरच्या हॉटेल हिल्व्ह्यू -प्रिया लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर राहत होतो. मात्र रशियाचा दौरा करताना आणि बल्गेरिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना युरोपातील जीवनशैलीचा मी अनुभव घेतला होता. त्यामुळे १९४२च्या चले जाव आंदोलनात शिक्षा झालेल्या, गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या, १९५७ ला पुण्यातून लोकसभेवर निवडून गेलेल्या आणि नंतर राज्यसभेचेही सभासद असलेल्या, वर्षातून काही महिने अमेरिकेत आपल्या मुलीबरोबर राहणाऱ्या आणि मुख्य म्हणजे ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त असलेल्या माणसाशी आपण बोलत आहोत यावर विश्वास ठेवणे अवघड व्हावे अशी त्यांची साधीसुधी जीवनशैली होती.
दोनतीन वेळेस त्यांचे डायनिंग टेबल असलेल्या आतल्या खोलीत जाण्याचा योग आला तेव्हा भिंतींना लागून असलेल्या लाकडी कपाटांतील पुस्तकांकडे मी नीट पाहून घेतले होते. स्वतः नानासाहेबांनी अनेक पुस्तके लिहिली होती हे मला माहिती होतेच. त्यांच्या तुरुंगवासातील दिवसांवर आधारीत एक लेख मला शाळेत पाठयपुस्तकात अभ्यासालाही होता.
नानासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर निर्माण होण्यास आणखी एक कारण होते. शासकीय आणि खासगी वैद्यकीय कॉलेजांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी मृतदेहांचा तुटवडा पडतो म्हणून देहदानाची चळवळ सुरु करणारे सोहोनी यांच्याबाबाबत मी इंडियन एक्सप्रेसमध्ये अनेक बातम्या छापल्या होत्या. सत्तरी ओलांडलेल्या सोहोनी यांच्या देहदान चळवळीस पाठबळ देणाऱ्या पुण्यातील दोन प्रमुख व्यक्तींमध्ये ना. ग. गोरे यांचा समावेश होता. यापैकी दुसरी व्यक्ती होती उद्योगपती शंतनुराव तथा एस. एल. किर्लोस्कर.
नानासाहेब आणि शंतनुराव या दोघांनीही मृत्यूपश्चात देहदानाचा अर्ज भरुन देहदानाच्या चळवळीस आपला सक्रिय पाठिंबा आहे असे जाहीर केले होते. देहदान चळवळीचा प्रचार करताना सोहोनी नेहेमी या दोन समाजधुरीणांचा उल्लेख करत असत. विशेष म्हणजे शंतनुराव किर्लोस्कर यांच्या व्यक्तिचित्राचा समावेश असलेले 'उत्तुंग' हे संजय सोनवणी यांनी प्रकाशित केलेले माझे पुस्तक भेट देण्यासाठी किर्लोस्कर यांनाही याच काळात मी सोनवणी यांच्याबरोबर भेटलो होतो. मात्र नानासाहेबांचा आपल्या देहदानाचा हा निर्णय त्यांच्या अमेरिकेतील मुलीने देहदानाविरुद्ध भूमिका घेतल्याने पूर्ण होऊ शकला नाही.
एक मात्र खरे कि त्याकाळात नानासाहेबांशी बोलताना आपण किती मोठ्या, विद्वान आणि अनुभवसमृद्ध व्यक्तीशी बोलतो आहोत याची त्यावेळेस जाणिव झाली नव्हती. मी त्यांच्या गाठीभेटी घेत होतो त्यावेळेपर्यंत ना. ग. गोरे या व्यक्तीच्या जीवन आणि कार्याविषयी प्रतिष्ठेच्या मराठी विश्वकोशात यदुनाथ थत्तेलिखित एक नोंदही प्रसिद्ध झाली आहे याची मला माहितीही नव्हती.
त्यांच्या मुलाखतीवर आधारीत गोवामुक्ती संग्रामावर लिहिलेला लेख पणजीतल्या दैनिक 'गोमंतक'चे संपादक नारायण आठवले यांनी छापला होता.

 

पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. . उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पात्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात  स्पष्ट केली होती. आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते.

परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शास्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शाश्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात उगवण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. 

पारतंत्र्याच्या बेडीतुन गोव्याची मुक्तता करण्यासाठी या पोर्तुगीज वसाहतीवर निःशस्त्र स्वारी करणाऱ्या या सत्याग्रहींस चुकूनही कल्पना आली नसेल कि पत्रातील वरील उतारा एक भविष्यवाणी ठरून त्यानंतर केवळ सहा वर्षातच गोव्यातील ४५० वर्षाची पोर्तुगीजांची सत्ता कोलमडून पडेल पण अखेर असेच घडले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या आदेशानुसार भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश केला आणि जवळजवळ कुठल्याही प्रतिकाराविना गोवा १९ डिसेम्बर १९६१ साली मुक्त झाला.

