पंढरीच्या वारी
```राम कृष्ण हरी.. ''
``राम कृष्ण हरी''
सन २००४ ला मी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरचा `टाइम्स ऑफ इंडिया' सोडून शनिवारवाडयालागून असलेल्या `सकाळ' वृत्तसमूहाच्या इमारतीत 'महाराष्ट्र हेराल्ड' ला रुजू झालो तेव्हापासून जूनच्या या काळात फोनवर ``राम कृष्ण हरी.. '' या शब्दांनी अभिवादन केले जायचे .
याचे कारण याकाळात देहू आणि आळंदी येथे पालखी सोहोळ्याची लगबग सुरु व्हायची, तेव्हापासून मी `सकाळ’ वृत्तसमूहाच्या तिथल्या स्थानिक वार्ताहरांशी संपर्कात असायचो आणि त्यांच्यांशी बोलूनच मग आमच्या इंग्रजी दैनिकात दररोज पंढरपूरच्या आषाढी वारीसंदर्भात एक बातमी द्यायचो.
या दोन्ही तिर्थक्षेत्रांतील वार्ताहरांना फोन लावला कि तिकडून ``राम कृष्ण हरी'' असे अभिवादन यायचे अणि माझ्याकडून पण मग तस्साच प्रतिसाद जायचा.
पुण्यातल्या आमच्या `महाराष्ट्र हेराल्ड' (नंतरचे `सकाळ टाइम्स' ) इंग्रजी दैनिकाच्या वाचकांसाठी या पालखी सोहोळ्याची सर्वांत पहिली आणि महत्त्वाची बातमी असायची ती म्हणजे दोन्ही पालख्यांचे - संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालख्यांचे - आळंदी आणि देहू येथून कधी प्रस्थान होणार, पुण्यात या पालख्या कोणत्या तारखेला आणि कधी येणार आणि पुण्यातून प्रस्थान कुठल्या वारी होणार.
याबाबत पुण्यात डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर , डेक्कन कॉर्नर, वगैरे परिसरांत राहणाऱ्या किंवा तेथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांना पुण्यात पालख्या कधी येणार याविषयी आगाऊ माहिती असणे आवश्यक असते. याचे कारण प्रचंड गर्दीमुळे त्यादिवशी या परीसरात अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असतात. त्यादृष्टीने पालखी सोहोळ्याची ही सलामीची बातमी फार महत्त्वाची असते.
ही पहिली बातमी पुण्यातल्या इंग्रजी दैनिकांत सर्वप्रथम मी द्यावी याबाबत मी नेहेमी दक्ष असे. पंढरीच्या वारीनिमित्त या दोन्ही ठिकाणी महिनाभर आधी तयारी सुरु असते, पालखीच्या रथासाठी बैलांची निवड होते, पालखी रथ तयार केला जातो, पालखीतल्या अश्वांची निवड असते, याबाबतच्या बातम्या वेळोवेळी मी देत असे.'
दोन वर्षांपूर्वी कोविड महामारीने आमच्या इंग्रजी दैनिक ``सकाळ टाइम्स’चासुद्धा बळी घेतला तेव्हापर्यंत इमानेइतबारे मी या बातम्या द्यायचो, दोन्ही पालखीचे आपापल्या ठिकाणांहून प्रस्थान होईपर्यंत दररोज या बातम्या मी द्यायचो.
ज्ञानदेव आणि तुकोबांच्या पालख्या पुणे शहरात आल्या कि या बातम्यांच्या पालखीची धुरा मग `महाराष्ट्र हेराल्ड- सकाळ टाइम्स’च्या बातमीदारांचा चमू आणि फोटोग्राफर्स यांच्याकडे जायची आणि मग पुढच्या वारीपर्यंत माझा वारकरी संप्रदायाशी असलेला संबंध खंडीत व्हायचा.
पंढरीच्या वारीशी आणि पालखी सोहोळ्याशी संबंधित असलेले हे काही प्रसंग मी कसे विसरेल? सन १९९९ ला पुणे कॅम्पातला `इंडियन एक्सप्रेस’ सोडून मी `टाइम्स ऑफ इंडिया’ला रुजू झालो. `टाइम्स’चे ऑफिस त्यावेळी नुकतेच शिवाजीनगरचा तात्पुरत्या आवारातून फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या स्वमालकीच्या अत्याधुनिक वातानुकूलित इमारतीत स्थलांतर झाले होते.
फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणजे पालखी मार्गावरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा. दोन्ही पालख्या पुण्यातल्या आपल्या रात्रीच्या मुक्कामी जागी जाण्याआधी या टप्प्यावर सर्वाधिक भाविक दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. तर १९९९ साली पहिल्यांदाच दोन्ही पालख्यांचे आणि अर्थातच दोन्ही संतांच्या पादुकांचे अगदी जवळून दर्शन घडले. याचे कारण म्हणजे `टाइम्स’ किंवा बेनेट अँड कोलेमन समुहाच्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावरच्या गच्चीतून या पालखी मिरवणुकीचे आणि पादुकांचे जवळून दर्शन घडते.
