Wednesday, December 29, 2021

पुण्यात लँडमार्क असणारे सिटी चर्च


पुण्यात क्वार्टर गेटपाशी YMCA ( Young Men's Christian Association ) चे प्रशस्त आवार हे येथील एक मोठे लँडमार्क आहे. अलका थिएटर चौकापासून सुरु होणारा आणि मुख्य पेठांतून जाणारा लक्ष्मी रोड येथून तिरकातिरका होत जात शहराच्या दोन भिन्न संस्कृतींना जोडत अरोरा टॉवरपाशी पुणे कॅम्पात संपतो.

या YMCA च्या शेजारीच जराशा अडवळणीला असलेले आणि शहराचे एका खऱ्या अर्थाने लँडमार्क असणारेCatholi,cc सिटी चर्च आहे.
माधवराव पेशवे यांनी आपल्या सैन्यातील गोव्यातील पोर्तुगीज कॅथोलिक सोजरांसाठी प्रार्थनामंदिर बांधण्यासाठी १७९२ साली जागा दिली होती. त्या जागेवर पहिला मिस्साविधी साजरा केला गेला त्या घटनेला या ख्रिसमसला म्हणजे २५ डिसेम्बरला २२९ वर्षे पूर्ण होतील.
क्वार्टर गेट येथील हे सिटी चर्च हे पोर्तुगीज वारसा असलेल्या मुंबई आणि वसई वगळता महाराष्ट्रातले पहिलेवहिले कथोलीक चर्च. या उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व कॅथॉलिक चर्चेसचे सिटी चर्च हे त्या अर्थाने मदर चर्च.
महाबळेश्वर या हिल स्टेशनवर भर बाजारपेठेत असलेले होली क्रॉस चर्च हे १८३१ साली बांधलेले एक छोटेसे चर्च महाराष्ट्रातील दुसरे सर्वात जुने कथोलीक चर्च.
मराठा सत्तेचा अखेरचा काळ पाहिलेले हे छोटेसे टुमदार सिटी चर्च हे त्याकाळी पुणे शहराचे एक टोक होते. म्हणून आवर लेडी ऑफ इम्यॅक्युलेट कंसेपशन चर्च ( Our Lady of Immaculate Conception Church ) असे बारसे झालेले हे चर्च आजतागायत सिटी चर्च याच नावाने ओळखले जाते.
माधवराव पेशवे यांनी दिलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या या चर्चचा इतिहास गंमतीदार आहे.
पुणे कॅथोलिक डायोसिसची स्थापना १८६७साली होऊन या धर्मप्रांतासाठी पुण्यात स्वतंत्र बिशप नेमण्यात आले. मात्र गोव्यातील पोर्तुगीज आणि भारतातील ब्रिटिश राजसत्ता भिन्न असतानासुद्धा पुण्यातले हे छोटेसे चर्च दिडशे वर्षे पोर्तुगीजांच्या अधिपत्यात असलेल्या गोवा आर्चडायोसिसच्या अखत्यारीत राहिले होते.
या सिटी चर्चशी निगडीत कथोलिक चर्चमधला एक इतिहास आणि कालखंड जोडलेला आहे.
मध्ययुगात युरोपमधल्या काही देशांतील दर्यावर्दी लोक नवे जग शोधायला बाहेर पडले, तेव्हा नव्या वसाहती निर्माण करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. यामुळे पोपमहाशयांनी पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड वगैरे कथोलीक देशांत संपूर्ण जगाची चक्क वाटणी केली! यात पोर्तुगालच्या वाटेला इंडिया म्हणजे गोवा आला होता.
नंतरचा पोर्तुगीज इंडिया म्हणजे गोव्यातील चर्चच्या हद्दीतील ब्रिटिश इंडियातील पुण्यातील हे सिटी चर्च... हद्द्वाद ही चर्चची सुध्दा एक डोकेदुखी राहिलेली आहे.
दोन भिन्न राजकीय सत्ता असताना येथील चर्चवर गोव्याच्या चर्चचा अधिकार होता, इथल्या धर्मगुरुंची नेमणूक Estado da India म्हणजे पोर्तुगीज इंडिया किंवा गोव्यातून तिथले आर्च बिशप करत असत..
काही दशकांपूर्वी या चर्चचा पुण्यात मुख्यालय असलेल्या पुणे डायोसिसमध्ये समावेश करण्यात आला. अगदी आजही मूळच्या गोवन किंवा पुणेस्थित गोंयकारांचे चर्च अशी या चर्चची प्रतिमा आहे.
या चर्चच्या शेजारीच कौलारी छत असलेली पूना गोवन इन्स्टिट्युटची वास्तू अनेकांनी पाहिली असेलच..
या सिटी चर्चशेजारीच ऑर्नेला बॉईज स्कुल आणि सेंट क्लेर गर्ल्स स्कुल आहे.
हे सिटी चर्च, पुणे कॅम्पात शिवाजी मार्केटसमोर असलेले सेंट झेव्हियर्स चर्च आणि रेस कोर्ससमोरचे सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल ही पुण्यातली जुनी कॅथॉलिक चर्चेस, त्याशिवाय सेंट मेरीज चर्च, पुणे शहराच्या मैलाचा दगड असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसशेजारी (जिपीओ ) शेजारचे सेंट पॉल चर्च, ख्राईस्ट चर्च ही जुनी प्रोटेस्टंट चर्चेस.
एकेकाळी म्हणजे शतकापूर्वी गौरव पाहिलेल्या यापैकी काही चर्चमधली भाविकांची संख्या हळूहळू रोडावत चालली आहे. तरीदेखील येणाऱ्या या ख्रिसमसनिमित्त ही चर्चेस पुन्हा एकदा नवी झळाळी अनुभवतील.

