Tuesday, November 8, 2022

इंग्लंडचे वलयांकित राजघराणे

जगातल्या तीन पदांवरील व्यक्तींविषयी गेली काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम औत्सुक्य राहिलं आहे. ही तीन पदे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रोमस्थित पोप आणि इंग्लंडच्या राणी साहिबा एलिझाबेथ द्वितीय आणि आता त्यांच्यानंतर गादीवर आलेले किंग चार्ल्स तिसरे..

आता एलिझाबेथ राणी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. प्रिन्स चार्ल्स राजे झाल्यानंतर या पदाविषयी भविष्यकाळात असं औत्सुक्य राहील अशीच  चिन्हे आहेत.

पोप जॉन पॉल दुसरे यांच्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीच्या काळानंतर आणि पोप बेनेडिक्ट आल्यानंतर या पदाचे वलय कमी झाले होते. पोप जॉन पॉल यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपली मोठी छाप उमटवली होती. जगभर अनेक राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटी देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. भारताच्या दोन दौऱ्यांत पोप जॉन पॉल त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भेटले होते. त्यांचा मायदेश पोलंड आणि इतर देशांतील कम्युनिस्ट राजवट संपवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या धक्कादायक निवृत्तीनंतर त्यांची जागा घेणाऱ्या पोप फ्रान्सिस यांनी या पदाला पुन्हा गत वलय मिळवून दिलं आहे.

जगभर आपल्या पदाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवण्याचं कर्तुत्व फार मोजक्या व्यक्तींचं असतं. एके काळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर हे याबाबतीत प्रसिद्ध होते. यामुळेच पद सोडल्यानंतर सुद्धा जगभर त्यांची व्याख्यानं होत असत. त्यांच्या पुस्तकांना मागणी असते. नव्वदी पार केलेल्या किसिंजर यांनी अलीकडेच एक नवं पुस्तक लिहिलं आहे. नुकतेच दिवंगत झालेले आता अस्तंगत झालेल्या  सोव्हिएत रशियाचे प्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह असेच एक व्यक्तिमत्व होते.

पंतप्रधान पंडित नेहरु आणि त्यांच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पण जगभर नाव कमावलं होतं आणि बांगलादेश निर्मितीनंतर इंदिराबाईंनी जगभर आपला वचकसुद्धा निर्माण केला होता.

इंग्लंडचा राजा अथवा राणी इंग्लंडबरोबरच ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर काही स्वतंत्र, सार्वभौम देशांचा राजा/ राणी किंवा राष्ट्रप्रमुख असतो.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेत अमेरिका आणि इंग्लंडच्या राज्यघटनांच्या काही चांगल्या तरतुदींचा समावेश केला आहे. मात्र इंग्लंडच्या राणीला वा राजाला  इंग्लंडच्या इतर पूर्वीच्या वसाहती राष्ट्रांप्रमाणे भारताच्या राष्ट्रप्रमुख म्हणून कायम ठेवले नाही. कॉमनवेल्थ परिषदेचा एक सदस्य म्हणून राणीला या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणून स्वीकारले, बस इतकेच.

इंग्लंडविषयी भारतीय जनतेत एक सुप्त आकर्षण आहे. बहुधा जगभर अनेक देशांतील लोकांत,  विशेषतः ब्रिटिश वसाहती असलेल्या राष्ट्रांत-  अशी भावना असणं शक्य आहे.  अमेरिकेविषयीसुद्धा असच आकर्षण आहे.

भारतातील अनेक लोकांना इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याची, तिथलं नागरीकत्व घेण्याची इच्छा आहे. पोर्तुगालची साडेचारशे वर्षे वसाहत असलेल्या  गोवा, दमण आणि दीव इथल्या लोकांना आणि १९६१ आधी म्हणजे गोवा मुक्तीआधी  जन्मलेल्या लोकांना पोर्तुगालचं नागरिकत्व घेणं आजही शक्य आहे. अनेक जण याबाबत प्रयत्न करून लिस्बनची वाट धरत आहेत.

आपल्या आधीच्या वसाहतीतील लोकांना नागरिकत्व देण्याची   अशीच सवलत इंग्लंडने दिली तर काय होईल याची नुसती कल्पनाच करुन बघा.

दहा वर्षांपूर्वी कुटुंबियांसह युरोप सहल आखताना  इंग्लंडच्या वारीला आम्ही प्राधान्य आणि सर्वाधिक दिवस दिले होते. दुदैवानं  आमच्या सहलीची तारीख आठवड्यावर आली आणि तरीही मुंबईतली ब्रिटिश वकिलात व्हिसाबाबत निर्णय घेईना तेव्हा इंग्लंड वगळून आम्हाला युरोप दौरा करावा लागला होता याची खंत आजही आहे.

गोव्याहून मी बल्गेरिया आणि रशियाला गेलो तेव्हा विमानमार्ग बदलून मॉस्को ऐवजी रोमला थांबण्याची माझी संधी थोडक्यात हुकली होती. मात्र काही वर्षांपूर्वी रोममध्ये आणि इटलीत भरपूर दिवस मुक्काम गेला.

इंग्लंडबाबतही असं काही घडावं अशी गोड आशा आहे.

इंग्लंडच्या राणी साहिबा आपल्या हयातीतच अगदी पदग्रहण केल्यापासून एक दंतकथा बनल्या होत्या. तसं पाहिलं तर हे इंग्लंडची राणी किंवा राजा हे पद अगदी विचित्र आहे. घटनात्मक आहेच शिवाय वंश परंपरेनुसार. शिवाय राजा आणि राणी हे इंग्लंडच्या चर्चचे प्रमुख म्हणजे पोपच. आहे की नाही गंमत ?

धर्मप्रमुख म्हणून इंग्लंडच्या आर्च बिशप ची नेमणूक राणी किंवा राजा करतो, जसं पोप बिशप आणि कार्डिनल यांची नेमणूक करतात तसे. इंग्लंड हे धर्माधिष्ठित राष्ट्र आहे. चर्च ऑफ इंग्लंड हा इंग्लंडचा राजधर्म आहे, त्या अर्थाने इंग्लंड हे सेक्युलर राष्ट्र नाही हे अनेकांना माहितीही नसते.

ख्रिस्ती धर्मात चर्च ऑफ इंग्लंड किंवा अँग्लिकन चर्च हा नवा पंथ निर्माण झाला तो इंग्लंडच्या राजामुळेच. राजा आठव्या हेनरीच्या घटस्फोटाला पोप क्लेमेंट सातवा मान्यता देईना, म्हणून या राजाने सोळाव्या शतकात हा पंथ स्थापन केला.

या राजघराण्यातील सर्व विवाह, बाप्तिस्मा, अंत्यविधी अत्यंत काटेकोरपणे विशिष्ट चर्चमध्ये होत असतात. इंग्लंडचा भावी राजा किंवा राणी धार्मिक नसेल किंवा नास्तिक असेल किंवा दुसऱ्या धर्माचा, पंथाचा असला तर अँग्लिकन चर्चचा धर्मप्रमुख कसा बनेल असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

एलिझाबेथ राणी साहिबा फार बोलत नसायच्या, मात्र त्यांचं सूचक मौनसुद्धा बातमी बनायची. त्यांचा पेहराव, कॅप, गळ्यातला हार याविषयी लिहिलं जायचं. त्यांच्या शेजारी कोण आणि कसे म्हणजे कुठल्या क्रमाने उभे राहिले यावर सुद्धा. त्यांच्या नंतर गादीवर कुणाचा कितव्या क्रमांकावर हक्क यावर लिहिलं जायचं.

राणीला भेटायला कसं जायचं, तिथं कसं वागायचं याविषयी खूप शिष्टाचार असायचे, राणीच्या हातात नेहेमी हातमोजे असायचे. राणीसाहिबावर असं खूप लिहिलं गेलं आहे. तरी त्यांच्या बाबतचे औत्सुक्य कमी होत नाही.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे १९८० साली सत्तेवर पुनरागमन झाल्यानंतर भारतात १९८३ साली कॉमनवेल्थ राष्ट्र प्रमुखांची परिषद झाली. इंग्लंडची राणी या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष. त्यावेळी प्रिन्स फिलिप यांच्यासह त्या नवी दिल्लीत आल्या होत्या. या कॉमनवेल्थ परिषदेचे सदस्य असलेल्या अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख नंतर गोव्यात चार दिवसांसाठी आले. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर अर्थात होत्याच. या ऐतिहासिक परिषदेचे वार्तांकन मी `द नवहिंद टाइम्स'साठी केलं. राणीसाहेब आणि प्रिन्स फिलिप मात्र दिल्लीहून लंडनला परतले होते. या दोघांविषयी वार्तांकन करण्याची माझी संधी हुकली. 

चाळीस वर्षांपूर्वी आताचे राजे चार्ल्स तृतीय आणि लेडी डायना स्पेन्सर यांचा विवाह जगानं अत्यंत  कुतूहलपूर्वक पाहिला  होता. त्यावेळी जगभर वृत्तपत्रांत याबद्दल रकानेच्या रकाने लिहिली गेली. बातमीदार म्हणून मीही याबाबत अपवाद नव्हतो.

प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेंसर यांच्या जगभर गाजलेल्या शाही विवाहाचे वृत्तांकन आमच्या पणजी इथल्या `द नवहिंद टाइम्स' इंग्रजी दैनिकाने केले,  गोव्यातील वृत्तपत्रात लंडनच्या शाही लग्नाचे फोटो मिळविण्यासाठी त्याच दिवशी म्हणजे २९ जुलै १९८१ला  आम्ही खूप  आटापिटा केला होता.  त्याकाळात दुसऱ्या शहरांतल्या, देशांतल्या घटनांचे फोटो चारपाच दिवसांनंतर मिळायचे.

प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही, सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. ब्रिटिश राजघराणे , ब्रिटिश पर्यटन खाते  आणि संपूर्ण जगभरातील प्रसारमाध्यमांतून या होणाऱ्या विवाहाविषयी प्रचंड गाजावाजा केला गेला.  त्यात तसे वावगे असे काहीही नव्हते.

यापूर्वी म्हणजे तीन दशकांपूर्वी १९४७ला राणी एलिझाबेथ व्दितीय यांचा स्वतःचा विवाह झाला तेव्हा ग्रेट ब्रिटन हे  जगातले  एक प्रमुख राष्ट्र असले तरी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र आताइतके जनसामान्यांपर्यंत पोहोचले नव्हते.

