Showing posts with label Francis D'Britto. Show all posts
Showing posts with label Francis D'Britto. Show all posts

Wednesday, April 27, 2022

 एक वेगळा प्रवाह - मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन पुण्यात १८७८ साली पार पडले. महाराष्ट्राच्या समाजजीवनात वेगवेगळ्या क्षेत्रांत नव्या मुहूर्तमेढ उभारणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडेच मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ करण्याचाही मान जातो. यानंतरच्या काळात महाराष्ट्रात आणि इतरत्र मराठी साहित्य संमेलने होत राहिली. मुख्य प्रवाह मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून वेगळे होऊन समांतर किंवा वेगळे अस्मिता दर्शवणारी विद्रोही, ग्रामीण, दलित, मुस्लीम, नास्तिक, कोकण, मराठवाडा अशी प्रादेशिक पातळीवरची आणि विविध विचारसरणीला वाहिलेली अनेक साहित्य संमेलने आजकाल होत असतात.

मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे होऊन पहिल्यांदा वेगळी चूल मांडण्याचे धाडस ख्रिस्ती साहित्य संमेलन या वेगळ्या प्रवाहाने शंभर वर्षांपूर्वीच केले होते हे मात्र अनेकांना माहितही नसेल.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८ आणि १९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत येथे पार पडले आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते रेव्हरंड निकल मॅक्लिकल. या 'महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांच्या पहिल्या साहित्य संमेलना*ला सात ख्रिस्ती पंथांच्या पन्नास प्रतिनिधींसह दिडशे लोक हजार होते.
मराठी साहित्य संमेलनातून याप्रमाणे अनेक नावे प्रवाह वेगळे झालेले असले तरी त्यापैकी अनेक काळाच्या ओघात नंतर लुप्त झाले आहेत वा केवळ अस्तित्व राखून आहेत. शतकापूर्वी वेगळी वाट चोखणारा ख्रिस्ती संमेलनाचा प्रवाह मध्यंतरीच्या काही दशकांचा अपवाद वगळता आजही वाहता आणि खळाळता राहिला आहे.
गंमत म्हणजे कालांतराने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नामांतर झालेल्या मूळ ग्रंथकारांच्या संमेलनातून फारकत घेतलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांतूनसुद्धा मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने १९९२ पासून स्वतंत्र चूल मांडली आहे आणि आतापर्यंत वेगळी तब्बल दहा संमेलने भरवली आहेत.
विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्त्य संमेलनांचे जसे दस्तऐवजीकरण झाले आहे तसेच या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे आणि हो, मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचेसुद्धा दस्तऐवजीकरण झाले आहे. या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलीत करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे योगदान सुनिल श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे.
'धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा ! शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा' ' या शिर्षकाचा चारशेदहा पानांचा जाडजूड ग्रंथ (दिलीपराज प्रकाशन, पुणे) आढाव यांनी पुढील पिढयांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला आहे. .
या ग्रंथाचे विशेष महत्त्व म्हणजे संमेलनाध्यक्षांच्या भाषणांबरोबरच ग्रंथकाराने 'समीक्षकाच्या दृष्टिकोनांतून' या शिर्षकाच्या लेखातून प्रत्त्येक संमेलनांची पूर्वपीठिका आणि त्यात्या संमेलनाध्यक्षांनी मांडलेल्या विचारांची समीक्षा केली आहे. मराठी साहित्यातील ख्रिस्ती साहित्याचे आणि साहित्यिकांचे स्थान, ख्रिस्ती साहित्याची व्याख्या, या साहित्याचा साहित्यिक आणि वैचारीक दर्जा, संमेलनाध्यक्षांचे उपस्थित केलेले मुद्दे, या शतकभरात मराठी ख्रिस्ती साहित्यजगात उमटलेली वादळे, वगैरे विविध विषयांचा आढाव यांनी या ग्रंथात उहापोह केला आहे. त्यादृष्टीने हा ग्रंथ केवळ मराठी साहित्यक्षेत्रासाठीच नव्हे तर एकूण मराठी साहित्यक्षेत्रासाठी .एक मौलिक ऐवज ठरतो.
.
१९२७ नंतर चार संमेलने सलग झाल्यानंतर १९३३ नंतर पुढचे ख्रिस्ती साहित्य संमेलन भरायला १९७२ साल उजाडावे लागले. त्यानंतर मात्र कॅथोलिक आणि प्रोटेस्टंटपंथीय साहित्यिकांनी अगदी चंग बांधून वेळोवेळी ही संमेलने भरवली आहेत. विविध कारणांमुळे या संमेलनांच्या क्रमसंख्यांविषयी मात्र स्पष्टता नाही हे आढाव यांनी आपल्या ग्रंथात स्पष्ट केले आहे. काही संमेलनांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.
