Saturday, June 12, 2021

 

खाद्यसंस्कृतीवरून कुणी स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये!
'अक्षरनामा'  
https://www.aksharnama.com/client/article_detail/5230 
पडघम - सांस्कृतिक       
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 12 June 2021
  • पडघमसांस्कृतिकखाद्यसंस्कृतीFood CultureवशटमासेFishमटणMutton

शाळेत असताना वडील मला अनेकदा आमच्या दुकानाशेजारी असलेल्या ‘समाधान’ हॉटेलात घेऊन जात असत. तिथं आम्ही सकाळी बटाटावडा, पुरी-भाजी किंवा संध्याकाळी घावन खात असू. त्या हॉटेलचा तो गोलाकार गरमागरम बटाटावडा, लाल रंगाचा रस्सा, त्यावर बारीक चिरून टाकलेला कांदा आणि शेजारी लिंबूची कापलेली एक फोड. साधारणतः एका वेळी ताटात दोन बटाटेवडे असायचे आणि गिऱ्हाईकाने न मागता दुसऱ्यांदा रस्सा वाढण्याचा शिरस्ता असायचा. रस्स्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी काही जण बटाटेभजेही खात असत. घराबाहेरच्या खाद्यसंस्कृतीची मला झालेली ही पहिली ओळख. आजही त्या बटाटावड्याची आणि चमचमीत रश्श्याची चव माझ्या तोंडात रेंगाळत असते.

श्रीरामपुरातली सोमैया हायस्कूलशेजारची आमची बोरावके चाळ मिश्र जातीधर्मांची होती. तिच्या एका टोकाला बैठी पाच-सहा घरे होती. तिथले भाडेकरू ब्राह्मण, मारवाडी, माळी आणि एक मुसलमान कुटुंब होते (पेशाने तांबोळी असलेले). चाळीच्या मध्ये एकमजली इमारतीत स्वतः चाळमालक बोरावके, माळी, मारवाडी आणि गुजराती घरे होती. चाळीच्या दुसऱ्या टोकाला कुडाच्या असलेल्या चार घरांत दोन मुसलमान, एक मराठा आणि आमचे ख्रिस्ती कुटुंब होते. या चाळीच्या समोरच्या बाजूला स्वतःच्या मालकीच्या असलेल्या कुडाच्या घरांत पिठाची गिरणी चालवणारे एक मुसलमान कुटुंब, चार माळी कुटुंबे, एक गवळी आणि सुकी मासळी विकणारे एक कोमटी कुटुंब राहायचे.

वेगवेगळ्या जातीधर्मांच्या, सामाजिक-आर्थिक स्तर भिन्न असलेल्या या कुटुंबांची खाद्यसंस्कृतीही पूर्ण वेगळी होती, हे सांगायला नकोच. आमच्या एका बाजूचे आणि समोरचे शेजारी मुसलमान होते, बाकीचे शेजारी माळी आणि मराठा असल्याने आसपासची सर्वच घरे तशी मांसाहारी होती.

समोरच्या चव्हाण नावाच्या माळी घरात आणि आमच्या घरात कालवणाची, सुक्या भाज्यांची दुपारी आणि रात्री देवाणघेवाण चालू असायची. रविवारी, बुधवारी आणि शनिवारी ही देवाणघेवाण ठप्प व्हायची. कारण या दिवशी आमच्याकडे ‘मटण’ असायचे. (ग्रामीण भागात ‘मटण’ ही संज्ञा सर्वसामान्य नाम म्हणून वापरली जाते, जसे कोंबडीचे मटण, बकरीचे मटण इत्यादी.) “ख्रिस्ती लोक एक वेळ रविवारी चर्चमध्ये मिस्साला जाण्याचे टाळतील, मात्र त्या दिवशी त्यांच्या घरी मटणाचा बेत  कधीही चुकणार नाही’’, अशी एक जुनी म्हण आहे. 

तर या दिवसांत आमच्या घरात काय शिजत असायचे, हे शेजाऱ्यापाजाऱ्यांना माहीत असायचे, मात्र त्याबद्दल कधीही नाराजी किंवा नापसंती व्यक्त होत नसायची.

दिवाळीला समोरच्या आणि बाजूंच्या माळी-मराठ्यांच्या घरांतून आमच्याकडे आणि शेजारच्या मुसलमानांच्या घरी फराळाच्या पराती यायच्या. नाताळाला आमच्याकडून सगळ्या शेजाऱ्यांना गोड फराळ जायचा आणि रमझान ईदच्या दिवशी आम्हां सर्व शेजाऱ्यांकडे त्या तीन मुसलमान घरांतून शीर-कुर्म्याची भांडी पोहोचती व्हायची. त्या घरांत लग्न वा दुसऱ्या काही निमित्ताने जेवण दिले जायचे, तेव्हा बिर्याणी किंवा लाल रश्शाचे चमचमीत मटण कालवण चाखायला आसपासच्या घरांतली कितीतरी माणसे यायची. ‘मटण खावे तर मुसलमानांच्या हातचे’ असा कौतुकाचा बोलबाला असायचा. इतरांची आगळीवेगळी खाद्यसंस्कृती स्वीकारून सहजीवनाची ती पद्धत आजही कायम आहे. 

नगरपालिकेच्या खटोड शाळेत मी सहावीत असताना बळीराम नेरे हा माझा क्लासमेट माझ्या घरी राहायला आला. तो मराठा होता. त्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि आई एका खेड्यात सरकारी नोकरीत होती. तो घरात आल्यापासून ‘त्या’ तीन दिवशी त्याच्यासाठी वेगळे कालवण किंवा भाजी होऊ लागली. त्याच्याबरोबर माझीही त्या मटणाच्या कालवणावरची वासना उडाली. वर्षभराने तो आपल्या आईकडे राहायला गेला, तरी नंतर माझ्यासाठी ‘त्या’ ठराविक दिवशी दाळ किंवा काहीतरी खळगुट करावे लागायचे, ते अगदी मी दहावीनंतर घर सोडेपर्यंत. (या परिसरात शाकाहारी लोकांना ‘खळगुठे’ असेही म्हटले जायचे!) 

मी शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या मामाच्या गावी घोगरगावला एकदा मामेभाऊ शाहूबरोबर गेलो होतो. श्रीरामपूर तालुक्यात मुठेवाडगाव येथे उन्हाळ्यात पार कोरडी असलेली गोदावरी ओलांडून पार करून आम्ही दोघे भामाठाणला पोहोचलो. चालतचालत संध्याकाळी ऊसतोडणी कामगारांच्या तात्पुरत्या वस्तीवर गेलो. शेतावरची कामे आटोपल्यावर शाहूची थोरली बहीण, मालनबाई तिथे आपल्या नवऱ्या-मुलासह ऊसतोडणीच्या कामाला आपल्या बैलगाडीसह आली होती. त्या वस्तीवर सगळीकडे ऊसाच्या लांबलांब वाड्यांनी बांधलेल्या खोपट्या होत्या. त्यात थोड्याशा सामानासाठी, काही भांड्यांसाठी आणि इनमिन दोनतीन जणांना बसण्यासाठी जागा होती. स्वयंपाक तर बाहेर दगडांच्या चुलीवर व्हायचा.

शाहूला आणि मला पाहून मालनबाई हरखून गेली. आपल्या माहेरच्या पाहुण्यांना म्हणून तिने लागलीच खोपटीत दोरीवर वाळत टाकलेल्या चान्या घेतल्या, साफ केल्या आणि चुलीवरच्या उकळत्या पाण्यात शिजायला टाकल्या. दर चार-पाच दिवसांनंतर ऊसतोडणीची जागा बदल्यावर सगळे बिऱ्हाड बैलगाडीवर टाकून हिंडणारे ऊसतोडणी कामगार मीठ, मिरची आणि तेल याशिवाय किती वस्तू सोबत बाळगणार? खोपीत दोरीवर सुकवून ठेवलेले मांसाचे तुकडे म्हणजे चान्या. त्या ऐनवेळी कुणाचाही पाहुणचारासाठी उपयोगी पडतात. त्यांच्यासाठी चान्या हीच पक्वाने होती. त्या खायची ती माझी पहिली आणि शेवटचीच वेळ.