Saturday, December 25, 2021

 

ख्रिसमस ट्री सजवताना आणि सणाची तयारी करताना ख्रिसमस कॅरोल्सचं पार्श्वसंगीत वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं…
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 23 December 2021
  • पडघमसांस्कृतिकनाताळNatalख्रिसमसChristmasकॅरोलCarolख्रिसमस कॅरोलChristmas Carol

कॅरोल्स म्हटलं की, ख्रिसमसला मध्यरात्रीच्या ‘मिस्साविधी’ला किंवा ‘मिडनाईट मास’ला हजर असलेल्या कुणाही व्यक्तीला हमखास आठवणारे एक गीत म्हणजे ‘ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ’ Gloria in Excelsis Deo . मूळ लॅटिनमधल्या या गाण्याचं हे धृपद संपूर्ण जगात अनेक ठिकाणी ख्रिसमसच्या काळात गायलं जातं. त्या नंतरची कवनं मात्र स्थानिक भाषांत गायली जातात. ‘देवाचा गौरव असो’ हा या लॅटिन शब्दांचा मराठी अनुवाद.

ख्रिसमस ‘मिडनाईट मास’च्या वेळी म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चमध्ये होणाऱ्या मिस्साविधीदरम्यान ख्रिस्तजन्माचं शुभवर्तमान वाचून झाल्यावर धर्मगुरू अल्तारापाशी असलेली बाळ येशूची प्रतिमा समारंभपूर्वक सजवलेल्या गव्हाणीकडे - ख्रिस्तजन्माच्या देखाव्याकडे - घेऊन जातात. या वेळी चर्चच्या बेलचा घंटानाद सुरू होतो आणि चर्चचा गायकवृंद वाद्यसंगीताच्या सुरात ‘ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ’ हे गीत गातो. तेव्हा भाविकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.

गेली अनेक दशकं मराठी भाषेतसुद्धा हे लॅटिन धृपद गायलं जातं. त्यानंतरच्या मराठी गायनाची पुढील कवनं अशी आहेत-

मेंढपाळ आवारात

कळपास राखिती

इतक्यात आकाशात

दूत गीत म्हणती 


आज रात्री बेथलेमात

तारणारा जल्मला

शांति होवो माणसात

स्तोत्र स्तवा देवाला


‘कॅथॉलिक सदगीते’ या पुस्तकात नाताळ सणाच्या गायनांचा स्वतंत्र विभाग होता. ख्रिस्ती गायनांच्या कुठल्याही पुस्तकांत असे वेगवेगळे विभाग असतातच. या विभागात कितीतरी गायनं असतात. नंतर काही वर्षांनंतर समजलं की, यापैकी अनेक गायनं चक्क भाषांतरित होती आणि त्यांच्या चालीसुद्धा लॅटिन धर्तीच्या होत्या. वरच्या नाताळगीताची चाल पूर्णतः लॅटिन धर्तीचीच आहे. मराठीत अशी पाश्चात्य चालीवरची कितीतरी गायनं आहेत.  

माझी आई पूर्णतः निरक्षर, तिला ‘आमच्या बापा’, ‘नमो मारिया’, ‘प्रेषितांचा विश्वासांगिकार -  देवदूताचा निरोप’, ‘रोझरीची माळ’ वगैरे चर्चमध्ये आणि घरी दररोज म्हटल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना आणि गायनं तोंडपाठ होती. तिलाही ‘ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ’     ( Glory to God in highest ) हे धृपद येत होतं. श्रीरामपूरच्या चर्चमधल्या इतर निरक्षर स्त्री-पुरुषांचीही हीच स्थिती होती.

अर्थात यात नवल काही नव्हतं. कारण सत्तरच्या दशकापूर्वी भारतातच नव्हे, तर सर्व जगभर कॅथॉलिक चर्चमध्ये संपूर्ण मिस्साविधी चक्क लॅटिन भाषेत व्हायचा. मराठी भाषासाक्षर असलेल्या माझ्यासारख्या लोकांसाठी या लॅटिन प्रार्थना आणि गायनं देवनागरी लिपीत पुस्तकांत छापलेली असायची. ती वाचून, गाऊन आमचा या मिस्साविधीत सहभाग व्हायचा. 

उदाहरणार्थ, ‘दोमिनस व्होबिस्कम’ ( Dominus vobiscum ) प्रभू तुमच्यासह असो!) अशी काही त्यातील वाक्यं मला आजही आठवतात. साठच्या दशकात पोप जॉन तेविसावे आणि पोप पॉल सहावे यांच्या काळात (1962-65) भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलनंतर जगभर चर्चमध्ये मिस्साविधी स्थानिक भाषांत होऊ लागला.
,,Open the windows... Let the fresh air in,, (चर्चच्या खिडक्या उघडा... खुली हवा येऊ द्या आत...) असे पोप जॉन तेविसावे यांचे ही दुसरी व्हॅटिकन परिषद उद्घाटन करतानाचे सुप्रसिद्ध वाक्य.. यानंतर कथोलीक चर्चमध्ये खूप अंतर्बाह्य बदल झाला..

डिसेंबर महिना सुरू झाला की, लहानपणापासून सतत कानावर पडलेली अशी कितीतरी नाताळाची मराठी गीतं कानांत गुंजू लागतात. त्यापैकी एक तर चक्क येशूबाळाचा पाळणा आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व ख्रिस्ती लोकांनी तो कधी ना कधी ऐकलेला असतोच. ख्रिस्तजन्माचा तो पाळणा असा-

धृ. घेई घेई घेई जन्म माझ्या मनी

तुझ्या जन्मदिनी ख्रिस्तबाळा
१. आवडला तुज जन्म गव्हाणीत
तसा मन्मनात आवडावा
२. हृदय पाळणा माझा त्यात नीज
भावे झोके तुज देतो बाळा
३. देतो खेळावया जीवन खेळणे
ऐकवी हसणे गोड तुझे
४. राजासनी तुझ्या दूतांच्या मेळ्यात
तुझे जन्मगीत गाऊ देई

येशूजन्माची अशी कितीतरी पाळणागीतं मराठीत गेल्या शतकाच्या काळात रचली गेली आहेत. ही पाळणागीतं महाराष्ट्रातील विविध कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चमध्ये नाताळ सणाच्या काळात भक्तिभावानं गायली जातात. यापैकी पुढील ‘प्रभुचा पाळणा’ या नावानं खुद्द ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिला आहे-

