Sunday, December 8, 2024


मी बातमीदार बनलो तेव्हा म्हणजे १९८१ साली आम्हा पत्रकारांना आणि इतर बिगरपत्रकार वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वर्षातून दहा पगारी सुट्ट्या (हॉलीडेज) होत्या. रजा वेगळ्या.

तत्कालीन अस्तित्वात असलेल्या आणि बहुसंख्य प्रतितिष्ठ वृत्तपत्रांत अंमलबजावणी होत असलेल्या वृत्तपत्र कर्मचारी कायद्यानुसार या पगारी सुट्ट्या होत्या.
गोव्यात आमच्या `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी आणि `नवप्रभा' या जुळ्या मराठी दैनिकात वर्षातून काही दिवस - नूतन वर्ष एक जानेवारी, २६ जानेवारी, पंधरा ऑगस्ट, गणेश चतुर्थी, दिवाळी - छपाई बंद ठेवून सर्वांना सुट्टी मिळायची,
यात तीनचार वर्षांनी एक मेच्या कामगार दिनाची भर पडली.
याचे कारण त्याकाळात डाव्या विचारसरणीचा जोर होता आणि आम्ही गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस (गुज) चे पदाधिकारी असलेले श्रमिक पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचारी स्वतःला कामगार समजायचो. उरलेल्या पाच पगारी सुट्ट्या आम्ही वर्षातून कधीही घेऊ शकायचो.
त्याशिवाय पत्रकार कायद्यानुसार वर्षाला तीस हक्काची रजा, बारा आजारपणाची रजा आणि दहाबारा कॅज्युएल रजा असायच्या.
गोवा सोडून मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हापर्यंत अशीच स्थिती होती,
पुण्यात त्यावेळी म्हणजे १९८९ साली मात्र दैनिकांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या असायच्या.
त्यावेळची प्रत्येक स्थानिक दैनिक आपापल्या वर्धापनदिनानिमित्त छपाई बंद ठेवायचे. उदाहरणार्थ, `सकाळ' चा वर्धापनदिनाला एक जानेवारीला सुट्टी असायची, दोन जानेवारीला पेपर नसायचा.
ही परिस्थिती एकदोन वर्षात व्यवहारी दृष्टिकोनामुळे बदलली.
मुंबईतल्या `लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसने पुण्यात आवृत्त्या सुरु केल्या होत्या. या दोन्ही वृत्तपत्रांनी आपल्या प्रती `सकाळ' वर्गणीदारांच्या घरांत दोन जानेवारीला फुकटात देणे सुरु केले.
त्यावेळचा पुण्यात दोन क्रमांकाचा असणारा `प्रभात' दुप्पट किंवा त्याहून अधिक प्रती दोन जानेवारीला छापू लागू लागला.
पुण्यात `सकाळ', `प्रभात' आणि `केसरी' याशिवाय इतरही दैनिके आहेत, याचा वाचकांना यावेळी पहिल्यांदाच पत्ता लागला.
परिणामतः `सकाळ' व्यवस्थापनाने एक जानेवारीला वृत्तपत्राची छपाई बंद ठेवण्याचा निर्णय रद्द केला. प्रतापराव पवार यांनी नानासाहेब परुळेकरांचा `सकाळ' पाचसहा वर्षांपूर्वी खरेदी केला होता.
छपाई आणि काम सुरु राहिले तरी `सकाळ' कर्मचाऱ्यांना मात्र त्यादिवसाऐवजी इतर दिवशी सुट्टी घेता यायची, आजही ही सोय आहे.
मी `इंडियन एक्सप्रेस'ला असतानाच पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांनी होळीनिमित्त सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला.
बहुतेक वृत्तपत्र व्यवस्थापकांनी या निर्णयाला ठाम विरोध केला. या वितरकांच्या मदतीशिवाय आपण आपल्या दैनिकाच्या प्रती लोकांना वाटू असाही इशारा त्यांनी दिला.
वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपला सुट्टीचा निर्णय वृत्तपत्र व्यवस्थापनकांना कळवल्यानंतर तीनचार दिवस तणावाची आणि संघर्षाची परिस्थिती निंर्माण झाली होती, हे आजही आठवते
मात्र वितरकांनी आपली एकी कायम ठेवली आणि आम्हा वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना असलेल्या आणखी एका सुट्टीची भर पडली.
पुण्यातल्या वृत्तपत्र वितरकांना आपल्या ताकदीची जाणीव झाली,
याआधी वृत्तपत्र कर्मचारी संघटितरित्या वृत्तपत्राची सुट्टीबाबत निर्णय घेऊ शकत असत. आता त्यांची जागा वृत्तपत्र वितरकांनी घेतली होती,
हळूहळू एक मे चा कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन, अशा सुट्ट्या वाढत गेल्या.
अलीकडेच दिवाळीनिमित्त पुण्यात दैनिकांची छपाई त्यामुळे दोन दिवस बंद असते.
पुण्यात काल आणि आज वृत्तपत्रे नाहीत.
मात्र किती वाचकांना या दोन दिवशी सकाळी चुकल्याचुकल्यासारखे किंवा दैनिकांची गैरहजेरी जाणवतअसेल ?
Camil Parkhe