फादर होण्यासाठी उमेदवारी करण्यासाठी मी सातारा जिल्ह्यात कराडला फादर प्रभुधर यांच्या ‘स्नेहसदन’ आश्रमात राहून अकरावी केली. त्या संपूर्ण वर्षभराच्या काळात या आश्रमात योगासने शिकावी लागली. तिथे मांसाहार पूर्णतः वर्ज्य होता. इतका काळ - अगदी एक आठवडाभरही - मी कधीही शाकाहारी राहिलो नव्हतो.   

बारावीला गोव्यातल्या जेसुईट लोयोला हॉल पूर्व-नोव्हिशिएटमध्ये राहायला गेलो, तेथे कराडच्या अगदी उलट स्थिती. बुधवारच्या दुपारचा अपवाद सोडता वर्षभर दुपारी आणि रात्री फक्त मांसाहारी आणि तेसुद्धा केवळ बीफ असायचे. पोर्तुगीज बोलणारा आमचा मेस्ता फ्रान्सिस आठवड्याभर बीफची नारळ घालून केलेली घट्ट मसालेदार शाकुती, कटलेट्स, समोसे, चिली-फ्राय, रोस्ट असे इतके वेगवेगळे पदार्थ बनवायचा की, एक डिश आठवड्यात क्वचितच रिपिट व्हायची! हा बीफचा पुरवठा पणजी मार्केटमध्ये दर शुक्रवारी बंद असायचा, म्हणून गुरुवारीच नेहमीपेक्षा दुप्पट बीफ आणले जायचे.

त्या काळात भाकरी किंवा चपातीचे कधी दर्शन घडले नाही. सकाळी नाश्त्यासाठी कडक भाजलेले गोलगोल उंडो पाव आणि रात्री साधे पाव असा मेन्यू असायचा. त्या सत्तरच्या दशकात गोव्याला बीफचा पुरवठा बेळगावातून व्हायचा, आजही होतो. गेली अनेक वर्षं गोव्यात आणि कर्नाटकातही भाजपचे सरकार असले तरी यात काहीही बदल झालेला नाही.

महाराष्ट्रात पंधरा वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या पराभवानंतर भाजप-शिवसेनेचे सरकार २०१४ साली आले. या युतीच्या सरकारचा पहिला महत्त्वाचा निर्णय होता-मागील १९ वर्षे बासनात गुंडाळून ठेवलेला गोवंश हत्याबंदीचा ठराव राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा आणि मंजुरीनंतर तातडीने हा कायदा महाराष्ट्रात अमलात आणण्याचा. एक नवी खाद्यसंस्कृती प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक पाऊल होते. देशात केवळ गोमांस बाळगल्याच्या संशयाच्या कारणाने उत्तर भारतात ‘मॉब लिंचिंग’ होण्याच्या घटना यानंतरच सुरू झाल्या.  

यावरून एक अलीकडची घटना आठवली. गोव्यात सांकवाल येथे राहणाऱ्या बहिणीकडे जाण्यासाठी नावेलीजवळच्या बस स्टॉपजवळ उभा होते. शेजारीच एक पासरो म्हणजे छोटेसे किराणा दुकान होते. जवळच्या शाळेच्या मैदानावरून धावत एक विद्यार्थी आला आणि त्या दुकानदाराला म्हणाला, “अंकल, माका एक बीफ पॅटीस दी!” ते ऐकून मी चमकलोच, पण लगेच लक्षात आले की, मी आता गोव्यात आहे, महाराष्ट्रात नाही.

या घटनेनंतर काही महिन्यांनी गोव्यातून सिस्टरताई आली आणि आल्याआल्या मला म्हणाली, “मी खिमा आणला आहे. फ्रिजमध्ये लगेच ठेवून दे.” ते ऐकून मी विचारात पडलो, पण काही बोललो नाही. तो खिमा गोव्यातून महाराष्ट्रात आणणे हा कायद्यानुसार दारू आणण्यापेक्षाही भयंकर गुन्हा आहे, हे मी तिला सांगितले नाही. 

गोव्यातील आमच्या जेवणात नाताळ, ईस्टर तसेच सेंट इग्नेशियस लोयोला, सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या फेस्तांनिमित्त पोर्कपासून म्हणजे डुकराच्या मासांपासून केलेले सोरपोतेर, विंदालू, सॉसेजेस अशा पोर्तुगीज वळणाच्या डिशेस असायच्या. आठवड्यातून काही दिवस मासे आणि अंडी यांचाही रतीब असायचा.

किंग प्रॉन्स हा माशांचा एक प्रकार मला आवडत नसायचा. प्रॉन्स बिर्याणीतून मी ते प्रॉन्स ताटात वेगळे काढून ठेवायचो. हे लक्षात आल्यावर माझ्या शेजारी बसून मी वेगळ्या वाटीत काढून ठेवलेले ते किंग प्रॉन्स मटकावण्यासाठी इतर मुलांची स्पर्धा सुरू झाली. कारण फाईव्ह स्टार हॉटेलांत असलेल्या मागणीमुळे किंग प्रॉन्स अत्यंत महागडे असत, आजही यात बदल झालेला नाही. त्यानंतर किंग प्रॉन्स खाणे मी सुरू केले.

केंद्रात आणि गोव्यातही भाजप हा एकच पक्ष सत्तेवर असला तरी हा पक्ष गोव्यातील खाद्य आणि पेय संस्कृतींबाबतचे नैतिक किंवा कायदेशीर नियम आपली सत्ता असलेल्या इतर राज्यांत किंवा देशभर लागू करण्याचा विचारही कधी करणार नाही. गोव्यात अगदी मॉलमध्येही दारू विकली जाते आणि प्रत्येक मांसाहारी हॉटेलांत बसल्या बसल्या गिऱ्हाईकांपुढे काचेचे ग्लास ठेवले जातात, हे अनेकांनी अनुभवलेले असेलच.  

पत्रकार म्हणून नोकरीला लागल्यावर पणजीला सान्त इनेजपाशी असलेल्या ताळगावला मी राहत असताना माझ्या घरमालकाची म्हातारी आई वारली, तेव्हाची घटना आठवते. मयतीला लोक जमले होते. काही वेळानंतर आम्हा सर्वांच्या हातात फेणीचे ग्लास आणि खाण्यासाठी उकडलेले छोले देण्यात आले, तेव्हा मी थक्कच झालो. किरीस्तांव लोकांच्या घरी किंवा रस्त्यातल्या चौकापाशी असलेल्या क्रुसासमोर कुठल्याही कारणानिमित्त रोझरीची प्रार्थना आणि लदाईन (लितानी) असायची, तेव्हाही अल्तारासमोरच्या मेणबत्त्या विझवण्याआधीच फेणी किंवा उर्राकचे ग्लास आणि उकडलेल्या छोल्यांचे ताट फिरवले जाई. हळूहळू या प्रकारांची सवय झाल्यावर त्याचे आश्चर्य व वैषम्य वाटेनासे झाले. गोव्यात आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथेही ख्रिस्ती कुटुंबांतील लग्नांत मांसाहारी पदार्थ असतातच. पाहुणे मंडळींच्या जेवणाच्या प्रत्येक टेबलांवर काचेचे ग्लासही असतात.  

खाण्यावरून शरमिंदा होण्यासारखा एक खूप जुना प्रसंग आठवतो. कॉलेजची सुट्टी संपल्यावर श्रीरामपूरहून मी गोव्याला झेलम एक्सप्रेसने निघालो. १९७०च्या दशकाच्या त्या काळात मिरज ते वॉस्को द गामा या मार्गावर मिटरगेज रेल्वे होती. त्यामुळे ब्रॉडगेज रेल्वेमार्ग मिरजला संपल्यावर तेथून लोंढा-मार्गे वॉस्कोची मिटरगेज रेल्वे पकडावी लागे. या मार्गावर प्रवास केलेल्यांनी ‘दूधसागर धबधबा’ पाहिला असेलच. सह्याद्री घाटात अत्यंत संथ गतीने चालणाऱ्या या मीटरगेज रेल्वेबाबत जुन्या पिढीतील लोक अनेक गंमतीदार किस्से सांगत. जसे की, दूधसागर धबधब्यापाशी या चालत्या गाडीतून उतरून, छायाचित्र काढून, परत मागच्या डब्यात चढणे शक्य होते.