हलवी मना प्रभुपाळणा हा

त्यजुनी सुखातें वरी यातनांना ||धृ|| 

पराकारणें जो झिजवी तनूला

यशोगान त्याचें मुदें गात गाना    

हलवी मना, प्रभुपाळणा ||१||    

हलवी मनातें हलवी जनातें

प्रभुपायिं लावी इत्तर जनांना

हलवी मना, प्रभुपाळणा ||२|| 

जगाच्या हिताचा प्रभूसेवनाचा

असे पाळणा जो पटवी मनांना

हलवी मना, प्रभुपाळणा ||३||


बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी, मुंबईने प्रकाशित केलेल्या ‘उपासना संगीत’ या पुस्तकात हा पाळणा समाविष्ट  आहे. त्यात अशी अनेक नाताळगीतं आणि शेकडो भक्तीगीतं आहेत. गेल्या शतकातील रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि कृष्णा रत्नाजी सांगळे प्रभुतींचं यात फार मोठं योगदान आहे. मराठी ख्रिस्ती समाजात भक्तिगीतांची, गायनाची आणि कीर्तनाचीसुद्धा फार जुनी परंपरा आहे. ‘उपासना संगीत’ या ४०४ पानांच्या जाडजूड गायनसंग्रहावर नुसती नजर फिरवली तर या विधानातील तथ्य लक्षात येईल.  

१९०३पासून प्रसिद्ध होणाऱ्या ‘निरोप्या’ या मासिकाचे खूप जुने अंक चाळताना एकदा पन्नासच्या दशकातील अंकात एक नाताळगीत मला दिसलं. लहानपणापासून नाताळाच्या दिवसांत चर्चमध्ये हे सुंदर चाल असलेलं नाताळगीत मी ऐकत आलो आहे-

चंद्रमा समवेत पातली

मंगल मध्यम रात

अधीर झाली बघण्या बाळा

विश्वपतीच्या त्या लडिवाळा

घेउनि हाती चांदणी माळा

विराजली गगनात

मला तोंडपाठ असणारे हे गायन लिहिणारा कवी कोण म्हणून आतुरतेनं कवीचं नाव पाहू लागलो, तर खाली ते दिलेलंच नव्हतं.  

ख्रिसमसच्या साधारणतः १०-१५ दिवस आधी कॅरोल सिंगर्सच्या तुकड्या ख्रिस्तमसची गाणी घरोघरी आणि इतर ठिकाणी म्हणण्यासाठी बाहेर पडतात. नाताळ सणापूर्वी एक-दोन दिवस आधी त्यांना त्यांच्या परिसरातील किंवा त्यांच्या चर्चमधल्या सगळ्या सभासदांच्या घरी भेटी द्यायच्या असतात. हे कॅरोल सिंगर्स गायनासाठी येतात, तेव्हा शेजारच्या घरांतील मुलंबाळं आणि मोठी मंडळीसुद्धा नाताळगीतं ऐकण्यासाठी जमत असतात. सांता क्लॉजसुद्धा कॅरोल सिंगिंगमध्ये रंगत आणतो.  

मागच्या रविवारी चिंचवडच्या आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चमध्ये मिस्सेच्या वेळी पुढील आठवड्याच्या सूचना वाचताना पॅरिश प्रिस्ट फादर लाझारस यांनी  १४ डिसेंबरपासून चर्चचा युथ ग्रुप कॅरोल सिंगिंगसाठी घरोघरी येईल असे जाहीर केले होते.  

तेव्हापासूनच मनात जिंगल बेल्स वाजायला सुरुवात झाली होती.

पंधरा डिसेंबरला कॅरोल सिंगर्स आमच्या घरी येणार होते आणि आमच्या कॉलनीत सर्व कॅथोलिक कुटुंबांकडे  त्यांना घेऊन जाण्याची सूचना मला आमच्या चर्चच्या एरिया लिडर सिक्वेरा मॅडम यांनी केली होती.  

संध्याकाळी सव्वा सातला कॉलनीच्या गेटपाशी चारपाच  दुचाक्यावर हिरवे टी-शर्ट घातलेले  काही मुलेमुली आले आणि त्यांच्या डोक्यावरच्या त्या लाल-पांढऱ्या रंगाच्या टोप्या पाहिल्या आणि मी माझा हात उंचावून ओळख करून दिली.

करोनाने थैमान माजवल्यापासून कॅरोल सिंगर्सची संख्या खूप रोडावली आहे आणि त्यांच्यामधल्या सांता क्लॉजला सुट्टीच देण्यात आली आहे.
``डॅशिंग थ्रू द स्नो... ''   या  शब्दांनी सुरुवात होऊन ओ, जिंगल बेल्स, जिंगल बेल्स हे गाणे झाले आणि शेवटी `` वी विश यु अ मेरी  ख्रिसमस अँड अ हॅपी न्यू इयर'' या गाण्याने आपली धावती भेट आवरती घेत कॅरोल सिंगर्सनी आमचा निरोप घेतला.

त्या दिवशी रात्री अनेक घरांना त्यांना भेटी द्यायच्या होत्या आणि त्यांच्याकडे सांता क्लॉजप्रमाणे हवेत उडणाऱ्या रेनडियरची गाडी नव्हती.
अशा प्रकारे चर्चमधले चारपाच युवकयुवतींचे गट ख्रिसमसच्या दोन दिवस आधीच म्हणजे बावीस डिसेंबर आधी आमच्या चर्चच्या संपूर्ण परिसरातील सर्व कुटुंबांना भेटी देऊन ख्रिसमससाठी योग्य ती वातावरणनिर्मिती करणार आहेत.

आता माळ्यावरचा ख्रिसमस ट्री खाली काढायला हवा, इतर सजावटीचे सामान शोधावे लागेल, नेहेमीप्रमाणे नवीन काही खरेदी होणारच. त्यासाठी शनिवारी पुणे कॅंपला भेट द्यावी लागणार.....  

ते कॅरोल सिंगर्स दृष्टीआढ झाले तरी  त्यांच्या भेटीमुळे नाताळगितांच्या  लहानपणापासून मनात कोरलेल्या अनेक आठवणी जागृत  होत गेल्या.