मात्र १९८०च्या सुरुवातीच्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची एंगेजमेंज वा  साखरपुडा झाला तेव्हा रेडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला होता, वृत्तपत्रे शहरांत आणि खेड्यापाड्यांत जाऊ लागली होती आणि ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हिजनचे  भारताच्या काही प्रमुख शहरांत आगमन झाले होते.

एके काळी ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळत नसे. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याविषयी जगात अनेक देशांत  कुतूहल होते.  एके काळी ब्रिटिशांनी जेथे राज्य केले होते त्या देशांत आणि इतरही ठिकाणी हा विवाह ठरला, तेव्हापासूनच पुढील काही महिने  हे लग्न म्हणजे एखाद्या परिकथेतील गोड सोहोळा. 'फेरीटेल वेडिंग'  आहे असेच वृत्तपत्रांतून आणि इतर प्रसारमाध्यमातून रंगविले जात होते.

याचे एका कारण म्हणजे खुद्द डायना यांचे व्यक्तिमत्व होते. प्रिन्स चार्ल्सने तिशी पार केली असली तरी डायना स्पेन्सर लग्नाच्यावेळी विशीच्या आत होती.  ती आता राजघराण्याचा भाग होणार होती. प्रसारमाध्यमातून  ब्रिटिश राजघराण्याच्या परंपरा, या शाही विवाहाची पूर्वतयारी, डायना यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी वगैरे संदर्भात भ्ररपूर काही लिहिले जात होते. या शाही लग्नानिमित्त स्मरणिका ठरतील अशा अनेक वस्तू बाजारात आल्या होत्या.

दिनांक २९ जुलै १९८१ला पार पडलेला हा शाही विवाह त्या काळात सर्वाधिक लोकांनी टेलिव्हिजनवर पाहिलेली घटना होती.

जगभर लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेली या घटनेचा वृत्तांत देण्याबाबत पणजी येथे  'नवहिंद टाइम्स'मधील आमच्या संपादकांनी मोठी व्यूहरचना केली होती. लग्नाची बातमी पीटीआय वगैरे वृत्तसंस्थांकडून ताबडतोब मिळणे शक्य होते. मात्र छायाचित्रांच्या बाबतीत तसे नव्हते.

१९८०च्या दशकाच्या सुरुवातीस राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तपत्रे फोटोंसाठी फार मोठया प्रमाणात प्रेस इन्फॉर्मशन ब्युरो (पीआयबी) वर अवलंबून  असत. दिल्ल्लीतून पीआयबीने पाठविलेली तीन-चार दिवसांपूर्वीच्या घटनांची  छायाचित्रे  सर्वच वृत्तपत्रे वापरत.असत. लंडन येथील  या शाही विवाहसोहळ्याची छायाचित्रे त्याच दिवशी मिळणे अशक्यच होते.

त्याकाळात महाराष्ट्रात टेलिव्हिजन फक्त मुंबई आणि नजिकच्या परिसरात दिसत असे. जवळपास कुठे टेलिव्हिजन टॉवर्स नसल्याने गोव्यातही टेलिव्हिजनचे कार्यक्रम पाहता येत नसे. असे असले तरी   'द नवहिंद टाइम्स'चे संपादक बिक्रम व्होरा हे गोव्यात टेलिव्हिजन सुविधा असणाऱ्या अगदी बोटावर मोजणाऱ्या व्यक्तींमध्ये होते. 

त्यासाठी त्यांनी मिरामार समुद्रकिनारी असलेल्या आपल्या बंगल्यात मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम पाहता यावे यासाठी  आपल्या टेलिव्हिजनसाठी एक उंच अँटेना लावली होती.

त्याशिवाय त्या अँटेनाला एका बुस्टरही लावला होता. त्यामुळे मुंबई दूरदर्शन केंद्राने प्रसारीत केलेले सर्व कार्यक्रम त्यांना अगदी स्पष्टपणे पाहता येत असत.

गोव्यात असलेल्या या दुर्मिळ सुविधेचा वापर करून या लग्नाचे छायाचित्र वापरण्याचे  संपादक व्होरांनी ठरविले होते. त्यानुसार लग्नाच्या तारखेच्या आदही काही दिवस फोटोग्राफर संदिप  नाईक  याने संपादकांच्या घरी जाऊन रंगीत तालीम घेतली.

टेलिव्हिजनसमोर कॅमेरा स्टॅन्ड लावून त्याने टेलिव्हिजनवर चाललेल्या कार्यक्रमाचे चांगल्यात चांगले फोटो काढण्याचा सराव केला.

त्यानंतर लग्नाच्या दिवशी संध्याकाळी दूरदर्शनच्या बातम्यांच्या वेळी संदिप सह संपादक आणि आम्ही काही बातमीदार  टेलिव्हिजनसमोर श्वास रोखून उभे होतो.

त्या  शाही लग्नाच्या बातम्या आणि चित्रे दाखविली जाऊ लागली तसे संदिप  कॅमेराची बटणे खटाखट दाबू लागला. लग्नाचे व्हिजुल्स चालू असेपर्यंत  कॅमेराचे शटर वेगाने फिरत गेले. व्हिजुल्स संपेपर्यंत संदिप  तणावाने घामाघूम झाला होता.

त्यानंतर तो वेगाने फोटोच्या प्रिन्टस काढण्यासाठी निघून गेला आणि आम्ही इतर जण दैनिकाच्या ऑफिसात गेलो. एक तासानंतर संदिप  फोटोंच्या प्रिन्टस घेऊन आला तेव्हा एकदम खुशीत होता.

काही फोटो अगदी मस्त आले होते.

संपादकांनी त्यापैकी एका फोटोची  छापण्यासाठी निवड केली.

फोटो अर्थातच पान एकवरच  जाणार होता. दु सऱ्या दिवशीच्या नवहिंद  टाइम्सच्या पान  एकवर लग्नाच्या बातमीसह तो फोटो प्रसिद्ध झाला.

फोटो कॅप्शनवर  'दूरदर्शन फोटो बाय संदिप नाईक '  अशी बायलाइनही होती !

त्याकाळात द नवहिंद टाइम्स हे गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक होते.  दुसऱ्या दिवशी गोव्यातील सर्वच मराठी वृत्तपत्रांनीं चार्ल्स-डायनाच्या लग्नाची बातमी छापली पण त्या लग्नाचा फोटो केवळ नवहिंद टाइम्सकडेच होता !

संपादक बिक्रम व्होरांनी केलेले नियोजन कमालीचे यशस्वी ठरले होते. त्यानंतर पुढे अनेक दिवस म्हणजे गोव्यात टेलिव्हिजन टॉवर येईपर्यंत काही विशेष बातम्यांसाठी या दैनिकात टेलिव्हिजन फोटोची बायलाईन्स असे.

संपादक बिक्रम व्होरा नंतर अनेक वर्षे आखाती देशांतील गल्फ न्यूज आणि खलीज टाइम्स या आघाडीच्या दैनिकांचे संपाद्क होते.  

प्रिंस ऑफ वेल्स चार्ल्स  आणि डायना यांच्या दोन्ही मुलांची लग्ने झाली तेव्हाही याविषयी आणि अनेक वादग्रस्त घटनांविषयी  भरपूर लिहिलं गेलं.

आपल्या लग्नाआधी तेव्हाचे  प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स हे  मुंबईला आले होते तेव्हा अभिनेत्री  पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या गालावर चुम्बन घेऊन मोठी खळबळ उडून दिली होती.  या १९८० साली झालेल्या घटनेची जगभर चर्चा झाली होती.

नंतर पद्मिनी कोल्हापुरे स्वतः  लंडनला  गेल्या तेव्हा ``प्रिन्स चार्ल्सचे चुंबन घेणाऱ्या तुम्हीच काय ? '' असा प्रश्न त्यांना विमानतळावरच्या एका अधिकाऱ्यानं विचारला होता असं  या अभिनेत्रीनं सांगितलं आहे.

पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सिनेमांना विसरलेले अनेक सिनेमाप्रेमी लोक हे चुंबन प्रकरण मात्र विसरलेले नाहीत.  

जगभर लंडनच्या या शाही कुटुंबाविषयी लिहिलं गेलं ते इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या स्थानामुळं आणि राणी साहिबा एलिझाबेथ यांच्या व्यक्तिमत्वामुळं. राजे चार्ल्स तृतीय हे इंग्लंडच्या राजघराण्यातल्या शतकांपासून चालत आलेल्या परंपरा आणि संकेत पाळतील कि नाही याबद्दल रास्त  शंका आहेत.

इंग्लंडच्या राज्यघटनेची अधिकृत मान्यता असलेले हे राजघराणे चालू ठेवायचे कि नाही याविषयीसुद्धा या देशाचे नागरिक फेरविचार करु शकतात.

इंग्लंडच्या राजघराण्याविषयी असलेले जागतिक वलय  मात्र पुढच्या काही वर्षांत कमी होईल  अशी चिन्हं नाहीत.

सद्याच्या इंग्लंडच्या राजाचा एक मुलगा प्रिन्स हॅरी राजघराण्याचा हक्कांचा आणि विशेषाधिकारांचा त्याग करून सामान्यजनांचं जीवन जगण्यासाठी आपली पत्नी आणि मुलं  यांना घेऊन अमेरिकेला राहायला गेला आहे, तिथंही हे राजघराणं त्याचा कायम पिच्छा करेल.  

Camil Parkhe 

बीड येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन


६ नोव्हेंबर २०२२ पासून बीड येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन होत आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनातून तिसेक वर्षांपूर्वी मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने वेगळी वाट धरुन वेगळी चूल मांडली. तेव्हापासून मुख्य (!) प्रवाहातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या बहुसंख्य अध्यक्षांनी या वेगळ्या प्रवाहावर टीका केली आहे, भरपूर तोंडसुख घेतले आहे.