गेल्या शतकभरात एकूण पस्तीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने झाली असून त्यात पंचवीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि दहा मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा समावेश होतो. आगामी सव्वीसावे मराठी ख्रिस्ती साहित्य साहित्य संमेलन मे महिन्यात बीड येथे होणार आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीबाबत १९७२ पासून एक अलिखित संकेत पाळला जातो, तो म्हणजे एकदा कॅथोलिक आणि त्यानंतर प्रोटेस्टंट असे साहित्यिक या पदासाठी आलटूनपालटून निवडले जातात. गेल्या काही दशकांच्या या पायंड्याकडे पाहू जाता कॅथोलिक म्हणजे वसईकडचा साहित्यिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे वसईउर्वरीत महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष बनलेले आहेत. वसईबाहेरच्या महाराष्ट्रातील एकही कॅथोलिक आतापर्यंत मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष झालेला नाही.
गेल्या वेळेस नाझरेथ मिस्किटा हे कॅथोलिक साहित्यिक मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष झाल्याने यावेळेस बीड येथे होणाऱ्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक प्रोटेस्टंट साहित्यिक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक आहेत.
आतापर्यंतच्या इतर मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. दुसरे - मनोहर कृष्ण उजगरे ((मुंबई १९३०), तिसरे -देवदत्त नारायण टिळक (निपाणी १९३२) चौथे - लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), पाचवे आणि सहावे- सत्यवान नामदेव सूर्यवंशी (मुंबई आणि पुणे- १९७२), सातवे - फादर डॉमनिक आब्रिओ (नंतर औरंगाबाद धर्मप्रांताचे पहिले बिशप- मुंबई १९७३) , दहावे - भास्करराव जाधव (बारामती १९७५), ,अकरावे - रॉक कार्व्हालो (सोलापूर १९७७), बारावे - रामकुंवर सूर्यवंशी (अहमदनगर १९८१) , तेरावे - फादर एलायस बी रॉड्रिग्स (मुंबई १९८४), चौदावे- जयंतकुमार त्रिभुवन, (कोल्हापूर १९८६), पंधरावे - विजया पुणेकर (मुंबई १९९०), सोळावे - फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), - सतरावे - निरंजन उजगरे (मालवण १९९४), अठरावे -सुधीर देवीप्रसाद शर्मा (नागपूर १९९८), एकोणिसावे - -सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००), विसावे - देवदत्त हुसळे (अहमदनगर २००१), एकविसावे -अनुपमा उजगरे (मुंबई २००५) , बाविसावे सुभाष पाटील (जालना २००७ ), तेविसावे - फादर मायकल जी. (वसई २००९), चोविसावे -अशोक आंग्रे (अहमदनगर, २०११ ), आणि पंचविसावे- नाझरेथ मिस्किटा (सोलापूर २०१४ ).
दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने - पहिले - अरविंद पी. निर्मळ (अहमदनगर -१९९२), दुसरे - सत्यवान नामदेव सूर्यवंशी (जालना १९९३), तिसरे - अरविंद पी निर्मळ (लोणावळा १९९४), चौथे - देवदत्त हुसळे (अहमदनगर- १९९५), पाचवे - बिशप प्रदीप कांबळे (पुणे २००१), सहावे - सुभाष चांदोरीकर (संगमनेर २००४), सातवे - डॉ. गिल्बर्ट लोंढे (नागपूर २००६), आठवे - वसंतराव म्हस्के (उदगीर २००८), नववे - अनुपमा डोंगरे-जोशी (श्रीरामपूर २०११) आणि दहावे - फादर ज्यो गायकवाड (श्रीरामपूर २०१८),
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने यांच्यात तुलनात्मकरित्या पाहू गेल्यास काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. मराठी साहित्यात महिलांचे योगदान फार पूर्वीपासून आहे, आठ शतकांपूर्वी होऊन गेलेल्या संत मुक्ताबाईंपासून ही स्त्रीसाहित्याची परंपरा आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सुरु झालेल्या आणि आता शंभरीच्या जवळ आलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच स्त्रियांना मिळाला आहे. कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर), दुर्गा भागवत (कऱ्हाड), शांता शेळके (आळंदी ) विजया राजाध्यक्ष (इंदूर) आणि अरुणा ढेरे (यवतमाळ २०१९) या त्या पाच महिला संमेलनाध्यक्ष.
याउलट केवळ पस्तीस संख्येच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या मात्र आतापर्यंत सहा महिला संमेलनाध्यक्षा झालेल्या आहेत, यापैकी पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या आणि एक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या.