गोव्यात जेसुईट फादरांच्या प्री-नोव्हिशिएटमध्ये (पूर्व-सेमिनरीत) हायर सेकंडरी आणि कॉलेज विद्यार्थी असताना गोव्यात मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या विविध घरांना कॅरोल सिंगर्स म्हणून आम्ही प्री-नॉव्हिस मुलं भेटी देत असू. गिटार वाजवणारा बेनेडिक्त उर्फ बेनी फरिया आमचा म्होरका असायचा. ‘ड्रमर बॉय’, ‘सायलेंट नाईट, होली नाईट’, ‘ओ  कम ऑल यी फेथफुल’,  ‘जॉय टू  द वर्ल्ड’ वगैरे अभिजात कॅरोल्स गायली जायची आणि लोकांना फेस्टिव्ह मूडमध्ये नेलं जायचं.   

सत्तरच्या दशकातले मिरामारचे ते कॅरोल सिंगिंग माझ्यासारखेच हल्ली इंग्लडला स्थायिक झालेल्या बेनीलासुद्धा आजही नक्की आठवत असेल.

नाताळाच्या आधी आमच्या घरी आठ-दहा दिवस दररोज संध्याकाळी करंज्या, लाडू, चकल्या, अनारशी वगैरे फराळ बनवण्याचं काम सुरू व्हायचं, ते मध्यरात्रीपर्यंत चालायचं. आमचं मोठं, खटल्याचं घर असल्यानं आणि नाताळाच्या या फराळाची ताटं शेजारच्या माळी-मराठा आणि मुसलमान घरांतही जाणार असल्यानं पितळाचे मोठमोठे डबे गच्च भरून हे पदार्थ व्हायचे.

या फराळाशिवाय नाताळ सणाची गोडी आणखी एका कारणानं वाढायची, ती म्हणजे नाताळाची गाणी. येशूबाळाच्या आगमनाच्या म्हणजे अ‍ॅडव्हेंटच्या या काळात नाताळाची गाणी गायली जायची. ती ऐकून या सणाच्या आनंदी वातावरणाचा अनुभव यायचा.

फराळ बनवून उशिरा रात्री दमूनभागून घरातले सर्व झोपले असताना ऐन मध्यरात्री किंवा अगदी भल्या पहाटे घराच्या पुढच्या दारावर मोठ्यानं थाप पडायची, दारावरची कडी वाजायची आणि त्यापाठोपाठ कानावर येणाऱ्या पेटी-तबल्याचे सूर आणि गायनाचे आवाज ऐकून सगळ्यांची झोप उडायची. नाताळाची उडत्या तालीची, तसंच रागदारीतली गायनं गाण्यासाठी चर्चमधली भजनी मंडळी अंगणात आलेली असायची.

अंगणात मोठ्या भावांनी बनवलेला ख्रिसमसचा स्टार लावलेला असायचा. येशूबाळाला भेटण्यासाठी आलेल्या त्या तीन मागी, ज्ञानी राजांना आकाशातील एका चमचमत्या ताऱ्यानं थेट बेथलेमच्या गाईगुरांच्या गोठ्यापर्यंत वाट दाखवली, तसेच उंच खांबावर लावलेले हे लुकलुकते ख्रिसमस स्टार त्या भजनी मंडळींना ख्रिस्ती कुटुंबांच्या घराची वाट दाखवायचे. थंडीच्या दिवसांत अंगावर उबदार पांघरुणं घेऊन, जमिनीवर मांडी घालून नाताळची गाणी ऐकली जायची, या भजनी मंडळासाठी स्वयंपाकघरात आईनं चहाचं आधण ठेवलेलं असायचं.  

आजही ख्रिसमस ट्री सजवताना आणि सणाची तयारी करताना ख्रिसमस कॅरोल्सचं पार्श्वसंगीत वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. प्रत्येकाच्या या सणाविषयीच्या कितीतरी सुखद आठवणी असतात.    

आजकाल ख्रिसमस हा केवळ ख्रिस्ती समाजाचाच उत्सव राहिला नाही. हल्ली विविध शाळांत, उद्योगकंपन्यांत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेलांत ख्रिसमस अगदी उत्साहानं साजरा होतो. या सोहळ्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात आणि एकमेकांना आनंदी करतात. तसं पाहिलं तर विशिष्ट धार्मिक विधीचा अपवाद वगळता कुठल्याही सणाचं वा उत्सवाचं स्वरूप आणि उद्दिष्ट असंच सर्वसमावेशक असायला हवं.

खिस्तजन्माचे हे बाळ येशू, मारियामाता आणि संत जोसेफ यांचे हे भारतीय पेहेरावातले चित्र गोव्याचे चित्रकार यांनी १९५४ साली काढले होते. सौजन्य पुन्हा एकदा Vivek Menezes
नाताळच्या सर्वांना शुभेच्छा...
Merry Christmas to you...

Boas Natal...




Saturday, December 18, 2021

 हे तसं अगदी खाजगी संभाषण.. ..