पुर्वसंमेलनाध्यक्ष निरंजन उजगरे, आणि सुभाष पाटील या आपल्या पूर्वसुरींच्या पावलांवर पाऊल टाकत आताचे संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे यांनीही `ख्रिस्ती दलित' या संकल्पनेवर भरपूर आगपाखड केली आहे.
दलित समाजाची पार्श्वभूमी नसलेल्या पूर्वसंमेलनाध्यक्ष डॉमिनिक ऑब्रिओ आणि सेसिलिया कार्व्हालो यांनी मात्र या वेगळ्या प्रवाहाबद्दल सहानुभूतीची भूमिका घेतली होती. गंमत म्हणजे दलित ख्रिस्ती संमेलनांवर टीका करणाऱ्या आधीच्या संमेलनाध्यक्षांनी पूर्वाश्रमीचे दलितत्व निदान मान्य केले होते, वाघमारे यांनीं मात्र आपला समाज मुळी दलितच नाही, अशीच भूमिका घेतली आहे.
या दलित ख्रिस्ती चळवळीविषयी संमेलनाध्यक्ष पौलस वाघमारे आपल्या भाषणात म्हणतात : (हे भाषण `अक्षरनामा'ने काल प्रसिद्ध केले आहे. )
``अलीकडच्या काही दशकांत ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ अस्तित्वात आली. खेड्यातील अस्पृश्य, दलित गणले गेलेल्या लोकांना त्यांचा दर्जा परत मिळवून देण्याच्या उद्देशाने ही चळवळ मूळ धरु लागली. महाराष्ट्रात रेव्ह. डॉ. अरविंद निर्मळ यांनी या चळवळीचा पाया घातला. आपला विचार रुजावा, फोफवावा, दबलेले लोक जागृत व्हावेत म्हणून त्यांनी विविध प्रयत्न केले. चळवळीसाठी पैसा उभा केला. कार्यकर्त्यांची फळी उभी केली. सुरुवातीची काही वर्षे निर्मळांच्या नेतृत्वामुळे ही चळवळ जीव धरुन होती. पुढे डॉ. निर्मळ ख्रिस्तवासी झाले, चळवळ खंडीत झाली.
मुळात दलित नसलेले आमचे लोक आहेत, कानामागून आलेल्या सवर्णांनी दलितत्व, अस्पृश्यता आमच्यावर लादलेली आहे. आमच्या असहायतेचा फायदा उठवत आम्हाला त्यांनी दास्यात ठेवले आहे. आणि त्यांचीच री ओढत, स्वतःला पुन्हा पुन्हा दलित म्हणवून घेत ही चळवळ पुढे रेटायचा प्रयत्न चालू आहे. ख्रिस्ती मिशनरींच्या आधाराने शिक्षण, आत्मसन्मान लाभलेले आणि आत्मभान लाभलेल्या लोकांनी या चळवळीला मान्यता दिली नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत ही चळवळ खुजी, खुरटी राहिली. याविषयीचे आत्मपरीक्षण या चळवळीतील कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.
अस्पृश्य नसताना दुसरे म्हणतात, वागवतात म्हणून किती दिवस स्वतःला ‘दलित’ म्हणवून घेणार आहोत आपण? आम्हाला केव्हा आत्मभान येणार? मिशनरींनी केलेले संस्कार, आम्ही विसरुन गेलो की काय? मिशनरींच्या प्रेरणेने स्वीकारलेल्या ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीचा आम्हाला विसर पडला की काय? राजांचा राजा, प्रभुंचा प्रभू असलेल्या ख्रिस्ताच्या प्रजेने स्वतःला अस्पृश्य, दलित म्हणून स्वत:ला हिनवून घ्यायचे, ही शरमेची बाब आहे.
या चळवळीतील कार्यकर्ते वारंवार वास्तवतेचा टाहो फोडतात, खेड्यातील वास्तवता दाहक आहे, अजूनही सवर्ण आम्हाला आमचा दर्जा देत नाहीत. या वास्तवतेला खरे पाहिल्यास आम्हीच जबाबदार आहोत. सवर्णांप्रमाणेच आम्हीच आम्हाला वारंवार दलित म्हणवून घेतल्याने ‘दलितत्व’ जाण्याऐवजी टिकून राहत आहे, ही खरी वास्तवता आहे.
कोणतीही गोष्ट वारंवार घोकल्याने ती सत्य वाटू लागते, या नियमानुसार आम्ही दलित नसतांना, अस्पृश्य नसतानादेखील दुसरे म्हणतात\ गणतात, म्हणून आम्ही स्वतःला दलित म्हणवून घ्यायचे, यात पुरुषार्थ नाही. ‘दलित ख्रिस्ती चळवळ’ दलितत्व घालवण्यासाठी आहे की, टिकवण्यासाठी, असा विरोधाभास जाणवतो. हे या चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांने आत्मपरीक्षण केल्यास निश्चितच पटेल.''
---
`ख्रिस्ती दलित' ही मुळी संकल्पनाच पौलस वाघमारे यांनी नाकारल्याने हा प्रपंच..
....
``अहमदनगर येथे २३ आणि २४ मे १९९२ रोजी पहिले ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलन पार पडले. सन २००४ पर्यंत अशी एकूण सहा ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. सन १९९२ मध्ये भरलेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष रेव्ह. अरविंद निर्मळ यांनी विशेष पुढाकार घेऊन चार संमेलने आयोजित केली होती. सन १९९० मध्ये महाराष्ट्रात सुरु झालेल्या ख्रिस्ती दलित मुक्ती चळवळ, पुण्यातील समता विचार मंच आणि आंध्र प्रदेशातील गुंटूरमधील दलित मुक्ती विद्यापीठाच्या सहकार्याने चेन्नईमधील गुरुकुल महाविद्यालयाने ही संमेलने प्रायोजित केली होती.
सन १९९३ मध्ये जालना येथे `आपण'कार सत्यवान नामदेव सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन भरले. लोणावळ्यात तिसरे संमेलन भरण्याआधीच या संमेलनाचे अध्यक्ष कवी विश्वासकुमार उर्फ संपत विश्वास गायकवाड यांचे निधन झाले. त्यामुळे हे संमेलन अध्यक्षाविना पार पडले. चौथे ख्रिस्ती दलित मराठी साहित्य संमेलन अहमदनगर येथे देवदत्त हुसळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनानंतर २३ सप्टेंबर १९९५ रोजी रेव्ह. निर्मळ यांचे निधन झाले.
पाचवे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन पुण्यात बिशप प्रदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली २००१ साली पार पडले. सहावे संमेलन नाशिक येथे ८ आणि ९ मे २००४ रोजी पार पडले. रेव्ह. सुभाष चांदोरीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. नागपुरला झालेल्या सातव्या संमेलनाचे गिल्बर्ट लोंढे अध्यक्ष होते तर लातुर जिल्हात उदगीरच्या आठव्या संमेलनाचे वसंत म्हस्के अध्यक्ष होते. श्रीरामपुरच्या २०१४ सालच्या नवव्या आणि २०१८च्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अनुक्रमे अनुपमा डोंगरे जोशी आणि फादर ज्यो गायकवाड यांनीं भुषवले.
चेन्नईमधील गुरुकुल ईश्वरविज्ञान महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या दलित ईश्वरविज्ञान विभागाचे अरविंद निर्मळ प्रमुख होते. सन १९८० मध्ये मंडळ आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर एक वर्षानंतर दक्षिण भारतात वेल्लोर येथे ख्रिश्चन दलित लिबरेशन मुव्हमेंट सुरु झाली. ख्रिस्ती दलितांची ही चळवळ महाराष्ट्रात आणण्याचे श्रेय निर्मळ याना दिले जाते. निर्मळ यांच्या निधनानंतर ही चळवळ काही काळ क्षीण झाली होती. प्रा. देवदत्त हुसळे, सुभाष चांदोरीकर आणि डॉ. गिल्बर्ट लोंढे यांनी या चळवळीला पुन्हा संजीवनी प्राप्त करून दिली.
विशेष म्हणजे ख्रिस्ती समाजात चालू असलेल्या आरक्षणासाठीच्या चळवळीची वा या विषयाची साधी दाखलसुद्धा या काळात झालेल्या बहुतांश मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांनी घेतलेली नाही. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांची परंपरा नाशिक येथे १९२७ साली झालेल्या संमेलनापासून सुरु होते. अर्थात सर्वच प्रकारच्या मराठी साहित्यातून वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतूनही बहुजन समाजाच्या प्रश्नांचे प्रतिबिंब पडतेच असे नाही. तसाच प्रकार येथेही घडला होता. सन १९२७ पासून २०२२ पर्यंत एकूण सहवीस मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने पार पडली आहेत.
या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलित करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे काम सुनील श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे. ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या शीर्षकाचा ४१० पानांचा जाडजूड ग्रंथ आढाव यांनी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
आरक्षणाच्या या महत्वाच्या मुद्द्यावर ख्रिस्ती समाजाच्या या प्रमुख व्यासपीठावर दलित ख्रिश्चनांच्या खास समस्यांवर चर्चा झाली नाही. याचे दुसरे कारण म्हणजे या समाजातील आर्थिकदृष्ट्या प्रगत झालेल्या समाजघटकाचा बराच काळ दलित ख्रिश्चनांना आरक्षण देण्यास ठाम विरोध होता. या परिस्थितीत आज फार मोठा बदल झाला आहे. असेही म्हणता येणार नाही. मुख्य म्हणजे या प्रगत घटकास आरक्षणाच्या कुबड्यांची आता गरज नाही. या लोकांची संख्या अगदी मूठभर असली तरी शिक्षित असल्याने ह्या प्रश्नाबाबत केवळ तेच पुढाकार घेऊ शकतात. त्यांचाच या सवलतीस तत्वतः विरोध असल्याने वा या बाबत ते निरुत्साही असल्याने बहुसंख्य ख्रिस्ती समाजाचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे शीतपेटीतच राहिला आहे.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आरक्षणाच्या हक्काचे पहिल्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरविंद निर्मळ यांनी जोरदार समर्थन केले. बहुसंख्य मराठी ख्रिस्ती समाज दलित असून आरक्षण वगैरे सवलतींवर त्यांचा हक्क आहे असे त्यांनी म्हटले. ख्रिस्ती समाजावर झालेल्या अन्यायासंदर्भात ते म्हणतात :
खेड्यापाड्यातील लाखो ख्रिस्ती दलित असून साक्षरावस्थेत पोहोचलेले नाहीत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजून त्यांना भेटलेच नाहीत. पूर्वी सरकारी सवलती, आरक्षण केवळ हिंदू धर्मातील दलितांनाच मिळत असत. नंतर शीख धर्मात गेलेल्या दलितांना या सवलती खुल्या झाल्या. परवा त्या नवबौद्धांनाही देण्यात आल्या. परंतु धर्मांतरित मुस्लिम आणि ख्रिस्ती दलितांना या सवलती अजूनही मिळत नाही. आई जेवू घालीना अन बाप भीक मागू देईना,'' अशी ख्रिस्ती दलितांची अवस्था आहे असे निर्मळ यांनी आपल्या या भाषणात पुढे म्हटले आहे.
दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाची विद्रोही, आक्रमक भूमिका
पहिल्या दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरविंद निर्मळ यांचे भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण तितकेच विद्रोही विचार अगदी ठामपणे मांडणारे आहेत. खरी सामाजिक बांधिलकी उराशी बाळगणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणावे, पहिल्या मराठी ख्रिस्ती दलित साहित्य संमेलनाचे आयोजन करावे. पंधरा मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनात आम्ही वाट चुकलो आहोत, आता नवी वाट तुडवायला हवी. मराठी ख्रिस्ती साहित्याला नवी दिशा द्यायला हवी. आमच्या मूक-बधिर समाजाला लिहिते, वाचते, बोलते व ऐकते करायला हवे, असे त्यांनी म्हटले होते.
आपण कोणत्या अर्थाने वाट चुकलो हे सांगताना अरविंद निर्मळ पुण्यातील ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या उदघाटक शांता शेळके यांच्या भाषणाचा संदर्भ देतात.
पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे उदघाटन करताना मराठी ख्रिस्ती साहित्य परंपरेचे विश्लेषण करताना शांताबाई शेळके म्हणाल्या होत्या ``फादर स्टीफन्सची पुराण ही संकल्पनाच हिंदू होती. साहित्यातील ही समन्वयाची भूमिका बाबा पदमनजी, रेव्ह. ना. वा टिळक, लक्ष्मीबाई आणि दे. ना. टिळक यांनीही पुढे चालू ठेवली. त्यामुळे मराठी माणसांमध्ये आणि मराठी साहित्यामध्ये त्यांना प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळाले आहे.''
या संदर्भात निर्मळ म्हणतात कि वर उलखलेली सर्व मंडळी म्हणजे सवर्ण धर्मांतरित ख्रिस्ती. त्यांना ख्रिस्ती धर्मात वैदिक धर्माची पूर्ती झाल्याचेही वाटले असेल. म्हणून त्यांनी ही समनव्याची भूमिका चालू ठेवली. आम्ही दलितांनी मात्र ख्रिस्ती धर्म पत्करला तो चातुर्वर्णाधिष्ठित हिंदू धर्माला पर्याय म्हणून. त्याचेशी समन्वय साधायला म्हणून नव्हे समन्वयाकडून संघर्षाकडे अशी वाटचाल आम्ही करायला हवी. याचा अर्थ असा नाही कि आम्हाला समेट नको आहे. समन्वय तडजोडीवर आधारित असतो परंतु समेटाला न्याय अभिप्रेत असतो.
संघर्षातून न्याय मिळवून मग आम्ही समेटाकडे वळू. समन्वय साधणाऱ्या सवर्ण ख्रिस्ती साहित्यिकांना मराठी साहित्यामध्ये प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळालेले आहे. परंतु संघर्षाची वाट तुडविणारे सूर्यवंशी मात्र मराठी साहित्यात उपेक्षितच राहतात, हेदेखील येथे लक्षात घेतले पहिजे'' असे निर्मळ यांनी ठासून सांगितले आहे.
``ख्रिस्ती धर्माचा अंगीकार करून त्या धर्माच्या नावाने जगणाऱ्या माणसांच्या जीवनाचं दर्शन घडवणारं, ते जीवन प्रतिबिबित करणारं साहित्य ते ख्रिस्ती साहित्य'' अशी नवी व्याख्या निर्मळ यांनी केली आहे.
ही व्याख्या स्वीकारली तर महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्म जगणारी बहुसंख्य माणसं दलित अस्मितेची, दलित मानसिकतेची, दलित जाणिवा उराशी बाळगणारी अशी त्रस्त, ग्रस्त माणसं आहेत, हेही आमच्या लक्षात येईल. त्यांच्या व्यथावेदना, त्यांची सुखदुःख, त्यांची तडफड, त्यांचा विद्रोह आणि त्यांचा नकार मग आमच्या साहित्यातून साकार होईल आणि आमच्या साहित्याला जिवंतपणा येईल. आमचे साहित्य मग विद्रोहाची आग ओकू लागेल. ते विषमतेविरुद्ध बंद पुकारील. मग ही विषमता आणि अन्याय स्वसमाजातील असली तरीही आमची लेखणी गय करणार नाही'' असे निर्मळ म्हणतात.
या नव्या वाटेवरील आणखी एक पाऊल म्हणजे आमच्या इतर दलित बांधवांशी आणि दलित साहित्याशी संबंध जोडणे, असे निर्मळ म्हणतात. इतर दलितांशी नाते जुळवून आम्ही एक भारतव्यापी दलित साहित्यिक चळवळ निर्माण केली पाहिजे. निदान महाराष्ट्रापासून आम्ही ही सुरुवात करायला हवी. आमच्या धर्मप्रेरणा वेगवेगळ्या असतील, आहेत. त्या कुणी कुणावर लढायला नकोत. परंतु दलितत्व हे आमचं सामान नातं आहे आणि विषमता हा आमचा समान वैरी आहे.
``आमच्या जालन्यात ख्रिस्तजयंतीच्या वेळी मोठी धामधूम असते. ख्रिस्तजयंतीच्या पूर्वसंध्येला कॅरोल राउंड निघतात. ख्रिस्तजन्माची स्तुतिगीते गेली जातात.
अशीच एक ख्रिस्तजयंती मी माझ्या सासूबाईंच्या येथे होतो. बाहेर मुलांचं एक टोळकं मध्यरात्री आलं, ते गाऊ लागले.
``उघडा हो दार आता / कुठवरी झोप घेता /
अंगात एक बंडी / वाजते फार थंडी /
नंतर' गद्यात ``आंटी उघडा ना आता दार अन द्या आम्हाला थोडीशी चिल्लर'. ' या गीताचा विषय ख्रिस्तजन्म नाहीच मुळी. पण माझ्या समाजाचं वास्तव त्यात उघड पडलं आहे.
``अंगात एक बंडी वाजते फार थंडी'' हा आहे माझा समाज, उघडा नागडा, थंडीत कुडकुडणारा अंगात उष्णता नाही म्हणून चहा प्यायला रुपयांऐवजी चिल्लर मागणारा. अंगात थंडी घालून ख्रिस्तजयंतीला थंडीने कुडकुडणाऱ्या या समाजाच्या व्यथावेदना माझ्या साहित्यात उतरल्या पाहिजेत याला म्हणतात सामाजिक बांधिलकी .दलित लेखक कवी हे आमचे खरे स्वजन: ''असं निर्मळ म्हणतात
`आपण'कार सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांनी १९७२ साली भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ख्रिस्ती समाज इतर दलित, अल्पसंख्य समाजाहून वेगळा नाही,या इतर समाजघटकांबरोबर राहून त्यांच्यासह झगडून ख्रिस्ती लोकांनी आपल्या हितसंबंधांचे रक्षण केले पाहिजे असा विचार मांडला होता.
जालना येथे १४ मे १९९३ रोजी पार पडलेल्या दुसऱ्या ख्रिस्ती दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सूर्यवंशी यांनी दलित लेखक कवी हेच आमचे खरे स्वजन आहेत असे स्पष्ट केले.
आपल्या भाषणात सूर्यवंशी म्हणतात ``हे ख्रिस्ती दलित साहित्य संमेलन आहे पण हा सवतासुभा नाही. ख्रिस्ती लेखक म्हणून इतर दलित लेखकांवेगळे आम्ही स्वतःला मनात नाही. दलित हा धर्म नाही कि जात नाही . दलित ही चिरडल्या, भरडल्या गेलेल्या व जात असलेल्या जित्या जागत्या माणसाची अगतिक बनवून सोडणारी अवस्था आहे. ती गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीतून बाहेर पडा हा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि दलित मुक्ती लढा सुरु झाला. तो आमचा लढा आहे आणि त्या लढ्यात उतरलेला प्रत्येक लेखक, कवी, पत्रकार, वक्ता आमचा भाऊ आहे, असे सूर्यवंशींनी यावेळी जाहीर केले.
दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात ख्रिस्ती दलित लेखककवींच्या लिखाणाचा मागोवा घ्यायला हवा. इतर समाजी दलित लेखकांची आणि आपली चूल वेगळी नाही हे संमेलन हा विचार पुढे ठेवण्यास बोलावण्यास आले आहे. स्वतःभोवती भिंतीही उभारू नयेत आणि ब्राह्मणी शैलीचे साहित्य लिहीत बसण्याचा व्यर्थ आटापिटाही करू नये. `विशाल प्रवाह' ही खोटी हूल आहे. या देशात प्रस्थापित म्हटले जातात त्यापेक्षा दलितांची संख्या अधिक आहे. विशाल प्रवाह आमचा आहे, त्यांचा नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न यशस्वी करण्यास सर्व दलित लेखकांनी धर्मभेद या तथाकथित जातीभेद विसरून एकत्र आले पाहिजे असे आवाहन यावेळी सूर्यवंशींनी केले.''
दलित ख्रिस्ती समाजाने आपल्या सभा आणि शिबिरांत इतर समाजी दलित नेते आणि साहित्यिकांना बोलावून त्यांचे विचार जाणून घेतले आहेत. यामध्ये बाबुराव बागुल, वामन निंबाळकर, विलास वाघ, उषा वाघ, नागपूरच्या कुमुद पावडे, औरंगाबादचे शांताराम पंदेरे, गोपाळ गुरु, डॉ लता मुरुणकर यांचा समावेश होता असे सांगून सूर्यवंशी म्हणतात कि ख्रिस्ती लेखकांबरोबरच बौद्ध, हिंदू, मुसलमान, शीख वगैरे समाजातील लेखकांनांही आम्ही वेळोवेळी बोलावतो याचे कारण म्हणजे ते आणि आम्ही वेगळे नाही, ही भावना आहे.
सूर्यवंशी यांनी 'जय हिंद ! जय भीम ! जय ख्रिस्त !' असे अभिवादन करुन आपले भाषण संपविले . .
सन १९७५च्या मुंबई येथील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष फादर डॉमिनीक ऑब्रिओ (नंतरचे औरंगाबाद धर्मप्रांताचे बिशप ) यांनी या व्यासपीठावरून सर्वप्रथम ख्रिस्ती दलितांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला.
''महाराष्ट्राच्या खेडोपाडी विखुरलेले आमचे असंख्य ख्रिस्ती बांधव केवळ ख्रिस्ती असल्यामुळे हलाखीचे व अपमानित जीवन जगात आहेत. कारण धर्मांतरामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती मुळात बदललेली नाही, याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे व इतरांना मिळणाऱ्या अल्पस्वल्प सवलती त्यांना मिळवून देण्यासाठी ख्रिस्ती लेखकांनीं पुढे सरसावले पाहिजे. ''
नाशिक येथे २००० साली भरलेल्या अठराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष सेसिलीया कार्व्हालो यांनी `दलित ख्रिस्ती' या संकल्पनेविषयी सहाभूतीची भूमिका घेतली होती.
सेसिलीया कार्व्हालो म्हणतात : एक उपेक्षित घटक म्हणजे दलित ख्रिस्ती. समाज आणि साहित्य या दोन्हींनी या घटकाची फारशी दाखल घेतलेली नाही. वास्तविक ख्रिस्ती धर्म कोणताही जातिभेदभाव मानत नाही ही फारच चांगली गोष्ट आहे. मात्र भारतीय मातीत आणि रक्तात जातिव्यवस्था भिनलेली असल्याने आणि ख्रिस्ती समाज या मातीतला असल्याने व्यवहारात मात्र जातिभेद मानला जातो. तळागाळातील लोकांनी ज्या कळाझळा सोसलेल्या आहेत ते त्या ख्रिस्ती दलितांच्या 'गावा' आणि 'वंशा' गेल्याशिवाय कळणार नाही .''