हा, तर या प्रवासासाठी आईने बाजरीच्या भाकरी आणि माझ्या आवडीची लाल मिरच्यांची सुकटाची चटणी कापड्यात बांधून दिली होती. गाडीने मिरज सोडल्यावर डब्यात वरच्या बर्थवर बसून रात्री नऊच्या दरम्यान मी त्या कापडाची गाठ सोडली, दोनतीन घास खाल्ले असतील तोच त्या डब्यातील अनेक प्रवाशांच्या एकापाठोपाठ सटासट शिंका सुरू झाल्या आणि एकच गोंधळ झाला. ‘कुणी वशट पदार्थ आणला?’ असे प्रश्न सुरू झाले. घाबरून मी गडबडीने ती सुकटाची चटणी झाकली. मात्र भूकेने भीतीवर मात केली आणि थोड्याथोड्या वेळाने एकेक घास घेत मी माझे जेवण संपवले. त्यानंतर सुकट, सुके बोंबील असे वशट खाद्यपदार्थ प्रवासात कधी आणायचे नाही, असा कानाला खडा लावला.   

पुणे श्रमिक पत्रकार संघ ( Pune Union of Working Journalists - PUWJ) आपल्या सात्त्विक आहाराच्या आग्रहाविषयी असाच प्रसिद्ध आहे. ऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या या संघटनेच्या कार्यकारिणीत १९४०च्या दशकात नथुराम गोडसे होता. नंतरच्या काळात ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी या संघटनेचे अध्यक्ष होते. (१९८०च्या दशकात मीसुद्धा या पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत होतो.) संघटनेच्या वार्षिक सभेच्या वेळी सर्व सदस्यांना भोजन दिले जाते. त्याचा मेन्यू वर्षानुवर्षे केवळ श्रीखंड-पुरी, आमरस, फदफदे असा ठेवून पत्रकार संघाने खाद्यसंस्कृतीबाबत आपले सोवळे कायम राखले आहे. इतरांच्या आवडीचा ‘तामसी आहार’ म्हणजे चिकन बिर्याणी किंवा किमान अंडा-करीचा बेत ठेवण्याचा काही सदस्यांचा आग्रह आजतागायत मान्य झालेला नाही.

याच्या अगदी उलट मुंबईतील ‘प्रेस क्लब’ची   (Mumbai Press Club) मानसिकता आहे! तिथं ‘व्हिजिटर’ म्हणून पाहुणचार घेतलेले मुंबईबाहेरचेही अनेक जण कौतुकाची भावना बाळगून असतात.

गोव्यातल्या ‘नवहिंद टाइम्स’ने ऐंशीच्या दशकात मला बल्गेरियात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी पाठवले होते. तेव्हा आम्हा ३० जणांच्या भारतीय तुकडीमध्ये दिल्ली दूरदर्शनमध्ये एक ज्येष्ठ अधिकारी होते. त्या दौऱ्यात मांसाहारी पदार्थांत पोर्क म्हणजे डुकराच्या मांसाचा समावेश असेल या भीतीने तीन महिन्यांच्या या काळात या गृहस्थाने साधे अंडा ऑम्लेटसुद्धा खाल्ले नव्हते!

पूर्ण शाकाहारी असलेले माझ्या परिचयातील एक जण कंपनीच्या कामानिमित्त चीनमध्ये शांघायला दोन महिने होते. तेथून परतून आज तीन वर्षे झाली तरी शांघाय नाव काढताच तिथे खाण्याचे झालेले हाल आठवून आजही त्यांना पोटात मळमळल्यासारखे होत असते.  

मुंबई-पुण्यातल्या इराणी हॉटेलांनी आपली स्वतःची वेगळी खाद्यसंस्कृती जपली होती. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यातले गरवारे पुलाजवळचे हॉटेल गुडलक आणि लकी रेस्टाँरंट ही इराणी हॉटेल्स देव आनंद, दिलीप कुमार वगैरे अभिनेत्यांची आवडती ठिकाणे होती. आता बंद झालेले लकी रेस्टाँरंट हे मस्काबन, चाय, खिमा पाव, चिकन मसाला, चिकन बिर्याणीसाठी प्रसिद्ध होते. नव्वदच्या दशकात आम्ही सडेफटिंग पत्रकारही तिथे बसायचो, तेव्हाही या अभिनेत्यांच्या नावांची तेथे हमखास उजळणी व्हायची.

नॉन-व्हेज समोसा आणि मस्काबन यामुळे पुणे कॅम्पातले हॉटेल ‘महानाझ’ खवय्यांचे आवडते होते. मी नोकरीला असलेल्या ‘इंडियन एक्सप्रेस’चे ऑफिस तेव्हा या ‘महानाझ हॉटेल’च्या समोरच्या अरोरा टॉवर्समध्ये होते. पुणे कॅम्पात अनवाणी पायाने हिंडल्यानंतर चित्रकार मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेन या हॉटेलमध्ये विसाव्यासाठी बसलेले मी पाहिले आहे. त्यांच्या अशा भेटीमुळे आम्हा पत्रकारांना हमखास एक सॉफ्ट स्टोरी मिळायची.  

हवेतल्या प्रवासातील खाद्य आणि पेय संस्कृतीची तर वेगळीच मजा असते. दहा वर्षांपूर्वी मुंबईतून पॅरिसच्या दिशेने आमच्या विमानाने उड्डाण केले आणि पंधरा-वीस मिनिटांतच ट्रे घेऊन आलेल्या एयर होस्टेसने मला विचारले- ‘काय घेणार तुम्ही?’ ट्रेकडे निरखून पाहत मी विचारले- ‘व्हॉट चॉइसेस आय हॅव्ह?’ तिने हसत म्हटले- ‘फ्रुट ज्यूस, वाईन, शॅम्पेन...’. ‘तर मग मी शॅम्पेन घेईन!’ मी लगेच म्हटले.

छोट्या आदितीने फ्रुट ज्यूसची ऑर्डर दिली. मात्र माझा उत्साहित झालेला चेहरा पाहून पत्नी, जॅकलीननेही शॅम्पेनची ऑर्डर दिली आणि तिचा ग्लासही माझ्यासमोर ठेवला.

मुंबई ते पॅरिस हा सहा तासांचा तसा कंटाळवाणा प्रवास मग अगदी मजेत गेला, हे सांगायलाच नको. 

ते तीन आठवडे फ्रान्समध्ये आणि इटलीमध्ये फिरताना विविध प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स आणि पेये यांचा आम्ही पुरेपूर आस्वाद घेतला. या वेगळ्या खाद्य आणि पेय संस्कृतींच्या देशांत वावरताना कधीही ‘होम सिक’ झाल्यासारखे वाटले नाही.      

‘व्हेन इन रोम, डू ऍज द रोमन्स डू’ ही म्हण रोममध्ये आणि युरोपातल्या इतर ठिकाणी सुट्टीवर असताना मी, जॅकलीनने आणि मुलगी आदितीने पुरेपूर अमलात आणली होती. तिथल्या एक युरोला मिळणाऱ्या बिनसाखरेच्या आणि बिनदुधाच्या काळ्या कॉफीची लवकरच आम्हाला सवय झाली. रोममध्ये असताना पास्ता आणि पिझ्झा आदितीने मनसोक्त खाल्ला.  