हे तसं अगदी खाजगी संभाषण.. कालच झालेलं पण ते इथे शेअर करण्याचा मोह आवरता येईना ...म्हणून हा उपद्व्याप..
------
काल संध्याकाळी औषधाच्या दुकानात सेल्सवुमनशी बोलताना फोन वाजला म्हणून लगेच दुकानाबाहेर आलो..
"तुम्ही कामिल पारखे काय? " एका महिलेचा तिकडून प्रश्न आला..
"हो..""
मी अमुक अमुक... तुम्ही माझे नाव कधी ऐकले काय..?
नाव तसे पुर्णतः अपरिचित होते पण भिडेखातीर आणि समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून म्हटले "हो, हे नाव ऐकले आहे.. "
पत्रकार असल्याने अनोळखी नंबरचे विविध पीआरओंचे असे फोन सतत येत असतात..
"तुमचं वय काय?"
तो प्रश्न ऐकून मी गप्पगारच झालो.
काय उद्देश असू शकतो हा प्रश्र्न विचारण्यामागे ? आवाजावरुन पलीकडच्या व्यक्तिच्या वयाचा अंदाज तर येत नव्हता..पण विचार करायला फार वेळ नव्हता..
तरी लगेचच मी त्या प्रश्नाला खरे काय ते उत्तर दिले. खरं पाहिलं तर मी यावर काही तरी खरमरीत उत्तर द्यायला पाहिजे होतं असं आता वाटतं..
"हा, तर माझे वय तुमच्यापेक्षा जास्त आहे... . तुमची "बदलती पत्रकारिता" हे पुस्तक मी वाचले आहे..त्यात 'पत्रकारितेतील स्त्रिया' या प्रकरणात महाराष्ट्रातील इंग्रजी आणि मराठी पत्रकारितेतल्या काही मोजक्या पत्रकार महिलांचा तुम्ही उल्लेख केला आहे. त्या प्रकरणात तुम्ही माझा उल्लेख सरळसरळ टाळला आहे. असं का?"
मला काहीं बोलू न देता त्या पुढे बोलत राहिल्या
"मी तुमच्याआधी खूप वर्षापूर्वी पत्रकारितेत आले. अनेक मराठी दैनिकांत मोठया पदांवर मी काम केले आहे .पत्रकारिता या विषयावर मी विद्यापिठात शिकवले आहे.. माझी कितीतरी - विसेक- पुस्तकेही आहेत. तुम्ही माझं नाव ऐकलं असेलच...आणि मराठी महिला पत्रकारांवर लिहिताना तुम्ही माझ्या नावाचा साधा उल्लेखही करत नाही..?"
"ओ मॅडम. मी खरंच तुमचं नाव कधीच ऐकलं नव्हतं.. नाही तर नक्की तुमचा उल्लेख केला असता... तुमच्याशिवाय आणि काहीं ज्येष्ठ महिला पत्रकारांचाही उल्लेख राहिला आहे.. आता पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत मी तुमचा उल्लेख करेल.. मुद्दाम तुमचं नाव टाळलं नाही.."
"असं कसं म्हणता तुम्ही.. महिला पत्रकारितेवर तुम्ही लेखात, पुस्तकात लिहिता, तेव्हा पत्रकार आणि लेखक म्हणून या विषयाचा पूर्ण अभ्यास करणं माहिती करून घेणे हे तुमचं काम होतं..
"ओ मॅडम .माझ्या पत्रकारितेतील अनुभवावर हे पुस्तक आहे. माझ्या नजरेतली. मी अनुभवलेली पत्रकारिता या पुस्तकात आहे.. ते आत्मचरीत्र नाही. पण माझी व्यक्तिगत निरीक्षणे त्यात मी मांडली आहे..तो इतिहास तर मुळीच नाही आणि परिपूर्ण माहिती नाही. इतिहास लिहिण्याचा उद्देश नसल्याने मी ती माहिती गोळा केली नाही आणि त्यामुळे तुमचा आणि अनेकांचा उल्लेख त्यात नाही.."
"अहो असं कसं म्हणता तुम्ही...? पत्रकारितेवर लिहिलेल्या तुमच्या या पुस्तकाबद्दल मी वाचले, खूप ऐकले म्हणून मुद्दाम ते पुस्तक विकत घेतले आणि वाचले .. माझा त्यात साधा उल्लेखही नाही हे ऐकून मला धक्काच बसला.. म्हणून लगेच हा फोन करते आहे.."
"ओ मॅडम.. तुमचे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे, पण मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. मला मराठी पत्रकारितेविषयी खरंच फार माहिती नाही. माझी सर्व नोकरी इंग्रजी दैनिकांतली .. मराठी पत्रकारितेशी माझा तसा लांबून संबंध आला. . शिवाय मी खूप वर्षे महाराष्ट्राबाहेर गोव्यात होतो.. नंतर महाराष्ट्रात ज्या मोजक्या शहरांत मी राहिलो फिरलो, त्या अनुभवावर हे पुस्तक आहे.. तुमच्या शहरातील पत्रकारितेविषयी मला फारशी माहितीही नाही...मी पत्रकारितेचा इतिहास लिहिलेला नाही..तसा दावा पण करत नाही... दुसरं म्हणजे हे पुस्तक विश्वकोश, encyclopedia नाही की ज्यात परिपूर्ण, अगदी अक्युरेट माहिती असायला हवी..''
पण मॅडम माझे म्हणणे ऐकून घ्यायलाच तयार नव्हत्या.
."अहो तुमचे हे पुस्तक सर्वदूर जाणार.. त्यात अशी अर्धवट अपुरी माहिती देणे योग्य आहे का...?
'ओ मॅडम. हे मराठी पुस्तक आहे ते असे 'सर्वदूर' कसे जाणार ..? ( बहिणाबाई म्हणतात तसं मानवी मन किती चंचल असतंं बघा.. इतक्या तापलेल्या, गंभीर संभाषणातसुध्दा 'ओ मॅडम' असं म्हणताना मला का कुणास ठाऊक ती ''दिदी, ओ दिदी" ही आता खूप प्रसिद्ध झालेली ती पूर्व समुद्र किनाऱ्यावरची ललकारीच सदा आठवायची...)
``अहो मॅडम, मराठी पुस्तकांची एक आवृत्ती किती प्रतींची असते आणि मराठी पुस्तके किती खपतात हे तुम्हाला माहिती आहे ना..? आणि मी म्हणजे काय डॉमिनिक लापियर, सलमान रश्दी, जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे किंवा गिरीश कुबेर आहे का की ज्यांच्या मांडणीची, पुस्तकाची सगळीकडे, `सर्वदूर'' चर्चा होणार आहे.. ? मी मुद्दामहून तुमचं नाव गाळलेलं नाही हे परत परत सांगतोय..."
"...आणि तुम्ही तुमच्या पुस्तकात तुमचा पत्ताही दिलेला नाही... तुमचा पत्ता मला द्या.. माझी सर्व पुस्तके आजच तुम्हाला पाठवून देते.. मग तुम्हाला कळेल मी कोण आहे ते !!"
"ओ मॅडम, पुस्तके वाचणे मी आता पूर्ण बंद केले आहे मागच्याच महिन्यात घरात असलेली कितीतरी - तीनचार पोते - वाचलेली अन् न वाचलेली आणि यापुढेही कधी वाचणारही नाही अशी इंग्रजी - मराठी पुस्तके मी रद्दीत दिली... नको, तुमची ती पुस्तके तुमच्याकडेच ठेवा...!"
त्या क्षणाला आमच्या दोघांपैकी नक्की कुणी फोन आधी कट केला ते आता आठवत नाही......
----
आणि माझ्या `बदलती पत्रकारिता' (सुगावा प्रकाशन, पुणे २०१९) या पुस्तकातील `पत्रकारितेतील महिला' या प्रकरणातील (१९९४च्या आसपास Indian Express मध्ये छापलेले) हे छायाचित्र
Camil Parkhe December 17, 2021
May be an image of 3 people, people standing and text that says "without any benefits accorded to retiring officers. Written with Pune from inside a hot air bal- loon floating a few hundread wigs, know your bosses, was his approach. "Ãh you are from In- NEWSMAKERS: Anuradha Shah, Prasannakumar Keskar, Madhav Gokhale, Nanda Dabhoie-Kasabe, Camil Parkhe, Rachana Bisht Rawat, Vishwanath Hiremath and Manish Umbrajkar, part of Newsline sreporting team sharing a light moment in front of the lens. Photo by Milind Wadekar."