आतापर्यंत होऊन गेलेल्या पंचवीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांबाबतीत आणखी दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे यापैकी अनेक जण एकाच घरातील वा कुटुंबातले आहेत. लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांचा मुलगा देवदत्त टिळक असे मायलेक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि त्यांच्या बहिण रुपकुंवर सूर्यवंशी असे भाऊबहिण , मनोहर कृष्ण उजगरे आणि त्यांच्याच घराण्यातले निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे हे दाम्पत्य अशा व्यक्ती संमेलनाध्यक्ष झालेल्या आहेत.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन या दोन्ही प्रवाहांतील संमेलनाध्यक्षपद अनेक धर्मगुरुंनी भुषवले आहे, यात कॅथोलिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, बिशप डॉमनिक आब्रिओ यांच्यासह प्रोटेस्टंट रेव्हरंड निकल मॅक्लिकल, रेव्ह. अरविंद पी निर्मळ आणि बिशप प्रदीप कांबळे यांचा समावेश होतो. मराठी ख्रिस्ती साहित्यप्रवाह अजूनही ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरु यांच्या प्रभावाखाली आहे हेच यातून दिसून येते.
वादविवाद, आरोपप्रत्यारोप नाही तर मराठी साहित्य संमेलन नाही. ख्रिस्ती साहित्य संमेलनेही यापासून लांब राहिलेली नाही, ''ख्रिस्ती साहित्य" या शब्दाची व्याख्या, दलित ख्रिस्ती हा अमंगळ शब्दप्रयोग अशा अनेक वादांनी ही संमेलनेही गाजलेली आहेत.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांत मराठी साहित्यक्षेत्रातील अनेक दिग्गज्जांनी हजेरी मांडली आहे, पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष असलेल्या संमेलनावेळी शांता शेळके उदघाटक होत्या, समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान उपस्थित होते. मुंबईच्या विजया पुणेकर संमेलनाध्यक्ष असताना कविवर्य नारायण सुर्वे प्रमुख पाहुणे होते. नागपूरच्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात वामन निंबाळकर हे एक व्याख्याते होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन यांच्यांमध्ये जसे विळ्या-भोपळ्याचे सख्य किंवा छत्तीसावा आकडा आहे, अगदी तशी स्थिती (मुख्य प्रवाहातले !) मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन यांच्यात आहे. अनेक मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांत `दलित ख्रिस्ती' या शब्दावर आणि वेगळ्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांवर तोंडसुख घेतले आहे.
मराठी दलित ख्रिस्ती चळवळीचे प्रणेते अरविंद पी. निर्मळ यांनी १९९२ अहमदनगरमध्ये पहिले मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन भरवले त्यावेळी प्रचंड विरोधामुळे ऐनवेळी संमेलनाच्या जागा बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती. परिस्थितीत आज २०२२ मध्येही यात फार बदल झालेला नाही. आजसुद्धा `दलित ख्रिस्ती' हा शब्द गावकुसाबाहेरच आहे.
ज्यांचे पोट भरले आहे अशांची प्रवृत्ती ख्रिस्ती दलितत्वाचे वास्तव सरळसरळ नाकारण्याची असते. याउलट आपल्या दलितत्वाचे वास्तव नाकारले तर ख्रिस्ती असल्याने इतर दलितांना दिल्या जाणाऱ्या सर्व आरक्षणादी सोयीसुविधांवर पाणी सोडावे लागते म्हणून या दलितत्वावर हक्क सांगितलं जातो. पूर्वास्पृश्य असलेल्या सर्व हिंदू. शीख आणि बुद्ध समाजाला लागू असलेल्या सोयीसुविधा आणि आरक्षण पूर्वास्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजालाही द्याव्यात आणि त्यासाठी इतरांसारखे त्यांचेही दलितत्व मान्य करावेच लागेल. असा हा तिढा आहे.
आतापर्यंत दोनच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांना मी आवर्जून हजर राहिलो आहे, मालवणचे १९९४ चे संमेलन आणि २०११ चे अहमदनगरचे संमेलन. मालवणच्या १९९४च्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाआधीच संजय सोनवणी यांनी `उत्तुंग' हा माझा व्यक्तिचित्रसंग्रह प्रकाशित केला होता, मी मात्र संमेलनात प्रेक्षक म्हणून हजर होतो.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष हे पद भूषवलेल्या व्यक्तींच्या नावावर एकही पुस्तक नाही वा संमेलनाध्यक्षपदावर निवड होईपर्यंत नव्हते असे अनेकदा झाले आहे. तर जोसेफ तुस्कानो आणि अनिल दहिवाडकर अशी मोलाची साहित्यिक सेवा करणारी माणसे संमेलनाध्यक्षपदापासून लांब राहिली आहेत.
मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या नागपूर, उदगीर आणि श्रीरामपूर येथल्या अनेक मांडवांत आणि व्यासपीठांवर मात्र मी अगदी हौसेने मिरवलो आहे. सत्कारही करवून घेतला आहे.