दोन वर्षांपूर्वी ‘सकाळ टाइम्स’च्या वतीने थायलंड येथे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या परिषदेत सहभागी झालो. भारतातले आम्ही सहा आणि जगभरातील सुमारे सत्तर पत्रकार त्या वेळी थायलंड सरकारचे पाहुणे म्हणून उपस्थित होतो. प्रवासाआधी थायलंडच्या मुंबईतील वकिलातीने माझ्या आहाराविषयी विचारणा केली, तेव्हा उपलब्ध तीन पर्यायांमध्ये मांसाहारी आणि शाकाहारी या नेहमीच्या दोन पर्यायांशिवाय ‘जैन पद्धती’चा तो तिसरा शाकाहारी पर्याय पाहून मी उडालो होतो! 

अशा भिन्न, तऱ्हेतऱ्हेच्या खाद्य आणि पेय संस्कृतीबद्दल खरे तर काही आक्षेपही नसावा. ज्याला जे खावे, प्यावेसे वाटेल त्याबद्दल आडकाठी नसावी. खाद्यसंस्कृतीनुसार कुणी स्वतःला, आपल्या समाजाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये.

मात्र तसे होण्याऐवजी आजही आहारपद्धतीवरून नाके मुरडली जातात. हल्ली तर खाद्यसंस्कृतीनुसार शेजारी निवडला जातो. काही शहरांत त्यानुसार स्वतंत्र इमारती आणि राहण्याच्या कॉलनीही उभारल्या जात आहेत.

समुद्रातील मासे, आकाशात विहार करणारे पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, वनस्पती आणि फळफळावळ हे तुमचे अन्न आहे,’ असे ‘बायबल’मधील ‘उत्पत्ती’ या पहिल्या पुस्तकात देवाने मानवाला म्हटले आणि हे वचन आज्ञाधारकपणे मी पुरेपूर अमलात आणतो, असे मी गमतीने म्हणतो. गंमतीने यासाठीच की, ‘बायबल’मधले हे वचन शब्दशः स्वीकारल्यास हे विश्व मानवकेंद्रीत आहे, असे मान्य करून पर्यावरण किंवा इतर जीवसृष्टी गौण ठरू शकते.   

अर्थात कुणाला अन्न म्हणून केवळ वनस्पती आणि फळफळावळ पसंत असू शकेल, तर कुणाला प्राणी-पक्षी म्हणजे मांसाहार आवडीचा असेल. त्याशिवाय आहारनिवडीत भौगोलिक संदर्भ महत्त्वाचे असतात. थंड प्रदेशातील इस्किमोंना ताज्या भाजीपाल्याऐवजी मासे, रेनडिअरचे दूध आणि मांसावर गुजराण करावी लागते. भुईमुगाचे पीक होणाऱ्या परिसरात जेवणाच्या पदार्थांत शेंगदाण्याचा मुबलक वापर होतो आणि त्याच पद्धतीने कोकणात नारळाचा!

चंद्र किंवा मंगळासारख्या परग्रहांवर वसती निर्माण करण्याची आस बाळगणाऱ्या मानवाला तिथल्या परिस्थितीनुसार आपला आहार बदलावा लागणार आहेच! की, तिकडेही खाद्यसंस्कृतीबाबत आपण अशीच कडवी भूमिका कायम ठेवणार आहोत?  

Friday, June 11, 2021

पंडिता रमाबाई


ख्रिस्ती मिशनरींचे योगदान

 कामिल पारखे

 वितरक:  सुगावा प्रकाशन

          1881 मध्ये कलकत्ता शहरात एका वीस वर्षांच्या मराठी युवतीचे आगमन झाले आणि तिच्या विद्वत्तेच्या तेजाने, संस्कृतवरील प्रभुत्वाने तेथील सामाजिक पुढारी चकित झाले. कलकत्त्याच्या विद्वान मंडळींनी या युवतीचा सत्कार घडवून तिला सरस्वतीउपाधी बहाल केली. विशेष म्हणजे रमाबाई डोंगरेहे नाव धारण करणाऱ्या या युवतीचे नाव महाराष्ट्रात तोपर्यंत कुणीही ऐकले नव्हते. त्यानंतर प्रसिद्धीचे वलय होऊन रमाबाई महाराष्ट्रात आल्यानंतर पुणे व पुण्याजवळील केडगाव ही त्यांची उर्वरित आयुष्यातील कर्मभूमी बनली. कलकत्त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती चिकटलेले प्रसिद्धीचे वलय त्यानंतर त्यांना संपूर्ण आयुष्यभर चिकटले.

          प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात वावरणाऱ्या व्यक्तींच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील प्रत्येक घटना समाजासमोर येत असतात. या घटनांबद्दल त्या व्यक्तीला कधी हार तर कधी प्रहार स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. पंडिता रमाबाई तर चाकोरीबद्ध वाट सोडून स्वत:च्या नव्या वाटा निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या. ज्या काळात महिलांना स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसे त्या काळात कुटुंबातील वा नातलगांमधील कुणाही कर्त्या पुरुषाचा आधार नसताना या एकाकी महिलेने प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस दाखविले. त्यांच्या स्वत:च्या धर्मांतरामुळे, बालविधवांच्या पुनर्वसन कार्यामुळे आणि नंतर ख्रिस्ती मिशनरी या नात्याने समाजातील सर्व अनाथ आणि असाहाय्य घटकांचा सांभाळ करण्याच्या वृत्तीमुळे समाजात निर्माण झालेल्या अनेक वादळांना या विदूषीने खंबीरपणे तोंड दिले. पंडिता रमाबार्इंचे जीवन म्हणजे सतत संघर्षाशी झुंजणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत लढून जीवनमूल्यांशी एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीची गाथाच आहे.

          पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म कर्नाटकात मेंगलोरजवळील गंगामूळ यागावी 23 एप्रिल 1858 रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री (अनंतपद्मनाभ) परमेश्‍वर डोंगरे हे संस्कृतपंडित होते. चित्पावन ब्राह्मण कुळातील अनंतशास्त्रींनी आपल्या पत्नीला, लक्ष्मीबाईला संस्कृत शिकविले. रमाबाई केवळ सहा महिन्यांच्या असताना अनंतशास्त्री आपल्या कुटुंबासह म्हणजे पत्नी, मुलगा आणि दोन मुलींसह तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडले. पंधरा वर्षे तीर्थार्टन केल्यानंतर हे कुटुंब मद्रास इलाख्यात पोहोचले. त्यावेळी तेथे भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळाने अनंतशास्त्रींचा आणि त्यांच्या पत्नीचा बळी घेतला. रमाबाई, त्यांचा थोरला भाऊ श्रीनिवास आणि थोरली बहीण कृष्णाबाई पोरके बनले. तेथूनच रमाबार्इंच्या संघर्षमय आयुष्याला सुरुवात झाली.

          आई-वडिलांच्या निधनानंतर या तरुण भावंडांनी आपली तीर्थयात्रा चालूच ठेवली. त्यानंतर काही महिन्यातच रमाबार्इंच्या थोरल्या बहिणीचे कृष्णाबाईचे निधन झाले. पित्याच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंनी संस्कृतचे आणि हिंदू धर्मशास्त्राचे गाढे ज्ञान संपादन केले होते. पुराण सांगत आणि संस्कृतमधून व्याख्याने देत हे बहीण-भाऊ पुढे फिरतच राहिले. त्यांना आसरा देणारे, मायेने त्यांची काळजी घेणारे या जगात आता कुणी उरले नव्हते. तीन-चार वर्षे हजारो मैलांचा पायी प्रवास करत श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाई 1878 साली कलकत्त्यात पोहोचले. या शहरात मात्र या भाऊ-बहिणीच्या ज्ञानाची कदर करणारे लोक त्यांना भेटले. आधुनिक विचारसरणीच्या ब्राह्मो समाजाच्या आणि कलकत्त्यातील विद्यापीठाच्या पंडितांनी या तेजस्वी तरुणांना आदराची वागणूक दिली.