( ' दलित ख्रिश्चनांचा आरक्षणासाठी लढा '' लेखक कामिल पारखे (सुगावा प्रकाशन २००६) मधील एक प्रकरण )

Camil Parkhe

Friday, November 4, 2022

 मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

खरे तर आतापर्यंत मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून गोव्यात आणि नंतर पुण्यात मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन किंवा समारोपाचे भाषण कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो, ते केवळ बातमी करण्यासाठी.

विशेष म्हणजे तत्कालिन उद्घाटक किंवा मुख्य पाहुण्यांनी आम्हा वार्ताहरांना कधीही निराश केले नाही. मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त इतर विषयांवर त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आमच्या वृत्तपत्राच्या अमराठी वाचकांसाठीसुद्धा त्यांचे मत महत्त्वाचे ठरायचे.
१८७८ साली पुण्यात मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन पार पडले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुहूर्तमेढ उभारणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडे या संमेलनाचा शुभारंभ करण्याचा मान जातो. नंतरच्या काळात ग्रंथकारांचे संमेलन ‘साहित्य संमेलन’ झाले. त्यानंतर ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झाले. कालांतराने विद्रोही, विचारवेध, ग्रामीण, दलित, मुस्लीम, नास्तिक अशी विचारनिहाय आणि कोकण, मराठवाडा अशी प्रदेशनिहाय संमेलने सुरू झाली.
मराठी साहित्य संमेलनापासून पहिल्यांदा वेगळी चूल मांडण्याचे धाडस ‘ख्रिस्ती साहित्य संमेलना’ने शंभरेक वर्षांपूर्वीच केले होते, हे मात्र अनेकांना माहीतही नसेल.
आता २६वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन बीड येथे नोव्हेंबर ६, ७ आणि ८ रोजी पार पडत आहे,संमेलनाध्यक्ष आहेत पौलस वाघमारे आणि स्वागताध्यक्ष आशिष शिंदे.
पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८-१९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष होते- रेव्हरंड निकल मॅक्लिकल. या महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांच्या पहिल्या साहित्य संमेलनाला सात ख्रिस्ती पंथांच्या पन्नास प्रतिनिधींसह १५० लोक हजर होते.
ख्रिस्ती संमेलनाचा हा प्रवाह मध्यंतरीच्या काही दशकांचा अपवाद वगळता आजही खळाळता राहिला आहे. गंमत म्हणजे १९९२ पासून मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाने स्वतंत्र चूल मांडली आणि आतापर्यंत १० संमेलने भरवली आहेत.
विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्त्य संमेलनांप्रमाणे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचेसुद्धा दस्तऐवजीकरण झालेले आहे. या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलित करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे काम सुनील श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे. ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या शीर्षकाचा ४१० पानांचा जाडजूड ग्रंथ आढाव यांनी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
हा ग्रंथ केवळ एकंदर मराठी साहित्यक्षेत्रासाठीही एक मौलिक ऐवज ठरतो.
१९२७ नंतर गेल्या शतकभरात एकूण ३५ संमेलने झाली असून त्यात २५ मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि १० मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचा समावेश होतो.
आतापर्यंतच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे : दुसरे - मनोहर कृष्ण उजगरे (मुंबई, १९३०), तिसरे - देवदत्त नारायण टिळक (निपाणी, १९३२) चौथे - लक्ष्मीबाई टिळक (नागपूर, १९३३), पाचवे आणि सहावे- सत्यवान नामदेव सूर्यवंशी (मुंबई आणि पुणे, १९७२), सातवे - फादर डॉमनिक आब्रिओ (नंतर औरंगाबाद धर्मप्रांताचे पहिले बिशप- मुंबई, १९७३), दहावे - भास्करराव जाधव (बारामती, १९७५), अकरावे - रॉक कार्व्हालो (सोलापूर, १९७७), बारावे - रामकुंवर सूर्यवंशी (अहमदनगर, १९८१), तेरावे - फादर एलायस बी रॉड्रिग्स (मुंबई, १९८४), चौदावे - जयंतकुमार त्रिभुवन, (कोल्हापूर, १९८६), पंधरावे - विजया पुणेकर (मुंबई, १९९०), सोळावे - फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे, १९९२), सतरावे - निरंजन उजगरे (मालवण, १९९४), अठरावे - सुधीर देवीप्रसाद शर्मा (नागपूर, १९९८), एकोणिसावे - सिसिलिया कार्व्हालो (नाशिक, २०००), विसावे - देवदत्त हुसळे (अहमदनगर, २००१), एकविसावे -अनुपमा उजगरे (मुंबई, २००५) , बाविसावे सुभाष पाटील (जालना, २००७ ), तेविसावे - फादर मायकल जी. (वसई, २००९), चोविसावे - अशोक आंग्रे (अहमदनगर, २०११), आणि पंचविसावे- नाझरेथ मिस्किटा (सोलापूर २०१४).
दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांची नावे : पहिले - अरविंद पी. निर्मळ (अहमदनगर, १९९२), दुसरे - सत्यवान नामदेव सूर्यवंशी (जालना, १९९३), तिसरे - अरविंद पी निर्मळ (लोणावळा, १९९४), चौथे - देवदत्त हुसळे (अहमदनगर, १९९५), पाचवे - बिशप प्रदीप कांबळे (पुणे, २००१), सहावे - सुभाष चांदोरीकर (संगमनेर, २००४), सातवे - डॉ. गिल्बर्ट लोंढे (नागपूर, २००६), आठवे - वसंतराव म्हस्के (उदगीर, २००८), नववे - अनुपमा डोंगरे-जोशी (श्रीरामपूर, २०११) आणि दहावे - फादर ज्यो गायकवाड (श्रीरामपूर, २०१८).


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने यांच्यात काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. मराठी साहित्यात महिलांचे योगदान फार पूर्वीपासून आहे. स्त्रीसाहित्याची मोठी परंपरा आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि आता शंभरीच्या जवळ आलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच स्त्रियांना मिळाला आहे.
याउलट केवळ ३५ संख्येच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या मात्र आतापर्यंत सहा स्त्रिया संमेलनाध्यक्षा झालेल्या आहेत. त्यापैकी पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या आणि एक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापैकी काही संमेलनाध्यक्ष एकाच घरातील वा कुटुंबातले आहेत. लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांचा मुलगा देवदत्त टिळक असे मायलेक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी आणि त्यांच्या बहिण रुपकुंवर सूर्यवंशी असे भाऊ-बहीण, मनोहर कृष्ण उजगरे आणि त्यांच्याच घराण्यातले निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे हे दाम्पत्य इत्यादी.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन या दोन्ही प्रवाहांतील संमेलनालध्यक्षपद अनेक धर्मगुरूंनी भूषवले आहे. यात कॅथोलिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, बिशप डॉमनिक आब्रिओ यांच्यासह प्रोटेस्टंट रेव्हरंड निकल मॅक्लिकल, रेव्ह. अरविंद पी. निर्मळ आणि बिशप प्रदीप कांबळे यांचा समावेश होतो. मराठी ख्रिस्ती साहित्यप्रवाह अजूनही ख्रिस्ती धर्म आणि धर्मगुरू यांच्याच प्रभावाखाली आहे, हेच यातून दिसून येते.


मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीबाबत १९७२ पासून एक अलिखित संकेत पाळला जातो, तो म्हणजे एकदा कॅथोलिक आणि त्यानंतर प्रोटेस्टंट असे साहित्यिक या पदासाठी आलटूनपालटून निवडले जातात. या पायंड्याकडे पाहू जाता कॅथोलिक म्हणजे वसईकडचा साहित्यिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे वसईउर्वरीत महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट संमेलनाध्यक्ष बनलेले आहेत.
वसईबाहेरच्या महाराष्ट्रातील एकही कॅथोलिक आतापर्यंत मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष झालेला नाही.
मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला एक ख्रिस्ती आणि वाचक म्हणून मी हजर होतो. संमेलनाध्यक्ष होते कवी निरंजन उजगरे, तर तत्कालिन शिवसेना नेते नारायण राणे प्रमुख पाहुणे. संपादक नारायण आठवले मुख्य पाहुणे होते. संमेलनाध्यक्ष निरंजन उजगरे होते.
मालवणच्या मिलाग्रिस चर्चचे पॅरीश प्रीस्ट म्हणजे प्रमुख धर्मगुरू फादर ग्रॅब्रिएल डिसिल्वा या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. या तीन दिवसीय संमेलनातल्या जेवणात मासळीचा मुबलक वापर असल्याने आलेले पाहुणे व रसिक जाम खूष होते.
उदगीर (जि. लातूर) येथे भरलेल्या ‘मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलना’त मी पहिल्यांदा एक साहित्यिक म्हणून हजर होतो. हे संमेलन लक्षात राहिले, ते त्या वेळी तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे. ‘हे संमेलन ख्रिस्ती धर्मांतरासाठी भरण्यात आले आहे’, असा आरोप करून ते उधळून लावण्याची धमकी एका स्थानिक दलित समाजघटकाने दिली होती.
श्रीरामपूर येथे अनुपमा डोंगरे-जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली झालेल्या ‘नवव्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलना’चे स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके यांनी मात्र पाहुण्यांची शाही बडदास्त राखली होती.
मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांत मराठी साहित्यक्षेत्रातील अनेक दिग्गज्जांनी हजेरी मांडली आहे, पुण्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष असलेल्या संमेलनावेळी शांता शेळके उदघाटक होत्या, समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान उपस्थित होते. मुंबईच्या विजया पुणेकर संमेलनाध्यक्ष असताना कविवर्य नारायण सुर्वे प्रमुख पाहुणे होते. नागपूरच्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात साहित्यिक वामन निंबाळकर हे एक व्याख्याते होते.
वादविवाद, आरोपप्रत्यारोप नाही तर मराठी साहित्य संमेलन नाही. ख्रिस्ती साहित्य संमेलनेही यापासून लांब राहिलेली नाही, ''ख्रिस्ती साहित्य" या शब्दाची व्याख्या, दलित ख्रिस्ती हा अमंगळ शब्दप्रयोग अशा अनेक वादांनी ही संमेलनेही गाजलेली आहेत.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन यांच्यांमध्ये जसे विळ्या-भोपळ्याचे सख्य किंवा छत्तीसावा आकडा आहे, अगदी तशी स्थिती (मुख्य प्रवाहातले !) मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन यांच्यात आहे.
अनेक मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांत `दलित ख्रिस्ती' या शब्दावर आणि वेगळ्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांवर तोंडसुख घेतले आहे. अपवाद फक्त सिसिलीया कार्व्हालो यांचा. आज २०२२ मध्येही यात फार बदल झालेला नाही. आजसुद्धा `दलित ख्रिस्ती' हा शब्द मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनातसुद्धा `गावकुसाबाहेरचा' आहे.
ज्यांचे पोट भरले आहे अशांची प्रवृत्ती ख्रिस्ती दलितत्वाचे वास्तव सरळसरळ नाकारण्याची असते. याउलट आपल्या दलितत्वाचे वास्तव नाकारले तर ख्रिस्ती असल्याने इतर दलितांना दिल्या जाणाऱ्या सर्व आरक्षणादी सोयीसुविधांवर पाणी सोडावे लागते म्हणून या दलितत्वावर हक्क सांगितलं जातो.
पूर्वास्पृश्य असलेल्या सर्व हिंदू. शीख आणि बुद्ध समाजाला लागू असलेल्या सोयीसुविधा आणि आरक्षण पूर्वास्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजालाही द्याव्यात आणि त्यासाठी इतरांसारखे त्यांचेही दलितत्व मान्य करावेच लागेल. असा हा तिढा आहे.
साहित्य संमेलनाध्यक्ष हे पद भूषवलेल्या व्यक्तींच्या नावावर एकही पुस्तक नाही वा संमेलनाध्यक्षपदावर निवड होईपर्यंत नव्हते असे अनेकदा झाले आहे. तर जोसेफ तुस्कानो आणि अनिल दहिवाडकर अशी मोलाची साहित्यिक सेवा करणारी माणसे संमेलनाध्यक्षपदापासून लांब राहिली आहेत.
आतापर्यंत दोनच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांना मी आवर्जून हजर राहिलो आहे, मालवणचे १९९४ चे संमेलन आणि २०११ चे अहमदनगरचे संमेलन.
मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या नागपूर, उदगीर आणि श्रीरामपूर येथल्या अनेक मांडवांत आणि व्यासपीठांवर मात्र मी अगदी हौसेने मिरवलो आहे. सत्कारही करवून घेतला आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य (?) प्रवाहातून पहिल्यांदा वेगळी चूल मांडणाऱ्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनास दाद द्यायला हवी. याचे कारण त्यानंतर अनेकांना असा वेगळा संसार मांडण्याचे धाडस झालं आहे.
बीडला होणाऱ्या २६ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनास शुभेच्छा !
(फोटो ओळी : पौलस वाघमारे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिसिलीया कार्व्हालो, अनुपमा उजगरे )

Camil Parkhe

Wednesday, November 2, 2022

देहविक्री हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय

 श्रीरामपूरला आमच्या घरापासून चारशे-पाचशे मीटर अंतरावर आणि आमच्या सोमैय्या शाळेच्या मागे दहावीस घरांची वस्ती होती. आमच्या चाळीतल्या घरांसारखीच ही घरे सुध्दा कुडांची आणि पांढऱ्या मातीने बांधलेली होती. मात्र तरी या वस्तीला ` सफेद गल्ली’ किंवा ` पांढरी वस्ती’ या नावाने ओळखले जायचे.

