कुठल्याही व्यक्तीच्या कार्याचे, योगदानाचे मूल्य पुरस्कार नाही तर काळच ठरवत असतो.
पुण्यात इंडियन एक्सप्रेसला नुकताच रुजू झालो होतो तेव्हाची गोष्ट. प्रा. दि. ब देवधर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि पुन्हा एकदा क्रिकेटमहर्षी देवधर यांच्यावर वृत्तपत्रांतून लेख प्रसिद्ध होऊ लागले. `पुन्हा एकदा' असा शब्द मी वापरला याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात चाळीसच्या दशकात क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या फर्ग्युसन कॉलेजातले माजी शिक्षक असलेल्या दिनकर बळवंत देवधर यांनी काही दिवसां[पूर्वी शंभरी पूर्ण केली होती, त्यावेळीही त्यांच्यावर वृत्तपत्रांतून असेच अनेक लेख प्रकाशित झाले होते.
योगायोगाने देवधर यांच्याप्रमाणेच शकुंतलाबाई परांजपे यांनाही त्याचवेळी पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. मी त्याकाळात डेक्कन जिमखान्यावर रानडे इन्स्टिट्युटसमोर प्रिया लॉजवर मंथली कॉट बेसिसवर राहत होतो आणि प्रा देवधर आणि शकुंतलाबाई परांजपे हे दोघेही डेक्कन जिमखान्यावर राहत होते. माझ्या शेजारीच राहणाऱ्या या दोन्ही पद्मभूषण पुरस्कारार्थींवर मी त्याकाळात लेख लिहिले होते. ही तीस वर्षांपूर्वीची म्हणजे १९९१ च्या आसपासची घटना.
यावेळी मला एक गोष्ट जाणवली कि पद्मभूषण मिळालेल्या प्रा. देवधर आणि शकुंतलाबाई परांजपे यांच्यामध्ये काही समान धागे होते. त्या दोघांनाही खूप वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. मग आता त्यांना हा त्याहून वरचा दर्जा असलेला हा पुरस्कार देण्याचे नैमित्तिक कारण काय होते?
देवधर यांच्याबाबत हे कारण अगदी उघड होते, त्यांनी अलिकडेच शंभरी ओलांडली होती. भारतात संततीनियमनाची चळवळ राबवणारे रधुनाथ धोंडो कर्वे यांनां मदत करणाऱ्या आणि त्यांच्या `समाजस्वास्थ' या मासिकात नियमितपणे लिहिणाऱ्या आणि माजी आमदार (विधानपरिषद सभासद) , खासदार (राज्यसभा सभासद) असलेल्या शकुंतलाबाईंचीसुद्धा नव्वदीकडे वाटचाल चालू होती. या दोघांनाही त्यांच्या या दीर्घायुष्यानिमित्ताने हा सत्कार दिला जात होता, हे स्पष्टच होते.
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे पद्म आणि भारतरत्न हे पुरस्कार केवळ हयात व्यक्तींनाच दिले जात असत. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे नेते एम. जी. रामचंद्रन यांच्या निधनानंतर तामिळनाडूत लगेच होणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. अर्थात याचा काँग्रेस पक्षाला निवडणुकीत काहींचं फायदा झाला नाही ही गोष्ट अलाहिदा. मात्र त्यानंतर हा पुरस्कार मरणोत्तर देण्याची घातक परंपरा सुरु झाली.
साहित्य अकादमी, ज्ञानपीठ आणि इतकेच नव्हे तर नोबेल वगैरे पुरस्कार मात्र आजही फक्त हयात व्यक्तींनाच दिले जातात. पेन्शन चालू राहण्यासाठी संबंधित व्यक्तींना दर वर्षाच्या अखेरीस आपण अजून जिवंत आहोत हे सिद्ध करणारा हयातीचा पुरावा दाखल करावा लागतो. अन्यथा नवीन वर्षाच्या सुरुवातीला पेन्शन लगेच बंद होते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे निधन झाले कि मग नोबेल आणि ज्ञानपीठ पुरस्कारासाठी ती व्यक्ती अपात्र ठरते.