------
फोटो कॅप्शन्स : लक्ष्मीबाई टिळक, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अनुपमा उजगरे, सिसिलिया कार्व्हालो आणि अनुपमा डोंगरे-जोशी

`निरोप्या'कार आर्चबिशप हेन्री डोरिंग

बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली ‘दर्पण’ मासिक सुरू करून मराठी वृत्तपत्रकारितेचा पाया रोवला. त्यानंतर मराठी भाषेत अनेक नियतकालिके सुरू करण्यात आली. यापैकी बहुतेक नियतकालिके आज काळाच्या ओघात गडप झाली आहेत. ‘ज्ञानोदय’ हे 1842 साली सुरू झालेले नियतकालिक आजही पुण्यातून प्रसिद्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वळण या आजही अत्यंत आडवळणाच्या ठिकाणी असलेल्या खेडेगावी फादर हेन्री डोरिंग या येशूसंघीय जर्मन धर्मगुरूने ‘निरोप्या’ हे मासिक 1903 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू केले. हे मासिक अजूनही पुण्यातून प्रकाशित होत आहे.

4 जानेवारी 1881 पासून गोपाळ गणेश आगरकर यांच्या संपादकत्वाखाली ‘केसरी’ हे नियतकालिक सुरू झाले. त्यामुळे सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेल्या मराठी नियतकालिकांमध्ये ‘निरोप्या’ या मासिकाने या एप्रिल २०२२ महिन्यात एकशेविसाव्या वर्षांत पदार्पण केले आहे ही बाब कौतुकास्पद आहे.
मराठी भाषिक कॅथोलिक समाजाची आध्यात्मिक गरज भागविणाऱ्या, या समाजातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वृत्त पुरविणाऱ्या या मासिकाची महाराष्ट्रातील विविध भागातील त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यातील मराठी भाषक ख्रिस्ती वाचक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. यावरून या मासिकाची लोकप्रियता लक्षात येते.
हिंदू मागासवर्गीय जातींतून नव्यानेच ख्रिस्ती धर्मात आलेल्या अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या समाजासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नियतकालिक सुरू करणारे फादर हेन्री डोरिंग हे धर्मगुरू निश्चितच द्रष्ट्ये मिशनरी होते हे यावरून दिसून येते. ‘निरोप्या’च्या या संस्थापकाचे त्यामुळे मराठी भाषिक ख्रिस्ती समाजावर आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेवर मोठे ॠण आहेत.
विशेष म्हणजे ‘ज्ञानोदय’ आणि ‘निरोप्या’ ही मराठीतील दोन्ही दीर्घायुषी मासिके मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाची मुखपत्रे आहेत. ‘ज्ञानोदय’ हे रेव्ह. हेन्री बॅलन्टाईन या अमेरिकन धर्मगुरूने सुरू केलेले नियतकालिक प्रॉटेस्टंट समाजात, तर ‘निरोप्या’ हे कॅथोलिक समाजात प्रामुख्याने वितरित केले जाते. या मासिकांचा खप केवळ ख्रिस्ती समाजापुरताच मर्यादित असला तरी महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराचे या नियतकालिकांत प्रतिबिंब उमटत असल्याने संपूर्ण मराठी समाजाची ही मासिके एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत.
हेन्री डोरिंग यांचा जन्म जर्मनीत बोकोल्ट येथे 13 सप्टेंबर 1859 रोजी झाला. 1882 मध्ये त्यांना गुरुदीक्षा मिळाली. 1895 मध्ये फादर डोरिंग यांचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीपाशी असलेल्या वळण येथे आगमन झाले. वळण शेजारी असलेले केंदळ हे गाव अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या खेडेगावातूनच कॅथोलिक मिशनरींनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वप्रथम धर्मप्रसार सुरू केला. आज अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, बीड, पुणे या जिल्ह्यात मराठी भाषिक कॅथोलिक ख्रिस्ती समाजाची मोठी संख्या आहे. यापैकी बहुसंख्य लोकांनी पूर्वाश्रमीच्या हिंदू महार या अस्पृश्य जातीतून ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला.
फादर डोरिंग वळण येथे आले तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्य नुकतेच सुरू झाले होते. अस्पृश्य जातीतून अनेकजण ख्रिस्ती धर्मात येत होते तरी केवळ धर्मांतरामुळे त्यांच्या सामाजिक वा शैक्षणिक परिस्थितीत एकदम मोठा बदल होत नव्हता. या नवख्रिस्ती समाजाला शिक्षित करण्यासाठी मिशनऱ्यांनी प्राथमिक शाळा सुरू केल्या. या नवसाक्षरांसाठी ख्रिस्ती धर्माचे ज्ञान देण्यासाठी मग या मिशनऱ्यांनी स्वतः मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि नंतर या भाषेत धर्मशिक्षणाची पुस्तकेही तयार केली.
फादर डोरिंग वळणला येण्याआधीच काही मिशनऱ्यांनी मराठी भाषेत धर्मशिक्षणाची काही पुस्तके लिहिली होती असे दिसते. अहमदनगर आणि नजिकच्या जिल्ह्यातील कॅथोलिक समाजातील पहिल्या पुस्तकाचा मान ‘लहान कॅथेखिसम’ या धर्मशिक्षणविषयक पुस्तकाला मिळतो. या पुस्तकाच्या लेखकाच्या नावाची नोंद मिळत नसली तरी या पुस्तकाचे लेखक केंदळ वळणमध्येच काम करणारे फादर दालिंग असावेत असे फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांनी म्हटले आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असणारे आणि रोम येथील विद्यापीठात तौलनिक धर्मशास्त्राचे प्राध्यापक असणारे फादर शेळके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्यावर संशोधन केलेले आहे.