कारवार येथे १९५४ साली भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे श्री. नानासाहेब गोरे अध्यक्ष होते. पारतंत्र्यात असलेल्या पंतकालीन मराठी साहित्यिकांची तोपर्यँत गोमंतकाबाहेरच करत असत. यापुढील गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातच व्हावे अशी इच्छा नानासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली अन यातूनच गोवा मुक्तीसाठी भारतीयांनी गोवेकरांच्या खांद्यास खांदा लावून लढा उभारण्याची कल्पना जन्मास आली.

पुण्याला परतल्यानंतर नानासाहेबांनी आपले समाजवादी दिवंगत एस. एम. जोशी यांची घेतली आणि गोवा मुक्तीसाठी गोव्यात प्रवेश करून तेथे सत्याग्रह करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. एसेम  यांनी सत्याग्रहाच्या कल्पनेचे स्वागतच केले. पण त्याचवेळी पोर्तुगीजांच्या वसाहतीत स्वातंत्र्यासाठी अगदी शांततामय सत्याग्रह करणेही किती धोकादायक आहे याची मला स्पष्ट कल्पना दिली. जुन्या आठवणींना

ब्रिटिश आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांमध्ये हाच फरक होता. गोव्यातील आपल्या सत्येला आव्हान देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मग ती सशस्त्र असो व निशस्त्र पोर्तुगीज राज्यकर्ते दीर्घ कारावासाची शिक्षा देत असत. अनेक स्वतंत्रसैनिकांनी या लढ्यात तर प्राणही गमावले होते.

गोवा मुक्तीसाठी त्या काळात पुण्यात स्थापन झालेल्या गोवा डमोचन सहायक समितीचे नानासाहेब एक कार्यवाह होते. या समितीतर्फे गोव्यात पाठविण्यात येणाऱ्या भारतीय सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीचे नेते म्हणून नानासाहेबांची निवड करण्यात आली. समितीतर्फे १५ ऑगस्ट १९५५ साली गोव्यात सामुदायिक सत्याग्रह आयोजित करण्याचा निर्णयही येवेळी घेण्यात आला होता. गोवा मुक्तीसाठी गोव्यात आणि गोव्याबाहेर कार्यरत असलेल्या गोवा नॅशनल काँग्रेसने त्यावेळेस श्री. नानासाहेब गोरे याना त्यांच्या सत्याग्रहप्रित्यर्थ निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा आयोजित केली होती. आचार्य अत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. पीटर अल्वारीस त्रिस्तव बॅगांझा कुर्हा वगैरे जेष्ठ गोवा स्वात्यंत्रसेनानाची याप्रसंगी भाषणे झाली होती.

नानासाहेबांच्या सत्याग्रहाच्या तुकडीने पुण्याहून गोव्याच्या दिशेने १२ मे १९५५ रोजी प्रस्थान केले. वयोवृद्ध स्वतंत्रसेनानी सेनापती बापट हेही या तुकडीत सहभागी झाले होते. सत्याग्रहींची संख्या सुरुवातीस ३२ होती तर वाटेत आणखी  व्यक्ती या तुकडीत सामावून सत्याग्रहींची संख्या ६८  पर्यंत पोहोचली. यापैकी चार सत्याग्रही गोमंतकीय होते. ५३ महाराष्ट्रीयन होते. ३ उत्तर प्रदेशचे आणि राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यातील प्रत्येकी एक व्यक्ती होती. या सत्याग्रह मोहिमेचे वर्णन करताना नानासाहेब म्हणतात, गोव्यापर्यंतच्या आमच्या प्रवासात आम्हा सत्याग्रहींचे जयसिंगपूर कोल्हापूर, बेळगाव आणि इतर ठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. गोवा मुक्तीविषयी भारतीयांच्या भावना इतक्या तीव्र असतील अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. भारत छोडो ये १९४२च्या चळवळीत निर्माण झालेल्या वातावरणासारखीच परिस्थिती येवसलीही आम्हाला दिसून आली.   

आपल्या सत्याग्रहातील भूमिका स्पष्ट करताना नानासाहेबांनी गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला लिहिले होते, ज्या परिस्थितीत गोवा, दमण बी दिवला भारतात विलीन होणे शक्य होईल ती परिस्थिती निर्माण व्हायला आम्ही सत्यभूत होऊ इच्छितो ज्याप्रमाणे शंभराहून अधिक वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले म्हणून आमचा देश ब्रिटिश होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे या टीचभर तुकड्यावर तुम्ही कितीतरी वर्षे राज्य केले म्हणून तो प्रदेश पोर्तुगीज होऊ शकत नाही. आम्हाला माहित आहे कि गोवा-दमण-दिवच्या जनतेला तुमचे स्वामित्व नको आहे तुमच्या स्वामित्वाविरुद्ध ती बंद करून उठली आहेत आणि त्या लोकांचे आम्ही (गोवेकराव्यतिरिक्त इतर भारतीय) भाईबंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र मिळविण्याच्या बाबतीत मदत करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. गोव्याच्या लोकांनी तुमच्या प्रशासकीय दहशतीविरुद्ध दीर्घकाळ लढादिलेला आहे आणि आपले रक्त सांडले आहे. जर या विषम, कठोर संघर्षात आम्ही स्तब्धपणे बघ्याची भूमिका घेतली आणि तुम्ही करीत असलेली पाशवी हिंसा अविरतपणे चालू दिली तर भावी पिढ्या आम्हाला अपराधी ठरवतील. या पात्राची एक प्रत पंतप्रधान पंडित नेहरू याना पाठविण्यात आली होती.