सी कॅथेड्रल ओल्ड गोव्यात बॉम जेसु बेसिलिकाच्या समोर आहे.

गोव्याला भेट देणाऱ्या बहुतेक सर्व पर्यटकांनी ओल्ड गोव्याला असलेल्या तांबड्या चिरांनी बांधलेल्या बॉम जेसू बॅसिलिकाला भेट दिलेली असतेच. या सतराव्या शतकातील भव्य चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हियर या संताच्या शरीराचे अवशेष किंवा रीलिक्स जपून ठेवलेले आहेत.

आज तीन डिसेंबर....सेंट फ्रान्सिस झेव्हियर याचा सण किंवा फेस्त.. गोवा राज्यात आज सार्वजनिक सुट्टी असते कारण या दिवशी ओल्ड गोवा येथे हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.
संत फ्रान्सिस झेव्हीयर हा गोवा आर्च डायोसिसचा पॅट्रन सेंट किंवा आश्रयदाता संत.. गोंयचो सायबा .... गोवन काथोलिकांचा हा एक मोठा सण.
मुंबई-पुणे हायवेवरचे चिंचवड स्टेशनजवळ आमच्या सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चचा आज सण. या सणाच्या वेळी मिस्साची शेवट या कोकणी गायनाने होईल.
जगभर जिथेजिथे गोवन कॅथोलिक आज हा सण साजरा करतील तिथेतिथे हे येथे दिलेले कोकणी गायन गायले जाईल. या गायनाची चाल अत्यंत सुंदर आहे.
यु ट्यूबवर एकदा ऐकून पहा.
हे कोकणी गायन रोमन लिपीत आहे पण वाचल्यावर त्याचा अर्थ मराठी वाचकाला बऱ्यापैकी कळेल.
Boas Festas! .... Happy feast to all !!!!!!!
SAM FRANCIS XAVIERA
Sam Francis Xaviera, vodda kunvra
Raat dis amchea mogan lastolea
Besanv ghal Saiba sharar Goyenchea
Samballun sodankal gopant tujea
Beporva korun sonvsarachi
Devachi tunven keli chakri
Ami somest magtanv mozot tuzi,
Kortai mhonn milagrir, milagri
Aiz ani sodam, amchi khatir
Vinoti kor tum Deva lagim
Jezu sarkem zaum jivit amchem,
Ami pavo-sor tuje sorxi

Saturday, December 4, 2021

प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि न अनुभवलेल्या मराठी साहित्य संमेलनांच्या काही आठवणी…
‘अक्षरनामा’  पडघम - साहित्यिक

पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत

  • Wed , 01 December 2021

आतापर्यंत खरे तर मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. ऐंशीच्या दशकात गोव्यात पणजीहून प्रसिध्द होणाऱ्या 'द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून आणि नंतर पुण्यात इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकांचा बातमीदार या नात्याने मी काही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन किंवा समारोप कार्यक्रमाची भाषणे कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो. मराठी साहित्य संमेलनातली ही उपस्थिती असायची ते केवळ उद्घाटक आणि इतर मुख्य पाहुणे मराठी साहित्याशिवाय इतर काही महत्त्वाचे मुद्दे मांडतील त्याची बातमी करण्यासाठी.