          श्रीनिवासशास्त्री आणि रमाबार्इंच्या संस्कृतवरील प्रभुत्वाने कलकत्त्यातील विद्वान मंडळी चकित झाली. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता त्या काळात या महिलेचे संस्कृतवरील प्रभुत्व ही निश्‍चितच कौतुकाची बाब होती. कलकत्ता विद्यापीठात झालेल्या विद्वानांच्या सभेत यावेळी रमाबार्इंना सरस्वतीउपाधी सन्मानाने देण्यात आली. तेव्हापासून रमाबाई डोंगरे ही युवती पंडिता रमाबाई सरस्वतीया नावाने संपूर्ण हिंदुस्थानभर ओळखली जाऊ लागली.

रमाबार्इंविषयी मुंबईच्या एका दैनिकात 1878 च्या जुलै महिन्यात पुढील बातमी प्रसिद्ध झाली:

          हल्ली कलकत्त्यास रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने कलकत्त्यात काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान मंडळीस चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते, जागच्या जागी संस्कृत काव्य करते. तिचे वय बावीस वर्षांचे असून ती अविवाहित आहे. महाराष्ट्रीयन असली तरी कर्नाटक प्रांतातून आली आहे.

          या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. स्त्री असूनही ही संस्कृत भाषा कशी शिकली, बावीस वर्षे ओलांडून अजून ती अविवाहित कशी, मराठी असूनही महाराष्ट्रात तिच्याविषयी कुणालाच काही कशी माहिती नाही, असे विविध प्रश्‍न रमाबार्इंविषयी मुंबई-पुण्यात विचारले जाऊ लागले.

          महाराष्ट्राला रमाबार्इंची ओळख झाली ती अशाप्रकारे. पंडिता रमाबार्इंच्या जीवनातील अनेक घटनांनी पुढील काळात महाराष्ट्रातील सामाजिक जीवन अनेकदा ढवळून टाकले. रमाबार्इंचा कलकत्त्यातील विद्वानांनी केलेला सत्कार आणि या महिलेविषयी महाराष्ट्रात झालेली त्यावेळची चर्चा रमाबार्इंच्या महाराष्ट्रातील पुढील जीवनाची एकप्रकारे नांदीच ठरली.

          त्यानंतर रमाबाई आणि त्यांचे बंधू आसामात सिल्हट येथे आणि बंगालमधील ढाका येथे गेले. ढाक्यात असताना श्रीनिवासशास्त्री आजारी पडले. तेथे त्यांचे 8 मे 1880 रोजी निधन झाले. आई-वडिलांच्या तसेच थोरल्या बहिणीच्या निधनानंतर रमाबार्इंना निदान आपल्या थोरल्या भावाचा तरी आधार होता. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर तोही आधार संपला. कर्नाटक प्रांत सोडून आलेल्या या तरुण अविवाहित महिलेला आता कुणाचाही आधार नव्हता.

          श्रीनिवासशास्त्री हयात असताना त्यांची आणि रमाबार्इंची बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली व्यक्तीशी ओळख झाली. श्रीनिवासशास्त्रींच्या निधनानंतर बिपीन बिहारींनी रमाबाईंना लग्नाची मागणी घातली आणि 13 जून 1880 रोजी बांकीपूर शहरात रजिस्ट्रारसमोर नोंदणी पद्धतीने या दोघांचा विवाह झाला. त्याकाळात रमाबार्इंनी नोंदणी पद्धतीने विवाह केला या घटनेने पुन्हा एकदा समाजात खळबळ उडाली. लग्नानंतर सिल्हट येथे बिपीन बिहारीदास वकिली करत असत. 16 एप्रिल 1881 रोजी रमाबार्इंच्या मनोरमा या मुलीचा जन्म झाला.

          रमाबार्इंना वैवाहिक सुख फार काळ लाभले नाही. लग्नानंतर केवळ 19 महिन्यांनंतर बिपीन बिहारींचा 4 फेब्रुवारी 1882 रोजी अल्पशा आजारानंतर मृत्यू झाला. थोड्या काळाच्या अवधीत वडील, आई, थोरली बहीण आणि थोरला भाऊ यांच्या निधनाचं दु:ख सहन करणाऱ्या रमाबार्इंवर आता पतीच्या निधाची आपत्ती कोसळली. त्यानंतर आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पंडिता रमाबार्इंनी महाराष्ट्राची वाट धरली.

          रमाबाई महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच या विदूषीची महाराष्ट्राला ओळख झाली होती. पुण्यात आल्यावर रमाबार्इंचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्याशी घनिष्ट संबंध जुळले. रमाबार्इंच्या पुण्यातील वास्तव्यात त्यांच्याविरुद्ध समाजात प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानंतरही रमाबाई रानड्यांनी पंडिता रमाबार्इंना भावनिक आधार दिला. पुण्यात पंडिता रमाबार्इंचे आगमन झाल्यानंतर या तेजस्विनीच्या सभा आयोजित करण्यात प्रसिद्ध मराठी कादंबरीकार हरी नारायण आपटे आणि रमाबाई रानड्यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील आपल्या वास्तव्यात पंडिता रमाबार्इंनी लोकजागृतीचे विशेषतः महिलांच्या प्रबोधनाचे कार्य सुरू केले. त्यांच्या या कार्यास पुण्यातील समाजसुधारकांचा मोठा पाठिंबा लाभला. रमाबार्इंच्या पुढाकाराने पुण्यात, अहमदनगर, सोलापूर आणि मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली.

          एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातसमाजजागृतीचे कार्य करणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये पुरुषांचीच अधिक संख्या होती. ज्या थोड्याफार महिला या क्षेत्रात काम करत होत्या त्या सर्वांना त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषांचे पूर्ण पाठबळ लाभले होते व त्यामुळे आपल्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल टीकेस त्या तोंड देऊ शकल्या. पंडिता रमाबाई मात्र परप्रांतातून एकट्या आल्या होत्या. एक छोटी मुलगी वगळता त्यांना कुटुंबातील कुणाही व्यक्तीचा वा नातलगाचा आधार नव्हता. त्याकाळात स्त्रियांच्या उन्नतीचे काम हाती घेणे किती कठीण होते हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सहन कराव्या लागलेल्या टीकेमुळे आणि हालअपेष्टांमुळे सिद्ध झाले होते. स्वत:च्या वैयक्तिक जीवनातसुद्धा रमाबार्इंनी खूप दु:ख सोसले. तरीसुद्धा सामाजिक प्रबोधनाचा काटेरी मार्ग त्यांनी निवडला हे विशेष.

          याच काळात ब्रिटिश सरकारने सर डब्ल्यू. हंटर या शिक्षणतज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची नेमणूक केली. या हंटर कमिशनसमोर दिलेली पंडिता रमाबार्इंची हिंदुस्थानातील महिलांच्या शिक्षणाबद्दलची साक्ष त्यावेळी खूप गाजली. हिंदुस्थानातील प्रचलीत सामाजिक व्यवस्थेमुळे या देशात महिला डॉक्टरांची खूप गरज आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था करावी असे त्यांनी या साक्षीत सुचविले. हंटर कमिशनच्या सदस्यांनी यावेळी रमाबार्इंची उलटतपासणीही घेतली. रमाबार्इंना त्यावेळी इंग्रजीचे फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी मराठीतून साक्ष दिली. रमाबार्इंच्या साक्षीने खुद्द सर हंटर फारच प्रभावित झाले. त्यांनी रमाबार्इंच्या साक्षीचे इंग्रजी रूपांतर करून छापून घेतले, इतकेच नव्हे तर इंग्लंडला परतल्यानंतर तेथे रमाबार्इंच्या कार्यासंबंधी व्याख्यानही दिले. अशाप्रकारे रमाबार्इंनी परदेशगमन करण्यापूर्वीच त्यांची कीर्ती इंग्लंडमध्ये पोहोचली.

          त्यानंतर थोड्याच काळात पंडिता रमाबार्इंनी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला प्रस्थान केले. त्यांची मुलगी मनोरमासुद्धा त्यांच्याबरोबर होती. इंग्लंडमध्ये असतानाच वॉण्टेज शहरात त्यांनी आपल्या मुलीसह 29 सप्टेंबर 1883 रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. या घटनेपासून या विदूषीच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले. रमाबाई इंग्लंडला गेल्या तर तेथे त्या ख्रिस्ती होतील ही महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांची भीती खरी ठरली. अपेक्षेप्रमाणे या घटनेने त्याकाळात महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली.