फादर शेळके पुढे म्हणतात की, फादर डोरिंग केंदळ वळण येथे स्थायिक झाले तेव्हा त्यांना स्थानिक लोकांमध्ये ‘सुभक्तीसार’ या शीर्षकाचे धर्मशिक्षणाचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे असे आढळले.
फादर डोरिंग यांच्या आधी म्हणजे 1892 च्या मध्यास केंदळ येथे आलेल्या फादर फ्रान्सिस ट्रेनकाम्प यांनी ‘सुभक्तीसार’ हे पुस्तक 1895 पूर्वी लिहून प्रसिद्ध केले. फादर ट्रेनकाम्प यांनी मराठी भाषेचा चांगला अभ्यास केला. या पुस्तकासाठी त्यांनी पुण्या-मुंबईच्या पुस्तकात आढळणाऱ्या भाषेऐवजी अहमदनगर जिल्ह्यात प्रचलित असलेल्या बोलीभाषेचा वापर केला. थोडेफार शिक्षण झालेले नवख्रिस्ती लोक या पुस्तकाचा वापर करत. देवळात मिस्साच्या वेळी प्रार्थना करण्यासाठीही धर्मगुरू या पुस्तकाचा वापर करत असत.
धर्मकार्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या फादर डोरिंग यांना केवळ ‘लहान कॅथेखिसम’, ‘मोठे कॅथेखिसम’ या भाषांतरित आणि ‘सुभक्तीसार’ या पुस्तकांचाच उपयोग करावा लागत असे. त्याकाळी मिशनऱ्यांना आपल्या घरापासून लांबवर असलेल्या खेडेगावात उपदेशासाठी, मिस्सासाठी जावे लागत असे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना ख्रिस्ती धर्माचे मराठीतून धर्मज्ञान देण्यासाठी त्याकाळी मराठी भाषेत पुस्तकेच नसल्याने या भाषेत धर्मविषयक साहित्याची निर्मिती करण्याची गरज फादर डोरिंग यांना भासू लागली. अशा प्रकारचे साहित्य नसल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना ख्रिस्ती धर्माची शिकवण देणाऱ्या धर्मशिक्षकांना किंवा पालकांना त्यांचे कार्य करणे कठीण जात होते.
या समस्येवर उपाय म्हणून फादर डोरिंग यांनी मराठी भाषेतून धर्मविषयक माहिती देणारे मासिक सुरू करण्याचे ठरविले. येशूसंघाच्या अधिकाऱ्यांनी या मासिकासाठी आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. अशाप्रकारे 1903 च्या एप्रिल महिन्यात फादरनी ‘येशूच्या अतिपवित्र हृदयाचा निरोप्या’ या आपल्या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.
तेव्हापासून पहिल्या महायुद्धाच्या काळातील काही वर्षांचा अपवाद वगळता ‘निरोप्या’ आजपर्यंत नियमितपणे प्रकाशित होत आहे. येसूसंघ या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या मालकीचे हे नियतकालिक असल्याने केवळ एक अपवाद वगळता गेली १२० वर्षे येशूसंघीय धर्मगुरूच या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
फादर डोरिंग यांनी ‘निरोप्या’सुरू केल्यानंतर या मासिकात लिहिण्यासाठी स्वतःच्या मराठी भाषेच्या ज्ञानात अधिक भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषेतील शब्द, हिंदू धर्मसाहित्यात वापरले जाणारे शब्द तसेच संकल्पना ते शिकले. या ज्ञानाचा वापर करून आपले मासिक नवसाक्षर नवख्रिस्ती लोकांसाठी अधिकाधिक उपयुक्त करण्याचा ते प्रयत्न करू लागले.
फादर डोरिंग हे या मासिकाचे संपादक आणि लेखकही होते. सुरुवातीच्या काळात ‘निरोप्या’ मुंबईतील ‘एक्झामिनर’ प्रेसमध्ये छापले जात असे. ‘निरोप्या’च्या पहिल्या अंकाची एकूण दहा पाने होती आणि त्यात पाच विषयांवर लेख होते. एप्रिल महिन्यासाठी प्रार्थनेचा विषय, पवित्र मिस्साचा चाकर होणे, लिओ तेरावे परमगुरुस्वामींचा (पोप) सण, तुझे राज्य येवो आणि एक रक्तसाक्षी (हुतात्मा) हे ते पाच विषय होत.