विशेष म्हणजे या उद्घाटक किंवा मुख्य पाहुण्यांनी आम्हा इंग्रजी दैनिकांच्या वार्ताहरांना कधीही निराश केले नाही. मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त बातमी मूल्य असलेल्या इतर विषयांवर त्यांनी बोलल्यामुळे इंग्रजी दैनिकांच्या अमराठी वाचकांसाठी सुद्धा त्यांचे मत महत्त्वाचें ठरायचे.
एका कोकणी साहित्य संमेलनावे उद्घाटन म्हणुन मराठी लेखक `स्वामी’कार रणजित देसाई यांचे भाषण माझ्यासाठी असेच विस्मरणीय ठरले. त्यावेळी पणजीहून आम्हा बातमीदारांना संमेलनस्थळी घेऊन जाणाऱ्या कारमध्ये एक नामांकित, आदरणीय साहित्यिक व्हीआयपी व्यक्ती होती. मी पुढें ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो आणि मागच्या सीटवर मडगावहून प्रसिध्द होणाऱ्या दैनिक `राष्ट्रमत’चे बालाजी गावणेकर, 'नवप्रभा'चे गुरुदास पेडणेकर यांच्याबरोबर बाकिबाब म्हणजे प्रसिद्ध कवी बा. भ. (बाळकृष्ण भगवंत ) बोरकर बसले होते.
मानेपर्यंत रुळणारे केस आणि खांद्यावर घेतलेली शाल असे या कविवर्यांचे रूप आजही माझ्या नजरेसमोर कायम आहे. मुखदुर्बळतेमुळे म्हणा किंवा भिडेखातिर मी बोरकर यांच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. मात्र त्यांच्याबरोबरच्या गाडीतील प्रवासाची ती स्मरणीय घटना माझ्या मनात खोलवर उमटली आहे हे निश्चित.
त्यानंतर दक्षिण गोव्यात भरलेल्या दुसऱ्या एका कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यावेळच्या केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी केले, तो प्रसंग आजही आठवतो. त्यावेळी कर्नाटकात मंगळूर येथे राहणाऱ्या अल्वा यांचे कानडी ढंगाचे, उच्चाराचे कोकणी समजून घेताना आम्हा बातमीदारांची कशी त्रेधातिरपीट झाली होती ते आजही स्पष्ट आठवते. (कोकणी भाषा ही देवनागरी लिपीबरोबरच रोमन आणि कन्नड लिपींतही लिहिली जाते. सरकारी पारितोषके मात्र फक्त देवनागरी लिपीतल्या साहित्याला दिली जातात.)
मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला बातमीदार म्हणून नाही तर एक ख्रिस्ती वाचक म्हणून मी हजर होतो. शिवसेनेचे स्थानिक नेते आणि आमदार नारायण राणे ऐनवेळी प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या विद्याभवन हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर नेल्सन मच्याडो यांनी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या साहित्य दिंडी नंतर संध्याकाळी राणेंच्या घरी जाऊन त्यांना संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची गळ घातली होती आणि ते लगेच राजी झाले होते.
``राजकारण्यांना साहित्य संमेलनात कशाला असा सन्मान द्यायचा?'' असा माझा नापसंतीचा सूर होता पण राणेंच्या उपस्थितीमुळे, त्यांच्याबरोबर आलेल्या फौजफाट्यामुळे, संमेलनाचा पुर्ण माहोल जो बदलला तो पाहून मग मी गप्पगार झालो.
शिवसेनेचे लढाऊ नेते अशी प्रतिमा असलेले नारायण राणे ख्रिस्ती समाजाच्या या मेळाव्यात काय मत मांडतील याबद्दलसुद्धा मी साशंक होतो. राणे यांच्या कोकणातील मतदारसंघात कॅथोलिक समाजाची संख्या लक्षणीय आहे. राणे यांच्या तिथल्या भाषणाने मात्र माझी निराशा केली नाही हे कबूल केले पाहिजे.
यावेळी संमेलनाध्यक्ष कवि निरंजन उजगरे होते. मराठी साहित्य संमेलने वाद झाल्याशिवाय गाजत नाहीत आणि आठवणीत राहत नाहीत. आपल्या भाषणात साहित्य संमेलनाध्यक्ष उजगरे यांनी ''दलित ख्रिस्ती' या शब्दप्रयोगाविषयी नापसंती व्यक्त केली आणि मग अशा वादाची ठिणगी पडलीच.
उजगरे यांची विधाने अशी होती:
"मध्यंतरी दलित ख्रिस्ती' चळवळ आणि त्यापाठोपाठ ' दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन' भरवण्यात आली. हा एकंदर प्रकारच अत्यंत चिंताजनक आहे. सर्व जातिजमातींमधून धर्मांतरीत झालेला ख्रिस्ती समाज ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने बांधला गेला आहे अशी आमची श्रद्धा असेल तर `दलित ख्रिस्ती' ही संकल्पना मान्य करता येणार नाही. पुन्हा एकदा अवमानित जगण्याकडे जाण्याची आमची मानसिक तयारी आहे का? अनुसूचित जातींना मिळणाऱ्या सवलतीसाठी आम्ही ' दलित ख्रिस्ती' ही पाटी गळ्यात अडकवणार का?"
झाले, या विधानामुळे उजगरे यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला. अलिकडेच, म्हणजे २०१८ ला दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे ज्यांनी अध्यक्षपद भूषविले ते निरोप्या ' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड या संमेलनात होते, कार्यकर्ते पौलस वाघमारे आणि माजी संमेनाध्यक्षा विजया पुणेकरसुध्दा होत्या.
काही दिवसांनी उजगरे यांनी आपले विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली होती.
तर या मालवणच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्थानिक मिलाग्रिस वर्चचे पॅरीश प्रीस्ट म्हणजे प्रमुख धर्मगुरु फादर ग्रॅब्रिएल डिसिल्वा होते. त्या तीन दिवसांच्या संमेलनात जेवणात मासळीचा मुबलक वापर असल्याने जमलेले रसिक आणि खवय्ये पाहुणेलोक या मालवणी पाहुणचाराबद्दल जाम खूष होते.
लातूर जिल्ह्यात उदगीर येथे भरलेल्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात मी पहिल्यांदा एक साहित्यिक म्हणून हजर होतो. हे संमेलन लक्षात राहिले ते त्यावेळी तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे.
हे संमेलन ख्रिस्ती धर्मांतरासाठी भरण्यात आले आहे असा आरोप करुन ते संमेलन उधळून लावण्याची धमकी एका स्थानिक दलित समाजघटकाने दिली होती. त्यामुळे जमलेल्या आम्हा पाहुण्यांना धड भोजनाची सुध्दा व्यवस्था झाली नव्हती. शेवटच्या दिवशी तर आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या एका पाळकाने म्हणजे पास्टरने सर्व पाहुण्यांना नॉनव्हेज जेवण भरपेट देऊन सुभाष चांदोरीकर आणि इतर आयोजकांची अब्रू वाचवली होती.