Saturday, December 7, 2024

 अतिशय धार्मिक म्हणता येईल अशा कुटुंबात मी वाढलो. माझ्या वडलांची दिनचर्या सुरु व्हायची ती सकाळी उठल्याउठल्या पलंगातल्या बिछान्यातच हातात रोझरी जपमाळ घेऊन कपाळावर, छातीवर आणि दोन्ही खांद्यांवर हाताने क्रुसाची खूण करत ' पवित्र क्रुसाच्या खुणेने...'' या प्रार्थनेपासून.

त्यानंतर `आमच्या बापा’, `नमो मारिया’ `प्रेषितांचा विश्वासांगिकार’ वगैरे प्रार्थना अर्धा तास चालायच्या. त्यांचे तोंड बाहेरच्या खोलीत असलेल्या आमच्या कुडाच्या भिंतीवर टांगलेल्या छोट्याशा आल्ताराकडे असायचे.
दरम्यानच्या काळात स्वयंपाकघरात केलेला कोरा चहा कपबशीत त्यांच्यासमोर ठेवलेला असायचा. दादांचे हे असे दररोजचे दर्शन मला खूप लहानपणापासून आठवते.. याचं कारण घरात इतरांपेक्षा खूप लवकर म्हणजे तांबडं फुटण्याआधीच बिछान्यातून बाहेर पडण्याची मला लागलेली सवय.
सकाळी साडेआठ दरम्यान दादांची आंघोळ, नाश्ता उरकायचा, तोपर्यंत घरात महिन्यावार लावलेला फुलांचा हार आलेला असायचा. कालचा जुना हार काढून दादा आल्तारासमोर उभे राहून दोनतीन प्रार्थना - आमच्या बापा, मारिया - मनातल्या मनात म्हणायचे आणि आमच्या `पारखे टेलर्स’ दुकानात जायला निघायचे.
माझी शाळा सकाळी अकराला असल्यानं अनेकदा मी त्यांच्याबरोबर जायचो. दुकानातल्या लाकडी फळ्यांचे दार उघडून केरसुणीनं ते दुकान झाडून घ्यायचे आणि मग दुकानाच्या भिंतीवर मध्यभागी असलेल्या आल्तारासमोर उभे राहून ते पुन्हा दोनतीन प्रार्थना म्हणायचे.
संद्याकाळी दुकानात पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवल्यावर आणि नंतरच्या काळात दिवे लावल्यावर लगेचच ते आल्ताराकडे पाहायचे आणि उजवा हात कपाळावर लावायचे.
श्रीरामपूर नगरपालिकेचा रात्रीचा साडेआठ वाजता भोंगा झाल्यानंतर दुकान बंद करण्याआधी पुन्हा एकदा आल्तारासमोर प्रार्थना व्हायची.
घरी आल्यावर नऊच्या आत आल्तारावर जाडजूड स्टीलच्या स्टॅण्डमध्ये दोन मेणबत्त्या लावल्या जायच्या आणि घरातील सगळे जण रात्रीच्या सामूहिक प्रार्थनेत सहभागी व्हायचे. जवळजवळ अर्धा तास चालणाऱ्या रात्रीच्या या प्रार्थनेत कुणीही गैरहजर राहू नये असा एक दंडक होता.
शनिवारी रात्री मारियेची प्रार्थना म्हणजे रोझरी व्हायची, आठवड्यातून दोनतीनदा मारियेची, सर्व संतांची आणि संत जोसेफची लितानी प्रार्थना व्हायची. अशाप्रकारे दादांचा नि आमच्या घरातला हा दिनक्रम कार्यक्रम कधीही चुकल्याचं मला आठवत नाही.
नाश्ता आणि कुठलेही जेवण घेण्याआधी हातानं क्रुसाची खूण केल्यानंतरच घास तोंडात टाकायचा ही त्यांची आणखी एक सवय. ही सवय आमच्या आईला - बाईला - सुद्धा होती. अहमदनगर जिल्ह्यात आईला 'बाई' असं संबोधन करण्याची रीत प्रचलित आहे.
