अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघ
आमचा अहमदनगर जिल्हा एकेकाळचा कम्युनिस्ट विचारसरणीचा बालेकिल्ला.. इथले नंतर राज्यात आणि केंद्रात प्रस्थापित झालेले अनेक नेते मूळचे कम्युनिस्ट विचारधारेचे.
मला आठवते ती इथली पहिली लोकसभेची निवडणूक १९७१ सालची. त्यावेळचे तेव्हाच्या कोपरगाव मतदारसंघातले सर्वांत तगडे उमेदवार होते कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि त्यांच्या विरोधात होते होतकरु तरुण उमेदवार एकनाथ विठ्ठलराव विखे पाटील.
इंदिराबाईंच्या `गरिबी हटाव'च्या त्या लाटेत निवडणूक अर्थात बाळासाहेब विखे जिंकले आणि त्यानंतर जिल्ह्यातला कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव ओसरत गेला, राज्यात सुद्धा.
आताचा शिर्डी मतदारसंघ राखीव झाला, त्यामुळे विखे घराण्याने शेजारच्या अहमदनगर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. तरी शिर्डी मतदारसंघात विखे चालवतील त्या उमेदवाराला भरपूर मते मिळतील अशीच स्थिती आहे.
रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा २००९ साली शिर्डी राखीव मतदासंघात पराभव झाला होता, आता ते भाजपच्या मदतीने राज्यसभेत आहेत, केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत.
तर या राखीव मतदारसंघात आपण आपल्या पसंतीचा उमेदवार जिंकून आणू शकतो अशी भावना येथील ख्रिस्ती मतदारांची आहे, याचे कारण या मतदारसंघाचा इतिहास आणि रचना.
मुंबई, पुणे आणि पालघर (वसई) खालोखाल इथे ख्रिस्ती मतदान अत्यंत लक्षणीय आहे आणि तिरंगी किंवा चौरंगी लढतीत ही मते निर्णायक ठरु शकतात.
उद्या सोमवार १३ मे रोजी या मतदारसंघात मतदान आहे आणि त्या निमित्ताने ख्रिस्ती लोकांच्या समाजमाध्यम ग्रुप्स वरच्या चर्चा या अनुषंगाने आहेत. या अनेक ग्रुप्सवर मी असल्याने या चर्चेतील आशय समजला.
अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाला स्वतःचा एक आगळावेगळा इतिहास आहे, ओळख आहे.
पुण्या-मुंबईतल्या कॉस्मोपॉलीटन ख्रिस्ती लोकांच्या तुलनेत हे लोक इथल्या मातीतले आहेत, इथल्या समाजजीवनाशी त्यांची नाळ जुळलेली आहे.
श्रीरामपूर परिसरात हरेगाव येथील खाजगी बेलापूर शुगर फॅक्टरी, टिळकनगर येथील खाजगी महाराष्ट्र शुगर फॅक्टरी येथे अंगमेहेनती कामगार वर्ग इथला वंचित समाजाचा होता.
त्या कामगारवर्गामध्ये स्थानिक आणि शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यातील ख्रिस्ती समाजाचे मोठे प्रमाण होते.
या तीनचार खाजगी साखर कारखान्यातील कामगार संघटनांचे नेते वंचित समाजातील चांगदेव त्रिभुवन आणि रणशूर वगैरे मंडळी होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर काम केलेल्या दादासाहेब (दामोदर) रुपवते यांच्यापासून आंबेडकरी चळवळीशी आणि कार्यकर्त्यांशी येथील वंचित ख्रिस्ती लोकांचे घट्ट संबंध राहिलेले आहेत.
रुपवते नंतर काँग्रेसमध्ये गेले, मंत्रीही झाले.
सत्तरच्या दशकात अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाचे कार्यक्रम नामदार दादासाहेब रुपवते यांच्या उपस्थितीवाचून होत नसत.
आज दादासाहेब रुपवते यांच्या नात असलेल्या उत्कर्षा रुपवते या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डीत उमेदवार आहेत.
इथले प्रमुख उमेदवार उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आहेत तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून लढत आहेत.
अर्थात शिर्डी आणि अहमदनगर मतदारसंघांतली खरी अटीतटीची लढत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे राधाकृष्ण विखे या दोन पारंपरीक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आहे.
मात्र यावेळी राधाकृष्ण विखे स्वतः अहमदनगर मतदारसंघात त्यांचा मुलगा सुजय विखे यांच्या निवडणूक प्रचारात गुंतलेले आहेत. तिथे महाआघाडीच्या निलेश लंके यांनी महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे.
शिर्डी आणि अहमदनगर मतदारसंघांतला ख्रिस्ती समाज आंबेडकरी चळवळीशी आणि कार्यकर्त्यांशी नाते सांगतो याचे कारण हे नाते तसे एकदम नैसर्गिक आहे.
इथल्या ख्रिस्ती समाजाचा इतर मागास वर्गात म्हणजे ओबीसीमध्ये समावेश होतो.
हा ख्रिस्ती समाज इथल्या वंचित समाजाचाच एक घटक आहे, धर्मामुळे त्यांच्यावर अन्याय होऊन त्यांना अनुसूचित जातीचे आरक्षण लागू होत नाही, इतकाच काय तो फरक.
त्यामुळे इथल्या राखीव जागेवर नैसर्गिक हक्क असुनसुद्धा आपण लढू शकत नाही तरी इथे लढणाऱ्या एखाद्या आपल्या उमेदवाराला आपण पाठबळ देऊन निदान निवडून आणू शकतो अशी भावना साहजिकच शिर्डी आणि काही प्रमाणात शेजारच्या अहमदनगर मतदारसंघांतील वंचित ख्रिस्ती समाजाची आहे
.
ही वस्तुस्थिती असल्याने या दोन्ही मतदारसंघांतील ख्रिस्ती मतदान आपल्या बाजूने वळवण्याचे शर्थीचे प्रयत्न काँग्रेस, महायुती आणि वंचित बहुजन आघाडींकडून होत आहेत.
यात ज्या आघाडीला यश मिळेल त्या आघाडीकडे या अटीतटीच्या निवडणुकीत यशाचे पारडे झुकेल अशी स्थिती आहे.
उद्याच ( १३ मे रोजी) मतदान होणाऱ्या पुणे मतदारसंघात आणि मावळ मतदारसंघात (पिंपरी चिंचवडचा समावेश असलेल्या) सुद्धा ख्रिस्ती मतदानाची संख्या अत्यंत लक्षणीय आहे.
या दोन्ही शहरांतील मतदार यादीतील या ख्रिस्ती मतदारांच्या विशिष्ट नाव आणि आडनावांमुळे त्यांची धार्मिक पार्श्वभूमी राजकीय पक्षांच्या नेत्यांना कळत देखील नाही अशी गंमत आहे. (उदाहरणार्थ, माझे व माझ्या मुलीचे नाव).
त्यामुळे या मतदारांकडे एक व्होटबँक म्हणून पाहिले जात नाही आणि इथेच गफलत होते.
महाराष्ट्रात ख्रिस्ती मतदारांची सर्वाधिक संख्या मुंबईत दोन मतदारसंघांत आहे.
तिथे पुढल्या टप्प्यात, २० मे रोजी, मतदान आहे. त्याबाबत नंतर...
Camil Parkhe