राहुरी तालुक्यातील एका आडवळणाच्या ठिकाणी ‘निरोप्या’च्या संपादकांचे वास्तव्य होते आणि त्यांचे मासिक तर मुंबईतून प्रसिद्ध होत होते. त्यामुळे अंक वेळेवर छापला जाईल यासाठी संपादकांना खास प्रयत्न करावे लागत असत. आपल्या या मासिकाचा चौथा अंक तर खुद्द संपादक महाशयांनीच सरळ स्वतःच्या हाताने लिहून काढला होता असे दिसते. हा अंक त्यावेळी का छापला गेला नाही हे आजही स्पष्ट होत नसले तरी या मासिकाच्या हस्तलिखित प्रतींवरून आपले नियतकालिक वेळेवर प्रकाशित झाले पाहिजे याबद्दल फादर डोरिंग विशेष आग्रही होते हे दिसून येते.
‘निरोप्या’तून ख्रिस्ती संतांची चरित्रे आणि ख्रिस्ती जगातील विविध घडामोडींविषयी लेख असत. शंभरी गाठलेल्या या मासिकात आजही ही सदरे प्रसिद्ध होत आहेत. त्याशिवाय ख्रिस्ती अध्यात्मात अभिजात वाङ्मय समजल्या जाणाऱ्या खाळेीींंळे लहीळीींळ या लॅटिन पुस्तकाचा अनुवादही त्यांनी या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध केला. ‘ख्रिस्तानुवर्तन’ या नावाने या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायापर्यंत हे पुस्तक ‘निरोप्या’तून प्रकाशित केले गेले.
दर महिन्याला नियमितपणे प्रभूचा संदेश घेऊन ‘निरोप्या’ हे चिमुकले मासिक अहमदनगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील खेड्याखेड्यांतून प्रवासाला निघत असे. त्याकाळी पुस्तकांची किंवा मासिकांची वानवाच असल्याने या छोट्याशा नियतकालिकाने शंभर वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागातील ख्रिस्ती धर्मीय वाचकांची वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली असणार.
1907 मध्ये फादर डोरिंग यांची पुणे धर्मप्रांताचे महागुरुस्वामी किंवा बिशप म्हणून नेमणूक झाली. केंदळ वळण येथे असताना त्यांना केवळ आपल्या धर्मग्रामाची जबाबदारी सांभाळावी लागे. बिशप झाल्यानंतर त्यांना आता संपूर्ण पुणे धर्मप्रांतात येणाऱ्या विविध जिल्ह्यांच्या धर्मग्रामांचे धर्माधिकारी म्हणून काम पाहावे लागत असे. त्याकाळच्या पुणे धर्मप्रांतात पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली वगैरे जिल्ह्यांचा परिसर येत असे. बिशप म्हणून डोरिंग यांची जबाबदारी अनेक पटींनी वाढली तरीसुद्धा या साहेबांनी ‘निरोप्या’ चे संपादन आणि लेखन सोडले नाही. ‘निरोप्या’च्या संपादकांची धर्मगुरुपदावरून महाधर्मगुरुपदावर बढती होऊन पुण्याला बदली झाली तसे या मासिकाचे प्रकाशनस्थळही पुण्याला हलविण्यात आले.
पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले तेव्हा बिशप डोरिंग पोपमहाशयांना भेटण्यासाठी रोम येथे गेले होते मूळचे जर्मन असलेल्या बिशपांना ब्रिटिशांची वसाहत असलेल्या आपल्या कर्मभूमीत परतणे अशक्य झाले. पोपनी जपानमधील हिरोशिमा धर्मप्रांताचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांची 1921 साली नेमणूक केली. या काळातच आर्चबिशप हे ख्रिस्ती महामंडळातील आणखी एक उच्च पद त्यांना देण्यात आले.
जपानमध्ये नेमणूक झाल्यानंतरही आपल्या कर्मभूमीत परतण्याची डोरिंग यांची तीव्र इच्छा असावी असे दिसते, कारण ब्रिटिश सरकारची परवानगी मिळताच त्यांनी पुन्हा 1927 साली पुणे धर्मप्रांतातील मराठी ख्रिस्ती समाजाचे मेंढपाळ म्हणून पुन्हा एकदा सूत्रे हाती घेतली.
पुण्यात परतल्यानंतर केवळ सहाच महिन्यात म्हणजे जून 1928 मध्ये त्यांनी बंद पडलेल्या ‘निरोप्या’चे पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने प्रकाशन सुरू केले. ‘निरोप्या’ त्याच्या गुरूप्रमाणेच (येशू ख्रिस्ताप्रमाणे) पुनरुत्थित झाला’’ असे या घटनेचे फादर ख्रिस्तोफर शेळके यांनी वर्णन केले आहे.
‘निरोप्या’ हे मराठी भाषिक कॅथोलिक समाजाचे सर्वात पहिले मुखपत्र. गेले एक शतक हे मासिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कॅथोलिक कुटुंबांमध्ये नियमितपणे जात आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या या समाजातील अनेक कुटुंबांना दररोज वर्तमानपत्र घेण्याचीही ऐपत नाही. मात्र अगदी वाजवी वर्गणी असलेले हे मासिक या कुटुंबातील लहानथोरांची वाचनाची भूक भागवत आहे. त्यादृष्टीने आर्चबिशप डोरिंग यांनी या समाजास मोठे उपकृत करून ठेवले आहे यात शंकाच नाही.