घरातल्या या धार्मिक वातावरणाचा प्रभाव घरातल्या आम्हा मुलामुलींवर पडणे साहजिकच होते. घरातली सगळीच मुलं साधुसंत झाली नाही तरी बऱ्यापैकी धार्मिक आणि चांगल्यावाईट कल्पनांचा आदर आणि दुःस्वास करणारी निघाली.
घरातल्या कुणाही व्यक्तीकडून कसलाही अपशब्द, लिंगाधारित अपशब्द किंवा एखादी शिवी कधीही कानावर पडली नाही.
सत्तरच्या दशकापर्यंत जगभरातील कॅथोलिक देवळांत रविवारचा आणि दररोजचाही मिस्साविधी लॅटिन भाषेतून व्हायचा. आपल्याकडे अलीकडच्या काळापर्यंत अनेक धार्मिक विधी सामान्य लोकांना न कळणाऱ्या संस्कृत भाषेत व्हायचे अगदी तसेच. श्रीरामपूरला आणि हरेगावसारख्या खेड्यांपाड्यांत १९७२ पर्यंत कॅथोलिक देवळांत मिस्साविधी आणि प्रार्थना लॅटिन भाषेत व्हायच्या,
पुस्तकात समोरासमोरच्या पानांवर रोमन आणि देवनागरी लिपींत लिहिलेल्या या लॅटिन प्रार्थना आम्ही म्हणायचो. मराठी भाषा येणारे आम्ही लोक देवनागरी लिपीतल्या त्या लॅटिन प्रार्थना सहजपणे गात आणि म्हणत असू.
आमच्या लहानपणी आम्ही - आणि जगभरातले सर्वच भाविक लोक - लॅटिन भाषेत प्रार्थना करत असू. .
तासभर चालणाऱ्या या संगीतमय लॅटिन मिस्सा खरंच भव्यदिव्य स्वरुपाच्या असायच्या. पूर्ण उपासनाविधीत याजक आणि जमलेले भाविक जवळजवळ विशिष्ट लयबद्ध पद्धतीने गात असत. लॅटिन भाषेच्या संगीतमय उपासनाविधीला रुळलेल्या माझ्यासारख्या मुलांना आणि अनेक ज्येष्ठांना हा निर्णय लगेचच रुचला नव्हता हे कबूल करायलाच हवं.
आज जगभर सगळीकडे स्थानिक भाषांत मिस्साविधी आणि इतर सर्व प्रार्थना होतात.
ख्रिस्ती लोक बहुसंख्य बसलेल्या श्रीरामपूरच्या नामवंत जर्मन हॉस्पिटल म्हणजे सेंट लुक हॉस्पिटलच्या परिसरापासून दोन किलोमीटर लांब पण शहराच्या मुख्य वस्तीत आमचं घर होतं.
मेनरोडपाशी सोनार लेनमध्ये आमचं `पारखे टेलर्स’ हे शहरात नावाजलेलं दुकान होतं. तेथून जवळच असलेल्या सोमैय्या हायस्कुलपाशी आम्ही राहायचो.
आमच्या चाळीत बहुधर्मिय आणि विविध जातींची घरं होती. आमच्या घराच्या भिंतीला लागून मुसलमान शेजार होता, त्यांच्या अगदी समोरसुद्धा एक मुसलमान घर होतं, आमच्या घराच्या दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंब होतं, त्यांच्याशेजारी आणखी एक मुसलमान कुटुंब होतं. समोरची चारपाच घरं माळी जातीच्या आणि एकमेकांचे नातेवाईक असलेल्या कुटुंबांची होती.
या साऱ्या घरांतील लोक पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी सामाईक नळावर अवलंबून असत. त्यावेळी तिथं गोल कुंकू लावलेल्या, कुंकवाची आडवी चीर लावलेल्या आणि अजिबात कुंकू नि कुठलेही सौभाग्यलेणं नसलेल्या बायांची गर्दी होई.
मात्र वेगवेगळे कुंकू असण्याचा किंवा अजिबात कुंकू नसण्याचा त्यांच्या आपापसांतील संभाषणांत काहीही फरक नसायचा.