या सफेद गल्लीला मी अनेकदा लांबून पाहिले, तिथून अगदी जवळून जाण्याची अनेकदा वेळ आली. या गल्लीत बहुधा एकदोन खोल्या असणाऱ्या घरांची समोरासमोर असलेली दारे होती, तिथल्या बाया अनेकदा दारापाशी बसून मशेरीनं दात घासत आपापसांत गप्पा मारत बसलेल्या दिसायच्या, किराणा दुकानावर त्या यायच्या, तेव्हा त्यांच्यापैकी काहींचे, विशेषतः प्रौढ बायांचे चेहरे काहीसे वेगळे, फुगलेले वाटायचे.
त्या `सफेद गल्ली’पाशी असलेल्या बाजारतळासमोरच्या मैदानावर आठवडी बाजाराच्या दिवशी शुक्रवारी तमाशाचे खेळ व्हायचे. या तमाशाबाबत वडीलधारी लोकांमध्ये खुलेपणाने कधी चर्चा झाल्याचे मी कधीही ऐकले नाही तसेच या पांढऱ्या घरांबाबत आणि त्या घरांत राहणाऱ्या बायांबाबत कधी वाईट किंवा चांगले बोललेले मी कधी ऐकले नाही. त्याकाळी शाळेच्या मागे त्या परिसरातील लोकांसाठी श्रीरामपूर नगरपालिकेने पुरुषांसाठी बारा आणि बायांसाठी बारा संडास बांधले होते. ते `बारा संडास’ असा अगदी सहजगत्या उल्लेख व्हायचा तसेच त्यामागची ती `पांढरी गल्ली’ असा तितक्याच सहजतेने उल्लेख व्हायचा.
शरीरधर्मासाठी दोन्हीही आवश्यकच..
सत्तरच्या दशकात गोव्यात मी शिकत असताना आणि नंतरच्या काळात पणजीला बातमीदारी करत असताना वॉस्को शहराजवळचा बायना बिच हा `रेड लाईट एरिया’ म्हणून प्रसिद्ध होता. समुद्रकिनारी असलेले बंदर अनेकदा कायम नौकानयनावर असलेल्या लोकांची आणि सैनिकांची शरीरसंबंधांची भूक भागवत असत.
ऐंशीच्या दशकात गोव्यात ताळगावला आमच्या `द नवहिंद टाइम्स’ आणि `नवप्रभा’ या जुळया इंग्रजी-मराठी दैनिकांतील आम्ही तीन सहकारी नारळांच्या झाडांनीं वेढलेलं एक बैठे टुमदार कौलारु घर भाड्याने घेऊन एकत्र राहत होतो. दरमहिना पाचशे रुपये भाडे होते या पाच खोल्यांच्या घराचे. आमच्यातल्या एक ज्येष्ठ सहकारी आपल्या पार्टनरबरोबर या घरात राहत असायचा, वेश्यागमनासाठी बायना बिचवर कि इतर कुठंकुठं हा माझा सहकारी जायचा तेव्हा तिथल्या या तरुणीला तो आपल्याबरोबर राहण्यासाठी म्हणून कायमचा घेऊन आला होता. मूळची कर्नाटकची असलेली ती आम्हा सगळ्यांबरोबर हिंदीत बोलायची. एका खोलीत मी आणि माझ्याच वयाचा, विशीच्या आसपास असलेला तो दुसरा तरुण सहकारी राहायचा.
या बंगलीवजा घराच्या आतल्या कुठल्याही रुमला दारं नव्हती आणि खिडक्यांनाही गज नव्हते. रात्री खूप उशिरा मी आलो कि स्वयंपाकघराच्या एका खिडकीची वरची कडी विशिष्ट पद्धतीनं खोलून मग ती खिडकी उघडून इकडंतिकडं न बघता मी सरळ माझ्या खोलीकडं जायचो.
एक दिवस मी रात्री घरी आलो तर या मुलानं मला सांगितलं कि सावंतवाडीहून त्याची मामेबहिण आज मुक्कामाला आली आहे, त्यामुळं त्या रात्री मी त्या रुमबाहेर झोपावं. काही हरकत न घेता मी त्याच्या सांगण्याप्रमाणं केलं. काही दिवसांनी तो मुलगा त्याच्या दोन चुलत कि मामे बहिणींना घेऊन आला होता आणि मग परत मला त्या खोलीबाहेर झोपावं लागलं.
दोनतीन दिवसांनी त्या मुलाच्या नातेवाईक बहिणींचा विषय सहज आमच्या तिसऱ्या सहकाऱ्याच्या पार्टनरशी बोलताना निघाला तेंव्हा ती एकदम खोखो हसत सुटली. मी मख्खपणे तिच्याकडं पाहत राहिलो तेव्हा ती हिंदीत मला म्हणाली, '' कामिल, तुम्ही किती बावळट आहात ! त्यानं तुम्हाला त्या मुली त्याच्या चुलत आणि मामे बहिणी आहेत असं सांगितलं आणि तुम्ही त्यावर सरळसरळ विश्वास ठेवला ? कमाल आहे बाई तुमच्या भोळसटपणाची आणि मुर्खपणाची! '' आणि ती पुन्हा तोंडाला पदर लावून पुन्हा हसत सुटली तेव्हा कुठं माझ्या डोक्यात लख्ख उजेड पडला!
गोव्यात मी पत्रकारितेची सुरुवात केली ती मुळी एज्युकेशन कॅम्पस आणि क्राईम रिपोर्टर म्हणूनच. दोन्हींचे जग अगदी वेगवेगळे. क्राईम रिपोर्टर म्हणून पोलीस, गुन्हेगारी विश्व आणि कधी ना कधी कायदा उल्लंघन करणारे लोक आणि त्यामुळे पोलिसांशी संबंध येणारे लोक यांच्याशी जवळून अनुभव आला. पोलिसांकडून या ना त्या कारणामुळे पकडले जाणारे लोक चोर वा गुन्हेगार असतातच असे नाही, याचा अनेकदा अनुभव आला.
पणजी पोलिस स्टेशनवर मुख्य असलेला फौजदार अलेक्स फर्नांडिस हा माझा जवळचा मित्र आणि क्राईम बिट सांभाळत असलेल्या माझ्यासाठी एक महत्त्वाचा स्त्रोत. पणजीतल्या आझाद मैदानावरच्या पोलिस मुख्यालयातली माझी भेट अलेक्सला `हाय’ केल्याशिवाय, त्याचाशी दोन शब्द बोलल्याशिवाय पुरी होत नसायची. कधीकधी फौजदार अलेक्स मला त्याच्या पोलिस जीपमधून पणजीतल्या `राऊंड’वर किंवा अगदी गुन्ह्याच्या घटनास्थळी घेऊन जायचा.
त्यादिवशी मात्र अलेक्स मला एका वेगळ्याच कामगिरीवर घेऊन गेला. त्यावेळी अंमलात असलेल्या `सिटा’ म्हणजे सप्रेशन ऑफ इममॉरल ट्रॅफिक ॲक्टीव्हीटीज अँक्टनुसार छापा घालण्यास आपण जात आहोत असे ऐकल्यावर मी सावध झालो होतो. आता या अँक्टमधील `सप्रेशन’ शब्दाची जागा `प्रिव्हेंशन’ ने घेतल्याने `सिटा’ ऐंवजी `पिटा’ असे नामानिधान झाले आहे.
पोलिस जीप पणजीहून चारशे वर्षांचा पोर्तुगीजकालीन पाटो पुल आणि पणजी बसस्टॅण्ड ओलांडून ओल्ड गोव्याच्या दिशेने धावू लागली आणि रायबंदर येथे रस्त्याशेजारी एकमजली इमारत असलेल्या एका लॉजपाशी थांबली. जीपमधल्या काही पोलिसांनी धावत जाऊन लागलीच मोक्याच्या जागा घेतल्या आणि इतर पोलिस तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावरच्या बंद खोल्यांना जोरजोराने ओरडत धडका देऊ लागले. सगळीकडे एकच गोंधळ माजला. दुपारचे चारपाच वाजले असावे.
त्यानंतर काय घडले ते सर्व काही येथे सांगता येणार नाही. मात्र सगळ्याच रूम्सचे दरवाजे काही क्षणात उघडले गेले आणि जेमतेम अब्रू राखण्यासाठी आवश्यक असणारे कपडे असलेले स्त्रीपुरुष पॅसेजमध्ये उभे राहिले.
आपण दोघे कोण आहोत, म्हणजे नवराबायको की दुसरे कोण आहोत, इथे कशासाठी आलो आहोत वगैरे सांगण्यात मग काही वेळ गेला. त्याकाळात आधार कार्ड वगैरे ओळखपत्रे नसायची, वैवाहिक संबंध दर्शवण्यासाठी मंगळसूत्रे दाखवले जायचे.
`कारवारचा शिक्षक’ म्हणून आपली ओळख सांगणाऱ्या एका मध्यमवयीन इसमाने अखेरीस आपल्याबरोबर असलेली महिला `आपली बायको नाही’ याची कबुली पाच मिनिटांत दिली. असेच इतरांच्या बाबतीत घडले, त्यांची चौकशी करुन पकडलेल्या महिलांना महिला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि लॉजच्या काही नोकरांना पोलिस स्टेशनवर आणले गेले.
देहविक्रीशी संबधित असलेल्या हॉटेलमधील लोकांबाबत आणि इतरांबाबत कशाप्रकारे कारवाई केली जाते याचा मी अनुभवलेला हा प्रसंग. पुढच्या काळात क्राईम रिपोर्टिंग करताना हा अनुभव खऱ्या अर्थाने पथदर्शक ठरला.
भारतातल्या प्रचलित कायद्यानुसार देहविक्रीच्या गुन्ह्यांत महिलेला दोषी किंवा गुन्हेगार ठरवले जात नाही, उलट `पिडित’ म्हणून त्यांची सुधारणागृहात रवानगी होते आणि संबंधित लॉजचे मॅनेजर, कामगारवर्ग वगैरेंना वेश्याव्यवसाय चालवण्यावरून अटक होते, लॉजचे मालक मात्र नेहेमीच या कारवाईपासून दूरच असतात.
एकदा रात्री पणजी पोलिस स्टेशनवर नव्यानेच रुजू झालेल्या आणि नाईट ड्युटीवर असलेल्या एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाबरोबर जीपने राऊंडला मी गेलो होतो. रात्री साडेदहाच्या आसपास पोलिस स्टेशनवर परतलो तेव्हा दर्शनी खोलीत कोपऱ्यात विशीच्या आसपास असलेली एक महिला दोन्ही पाय दुमडून, अवघडून बसलेली दिसली. मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या कंपाल ग्राउंडजवळ रस्त्यावर उभी राहून ती गिऱ्हाईक शोधत उभी होती म्हणून तिला पोलिस चौकीत आणले होते. बहुधा तिच्याच सुरक्षितेच्या कारणास्तव.
वेश्याव्यवसायाचा विषय निघाला कि मला आजही ती कोपऱ्यात अवघडून बसलेली ती तरुणी हमखास आठवते.
काही वर्षांपूर्वी पत्नी आणि मुलीसह युरोपच्या सहलीवर होतो तेव्हाची गोष्ट. पॅरीस शहर जगातली रोमान्स नगरी आणि फॅशनचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. पॅरीसच्या आठवड्याभरच्या त्या वास्तव्यात आम्ही मॉन्तमार्ट या भागात राहत होतो. पॅरीसमधलं सर्वात मोठे आणि उंच टेकडीवर असलेले चर्च म्हणजे बॅसिलिका ऑफ सेक्रेड हार्ट (पवित्र हृदयाची बॅसिलिका) इथं आहे आणि या चर्चच्या खालचा परीसर चित्रकला, फोटोग्राफी वगैरे कलांसाठी जगप्रसिद्ध आहे. गेल्या काही शतकांत मॉन्तमार्ट इथं नामवंत चित्रकारांनी हजेरी लावली आहे.