1981 साली या मासिकाची वार्षिक वर्गणी केवळ तीन रुपये हेाती आणि किरकोळ अंकाची किंमत तीस पैसे होती. आज 2022 साली रंगीत मुखपृष्ठ असलेल्या आणि एकूण 32 पाने असलेल्या या मासिकाची वार्षिक वर्गणी दोनशे रुपये आहे.
आर्चबिशप डोरिंग यांच्या ‘निरोप्या’ने मराठी भाषिक कॅथोलिक समाजात वाचनाची आवड निर्माण करण्याबरेाबरच या समाजात लेखकांच्या आणि कवींच्या पिढ्या निर्माण करण्याचेही मोठे योगदान दिले आहे. मराठी सारस्वतात पुढे मोठे नाव कमाविणाऱ्या अनेक कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लेखकांना त्यांच्या उमेदवारीच्या काळात ‘निरोप्या’ ने त्यांना हक्काचे एक व्यासपीठ मिळवून दिले. आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, कवी विश्वासकुमार आदी नामवंत साहित्यिकांचा ‘निरोप्या’च्या लेखकांमध्ये समावेश होतो.
आपले साहित्य आणि नाव पहिल्यांदाच छापून आल्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव मलासुद्धा ‘निरोप्या’मुळेच लाभला. माझा पहिला लेख होता वि.स, खांडेकर यांना त्यांच्या `ययाती' कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला याबद्दल. साल होते १९७४ आणि माझे वय १५ वर्षे.
एखाद्या नियतकालिकाच्या प्रकाशन स्थळात अगदी क्वचितच बदल होतात. ‘निरोप्या’च्या शंभर वर्षांच्या आयुष्यात मात्र असे प्रसंग अनेकदा घडून आलेले दिसतात. याचे कारण म्हणजे ‘निरोप्या’चे मालकीहक्क असणाऱ्या येशूसंघाचे धर्मप्रांताधिकारी यांच्यामार्फत ‘निरोप्या’च्या संपादकांची नेमणूक केली जाते. नव्या संपादकांच्या नियुक्तीनंतर हे मासिकही ते संपादक ज्या धर्मग्रामात कार्यरत असतात तेथून प्रसिद्ध होत राहिले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील केंदळ वळण, श्रीरामपूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, सातारा जिल्ह्यातील कराड, त्याचप्रमाणे नाशिक वगैरे ठिकाणी ‘निरोप्या’चे कार्यालय सातत्याने स्थलांतरित होत राहिले.
या विविध जिल्ह्यांतील ख्रिस्ती धर्मियांनी अर्थातच त्यामुळे ‘निरोप्या’ची साथ सोडली नाही. त्यांच्या अनेक पिढ्यांनी या चिमुकल्या नियतकालिकावर आपली वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली आहे.
‘निरोप्या’कार आर्चबिशप डोरिंग यांनी मराठी साहित्याला आणखी एक मोठे योगदान दिले आहे. सतराव्या शतकात गोमंतकात मराठी भाषेत लिहिले गेलेले ‘क्रिस्तपुराण’ हे अस्सल देशी महाकाव्य त्यांनी महाराष्ट्रात उजेडात आणले. ‘क्रिस्तपुराणा’ची रचना फादर थॉमस स्टीफन्स या मूळच्या इंग्रज येशूसंघीय धर्मगुरूंनी 1616 साली केली. मात्र त्याकाळात गोव्यात देवनागरी मुद्रणकला विकसित झाली नसल्याने त्यांना ते छापावे लागले.. रोमन लिपीत असल्याने मराठी सारस्वताचे या अभिजात वाङ्मयाकडे तीन शतके लक्षच गेले नाही.
आर्चबिशप डोरिंग यांनी या महाकाव्याचा अभ्यास केला व या साहित्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या पुराणातील येशू ख्रिस्ताच्या चरित्रावर आधारित काही भागांचे देवनागरीत लिप्यांतर करून त्यांच्या तीन पुस्तिका प्रकाशित केल्या. अशाप्रकारे मराठी भाषेत असूनही रोमन लिपीमुळे मराठी भाषिकांपासून दुरावलेल्या या महाकाव्याचा निदान काही भाग तरी आर्चबिशप डोरिंग यांच्यामुळे प्रथमतःच मराठी भाषिकांना प्राप्त झाला. हे संपूर्ण महाकाव्य 1956 साली शांताराम बंडेलू यांनी देवनागरीत आणून य. गो. जोशी यांच्या प्रसाद प्रकाशनाने प्रकाशित केले.