या आमच्या माळी-मराठी आणि मुसलमान शेजाऱ्यांच्या आपापसांत नेहेमी भाजी-कालवणांची - अडीअडचणीच्या काळात गव्हाच्या-ज्वारी-बाजरीच्या पिठाचीही आठव्याच्या किंवा एखाद्या पातेल्याच्या मापात मोजून घेऊन देवाणघेवाण व्हायची.
जराशा अंतरावर असलेल्या दगडी इमारतीत आणि बैठ्या दगडी घरांत एकदोन ब्राह्मण घरं होती. त्या ब्राह्मण घरातला नातू माझ्याच वर्गातला आणि माझा जवळचा मित्र, तो आमच्या घरात यायचा, मीही त्याच्या घरात थेट आतपर्यंत जायचो,
मात्र त्याची सत्तरीतली आजी कायम सोवळ्यात असायची, आणि कुणाला तिच्याजवळ येऊ किंवा शिवू देत नसायची. माझ्या आईची तिची जाम गट्टी होती.
'' या,या मार्थाबाई, बसा घडीभर'' असं म्हणत ती माझ्या आईला आपल्या घरात घ्यायची,
भरपूर वेळ खूप गप्पाटप्पा व्हायच्या, मात्र सुरक्षित अंतर ठेवूनच. आम्हाला मात्र त्याचं कधीही वाईट वाटलं नाही. इतर कुणाही व्यक्तीला - अगदी मराठा आणि माळी जातीच्या लोकांनाही - त्या गणपुले आजी शिवत नसायच्या.
सगळा शेजारपाजार एकमेकांच्या घरांतील सुखदुःखाला म्हणजे लग्नकार्यांना, मयतीला हजर असायचा, त्यामुळे एकमेकांच्या रितीरिवाजांची आणि संस्कृतीची साधारण ओळख असायची.
शेजारच्या मुसलमान घरांतील लहान मुलांच्या सुंता कार्यक्रमांना हजेरी लावल्याचं मला आजही आठवतं. नंतर थोडं मोठं झाल्यावर कळालं कि सुंता परंपरा यहुदी धर्मात होती आणि यहुदी असलेल्या येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या बाराही शिष्यांची साहजिकच सुंता झाली होती.
नव्या ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांमध्ये मात्र सुंता प्रथा न आणण्याचा निर्णय या विषयावर चर्चा होऊन अगदी सुरुवातीच्या काळातच घेतला गेला होता.
कालांतरानं लक्षात आलं कि धर्म आणि भाषा, संस्कृती, पेहराव आणि अगदी खाद्यपध्द्ती यांचा एकमेकांशी काही एक संबंध नसतो.
साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता.
या युरोपियन धर्मगुरुंच्या देखरेखीखाली आम्हा मुलांची अध्यात्मिक जडणघडण होत होती.
साठ आणि सत्तरच्या दशकांच्या पिढीपर्यंत देशातील धार्मिक ख्रिस्ती कुटुंबांत घरातलं एक तरी मुल फादर किंवा सिस्टर व्हावं अशी आईवडलांची अपेक्षा असायाची.
युरोपातून आणि अमेरिकेतून अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आणि नन्स मिशनरी होऊन भारतात, आफ्रिका खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आले त्याचं हे प्रमुख कारण होतं. ख्रिस्ती बहुसंख्य असलेल्या केरळ, गोवा आणि वसईसारख्या भागांतूनसुद्धा अनेक धर्मगुरु आणि नन्स देशाच्या कानाकोपऱ्यांत काम करत आहेत ते याच कारणामुळं.