काही आठवड्यांपूर्वीच महाराष्ट्रातही साहित्यक्षेत्रातील काही नामवंत व्यक्तींना विशिष्ट पुरस्कार दिले नाही त्याबद्दल जाहीर नापसंती व्यक्त झाली तेव्हा हे पुरस्कार केवळ हयात व्यक्तींनाच दिले जातात असा नियम आहे असे अधिकृतरीत्या सांगितले गेले आणि हवे असल्यास हा नियम बदलता येईल अशीही पुष्टी जोडण्यात आली होती.
हयातीच्या या नियमामुळेच अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना हा पुरस्कार मिळाला नाही असे म्हटले जाते. मात्र वर्णभेदाच्या संघर्षात अहिंसेचे साधन यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या अमेरिकेतल्या रेव्ह. मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अगदी तरुणवयात मिळाला. वर्णभेदाच्या संघर्षात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील नेते नेल्सन मंडेला आणि नुकतेच दिवंगत झालेले आर्चबिशप डेसमंड टुटू यांनाही नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आले.
अशाच प्रकारे मानवतेवरील एक कलंक असणाऱ्या अस्पृश्यतेचा भारतात राज्यघटनेच्या माध्यमातून कायमचा नायनाट करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाला मात्र नोबेल पुरस्कार मिळाला नाही.
याउलट या शतकाच्या सुरुवातीला बराक ओबामा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे घेतल्याघेतल्या त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले ते नेमके कशासाठी याचा खुद्द ओबामा यांनासुद्धा थांगपत्ता लागलेला नसेल.
एखादा सन्मान व पुरस्कार एखाद्या व्यक्तीला देण्यामागचे (किंवा न देण्यामागचे) कारण शोधू गेल्यास काही गंमतीदार, अविश्वसनीय किंवा धक्कादायक माहिती मिळते. स्थानिक, राज्य, आणि राष्ट्र तसेच जागतिक पातळींच्या पुरस्कारांविषयीही असेच घडल्याचे दिसते.
वि. स. खांडेकर यांना त्यांच्या 'ययाती' या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा त्यांची दृष्टी अधू झाली होती, मदतीशिवाय त्यांना हालचाल करता येत नव्हती. ''पुरस्काराचा आनंद उपभोगण्याची क्षमता असताना हा सन्मान मिळाला असता तर बरे झाले असते'' अशी हा सन्मान जाहीर झाल्यावर गलितगात्र अवस्थेतील खांडेकरांची प्रतिक्रिया होती ! त्यानंतर दोन वर्षांत वयाच्या ७८ व्या वर्षी खांडेकरांचे निधन झाले.
याचा अर्थ वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत खांडेकरांना दीर्घायुष्य लाभले नसते तर मराठीतले पहिले ज्ञानपीठ मिळण्याचा सन्मान त्यांना मिळाला नसता.
खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा श्रीरामपुरातल्या लोकमान्य टिळक वाचनालयातून या कादंबरीची प्रत लगेच मिळवून मी ती अधाशीपणे वाचून काढली होती. या कादंबरीवर मी लिहिलेला एक लेखही तेव्हा कराडहून प्रसिद्ध होणाऱ्या 'निरोप्या' मासिकात संपादक जेसुईट फादर प्रभुधर यांनी प्रकाशित केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी मी नववीत शिकत होतो. या कादंबरीतली ययाती, देवयानी, शुक्राचार्य, शर्मिष्ठा, कच, पुरु ही पात्रे आजही माझ्या मनात घर करुन बसली आहेत.
इंग्रजी किंवा इतर भाषेतल्या कुठल्याही साहित्यकृतीला एखादा पुरस्कार मिळाला कि त्या पुस्तकाकडे वाचकांचे लक्ष जाते, त्या पुस्तकाच्या नंतर वर्षानुवर्षे अनेक आवृत्त्या निघत असतात. उदाहरणार्थ, ``टू किल अ मॉकिंग बर्ड' हे पुस्तक एकदा माझ्या हातात पडले तेव्हा ते एक नावाजलेले पुस्तक आहे हे मला आठवले. किती मराठी पुस्तकांबाबत असे म्हणता येईल ?
`ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाल्यानंतरसुद्धा खांडेकरांच्या या पुस्तकाच्या फार आवृत्त्या निघाल्या नाहीत, इतरही अनेक पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तकांची बहुधा हिच कथा आणि व्यथा असेल.
वि. वा शिरवाडकर उर्फ कवि कुसुमाग्रज यांना १९६७ ते १९८१ या काळातील त्यांच्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ सन्मान मिळाला. ''देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे'' अशा अनेक लोकप्रिय कविता लिहिणाऱ्या विंदा उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांनी खूप वर्षांपूर्वी म्हणजे ऐंशीच्या दशकातच आपल्याकडे आता लिहिण्यासारखे नवीन असे काही नाही असे जाहीरपणे सांगून आपली लेखणी म्यान केली होती.
`कधी थांबावे' यासंदर्भात विंदांचा हा संदर्भ देणारा सुभाष अवचट यांचा लेख मागच्या महिन्यात अनेकांनी वाचलाही असेल.
कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार `अष्टदर्शने' या साहित्यकृतीसाठी देण्यात आला. विंदांची ही ज्ञानपीठप्राप्त साहित्यकृती मात्र किती जणांनी वाचली असेल वा हे नाव ऐकले असेल याविषयी मला शंका आहे.
एखाद्या व्यक्तीला विशिष्ट निर्मितीसाठी पुरस्कार मिळाला किंवा मिळाला नाही यामुळे त्या व्यक्तीचे किंवा त्या कलाकृतीचे श्रेष्ठत्व ठरत नाही, तसे गृहीत धरता कामा नये. उदाहरणार्थ, गेल्या शतकातील एक महान तत्त्वज्ञ असलेल्या, नितिमत्तेविषयी अपारंपरिक मते मांडणाऱ्या आणि युद्धविरोधी भुमिका घेऊन लोकप्रिय जनमताचा आणि शासनाचाही रोष पत्करणाऱ्या बर्ट्रांड रसेलला नोबेल पारितोषिक मिळाले ते चक्क साहित्यातील होते !
भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेले ज्ञानपीठ पुरस्कार १९६५ पासून दिले जात आहे. मराठी साहित्यातील दिग्गज असलेल्या अनेक साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने हुलकावणी दिली आहे, वानगीदाखल म्हणून विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, शांता शेळके, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर, मंगेश पाडगावकर, वसंत कानेटकर, जी. ए. कुलकर्णी, नारायण सुर्वे, वसंत बापट वगैरे कितीतरी नावे देता येतील.
विजय तेंडुलकर आणि नामदेव ढसाळ यांची नावे वगळून मराठी साहित्याचा सोडा, अगदी भारतीय साहित्याचाही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, अशांना ज्ञानपीठ पुरस्कार का बरे दिला गेला नसेल ?
नामदेव ढसाळ यांचा साहित्यविश्वात क्रांती करणारा `गोलपिठा' हा पहिला कवितासंग्रह १९७३ साली प्रसिद्ध झाला, मात्र त्यांच्या कुठल्याही साहित्यकृतीला साहित्य अकादमीचा किंवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाहीच ! पश्चात्यबुद्धी म्हणून बहुधा त्यांना साहित्य अकादमीने आपल्या स्वर्णजयंतीनिमित्त २००५ साली जीवनगौरव पुरस्कार दिला.
याचाच अर्थ इतर पुरस्कारांप्रमाणेच केवळ मेरीट म्हणजे उच्च दर्जाच नव्हे तर इतरही अनेक गोष्टी साहित्य अकादमी किंवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आवश्यक असतात. यामध्ये आवश्यक ती लॉबिंग प्रक्रिया, तांत्रिक आणि इतर बाबींचे पालन वगैरे अनेक गोष्टींचा समावेश असतो.