मराठीत साहित्यसंपदा असणारे आजचे पुण्याचे बिशप थॉमस डाबरे हे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांचे उत्तराधिकारी आहेत. फादर भाऊसाहेब संसारे हे `निरोप्या'चे विद्यमान संपादक आहेत


1949 मध्ये वृद्धत्वामुळे आर्चबिशप डोरिंग यांनी निवृत्ती स्वीकारली आणि त्यांच्या जागी अँड्र्यू डिसोझा या धर्मगुरूंनी पुण्याचे पहिले भारतीय बिशप म्हणून सूत्रे हाती घेतली. ‘निरोप्या’तून शेवटचे बोधपत्र लिहून या मेंढपाळाने आपल्या कळपाचा निरोप घेतला. ‘निरोप्या’च्या अंकात प्रसिद्ध झालेले हे बोधपत्र पुढीलप्रमाणे आहे.
‘येशू ख्रिस्तामध्ये अतिप्रिय लेकरांनो, ईश्वराने तुम्हांस पुष्कळ वर्षे माझ्या हवाली केले, तरी आता तुम्हांस माझा शेवटचा सलाम सांगण्याची वेळ आली. 42 वर्षांपूर्वी 10वे प्रिय परमगुरुस्वामी यांनी मला पुण्याचे महागुरू म्हणून नेमिले आणि बायदरलीदन बिशपच्या जागी मला पुणे धर्मप्रांताचा अधिकार दिला.
सात वर्षे माझ्या कळपामध्ये शांतीने काम करता आले. मग पहिले महायुद्ध सुरू झाले, त्यावेळी मी परमगुरुस्वामींची भेेट घ्यायला रोम शहरी गेलो होतो. पुण्याला परत जाण्याचे माझे सर्व प्रयत्न व्यर्थ निघाले. मला माझ्या प्रिय लेकरांपासून लांब राहणे भाग पडले.
युद्ध संपल्यावर परमगुरुस्वामींनी मला जपान देशाला पाठविले. हिरोशिमा शहराचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांनी मला नेमिले. शेवटी 1927 साली ब्रिटिश सरकारने मला पुण्याला परत जाण्याची परवानगी दिली. तेव्हापासून मी पुन्हा तुम्हांमध्ये राहात होतो.
दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नवीन अडचण व त्रास उत्पन्न झाला. काही तरुण फादर, जर्मन नागरिक असल्याकारणाने, त्यांस सरकारने कैद्यांच्या छावणीत ठेवले आणि बिशपचा व्यवहारदेखील जरा कठीण झाला. या अवघड दिवसात विश्वासी आणि फादर लोकांचा विश्वासूपणा, प्रेम ही मला मोठ्या समाधानाची व शक्तीची कारणे होती. त्यांची आस्था आणि साहाय्य शेवटपर्यंत उपकारी मनाने मी विसरणार नाही.
युद्ध संपल्यावर माझ्या वृद्धपणाचा परिणाम अधिकाधिक मजवर झाला. प्रवास करणे मला कठीण झाल्यामुळे सर्व मिशनस्थानांची भेट वेळोवेळी घेता आली नाही. म्हणून माझ्यापासून हे भारी ओझे काढण्यास आणि उत्साही खांद्यावर ठेवण्यास परमगुरुस्वामींची विनंती करण्यास मला योग्य वाटले. त्यांनी माझी विनंती मान्य करून अंद्रू डिसोजा फादर यांस माझ्या जागी महागुरू म्हणून नेमले. त्यांची दीक्षा 24 ऑगस्टला झाली आणि या दिवसापासून ते महागुरूचा अधिकार चालवू लागले. ते तुमची चांगली काळजी घेतील.
म्हणून माझ्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हास माझा शेवटचा बोध करितो. तुम्ही विश्वासात स्थिर राहून आपल्या विश्वासाप्रमाणे वर्तन करा. तुमच्यापुढे नवीन संकटे आहेत. येशूच्या हृदयाची आणि प.मारियेच्या निष्कलंक हृदयाची भक्ती बाळगत जा. ती तुमची रक्षण करतील. तुमच्या नवीन महागुरुस्वामींसाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हांसाठी रोजरोज प्रार्थना करीत जाईन, अशी खातरी मी तुम्हाला देतो. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.”
                                                                                                                    - हेन्री आर्चबिशप

निवृत्तीनंतर 17 डिसेंबर 1951 रोजी आर्चबिशप डोरिंग यांचे निधन झाले. पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलमध्ये त्यांची समाधी आहे. जर्मनीतून महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकून, स्थानिक निरक्षर आणि अर्धशिक्षित ख्रिस्ती समाजाला ज्ञानार्जन करणारे आर्चबिशप डोरिंग हे आज विस्मृतीत गेले असले तरी ‘निरोप्या’च्या रूपाने त्यांचे स्मारक त्यांच्या कळपाच्या भेटीस आजही दर महिन्याला नियमाने येत आहे.


( ख्रिस्ती मिशनरींचे योगदान- कामिल पारखे (वितरण सुगावा प्रकाशक) मधील एक प्रकरण )