पालखी आणि पादुका दर्शनांचा तो क्षण आजही माझ्या नजरेसमोर आहे.
नंतर पुढच्या काही वर्षांत `टाइम्स ऑफ इंडिया’च्या ऑफिसमधून खाली उतरुन वारीच्या मिरवणुकीत सामील झालो, त्यावेळी कपाळावर लावला गेलेला बुक्का चिंचवडला रात्री घरी जाईपर्यंत मी कायम ठेवायचो. जॅकलीनचा त्याबद्दल आक्षेप असण्याचा प्रश्नच नव्हता. आदितीला - आमच्या मुलीला - वारीचा हा अनुभव देणे आम्हा दोघांनाही नक्कीच आवडले असते. आदितीला आम्ही गणपती मूर्ती विसर्जनालाआणि विसर्जन मिरवणुकीला दरवर्षी नेत होतोच. पण पंढरीच्या वारीच्या सोहोळ्याचा अनुभव काही वेगळाच.
मॉन्सूनच्या बातम्यांत विशिष्ट शब्दयोजना असते, अनेकदा मानवी भावनांचा वापर केला जातो असे म्हटले होते, जसे कि मान्सून रुसला, रेंगाळला, दांडी मारली, प्रसन्न झाला, परतला, वगैरे. पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहोळ्याच्या बातम्यांची आपली स्वतःची अशी वेगळीच परिभाषा असते, वेळोवेळी पालखी मिरवणुकीचे वृत्तांकन केले कि मग ही परिभाषा अंगवळणी पडते.
इथे ज्ञानोबांची पालखी पहिल्या दिवशी `टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान' करते, मात्र ती आळंदीलाच असते, त्या पहिल्या दिवशी या पालखीचा 'मुक्काम' हा `आजोळी' असतो. पालखींचा `विसावा' असतो, पाद्यपूजन असते, मार्गावरच्या नदीत पादुकांचा स्नानसोहोळा असतो, पहिले, दुसरे `रिंगण असते, तुकाराम महाराज आणि ज्ञानदेव महाराजांच्या दोन्ही पालख्यांची एका ठिकाणी भेटसुद्धा होते आणि नंतर या आपापल्या वेगळ्या मार्गाने प्रस्थान करतात.
पंढरीची वारी समजावून घ्यायची असेल तर वारकऱ्यांबरोबर काही पावले चालणे आवश्यक आहे. बातमीदाराने किंवा फोटोग्राफरने स्वतःच्या वाहनाचा वापर करत वारीच्या बातम्या आणि फोटो देणे वेगळे आणि त्यासाठी स्वतः पायी चालत, घाम गाळत आणि पाऊस झेलत वारी करणे वेगळे.
इथे वारीमध्ये सामिल होणारा प्रत्येक 'माऊली' `माऊली' असतो, प्रत्येकाला `माऊली' हेच संबोधन वापरले जाते. मागे एकदा इस्कॉनच्या मंदिराला आणि तिथल्या आवारात चालू असलेल्या विविध उपक्रमांना भेट दिली तेव्हा तिथे सगळेजण एकमेकांना 'प्रभू', 'प्रभू' असेच संबोधत होते हे आता आठवले.
दैनिकांचे अनेक बातमीदार आळंदी किंवा देहू तीर्थक्षेत्रांपासून पुण्यापर्यंत पालख्यांबरोबर येतात, पालख्यांनी पुण्यात दोन मुक्काम केल्यावर काही बातमीदार पुण्याहून दिवे घाटापर्यंत पालख्यांची सोबत करतात आणि पुण्यातल्या आपल्या मुख्यालयात परततात. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते तशी.
`महाराष्ट्र हेराल्ड’मध्ये कौस्तुभ कुलकर्णी, शर्वरी जोशी, मयुरेश कोन्नूर या तीन तरुण पत्रकारांनी पुण्यापासून पंढरपूरपर्यंत संपूर्ण वारीचे वार्तांकन केल्याचे आठवते. सन २००४ साली इंग्रजी पत्रकारितेतील `पहिला वारकरी बातमीदार' म्हणून कौस्तुभ कुलकर्णी याला पाठवायची कल्पना `महाराष्ट्र हेराल्ड'चे तेव्हाचे संपादक प्रदुमन महेश्वरी यांची. एका बातमीदाराने संपूर्ण वारी करण्याची परंपरा मराठी दैनिकांत आधीपासून असली तरी इंग्रजी पत्रकारितेतील २१ दिवसांची संपूर्ण वारी करणारे हे पहिलेच पत्रकार, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आणि इतरांमध्ये तेव्हा केव्हढे अप्रूप असायचे.