श्रीरामपूर येथे अनुपमा डोंगरे - जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली झालेल्या नवव्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके यांनी मात्र पाहुण्यांची शाही बडदास्त राखली होती.
ही सर्व साहित्य संमेलने लक्षात राहिली आहेत ती अशा वेगवेगळया साहित्यविरहीत संदर्भांनी. या सर्व संमेलनांना मी उपस्थित असल्याने या साहित्य जत्रा आठवणीत राहिल्या.
मात्र काही मराठी साहित्य संमेलनांना थेट हजर नसतानाही ही संमेलने झाल्यापासून साडेचार दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही आजही माझ्या मनात अगदी ताजी आहेत. ही संमेलने झाली त्यावेळीं म्हणजे सत्तरच्या दशकात मी शालेय विद्यार्थी होतो. तरीसुद्धा त्या संमेलनाआधी, संमेलनादरम्यान आणि संमेलन पश्चात झालेले कवित्व, वाद आणि घडामोडी मला आजही अगदी स्पष्ट आठवतात.
संमेलनात हजर नसतानासुद्धा माझ्या आठवणीत असलेली ही दोन मराठी साहित्य संमेलने म्हणजे इचलकरंजीत पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आणि त्यापाठोपाठ लगेच कराड येथे दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली ऐन आणीबाणीच्या काळात झालेले मराठी साहित्य संमेलन.
इचलकरंजीचे १९७४ सालचे संमेलन खास आठवते याचे कारण संमेलनाध्यक्ष पु.ल. देशपांडे. त्यात या संमेलनाची पन्नाशी पुर्ण झाली म्हणून साहित्य विश्वात खूप उत्साह होता. याकाळात मी शाळेत शिकत असलो तरी मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली होती आणि तो वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हणजे त्याकाळात नव्यानेच साक्षर झालेली पहिली किंवा दुसरी पिढी नियतकालिके आणि मासिके भरपूर, अगदी पुरवून पुरवून वाचत असे. या दैनिकांना आणि इतर नियकालिकांसाठी ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने म्हणजे मोठी पर्वणीच होती. मला वाटते पुलंच्या अध्यक्षतेखाली भरलेले हे साहित्य संमेलन हे मराठी ग्रंथकारांचे पहिलेच मोठे गाजलेले संमेलन, मोठी साहित्य यात्रा असावी.
इचलकरंजीचे हे संमेलन होण्यापूर्वी कितीतरी दिवस आधी नियकालिकांची पानेच्या पाने आणि रकाने साहित्य संमेलना विषयीच्या मजकुराने भरली होती. संमेलनाध्यक्षकांचे संपूर्ण भाषण पान एकवरुन आतल्या पानावर आणि उद्घाटकांच्या भाषणाचा वृत्तान्त हा पान एक्वरची पहिली बातमी म्हणजे लीड न्युज होती. त्याशिवाय दैनिकांची इतर सर्व पाने संमेलना विषयीच्या बातम्यांनी भरलेली होती.
कराड येथील साहित्य संमेलन भरण्याआधीच त्याभोवती वादाचे ढग जमायला सुरुवात झाली होती. संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत आणि यजमान किंवा स्वागताध्यक्ष होते कराडचे सुपुत्र आणि देशाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे साहित्य संमेलन होणार होते त्यावेळचा काळ आणि परिस्थिती.
हा काळ होता पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशभर लादलेल्या आणीबाणीचा. देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व नेते त्यावेळी तुरुंगात होते. प्रसारमाध्यमांत सेन्सॉरशिप लागू होती.
आणीबाणी होती तरी कराड इथल्या साहित्य संमेलनातल्या सर्व बातम्या दैनिकांच्या आम्हा वाचकांपर्यंत पोहोचत होत्या. मावळते संमलनाध्यक्ष पु. ल. देशपांडे यांनी नव्या संमेलनाद्यक्षा दुर्गा भागवत यांच्याकडे सूत्रे सोपवतना केलेले भाषण, क्षणचित्रे वगैरे सर्व वृत्तांत यांनी वृत्तपत्रांची रकाने भरली होती.
"खूप वापर होत गेला तर मेलेल्या कातडीपासून बनवलेले वहाणसुध्दा कुरकुरायला लागते.," अशा आशयाचे या संमेलनात पुलंनी म्हटलेले आणि दैनिकांत वाचलेले एक वाक्य अजूनही मी विसरलेलो नाही.
कराड इथले हे मराठी साहित्य संमेलन हे या ग्रंथकारांच्या मेळाव्याच्या इतिहासातील अनेक कारणांनी आणि अर्थांनी आतापर्यंत सर्वांत गाजलेले आणि ऐतिहासिक संमेलन म्हणता येईल.
हे संमेलन पार पडल्यानंतरसुद्धा तिथले कवित्व लगेच संपले नाही. संमेलनानंतर लवकरच संमेलनाध्यक्षा दुर्गाबाईना अटक झाली आणि आणीबाणी शिथिल झाल्यावरच त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
त्यानंतर जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कराड येथील मावळते आणि नवीन असे दोन्ही संमेलनाध्यक्ष - पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत - सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या विरोधात हिरीरीने उतरले आणि काँग्रेसचे निवडणुकीत पानिपत झाल्यावर दोघेही पडद्याआड झाले.
कराडचे हे गाजलेले आणि आताही बहुचर्चित असलेले हे साहित्य संमेलन मी संमेलनस्थळी न जाताही अशाप्रकारे वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनुभवले.
योगायोगाने केवळ एक वर्षांतच जेसुईट ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी मी कराड येथेच आलो. तिथे टिळक हायस्कूलात अकरावीचे शिक्षण घेताना तिथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाची आठवण येणे साहजिकच होते. तेव्हा म्हणजे १९७६ ला आणीबाणी पर्व चालूच होते.
आजही पुण्याहून गोव्याला जाताना आणि तेथून परतताना कृष्णाकाठचे कराड लागतेच. त्या थांब्यावर असताना कराडमधला माझा तो एक वर्षाचा काळ आणि त्याआधीचे पुलंनी आणि दुर्गाबाईनी गाजवलेले ते ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन हमखास आठवते.
कराडचे ते साहित्य संमेलन मराठी सारस्वतांनीच नाही तर सर्व भारतीयांनी सदा स्मरणात ठेवावे असेच आहे.
आणीबाणीच्या काळात कराडचे साहित्य संमेलन होत होते त्यावेळी सुध्दा सर्वकाही अलबेल आहे असे मानणारे आणि सांगणारे लोक बहुसंख्य होते.
सद्याच्या विविध क्षेत्रांतील अनेक अर्थांनी भरकटलेल्या परिस्थितीत तर कराड येथील ते साहित्य संमेलन एखाद्या दिपगृहासारखे दिशा दाखवणारे झाले आहे. पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या कणखर, परिणामांची पर्वा न करता राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावणाऱ्या, स्पष्टवक्त्या साहित्यिकांची कमतरता तर खूपच जाणवते आहे.