कोणे एके काळी अशाच धार्मिक कॅथोलिक कुटुंबात जन्मलेले जॉर्ज फर्नांडिस मंगलोर येथील सेमिनरीत फादर होण्यासाठी दाखल झाले होते, मात्र नंतर त्यांचा विचार बदलला आणि मग ते समाजवादी विचारसरणीचे कामगार नेते बनले.
आमचे धार्मिक ख्रिस्ती कुटुंबसुद्धा यास अपवाद नव्हते. याचा परिणाम म्हणून मी स्वतः आजन्म ख्रिस्ती संन्याशी होण्याचा निर्णय घेतला. दहावीनंतर मी जेसुईट फादर होण्यासाठी घरकुटुंब सोडले.
दहावीनंतर श्रीरामपुरातले घर मी सोडेपर्यंत दोन गोष्टी माझ्या शरीराभोवती कायम असायच्या. त्यापैकी एक म्हणजे गळयाभोवती काळ्या दोरीने बांधलेला क्रूस. ख्रिस्ती असल्याची ही खूण अनेकदा इतरांना दिसेल अशा पद्धतीने शर्टाच्या कॉलरपाशी असायची.
दुसरी एक गोष्ट मात्र इतरांना कधीही दिसत नसायची. चारपाच दिवसांच्या दिवाळसणाचा फक्त शेवटचा दिवस आमच्या घरी साजरा व्हायचा, तो म्हणजे भाऊबीज. ``इडा पिडा टळो'' असं काहीसं म्हणत बाई दादांना आणि आम्हा सर्व मुलांना ओवाळायची, नंतर बहिणी आम्हा भावांना ओवाळायच्या आणि मग ओवाळणीच्या ताटात आम्हा सर्व पुरुषांना करदोटे मिळायचे.
आधल्या वर्षाचे करदोटे काढून मग ते नवे करदोटे कमरेभोवती गुंडाळायचे. करदोटेविना पुरुष म्हणजे षंढ असा त्याकाळी समज असायचा.
गोव्यात आल्यानंतर गळ्याभोवतीचाचा हा क्रूस आणि अंतवस्त्रापाशी असलेला करदोटा नक्की कधी आणि कसे गळून पडले हेसुद्धा आता आठवत नाही.
गोव्यात अर्थातच कॅथोलिक समाजात करदोटे बाळगण्याची प्रथा नाही आणि गळ्याभॊवती कुणी क्रॉससुद्धा बाळगत नाही.
हा, गोव्यात कॅथॉलिक व्यक्ती असल्याची ओळख करून देणारी एक दुसरी गोष्ट होती, ती म्हणजे उजव्या अंगठ्याच्या टोकापाशी गोंदलेली छोटीशी क्रुसाची चिन्ह. हिंदू पुरुषाचे दोन्ही कान टोचलेले असतात, तसे गोव्यात कॅथोलिक स्त्री-पुरुषाचे अंगठे क्रूसाचे चिह्नाने गोंदलेले असतात .
मात्र गोव्यात पदवीधर होण्याआधीच धर्मगुरू होण्याचे, आजन्म अविवाहित राहून धर्मसेवा आणि समाजसेवा करण्याचं ध्येय मी सोडलं आणि पत्रकारितेच्या व्यवसायात आलो.
जेसुईट संन्याशी होण्याचं बाळगलेलं स्वप्न सोडणं तितकं सहज नव्हतं. याकाळात प्रचंड मानसिक तणावातून गेलो, मात्र वर्षभराच्या काळात सावरलो आणि एका नव्या व्रताचा - पत्रकारितेच्या आणि कामगार चळवळीच्या - स्वीकार केला.
आज मागे वळून पाहताना एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे झालेले हे स्थित्यंतर अगदी सहजगत्या पार पडले असं वाटते.
आजन्म अविवाहीत धर्मगुरु राहण्याचे उद्दिष्ट सोडून मी गृहस्थाश्रम स्वीकारायला होता तरी तसा एकदा घेतलेला वसा पूर्णतः टाकून दिलेला नव्हता. नव्या अवतारातसुद्धा मूळचा पिंड कायम राहिला होता असे आज मागे वळून पाहताना जाणवते.