          इंग्लंडमध्ये 1886 पर्यंत म्हणजे तीन वर्षे राहून रमाबार्इंनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. याच दरम्यान महाराष्ट्रातून आनंदीबाई गोपाळराव जोशी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या आनंदीबाई पहिल्या भारतीय महिला, तर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या पंडिता रमाबाई या दुसऱ्या महाराष्ट्रीयन महिला. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रार्थना समाजाचे नेते डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या कन्या अन्नपूर्णा किंवा ॲना तर्खडकर इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई सरस्वती यांची पूर्वी कधीही गाठभेट झाली नव्हती. मात्र आनंदीबार्इंच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी पंडिता रमाबाई कन्येसह इंग्लंडहून अमेरिकेत गेल्या.

          आनंदीबार्इंच्या पदवीदान समारंभानंतर रमाबार्इंचे अमेरिकेत अडीच वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी अमेरिकेच्या विविध भागांत व्याख्याने दिली. अमेरिकेतील महिलांच्या संस्था, तेथील शिक्षणपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अमेरिकन जनतेत भारतातील महिलांच्या, विशेषत: बालविधवांच्या परिस्थितीबाबत जागृती निर्माण केली. या जागृतीमुळे हिंदुस्थानात पंडिता रमाबार्इंच्या महिलांविषयक कार्यास मदत करणाऱ्या रमाबाई असोसिएशनया संस्थेचा जन्म झाला. हिंदुस्थानात हे कार्य करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची हमी या संस्थेने स्वीकारली.

          हिंदुस्थानात उच्चवर्णीय बालविधवांसाठी शाळा चालविणे हे रमाबाई असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट होते. या शाळेची शैक्षणिक पद्धती पूर्णत: पंथरहित असावी, असा या संस्थेच्या घटनेत महत्त्वाचा नियम होता. रमाबाई असोसिएशनच्या सल्लागार मंडळात रावबहादूर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रावबहादूर महादेव गोविंद रानडे यांचा समावेश होता.

          भारतात परतल्यानंतर पंडिता रमाबार्इंनी रमाबाई असोसिएशनच्या वतीने मुंबईत चौपाटीजवळ 11 मार्च 1889 रोजी शारदा सदनया संस्थेची स्थापना केली. या सदनाच्या पहिल्या बालविधवा विद्यार्थिनी गोदूबाई. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह होऊन पुढे त्या आनंदीबाई वा बाया कर्वे या नावाने सुपरिचित झाल्या. बाया कर्वे यांनी माझे पुराणया आपल्या आत्मचरित्रात शारदा सदनातील दिवसांचे वर्णन केले आहे. गोदूबार्इंप्रमाणेच अनेक बालविधवांना शारदा सदनात शिक्षण आणि निवारा मिळाला.

          दीड वर्षानंतर म्हणजे 1880 च्या नोव्हेंबरात रमाबार्इंनी शारदा सदनचे मुंबईतून पुण्यातील कॅम्पात स्थलांतर केले. शारदा सदन ज्या संस्थेतर्फे चालविले जात होते ती रमाबाई असोसिएशन ही मिशनरी संस्था नसल्याने शारदा सदनचे काम सेक्युलर पद्धतीने चालवावे असा स्पष्ट नियम होता. रमाबाई स्वत: ख्रिस्ती असल्या तरी सदनातील बालविधवांच्या धार्मिक बाबतीत त्यांनी ढवळाढवळ करू नये असा असोसिएशनच्या सल्लागार मंडळींचा आग्रह होता. मात्र शारदा सदनच्या चालिका स्वत: हे कार्य येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी चालवित असल्याने त्यांच्या जीवनपद्धतीचा, विचारसरणीचा प्रभाव सदनातील कोवळ्या वयाच्या मुलींवर पडणे साहजिकच होते. यातूनच रमाबाई शारदा सदनातील असाहाय्य मुलींवर धर्मांतराची सक्ती करतात, रमाबाई छुप्या पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत, असे आरोप त्यांच्यावर केले जाऊ लागले.

          शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनी गोदूबार्इंचा धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह झाला तेव्हा पंडिता रमाबार्इंनी शारदा सदनात मोठी जेवणावळ घातली. या समारंभाबद्दल महर्षी कर्व्यांनी आपल्या आत्मवृत्तया आत्मचरित्रात लिहिले आहे, “आपल्या पहिल्याविद्यार्थिनीची योग्य व्यवस्था लागत आहे हे पाहून त्यांना (रमाबार्इंना) अतिशय आनंद झाला होता. सदनातील विद्यार्थिनींनाही आपल्या एका मैत्रिणीला संसारसुखाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्यामुळे आणि विधवांच्या भावी सुस्थितीचे द्वार मोकळे होत चालल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता.बाया कर्वे यांनी आपल्या माझे पुराणआत्मचरित्रात म्हटले आहे, ‘बार्इंनी मला दागिने व कपडे दिले. त्यांच्या जावयालाकर्व्यांना कपडे दिले.पंडिता रमाबार्इंच्या या जावयाने पुढे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान केले आणि वयाची शंभरी गाठल्यानंतर त्यांचा पंडित नेहरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर आणि गोपाळ कृष्ण गोखले आदी मोजक्या व्यक्तींच्या ऋणांचा आदरपूर्वक उल्लेख केला.

          शारदा सदनचे काम चालू असतानाच पंडिता रमाबाई हिंदुस्थानच्या राष्ट्रीय चळवळीतही सक्रियपणे भाग घेत. रमाबार्इंच्या प्रयत्नांमुळे काँग्रेस संघटनेत स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. मुंबईत भरलेल्या 1889 च्या काँग्रेस अधिवेशनात रमाबाई स्त्री-प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या केवळ दोन महिलांमध्ये रमाबार्इंचा समावेश होता. या परिषदेतील रमाबाईंच्या भाषणाचे विस्तृत वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने 30 डिसेंबर 1889 च्या अंकात दिले.

          1897 मध्ये महाराष्ट्रात प्लेगच्या साथीने थैमान घातले. यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चालविलेल्या कडक तपासणीमुळे सामान्य लोकांच्या झालेल्या हालाविरुद्ध पंडिता रमाबार्इंनी आवाज उठविला. गार्डीयनया इंग्रजी साप्ताहिकात रमाबार्इंनी या संदर्भात एक पत्र लिहिले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उपस्थित झालेल्या या विषयाच्या संदर्भात उत्तर देताना लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांनी रमाबार्इंचे हे पत्रच वाचून दाखविले.

          1895 साली पुण्यात काँग्रेसचे प्रथम अधिवेशन भरले तेव्हा संपूर्ण हिंदुस्थानातून या शहरात जमलेल्या काही पुढाऱ्यांनी शारदा सदनला भेट दिली. तोपर्यंत या सदनातील बारा मुली रमाबार्इंच्या कार्याने प्रभावित होऊन ख्रिस्ती झाल्या. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठे वादळ निर्माण झाले. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेत विधवाविपनाचा निषेध करणारा व विधवांना स्वावलंबी करण्याबाबतचा ठराव इंडियन सोशल रिफॉर्मचे संपादक के. नटराजन यांनी मांडला. त्यावेळच्या भाषणात नटराजन म्हणाले, “विधवांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा जो पायंडा पंडिता रमाबार्इंनी घालून दिला आहे व या शहरात त्यांचे कार्य इतक्या यशस्वीपणे चालू आहे त्याची प्रशंसा केल्याखेरीज माझ्याने राहवत नाही. काही धर्मांतरे झाली त्यांच्याबद्दल रमाबार्इंवर जे टीका करत आहेत त्यांच्याबद्दल मला सहानुभूती वाटत नाही. ठोकळेबाज धर्ममतांवर माझा विश्‍वास नाही. आपल्या बंधूंचे भले करणे हा मी सर्वोच्च धर्म समजतो. भुकेल्याला अन्न देणे हे अत्यंत उच्च दजाचे धार्मिक कृत्य व श्रेष्ठ प्रतीचे दान आहे. पंडिताबाई व तिचे अमेरिकेतील मित्र व सहायक यांचे आपल्यावर इतके ऋण आहेत की आपण ते कधीही फेडू शकणार नाही; मग धर्ममतांबद्दल कितीही मतभेद असो.