अनेकदा विशिष्ट पुरस्कारासाठी संबंधित व्यक्तींनी किंवा त्यांच्या वतीने इतरांनी अर्ज किंवा नामांकन करण्याचा नियम असतो आणि यास पात्र असलेले अनेकजण तयार नसतात. यामुळे आलेल्या अर्ज विचारात घेऊन पुरस्कार जाहीर करण्याची नामुष्की येते आणि कधीकधी एखाद्या पुरस्कारासाठी एकही अर्ज आलेला नसतो.
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यावर त्या साहित्यकृतीच्या पात्रतेबद्दल तांत्रिक मुद्द्यावर संशय निर्माण झाल्याने अत्यंत उद्विग मनाने जी. ए. कुलकर्णी यांनी आपला पुरस्कार परत केला होता हे एक उदाहरण आहेच .
इतर भारतीय भाषांच्या तुलनेत मराठी साहित्याला फार कमी साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले हे याची कारणमीमांसा देताना दुसऱ्यांचे पाय ओढण्याचे प्रकार आणि पुरस्कारांसाठी लॉबिंग करण्यात अपयश अशी दोन मुख्य कारणे आहेत असे दिल्लीत राहणाऱ्या आणि तेथील समीकरणांची पूर्ण जाणिव असलेल्या मराठीतील एका ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षकाने एका आघाडीच्या मराठी दैनिकात काही वर्षांपूर्वी लिहिल्याचे आठवते.
सातशे-आठशे वर्षांपूर्वीचे चक्रधर स्वामी आणि संत ज्ञानेश्वर यांच्या आणि सतराव्या शतकातील ख्रिस्तपुराण'कार जन्माने ब्रिटिश असलेल्या फादर थॉमस स्टिफन्स यांचा वारसा सांगणाऱ्या आणि आता अभिजात भाषेच्या दर्जासाठी प्रयत्न होत असलेल्या मराठी भाषेला आतापर्यंत भालचंद्र नेमाडे यांच्यासह केवळ चार ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेलं आहेत.
अभिजात दर्जा मिळाल्याने एखाद्या भाषेचे किंवा त्या भाषेतील साहित्यकृतींचे महत्त्व वाढते असे थोडेच आहे? मात्र दरवर्षी या ना त्या निमित्ताने मराठीला अभिजात दर्जा मिळावा याबाबत कागदी घोडे नाचवले जातात. मराठी भाषा वाचली जावी, या भाषेत लिहिले जावे, ही भाषा समृद्ध व्हावी यासाठी किती प्रयत्न केले जातात ?
याउलट अगदी अलिकडच्या काळापर्यंत मराठी भाषेची बोलीभाषा समजली जाणाऱ्या आणि १९८७ साली स्वतंत्र भाषा म्हणून राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट झालेल्या कोकणी भाषेला रविंद्र केळेकार आणि यावर्षी दामोदर मावझो यांच्या रुपाने आतापर्यंत दोन ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत, यावरुन काय बोध घेता येणार आहे?
ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी वा इतर पुरस्कार न मिळाल्याने कुठल्याही साहित्यिकाचे व त्यांच्या साहित्यकृतीचे मूल्य अथवा योगदान कमी होत नाही. साहित्यक्षेत्रातील पुरस्काराबाबत असे म्हणता येईल तसेच इतर कुठल्याही क्षेत्राविषयी असेच म्हणता येईल.
उदाहरणार्थ, भारतरत्न पुरस्कारांचे मानकरी असणाऱ्या व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे, मात्र अलिकडच्या काळातील लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि पंडित भिमसेन जोशी अशी नावे वगळली तर महाराष्ट्रातील या इतर भारतरत्नांची नावेही अनेकांना माहित नसतील, त्यांच्या कार्याविषयीची माहिती असणे ही तर अगदी वेगळी बाब .
त्यामुळे एखादे पुरस्कार मिळाल्यामुळे फार भावनाविवश किंवा हुरळून जाण्याची नसते तसेच पुरस्कार न मिळाल्याने नाराज, निराश होण्याचेही कारण नसते. कुठल्याही व्यक्तीच्या कार्याचे आणि योगदानाचे मूल्य असले पुरस्कार नाही तर काळच ठरवत असतो.