Friday, December 6, 2024

 कुठल्याही प्रार्थनास्थळाच्या आवारात संबंधित देवदैवतांच्या तसबिरी आणि धर्मग्रंथांतील वचने असतात. काल या देवळाच्या प्रशस्त आवारात शिरलो अन डाव्या बाजूला या कोनशिलावजा फलकाकडे लक्ष गेले आणि मी चमकलो.

तो फलक पाहून मी चमकलो, याचेही मला नंतर आश्चर्य वाटले.
याचे कारण म्हणजे या मंदिराच्या स्थापनेपासुन म्हणजे गेली तीस वर्षे मी तिथे वेळोवेळी जात आलेलो आहे. दादाबाई असताना घरच्यांना भेटण्यासाठी येथे माझे कायम येणेजाणे असायचे.
रविवारच्या मिस्सेसाठी या परिसरातील लोकांच्या सोयीसाठी शहरातील हे दुसरे चर्च बांधण्यात आले आहे.
अलिकडच्या काळात जेथेजेथे मी गेलो तिथेतिथे हा फलक पाहून त्याभोवती फोटो काढण्याचा मला मोह झाला आहे. उदाहरणार्थ, पुण्यातील नव्या पेठेतील एस एम. जोशी स्मारकातील भारतातील राज्यघटनेच्या प्रास्तविकेचा हा फलक.
दर पंधरा ऑगस्टला चर्चमध्ये गायला जाणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतील ती प्रसिद्ध ओळसुद्धा या फलकावर कोरली आहे,
प्रागतिक विचारसरणीच्या संस्थांनी भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्तविकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करावा, लोकांमध्ये याबाबत जाणिव निर्माण करावी यात काही विशेष नाही.
त्यांच्या मूलभूत उद्दिष्ट्यांचा तो एक भाग असतो.
असेच कार्य करण्यासाठी लोयोला दिव्यवाणी चर्चच्या आवारात अगदी प्रवेशद्वारातच येशू ख्रिस्ताची प्रतिमा किंवा बायबलच्या वचनांऐवजी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत मांडलेल्या लोकशाही देशाच्या आदर्श तत्त्वांचा पुरस्कार करावा याचे मला सद्याच्या वातावरणात विशेष कौतुक वाटले.
गेल्या तीस वर्षांच्या काळात या अतिपरिचित फलकाच्या अस्तित्वाची मला कधी जाणिवही का झाली नाही याचेही मला लगेच उत्तरही मिळाले.
Where the mind is without fear
and the head held high;
Into that heaven of freedom,
my Father, let my country awake.
^^
Camil Parkhe, November 11, 2024
नारायण वामन टिळक

काल `साधना' च्या बुक स्टॉलमध्ये एक तास घालवला. एक पुस्तक घ्यायचे मनात होते, पण निर्णय होत नव्हता.