          रमाबार्इंना जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते. रमाबाई असोसिएशनच्या नियमानुसार शारदा सदनात उच्चवर्णीय मुलींसाठी सोवळ्याओवळ्याचे कडकडीत नियम पाळावे लागत असत. असे सोवळ्याओवळ्याचे नियम तेथे पाळले नसते तर अनेक उच्चवर्णीय लोकांनी आपल्या बालविधवा मुलींना वा बहिणींना शिक्षणासाठी येथे पाठविलेच नसते. या संदर्भात शारदा सदनातील आपल्या सुरुवातीच्या दिवसांचे बाया कर्व्यांनी पुढील शब्दात वर्णन केले आहे. सहा महिने ब्राह्मणाची बाई मिळाली नाही म्हणून माझे जेवणही मलाच करावे लागे. गोविंदराव व काशीबाई कानिटकर, हरी नारायण आपटे आदी मंडळी केव्हा तरी सदनात आली म्हणजे एखाद्या वेळी त्यांच्यासाठी स्वयंपाकसुद्धा करावा लागे.

          आपल्या मुली बालविधवा असल्या, समाजात त्या कितीही उपेक्षित असल्या तरी शारदा सदनात त्यांनी सुखात राहावे, असे रमाबार्इंना वाटे. शारदा सदनातील घटनांकडे लक्ष असणारे लोक रमाबाई आपल्या मुलींना दुधातुपात नुसते लोळवितेअसे म्हणत. शारदा सदनातील बालविधवांच्या या खाण्यापिण्यावरून एकदा केसरी आणि सुधारक या वृत्तपत्रांत वादही झाला होता. बाया कर्व्यांनी या संदर्भात लिहिले आहे, रमाबाई असोसिएशनची सल्लागार मंडळी म्हणे आपल्या जातीतील विधवांनी चैनीने राहणे बरे नव्हे’, पण रमाबार्इंना ते आवडत नसे. पूर्वीचे दिवस त्यांच्या मनात येत. त्या म्हणत, ‘मी विद्यार्थिनींना हालातून वर काढण्यासाठी त्यांचे हाल कमी करण्यासाठी शाळा घातली. मी त्यांना सुखात ठेवायचे ठरविले, ते कमी होणे शक्य नाही.

          शारदा सदनातील दिवसांबद्दल कृष्णाबाई गद्रे यांनी लिहिले आहे, ‘काय त्या बंगल्याची शोभा व काय तो सुंदर फुलांनी शृंगारलेला बगीचा, जिकडे पाहिजे तिकडे मोकाट फिरण्याची आम्हाला मुभा, दिवाणखाना देखील आमची बैठकीची जागा. सुंदर कोचाखुर्च्यांवर बसून गप्पा माराव्यात, बागेत जाऊन जाई, जुई, मोगरा, चमेली, बकुळी व मधुमालतीच्या वेण्या गुंफून केसावर लावाव्यात. रमाबार्इंनी आम्हाला फुलांची, पक्ष्यांची व झाडांची माहिती देऊन दुर्बिणीतून (सूक्ष्मदर्शक यंत्रांतून) त्यांचे निरीक्षण करण्यास शिकवले. काय ते लाड? अशा सुंदर वातावरणात आपले दिवस घालवायला कोण बालविधवा येणार नाही? कधी कधी रमाबाई स्वत: पहाटेस उठून आम्हाला आगाशीवर नेऊन नक्षत्रे वगैरे मोठ्या आवडीने शिकवीत.

          रमाबाई या शारदा सदनातील मुलींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बळजबरी करतात, हा त्यांच्यावर नेहमी केला जाणारा आरोप. या आरोपामुळे घाबरून काही पालकांनी आपल्या मुली सदनातून काढून घेतल्या. मात्र त्यामुळे या सदनात आश्रयासाठी येणाऱ्या अनाथ, समाजाने टाकून दिलेल्या बालविधवांची संख्या रोडावली नाही. समाजात त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेल्या वादळास खंबीरपणे तोंड देऊन पंडिता रमाबार्इंनी विधवांच्या पुनर्वसनाचे आपले कार्य चालूच ठेवले.

          त्या काळात मुली पाच-सहा वर्षांच्या झाल्या की त्यांची लग्ने उरकून टाकली जात असत. अनेकदा या कोवळ्या मुलींची प्रौढ पुरुषांशी लग्ने लावली जात असत. यामुळे अनेक मुलींवर वैवाहिक सुख भोगण्याआधीच बालविधवा होण्याची आपत्ती कोसळे. या बालविधवांना त्यानंतर अत्यंत उपेक्षित जीवन जगावे लागे. त्यांच्या स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींकडून आणि समाजाकडून त्यांची उपेक्षा होत असे. बैरामजी मलबारी या पारशी समाजसुधारकाने बालविवाह प्रथेविरुद्ध आवाज उठविला. या चळवळीचा परिणाम होऊन ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात संमतीवयाचे विधेयक आणले. या विधेयकानुसार बारा वर्षांपेक्षा लहान असलेल्या स्त्रीशी तिच्या नवऱ्याने शरीरसंबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरणार होता. या विधेयकामुळे स्त्रियांच्या हालअपेष्टा कमी होणार असल्याने या विधेयकास स्त्रियांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी पंडिता रमाबार्इंनी पुढाकार घेतला.

          संमतीवयाच्या विधेयकामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात. विशेषत: पुण्यात मोठा वाद निर्माण झाला. ब्रिटिश सरकारतर्फे सामाजिक सुधारणा लागू करण्यास लोकमान्य टिळकांचा प्रथमपासून विरोध होता. त्यातच समाजातील सनातनी मंडळींचाही या विधेयकास विरोध अपेक्षितच होता. या विधेयकामुळे पुण्यात गोपाळ गणेश आगरकर, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक आणि या विधेयकास विरोध करणारी सनातनी मंडळी यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. महिलांच्या विकासासाठी धडपडणाऱ्या पंडिता रमाबाई या विधेयकास पाठिंबा देण्यासाठी महिलांना संघटित करू लागल्या. संमतीवयाच्या विधेयकाच्या निमित्ताने पुण्यातील दोन गटांनी एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात चिखलफेक केली. या संघर्षात अल्पसंख्य असणाऱ्या आगरकर, पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर या समाजसुधारकांना अर्थातच मोठी किंमत चुकवावी लागली.

          संमतीवयाच्या विधेयकास पाठिंबा मिळविण्यासाठी मुंबईत झालेल्या एका सभेचे चालकत्व पंडिता रमाबार्इंकडे होते, तर अध्यक्षस्थानी कॉर्नेलिया सोराबजी या सामाजिक कार्यकर्त्यां होत्या. त्यानंतर पुण्यात आर्य महिला समाजाच्या वतीने पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकरांनी सभा आयोजित केली. या सभेत पाच-सहा महिलांचा अपवाद वगळता इतर महिलांनी या विधेयकास पाठिंबा व्यक्त करणाऱ्या ठरावावर सह्या केल्या, असे त्यावेळी आगरकरांच्या सुधारकपत्रात छापून आले.

          न. चिं. केळकरांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्रात या सभेबद्दल खालील माहिती दिली आहे. या लिखाणावरून पंडिता रमाबार्इंच्या स्वभाववैशिष्ट्यांवरही प्रकाश पडतो. केळकरांनी लिहिले आहे.