बातमीदार कौस्तुभ कुलकर्णीने पूर्ण वारी केली आहे असे कळताच एका मध्यमवयीन गृहस्थाने कौस्तुभच्या पायी लोटांगणच घातले होते ! वारी करुन परतलेल्या वारकऱ्यांच्या पायी पडण्याची आपल्याकडे परंपराच आहे, असे लोटांगण घातल्याने हा नमस्कार थेट पांडुरंगाला पोहोचतो अशी श्रद्धा आहे.
काही वर्षांपूर्वी मी बायको आणि मुलीसह इटलीमधील व्हॅटिकन सिटी, रोम, फ्रान्समधील मेरियन डिव्होशन सेंटर लुर्ड्स वगैरे तीर्थस्थानांची म्हणजे होली लँडची यात्रा करुन परतलो तेव्हा पलेसुद्धा कुणी `असे' स्वागत करेल काय असा एक गंमतीदार विचार माझ्या मनात आला होता.
पालखी सोहोळा किंवा पंढरपूरच्या वारींचा अभ्यास करायचा किंवा लिहायचे म्हणजे काही तज्ज्ञांना वाट पुसणे भाग पडते. पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा ऐवज, त्यावर कितीतरी लिहिले गेले आहे. अनेक नामवंत लोकांनी याबाबत पायाभूत स्वरुपाचे लिहिले आहे.
दि. बा. मोकाशी यांनी साठच्या दशकात लिहिलेले 'पालखी' हे पुस्तक माझ्या फार आवडीचे. सन १९६१ ला पानशेत धरण फुटले त्याच काळात झालेल्या वारीमध्ये मोकाशी संशोधनासाठी सामिल झाले होते. त्याच तटस्थ दृष्टिकोनातून हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीला चित्रकार रवि मुकुल यांची सुंदर रेखाटने आहेत.
त्याशिवाय ज्येष्ठ मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे एकदा पंढरपूरच्या वारीत सश्रद्ध मनाने सहभागी झाल्या ती वारी त्यांनी आपल्या 'वाटचाल' या प्रदीर्घ लेखात रेखाटली आहे. या वार्षिक वारीत `हौशे, नवशे आणि गवसे' असतात, या सर्वांचे वर्णन मोकाशी आणि इरावतीबाई करतात.
आपल्या या लेखात महाराष्ष्ट्रातील विविध प्रांतांतील -मोगलाई, खानदेश, वऱ्हाड, नाशिक, सोलापूर - विविध जातींचे लोक पंढरीच्या वारीला येतात असे इरावती कर्वे यांनीं म्हटले आहे, ''ज्या देशातील लोक पंढरीला येतात तो महाराष्ट्र ' अशी महाराष्ट्राची एक नवी व्याख्या मला कळून आली' असे इरावतीबाई म्हणतात.
पुण्यातल्या डेक्कन कॉलेजात शिकवणाऱ्या इरावतीबाईंचा समाजशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. महाराष्ट्राची त्यांनी केलेली आणखी एक व्याख्या आहे: ''जेथपर्यंत महार पोहोचले तिथपर्यंत महाराष्ट्र !''
दुर्गा भागवत यांनीसुद्धा `पंढरीचा विठोबा' या शिर्षकाचा एका वेगळ्या आशयाचा लेख त्यांच्या `पैस' या पुस्तकात लिहिला आहे.
त्याशिवाय परदेशी संशोधक गाय दलरी, सोन्थायमर वगैरे नावे पंढरी वारीच्या अभ्यासात घेतली जातातच. त्याशिवाय दिलीप पुरुषोत्तम चित्रे अशी अनेक नावे आहेतच .
प्राच्यविद्या पंडित जर्मन जेसुईट आणि पुण्यातल्या `स्नेहसदन’ आश्रमाचे संस्थापक फादर मॅथ्यू लेदर्ले यांनीही वारकऱ्यांचा भक्तीभाव जाणून घेण्याच्या हेतूने एकदा पूर्ण वारी केली होती. `` तुकारामांच्या अभंगांनी मला भुरळ घातली आहे. स्वर्गात पोहोचलो म्हणजे मी संत तुकारामांची नक्कीच गाठ घेईन आणि त्यांचे अभंग स्वतःच्याच वाणीमध्ये गाण्याची त्यांना विनंती करेन'' हे फादर लेदर्ले यांचे वाक्य प्रसिद्ध आहेच.
फोटोग्राफर संदेश भंडारे यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पंढरपूरची वारी कव्हर केली आहे आणि `वारी- एक आनंदयात्रा' या पुस्तक रुपात ही वारी उपलब्ध आहे. (हा इथला फोटो संदेश भंडारे यांचाच. )
वारी अनुभवायची असली तर वारकऱ्यांसोबत अशी काही पाऊले चालायलाच हवी.