टी. बी कुन्हा
खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील मतदारांनी जन्माने ख्रिस्ती असलेली एक व्यक्ती लोकसभेवर निवडून दिली होती.
महाराष्ट्र राज्य त्यावेळी त्यावेळी नुकतेच अस्तित्वास आले होते. महाराष्ट्रातून ख्रिस्ती व्यक्ती देशाच्या संसदेवर निवडून येणे ही फार मोठी ऐतिहासिक घटना होती, त्या निवडणुकीने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक खूप ताकदवान राजकीय नेता दिला.
निवडून आलेल्या त्या व्यक्तीने देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर फार मोठा दूरगामी प्रभाव केला.
अर्थात जॉर्ज फर्नांडिस यांची १९६७ साली निवड करताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी फर्नाडिस किंवा काँग्रेसचे स. का. पाटील यांचा धर्म किंवा जात विचारात घेतलीच नव्हती.
अरुण साधू यांच्या ‘आज दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन कादंबरींवर आधारीत असलेल्या जब्बार पटेल दिग्दर्शित आणि विजय तेंडुलकर यांची पटकथा असलेल्या `सिहासन' चित्रपटातील डिकॉस्टा या कामगार नेत्याचे पात्र हे जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बेतलेले आहे असे म्हणतात.
सतीश दुभाषी यांनी हे पात्र साकारले होते.
त्यावेळची १९६७ ची लोकसभा निवडणुकीत आजही ऐतिहासिक ठरते याचे कारण त्यावेळी पहिल्यादाच बलाढ्य गणल्या गेलेल्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाला अनेक ठिकाणी विशेषतः दक्षिण भारतात अपयश चाखावे लागले.
त्यावेळी देशात अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रातसुद्धा विरोधी पक्षांचे नेते लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र त्यापैकी बहुतेकांचा पुढील निवडणुकीत पराभव झाला.
जॉर्ज फर्नांडिस यांचासुद्धा.
जॉर्ज फर्नांडिस त्यानंतर अनेकदा बिहारमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीप्रमाणेच धर्माची बाब त्यांच्या या निवडणुकांत कधीही आडवी आली नाही.
मूळचे मॅंगलोरचे असलेले जॉर्ज तरुणपणी फादर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी सेमिनरीत दाखल झाले होते ! ( दहावीच्या परीक्षेनंतर मी पण जेसुईट धर्मगुरू होण्यासाठी श्रीरामपूर सोडून गोव्यात आलो होतो. )
जन्माने ख्रिस्ती असलेली आणखी दोन व्यक्ती ख्रिस्ती बहुसंख्य नसलेल्या मतदारसंघातून अनेकदा निवडून आलेल्या आहेत. जॉर्ज फर्नाडिस यांच्याप्रमाणेच ही व्यक्ती सर्वांना परिचित आहे. त्या आहेत काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी.
त्याशिवाय तिसरी व्यक्ती म्हणजे एन. के. पी. साळवे.
'महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्त्वाची ख्रिस्ती व्यक्ती म्हणजे एन. के. पी.
(नरेंद्र कुमार प्रसादराव) साळवे. ते १९६७ ते १९७७ या काळात लोकसभेचे सभासद होते.
त्याशिवाय राज्यसभेवर ते चार वेळेस निवडून गेले होते आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्रीसुद्धा होते.
अर्थात जॉर्ज फर्नांडिस किंवा सोनिया गांधी यांना ख्रिस्ती व्यक्ती म्हणून संबोधने त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, त्यांना ते आवडले नसते याची मला पूर्ण कल्पना आहे.
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे किंवा समाजवादी नेते ना. ग. गोरे यांना ब्राह्मण म्हणून संबोधने असाच काहीसा हा प्रकार आहे.
रोमन कॅथोलिक कुटुंबांत जन्मलेल्या जॉर्ज फर्नांडिस आणि सोनिया गांधी यांचा परंपरेनुसार बाप्तिस्मा झाला होता. त्याचप्रमाणे नानासाहेब गोरे किंवा कॉम्रेड डांगे हे ब्राह्मण कुटुंबांत जन्मले होते आणि त्यांनी आपले ब्राह्मण्यत्व कधीही मिरवले नव्हते.
जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच इतरही अनेक ख्रिस्ती व्यक्ती मुंबईच्या समाजकारणात आणि राजकारणात त्याकाळात सक्रीय होत्या.
जॉर्ज फर्नांडिस मुंबईच्या क्षितिजावर अवतरण्यापूर्वी खूप वर्षे आधीच त्यांचा मुंबईच्या समाजकारणात आणि चळवळीत वावर होता.
वसईचे `काका' जोसेफ बॅप्टिस्टा असेच एक नाव. बाळ गंगाधर टिळक यांचे एक जवळचे सहकारी.
चिरोल बदनामी खटल्यात विलायत वारीत जोसेफ बॅप्टिस्टा यांनी टिळकांना साथ दिली होती. त्याशिवाय `होम रुल' चळवळीचे ते एक प्रमुख नेते होते.
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हे टिळकांचे ऐतिहासिक वाक्य मूळचे काका जोसेफ बॅप्टिस्टा यांचे आहे असेही काही जण म्हणतात.
वसईत आता त्यांच्या नावाने एक ज्युनियर कॉलेज आहे.
जॉर्ज फर्नाडिस यांच्यापूर्वी खूप वर्षे आधी एका ख्रिस्ती कामगार नेत्याची मुंबईतून आमदार म्हणून निवड झाली होती.
समाजवादी पक्षाचेच असलेले पीटर अल्वारीस हे त्यांचे नाव.
पीटर अल्वारीस हे मूळचे गोव्याचे. गोव्यात पोर्तुगीजांविरुद्ध उठाव करण्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. गोवा सोडून मुंबईत त्यांनी गोवा मुक्तीसाठी कार्य सुरु केले.
पीटर अल्वारीस हे मुंबई विधानसभेचे ते १९४९ ते १९५२ या काळात आमदारसुद्धा होते. त्यांच्या रूपाने एक कामगार नेता पहिल्यांदा आमदार झाला होता.
गोवा १९६१ साली मुक्त झाल्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून पीटर अल्वारीस पणजी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.
गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने अल्वारीस यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला होता.
गोव्यातल्या पोर्तुगीज वसाहत राजवटीविरुद्ध संघर्ष उभारणारे टी. बी कुन्हा (त्रिस्ताव डी ब्रागांझा कुन्हा) यांनी मुंबईतून आपले राजकीय कार्य सुरु ठेवले होते.
येथे अधिक ठळकपणे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच या सर्व व्यक्ती केवळ जन्मानेच रोमन कॅथोलिक होत्या.
यापैकी बहुतेक जण एकतर डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीच्या होत्या. काही पूर्ण नास्तिक होते.
नास्तिक असल्यामुळे टी. बी. कुन्हा यांना मुंबईतील कॅथोलिक कबरस्थानात चिरविश्रांतीसाठी जागा मिळाली नव्हती. त्याऐवजी त्यांचे पार्थिव प्रोटेस्टंट कबरस्थानात पुरण्यात आले होते.
एके काळी नाकारलेल्या गेलेल्या टी. बी. कुन्हा यांच्या याच पार्थिवाच्या अवशेषाला आता पणजीतल्या आझाद मैदानातील स्मारकात अत्यंत सन्मानाची जागा मिळाली आहे.
प्रजा समाजवादी पक्षाचे एफ एम पिंटो हे सत्तरच्या दशकात माटुंगा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून जात असत. मुंबईच्या माटुंगा, चेंबूर, बांद्रा, अंधेरी, आणि इतर परिसरांत मूळचे गोमंतकीय तामिळ आणि मल्याळी असलेल्या ख्रिस्ती लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे.
खूप वर्षांपूर्वी जनता दलाचे डॉमिनिक गोन्सालवीस वसईतून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते.
डॉ. लिऑन डिसोझा यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होते. आमदार म्हणून निवडले गेल्यानंतर काही काळ ते महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीसुद्धा होते.
नव्वदच्या दशकात महाराष्ट्र मंत्रिमंडळात सेलीन डिसिल्व्हा या मंत्री होत्या.
सेलीन डिसोझा यांच्या कन्या जेनेट डिसोझा यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या उपाध्यक्षा म्हणून कार्य केले आहे.
आता हा भूतकाळ झाला आहे. मात्र हा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.
Camil Parkhe