          सौ. काशीबाई कानिटकर यांनी बिलाचे समर्थन केले, पण दुसरी एक बाई उठून म्हणाली, या बिलान्वये तुमच्या जावयावर उद्या खटला झाला तर तो तुम्हांस आवडेल काय? काशीबाई पडल्या हाडाच्या हिंदू. त्यांच्याने उत्तर देववेना. रामाबाईही हाडाच्या हिंदूच, पण धर्मांतराने त्यांचे सर्वच विचार बदललेले होते. काशीबाई निरुत्तर झाल्यावर रमाबाई म्हणाल्या, ‘बेहेत्तर आहे. मुलीपेक्षा जावई अधिक नाही.हे उत्तर पंडिता रमाबाईंच्या सडेतोड स्वभावास धरूनच होते. हा स्वभाव धर्मांतराने नव्याने बनलेला नव्हता.

          संमतीवयाच्या विधेयकाविरुद्ध कितीही गदारोळ उठला तरी अखेरीस हे विधेयक मंजूर होऊन तसा कायदा अस्तित्वात आला. आज विशीच्या आत मुलींची सहसा लग्ने होत नाहीत. शंभर वर्षांपूवी मात्र बारा वर्षांखालील मुलींच्या विवाहास विरोध करण्यासाठी रमाबार्इंना चळवळ करावी लागली आणि प्रतिकूल टीकेस तोंडही द्यावे लागले.

          मध्य भारतात 1897 साली भीषण दुष्काळ पडला तेव्हा भुकेने हाडाचे सापळे झालेल्या शेकडो मुलींना पंडिता रमाबार्इंनी आश्रय दिला. या मुलींच्या मदतीला रमाबाई धावून गेल्या नसत्या तर या मुलींना मृत्यूलाच सामोरे जावे लागले असते.

          रमाबाईंच्या भारतातील महिलांच्या कार्यासाठी अमेरिकेतील रमाबाई असोसिएशनने दहा वर्षे आर्थिक पाठबळ देण्याचे कबूल केले होते. 1898 मध्ये ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा रमाबाई अमेरिकेत गेल्या व ही संस्था विसर्जित करण्यात आली. यानंतर नव्याने स्थापन झालेल्या अमेरिकन रमाबाई असोसिएशनया संस्थेच्या मदतीने रमाबार्इंनी पुण्याजवळील केडगाव येथे मुक्ती सदनचे काम सुरू केले. त्यानंतर रमाबार्इंनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ केडगाव येथेच घालविला.

          केडगाववात पंडिता रमाबार्इंनी समाजाच्या विविध उपेक्षित घटकांसाठी वेगवेगळी सदने काढली. एखाद्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडले वा त्यांच्यावर एखाद्या अनुचित घटनेची आपत्ती कोसळली की त्या स्त्रियांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला ती स्त्री नकोशी होई, अशा समाजबहिष्कृत स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी कृपासदनउघडले. या परित्यक्ता स्त्रियांचे त्यांनी पुनर्वसन केले. वृद्ध, अपंग आणि परावलंबी स्त्रियांसाठी रमाबार्इंनी प्रीती सदनसुरू केले.

          भारतातील पहिली अंधशाळा उघडण्याचे श्रेय रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबाई यांना दिले जाते. अंधत्वामुळे परावलंबी बनलेल्या मुलींना आणि महिलांना केडगावातील बर्तमय सदनातआश्रय देऊन रमाबार्इंनी त्यांचे पुनर्वसन केले. येशू ख्रिस्ताने बर्तमय नावाच्या अंधाला दृष्टी दिली असे बायबलमध्ये सांगितले आहे. बर्तमय सदनातील अंध महिलांना ब्रेलने एकप्रकारे दृष्टीच दिली. बर्तमय सदनात या अंधांना स्वेटर विणण्याची, वेताच्या खुर्च्या बनविण्याची, टोपल्या तयार करण्याची कला शिकविली जाई. त्यामुळे या अंध महिला आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकल्या.

          केडगावात स्थायिक झाल्यानंतर लवकरच म्हणजे 1905 साली पंडिता रमाबार्इंनी संपूर्ण बायबलचे मराठी भाषांतर करण्याचे कार्य हाती घेतले. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचे हे कार्य चालू राहिले. संपूर्ण बायबलच्या भाषांतरास त्यांना अठरा वर्षे लागली. बायबलचा जुना करार हिब्रू भाषेत तर नवा करार ग्रीक भाषेत आहे. संपूर्णबायबलच्या इंग्रजी भाषांतराच्या अनेक आवृत्त्या रमाबाईंच्या काळातसुद्धा उपलब्ध होत्या. तरीसुद्धा मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून बायबलचे मराठीत भाषांतर करण्याचे या विदूषीने ठरविले आणि त्यासाठी या दोन्ही भाषांचा त्यांनी अभ्यास केला.

          कर्नाटकात जन्मलेल्या रमा डोंगरेला कानडी भाषा येत होती, वडिलांमुळे तिने संस्कृतवर प्रावीण्य मिळविले आणि रमा पुढे पंडिता रमाबाई सरस्वतीबनली. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठीवरही प्रभुत्व मिळविले. इंग्रजी शिकून पुढे त्या इंग्लंड आणि अमेरिकेतही व्याख्याने देत फिरल्या. चाळिशी उलटल्यानंतर त्या आता बायबलच्या भाषांतरासाठी हिब्रू आणि ग्रीक भाषेचा अभ्यास करू लागल्या. मुक्ती सदनातील दीड-दोन हजार अनाथ मुली आणि महिलांची जबाबदारी असताना पंडिता रमाबाई आपल्या विविध कार्याचा व्याप सांभाळत असत हे विशेष.

          बायबलच्या मूळ भाषेतून म्हणजे हिब्रू आणि ग्रीक मधून या धर्मग्रंथाचे भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या जगातील एकमेव महिला. पंडिता रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबार्इंचे वयाच्या चाळिसाव्या वर्षी निधन झाले. आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्यूचा आघात रमाबार्इंनी खंबीरपणे सोसला आणि बायबलच्या भाषांतराचे काम चालूच ठेवले. बायबलचे भाषांतर हे त्यांच्या अखेरच्या जीवनातील मिशन बनले होते. भाषांतर पूर्ण होण्याआधी आपला मृत्यू होऊ नये अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. रमाबार्इंचे बायबलचे भाषांतर त्यांच्या स्वत:च्या केडगावातील छापखान्यातच छापले जात होते. 4 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबार्इंनी भाषांतराचे शेवटचे प्रूफ वाचून हातावेगळे केले आणि छपाईसाठी छापखान्यात पाठविले. त्यानंतर त्याच रात्री या महान समाजसेविकेने या जगाचा निरोप घेतला.

संदर्भ

1. ‘महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई’- लेखक आणि प्रकाशक - देवदत्त नारायण टिळक, शांतिसदन, आग्रा रोड, नाशिक (1960).

2. ‘वधस्तंभाचे सेवक’ - लेखक-थिओडोर विल्यम्स - मराठी अनुवाद - डी. वाय. गायकवाड, प्रकाशक - औटरिच प्रकाशन, इंडियन इव्हँजेलिकल मिशन, 7 लँगफोर्ड रोड, बंगलोर 560025 (1991).

3. ‘भारत आणि ख्रिस्त’ - लेखक-फादर हान्स स्टाफनर (येशूसंघ) मराठी अनुवाद - डॉ. वा. पु. गिडे, प्रकाशक - मार्ग प्रकाशक, स्टीफन्स निवास, 2008, संत विन्सेंट मार्ग, पुणे 411001 (1988).

4. ‘ख्रिस्ती मराठी वाङ्मय (फादर स्टीफन्स ते इ.स. 1960 अखेर)’-लेखक -डॉ. गंगाधर नारायण मोरजे, प्रकाशक - डॉ. पी. एस. जेकब, प्राचार्य, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर आणि डॉ. मॅथ्यू लेदर्ले (येशूसंघ), स्नेहसदन, 250 शनिवार पेठ, पुणे 411030, (वितरक - अ.ज.प्रभू, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, 1334शुक्रवार पेठ, पुणे 411 002 (1984).