नवनवी पुस्तके घेऊन घरात पडून राहतात, हातातल्या कामांमुळे वाचून होत नाहीत. हा नेहेमीचा अनुभव. शेवटी ते पुस्तक विकत घेऊन बॅगेत टाकले आणि प्रस्तावनेचा बराचसा भाग मेट्रोच्या परतीच्या प्रवासात वाचून काढला.

हे पुस्तक आहे सुधीर रसाळ लिखित` वाड्मयीन संस्कृती'.

पुस्तकाच्या शीर्षकाशी तसे मला काही देणेघेणे नाही, पुस्तक मी निवडले ते त्यातील नव्वद पानांच्या एका दीर्घ लेखामुळे.

ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचा तर परिचय देण्याची गरज नाही. या पुस्तकातील ज्या दीर्घ लेखाने मला आकर्षित केले तो लेख नारायण वामन टिळक यांच्यावर आहे.

नारायन वामन टिळक हे मराठीतील पंचकवीमधले एक. लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतिचित्रां'तून आपण सर्वांना ते परिचित असतात,

पाठ्यपुस्तकांत असलेल्या `दया आणि शांती' `तू तर माझ्याही पुढे गेलीस!' अशा धड्यांतून आणि `केवढे हे क्रौर्य', `वनवासी फुल' अशा कवितांमुळे त्यांचे नाव खास लक्षात राहते.

`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या माझ्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांत टिळकांचे अल्पचरित्र आहे.

पण याहून अधिक नारायण वामन टिळकांचे खूप काही भरीव योगदान आहे.

ख्रिस्ती धर्म. मराठी भाषा, भारतीय परंपरा आणि संस्कृती, इथल्या मातीतल्या संतांचे लिखाण या संदर्भात ना. वा. टिळकांनी भारतीय आणि विशेषतः मराठी ख्रिश्चनांना खूप काही दिले आहे.

टिळकांचे निधन झाले मुंबईत, ते ख्रिस्ती होते तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचे दफन न होता मुंबईतच दहन झाले,

त्यांच्या अवशेषांना नंतर अहमदनगर इथल्या कबरस्थानात ठेवून तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली आहे.

`तुकानिर्मित सेतूवरुनी /
मीही आलो ख्रिस्ताचरणी //

अशी टिळकांची एक ओळ प्रसिद्ध आहे,

यावरून त्यांची वाटचाल आणि मराठी ख्रिस्ती समाजात रुढ केलेल्या अनेक परंपरांची कल्पना येऊ शकेल.

टिळकांची अनेक गायने आजही महाराष्ट्रातील चर्चेसमध्ये किबोर्ड, पेटी आणि तबल्याच्या सुरांत गायली जातात.

येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म पाश्चात्य नाही, पौर्वात्य आहे, हे टिळकांनी ठासून मांडले.

आम्ही ख्रिस्ती झालो म्हणजे या मातीत आणि देशात उपरे होत नाही हा त्यांचा सिद्धांत आजही मांडला जातो.

सुधीर रसाळ यांनी नारायण वामन टिळकांचा हा राष्ट्रवाद अन या मातीशी नाळ सांगणारा ख्रिस्ती धर्म आणि परंपरा याबाबत या दीर्घ लेखात विस्तृतपणे लिहिले आहे, ते हा लेख चाळताना लक्षात आले.

हा लेख मी अजून वाचलाही नाही.

मात्र आज सकाळीच लक्षात आले ६ डिसेंबर नारायण वामन टिळकांची जयंती. त्यामुळे या महान व्यक्तीविषयी काही शब्द लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.

नारायन वामन टिळकांना अभिवादन !