या सत्याग्रहींच्या तुकडीचे स्वागत गोव्यात डिचोलीजवळ सशस्त्र पोर्तुगीज पोलिसांनी केले. नानासाहेब, सेनापती बापट यांच्यासह सर्व सत्याग्रहींना  यावेळी बेदम मारहाण करण्यात आली. नानासाहेब वगळता इतर सर्व सत्याग्रहींना नंतर गोव्याच्या सरहद्दीबाहेर नेऊन सोडण्यात आले. नानासाहेबांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यांच्यानंतर गोव्यात सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या श्री. शिरूभाऊ लिमये, श्री. जगन्नाथराव जोशी, श्री. मधू लिमये, खासदार श्री. किडीबकुमार चौधरी या सर्वांवर लष्करी न्यायालयात खटला भरण्यात आला. यापैकी बहुतेक नेत्यांना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु अम्नेस्टी इंटरनॅशनलमुळे अडीच वर्षानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली.

केवळ  स्वातंत्र्याचे  नारे लागवल्याबद्दल निशस्त्र सत्याग्रहींना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा मिळाल्याच्या वृत्ताने त्यावेळेस भारतात मोठी खळबळ निर्माण झाली होती. या शिक्षेची बातमी कळताच माझ्या आई वडिलांना धक्काच  बसला. माझी आणि त्यांची पुन्हा कधीही भेट होणार नाही असेच त्यांना वाटले, असे नानासाहेब म्हणतात. नानासाहेबांना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्माविण्यात आली तेव्हा त्यांच्या वडिलांचे वय ८२ वर्षाचे होते.  

नानासाहेब तुरुंगात असताना त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचण्यास आवडतात अशी विचारणा पंतप्रधान नेहरूंनी नानासाहेबांच्या पत्नीकडे केली होती. त्यानंतर पंडितजींनी पुस्तकांचा एक गठ्ठा नानासाहेबांना पाठविण्याची व्यवस्थाही केली. पण हि पुस्तके माझ्या तुरुंगाच्या कोठडीत कधीच पोहोचली नाहीत. नानासाहेबांनी हसत हसत सांगितले.

नानासाहेबांची तुरुंगातून मुक्तता झाली तेवढा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर घेतला होता. या काळात झालेल्या निवडणुकीत नानासाहेब पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नानासाहेबांनी गोवा मुक्तीचा विषय उपस्थित केला होता.

या काळात भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करावा यासाठी राष्ट्रवादी मंडळ सरकारवर सतत दबाव आणत होती. त्यावेळी पंतप्रधान नेहरू श्री. पीटर अस्वारीस, बॅरिस्टर पै आणि श्री. गोरे यांच्याशी प्रश्नावर चर्चा केली, गोवा मुक्त करण्यासाठी गोमंतकीय नागरिक पोर्तुगीज सरकारविरुद्ध तीव्र करू शकतील काय असा प्रश्न पंडितजींनी या बैठकीत आम्हाला विचारला. पण अहिंसा, सत्याग्रहासारख्या आंदोलनांनी पोर्तुगीजांवर दबाव आणण्याचे कधीच मागे गेला आहे आता एकाच पर्याय राहिलेला  आहे म्हणजे लष्करी कारवाई असे मी पंडितजींना दिले असे श्री.  म्हणतात .   लष्करी कारवाईच्या आमच्या सल्ल्यानेच पंडितजींनी नंतर कारवाई केली असा दावा मी करत नाही. पण यानंतर वेळोवेळी घेतल्या भूमिकेवरून कारवाईचा त्यांनी ठाम निर्णय होता हे स्पष्ट झाले व पोर्तुगीज शासनालाही ह्याची स्पष्टता आली होती. श्री. गोरे पुढे म्हणतात.

स्वातंत्र्यसैनिकांचा सशस्त्र निशस्त्र उठाव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टाई वगैरे सर्व प्रयत्नानंतरही पोर्तुगीजांनी सोडण्यास नकार दिला. नेहरुंच्या आदेशावरून भारत, गोवा, दमण आणि दिवमध्ये केला अन गोवा स्वतंत्र झाला. गोव्याच्या मुक्तीसाठी हुतात्मा सांडलेले रक्त आणि स्वातंत्र्य श्रम वाया गेले नाही अन ४५० प्रदीर्घ काळानंतर गोवा पुन्हा भारत भूमीशी संलग्न झाला.