मॉन्तमार्ट इथल्या भूमिगत आणि जमिनीवर असलेल्या मेट्रोमार्गाभोवती फिरताना मला एका गोष्टीचं सतत आश्चर्य वाटायचं ते म्हणजे इथं असलेली सेक्स टॉईज विकणारी अनेक दुकानं.
त्यानंतर मला कळालं कि हा परिसर आणखी एका गोष्टीसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे ती म्हणजे देहविक्री. आम्ही दररोज ज्या हॉटेलात जेवणासाठी जायचो तिथल्या मूळचा ट्युनिशियन असलेल्या मॅनेजरनं मला सांगितलं कि रात्री दहानंतर शक्यतो रस्त्यावर फिरू नका, कारण त्यावेळी देहविक्रीसाठी आमंत्रण देणाऱ्या महिला जागोजागी उभ्या असतात, आपल्या गिऱ्हाईकाच्या शोधात फिरत असतात.
पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ला `सकाळ टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा आणि भारताचा पत्रकार प्रतिनिधी म्हणून थायलंड येथे भरलेल्या उद्योगविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेला मी हजर होतो. भारतातल्या सहा पत्रकारांमध्ये आणि जगातल्या ७४ पत्रकारांमध्ये माझा समावेश होता. थायलंडमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे आणि या व्यवसायात महिलांबरोबर पुरुषसुद्धा आहेत. आशिया खंडातली सेक्स कॅपिटल’ असाच थायलंडचा बोलबाला आहे.
बँकॉक इथल्या आमच्या हॉटेलसमोर असलेल्या मसाज पार्लरच्या किंवा `स्पा'च्या मुली आणि महिला दिवसभर आणि रात्रभर रस्त्यावर चालणाऱ्या पुरुषांना आपल्याकडं हाक मारून बोलवत असायच्या.
गोव्यात पर्यटक म्हणून गेल्यावर तिथं दारु प्यायलाच हवी किंवा पुण्यात मित्रांबरोबर मजा मारण्यासाठी आल्यावर तिथल्या बुधवार पेठेत जायलाच हवं असं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांतून येणाऱ्या काही तरुणांना वाटत असतं. तसंच थायलंडला आल्यावर तिथल्या मसाज पार्लरला भेट द्यायलाच हवी, त्याशिवाय या देशाची सहल पुर्ण होऊ शकत नाही, असाच अनेकांचा समज असतो.
आमच्या एका कॉमन मित्राच्या बोलण्यावरुन थायलंडची कीर्ती कानावर पडलेल्या माझ्या पत्नीनंसुद्धा हा `स्पा'चा काय प्रकार आहे त्याचा अनुभव घे असं मला सांगितलं म्हणजे चक्क बजावलंच होतं !
बॅंकॉंकला रस्त्यांवरच्या इमारतींत जागोजागी ` हेल्थ स्पा', `थाई मसाज’ असं लिहिलेलं आढळतं. तिथं ग्राहकांच्या हातापायाला किंवा पूर्ण अंगाला मसाज करणाऱ्या मुली, महिला रस्त्यांवरुन जाणाऱ्या लोकांना पारदर्शक काचांमुळे स्पष्ट दिसतात. ग्राहक कोचवर पडून त्याच्या शरीराला तेल लावून मुली आणि महिला मसाज करत असतात आणि असे चारपाच ग्राहक आपापल्या कोचावर ओळीने बसलेले, पालथे पडलेले बाहेरुन स्पष्ट दिसत असते. अशी मालिश करवून घेताना आडूनलपून राहण्याची मुळी गरजच नसते.
हा, मात्र काही `हेल्थ स्पा'मध्ये आंबटशौकीन ग्राहकांना `इतर' सेवा पुरवण्यासाठी आतल्या भागांत, पहिल्या मजल्यांवर वेगळे कक्ष असतात. आणि विशेष म्हणजे ही सर्व सेवा कायदेशीर असते, पोलिसांची किंवा इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाची तिथे धाड पडण्याची भीती मुळीच नसते.
थायलंडच्या कीर्तीला जागून त्यानुसार माझ्याबरोबर असलेला एक भारतीय पत्रकार दररोज रात्री नवनव्या मसाज पार्लरला भेट देत होता.
पहिल्या दिवशी घाबरत घाबरत मीही माझ्या पत्रकार मित्रासह आमच्या हॉटेलसमोरच असलेल्या `स्पा'मध्ये गेलो आणि तो मित्र `आतल्या’ भागात गेल्यावर मी स्वतःच्या अंगाखांद्याला मसाज करवून घेतला. नाहीतर भारतात परतल्यानंतर मित्रांनी आणि इतरांनी वेड्यात काढले असतं अशी भीती होती. त्या तरुण मुलींकडून असा मसाज करवून घेताना मी स्वतःच प्रचंड अवघडलो होतो आणि वेळेच्या आधीच '' बस्स, इतकं पुरं झालं !'' म्हणून स्वतःची सुटका करुन घेतली आणि हुश्श्य केलं.
खूप वर्षांपूर्वी पंचविशीच्या उंबरठ्यावर मी असताना बल्गेरिया येथे अनुभवलेला असाच एक प्रसंग त्यावेळी आठवला होता. बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना काही आठवड्यांनंतर केस खूप वाढले म्हणून मी एका सलून मध्ये शिरलो. तेव्हा अनपेक्षितपणे तिथं काम करणाऱ्या एका तरुणीनं केस कापण्यासाठी माझ्या डोक्याचा ताबा घेतला होता. नंतर डोक्याला मालिश पण केली होती. तेव्हा तो अर्धा पाऊण तास मी असाच बावचळून आणि अवघडून गेलो होतो हे आठवलं.
अशा प्रसंगाला मला तोंड द्यावं लागणार अशी मला कल्पना असती तर कदाचित माझा प्रतिसाद आणि वागणं जरा दुसऱ्या प्रकारचं असलं असतं ! सोफिया शहराच्या बांकिया उपनगरात माझ्या रुमवर परतल्यावर हा प्रकार मी इतर भारतीय पत्रकारांना सांगितला होता. दुसऱ्या दिवशी मग यापैकी अनेकांनी केस कापण्यासाठी सोफियाची लोकल ट्रेन पकडली होती.
थायलंडच्या दौऱ्यात मित्र बनलेला हा पत्रकार सहकारी माझ्याहून दहा वर्षांनी लहान होता, त्या पत्रकार सहकाऱ्यासारखं आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचं, आतल्या कक्षात जाण्याचं मला धाडस झालं नाही. `स्पिरिट इज विलिंग बट द फ्लेश इज विक' हे प्रसिद्ध वाक्य आहे. इथं अगदी उलट स्थिती होती, फ्लेश इज विलिंग बट द स्पिरिट इज विक ! पुर्वसंचित नैतिक, धार्मिक व सामाजिक संस्कारांचं दडपण, ओझं असं सहजासहजी झुकारता येत नाही हेच खरं ! मग एखादे कृत्य कायदेशीर किंवा बेकायदेशीर असो वा नसो !
देहविक्री करणे हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय आहे असं म्हटलं जातं. वेश्यांना किंवा व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांना (पुरुषांना नव्हे !) नेहेमीच तिरस्करणीय वागणूक मिळत आली आहे. व्यभिचार करणाऱ्या किंवा नैतिक गैरवर्तन करणाऱ्या दोन महिलांचा बायबलमध्ये नव्या करारात उल्लेख येतो.
ज्युंच्या प्राचीन कायद्यानुसार व्यभिचार करणाऱ्या महिलेला लोकांनी सार्वजनिकरित्या दगडाने ठेचून ठार करण्याची शिक्षा दिली जात असे. व्यभिचार करताना पकडल्या गेलेल्या एका महिलेचा ``आपण काय न्यायनिवाडा करताल?'' असं येशू ख्रिस्ताची परिक्षा करण्याच्या हेतूनं, त्याला अडचणीत टाकण्यासाठी विचारलं जातं. त्या स्त्रिला दगडानं ठेचण्याच्या शिक्षेचं येशूनं समर्थन न केल्यास तो धर्मशास्त्राविरुद्ध आहे असं सांगायला हे लोक टपलेलं असत.
मात्र, ``तुमच्यापैकी ज्या कुणी आतापर्यंत एकही पाप केलेलं नसेल त्या व्यक्तीनं त्या व्यभिचारी महिलेच्या अंगावर पहिला दगड टाकावा'' असं जमिनीवर मातीत बोटांनी लिहून येशू सांगतो आणि ते ऐकून तिथं जमलेले सगळे लोक हातातला दगड खाली टाकत एकापाठोपाठ तेथून पाय काढतात अशी ही एक मार्मिक कथा आहे.
वेश्याव्यवसाय सर्वाधिक प्राचीन असला तरी कायमच तिरस्करणीय राहिला आहे. इतकेच नव्हे तर स्त्रीपुरुषांचे असलेले शारीरिक संबंधसुद्धा नैसर्गिक, पवित्र मानले जात नाही. अगदी विवाहित पतिपत्नींचेसुद्धा. आपल्याकडं आणि खरं पाहिलं तर जगात सगळीकडे सर्व समाजांत आणि धर्मांत शरीरधर्म वाईट असंच समजलं जातं.
``ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यु'' असलं तत्त्वज्ञान एकेकाळी खूप लोकप्रिय आणि त्यामुळं पौंगडावस्थेत नुकत्याच येणाऱ्या तरुण मनाला घाबरुन सोडणारं होतं. त्यामुळे दैवी संबंधांमुळं किंवा अनैसर्गिक पद्धतीने झालेले जन्म श्रेष्ठ असं समजलं गेलं आणि अशाप्रकारे जगात विविध धर्मांतली दैवतासमान मानल्या गेलेल्या व्यक्ती दैवी किंवा अनैसर्गिक संबंधांतून जन्माला आली असं दाखवलं गेलं.
याचं सरळसरळ कारण म्हणजे स्त्रीपुरुषांचे शरीरसंबंध एकतर तिरस्करणीय किंवा हीन मानले गेले. पृथ्वीवर तपस्या करणाऱ्या ऋषीमुनींना त्यापासून प्रवूत्त करण्यासाठी आणि त्यांना वाममार्गाला ( !) लावण्यासाठी मग स्वर्गातून अप्सरा पाठवल्या जातात. स्त्री म्हणजे मोक्षमार्गातली एक धोंड असाच सगळीकडं मानलं गेलं आहे.
स्त्रीपुरुषांच्या नैसर्गिक असलेल्या शरीरसंबंधांविषयी असलेल्या घृणेमुळे पुढे ख्रिस्ती धर्मातील कॅथोलिक धर्मगुरुंवर अविवाहीत राहण्याचं बंधन आलं जे आजतागायत कायम आहे. प्रोटेस्टंट पंथांत मात्र विवाहित धर्मगुरु असतात. भारतीय प्राचीन संस्कृतीत साधूसंतांनी, गुरुवर्यांनी आणि देवमाणसांनी संसारी असणे, प्रापंचिक असणे तितके तिरस्करणीय समजले जात नसायचे, हे विविध ऋषीमुनींच्या उदाहरणांनी स्पष्ट होते. आजन्म अविवाहित राहण्याचं व्रत घेऊन मिशनरी वृत्तीनं सेवा करण्याचं व्रत घेणाऱ्या कॅथोलिक ख्रिस्ती धर्मगुरुंचं अनुकरण मात्र भारतात काही संघटनांनी केलं आहे.

स्त्री किंवा एकूणच कामजीवन हे मोक्षमार्गातली र्धोंड मानले गेले आहे त्यामुळेच `सावधान; असं कानावर पडताच किंवा पडण्याआधीच काही जण बोहल्यावरुन मागे फिरतात. मी स्वतःसुद्धा जेसुईट धर्मगुरु होऊन आजन्म अविवाहित राहण्याचं व्रत घेण्याचं ठरवलं होतं. नंतर हा निर्णय मी बदलला तो काही वेगळ्या कारणांनी, केवळ लग्न करण्यासाठी नाही.

औपचारिकरीत्या संन्यासी व्रतबद्ध होण्याआधीच मी `सावधान' होऊन माघारी फिरलो आणि त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी गृहस्थाश्रम स्विकारला.
वेश्या केवळ स्त्रियाच असतात किंवा वेश्या व्यवसाय केवळ स्त्री आणि पुरुष या दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच चालतो ही एक गैरसमजूत आहे. गेल्या काही वर्षांत या समजुतीला तडे गेल्याचे दिसत आहेत. अलीकडेच डॉ. माधवी खरात यांनी लिहिलेली आणि कुणाल हजेरी यांच्या चेतक बुक्सने प्रकाशित केलेली `जिगोलो’ या नावाची पुरुष वेश्याच्या जीवनावरची कादंबरी मी त्या विषयाच्या नाविन्यामुळं एका बैठकीत वाचून काढली.
काही वर्षांपूर्वी सुगावा प्रकाशनाचे विलास वाघ आणि उषा वाघ यांनी अमेरिकेतील वेश्याव्यवसाय या शीर्षकाचा मी अनुवाद केलेले एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यावेळी या व्यवसायातील शोषणाची माहिती झाली.
देहविक्री करणाऱ्या महिलांनीसुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, वेश्यांनासुद्धा चांगले जीवन जगात आले पाहिजे, असा त्यावेळी बंडखोर, क्रांतिकारक वाटणारा विचार सुरक्षित कामजीवन आणि भारतातील संततीनियमन चळवळीचे आद्य प्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच मांडला होता. र. धो. कर्व्यांच्या काळातील वेश्याव्यवसाय आणि वेश्यांची स्थिती आणि सद्यस्थिती यात निश्चितच मोठे अंतर आहे.
सत्तरच्या दशकात दुर्गा भागवत यांनी देहविक्री करणाऱ्या स्त्रियांबाबत केलेले एक विधान खूप वादग्रस्त ठरले होते. या विधानाचा विपर्यस्त अर्थ काढून दुर्गा भागवत वेश्याव्यवसायाचे समर्थन करतात असा आरोप केला गेला होता.
नामदेव ढसाळ यांचा `गोलपिठा' हा काव्यसंग्रह वेश्यांची वस्ती असलेल्या मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातले जीवन आणि भाषा चित्रित करतो. या काव्यसंग्रहाला विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना लिहिण्याआधी तेँडुलकर यांनी कामाठीपुरा येथला बराचसा परीसर आपल्या पायाखाली घातला होता, कारण इथले जीवन आणि भाषा मध्यमवर्गीय समाजाला आणि लेखकांना पूर्णतः अपरिचित होता.
दुर्गाबाई भागवत यांना त्यांच्या `पैस’ या लेखसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त महिला मंडळाने आयोजित केलेला त्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना भागवत म्हणाल्या कि, ''वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळायला हवी.'' त्यांच्या या विधानाचा धागा पकडत नामदेव ढसाळ यांच्या `गोलपिठा' कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजा ढाले म्हणाले, ''ज्यांना प्रतिष्ठा मिळवून द्यावे असे वाटते त्यांनींच हा धंदा करावा !''
ढाले यांच्या या विधानाने मोठे महाभारत घडले. त्यानंतर बराचसा काळ ओलांडला आहे.
देहविक्री करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा कायद्याचे सर्व अधिकार समानतेने मिळायला हवेत, वेश्यांनासुद्धा सन्मानपुर्वक, प्रतिष्ठेचे जीवन मिळायला हवे, या शब्दांत आता खुद्द सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे देहविक्रीबाबत वेगळाच, क्रांतिकारक दृष्टिकोन निर्माण केला आहे.
सोशल माध्यमांत निरोगी आणि आरोग्यदायक कामजीवनाबाबत आता खुलेपणानं लिहिलं आणि वाचलं जात आहे.
तरीदेखील याबाबत अजूनही फार मोठी मजल मारावी लागणार आहे हे निश्चित.