Saturday, September 24, 2022

 जगभर, भारतात  गाजलेली लग्ने 

 

गोव्यात कॉलेजात असताना आणि नवहिंद टाइम्स मध्ये बातमीदार असताना लंडनमध्ये साखरपुडा होऊन तिथेच झालेले प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेंसर यांचे लग्न तेव्हा जगभर गाजले. जगभरच्या नियतकालिकांत या `फेरी टेल' म्हणून गणल्या जाणाऱ्या लग्नाविषयी कितीतरी दिवस रकानेच्या रकाने लिहिले जात होते. `विसाव्या शतकाचे मोठे लग्न' असे वर्णन त्यावेळी केले गेले होते.

पुण्यात इंडियन एक्सप्रेसच्या कॅंपातल्या ऑफिसात होतो तेव्हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विजयसिंह मोहिते पाटील आमच्याशी गप्पा करायला आले होते. ते गेल्यानंतर मग मी माझ्या सहकाऱ्यांना या मंत्रीमहोदयांच्या लग्नाची गोष्ट सांगितली तेव्हा सगळे जण थक्क झाले होते. 
 
अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटलांचे सत्तरच्या दशकातले लग्न महाराष्ट्रभर गाजले होते ते त्यांचे वडील सहकारनेते शंकरराव मोहिते पाटील यांच्यामुळे. या लग्नासाठी वरपित्यांनी गावोगावच्या लोकांना आमंत्रण दिले होते. असं म्हणतात कि या लग्नाच्या आवतणासाठी घरटी आमंत्रण देण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या बोर्डालाच कुंकू-तांदळाचा टिळा लावण्यात आला होता. आणि ही मंडळी खरंच लग्नाला आली पण.वऱ्हाडासाठी पाण्यासाठी विहिरींत बर्फाच्या लाद्या सोडण्यात आल्या होत्या, अशा अनेक दंतकथा आहेत. 
 
 
बहात्तरच्या दुष्काळात असे लग्न झाले याची तक्रार दिल्लीत खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींकडे करण्यात आली होती. ``मी तर या सगळ्या गावातील लोकांच्या बारशाला, लग्नांना, मयतीला गेलेलो आहे, मग त्यांना घराच्या लग्नाचे आमंत्रण द्यावे लागणार ना?'' असे त्यांनीं इंदिराबाईंना आपल्या हिंदी भाषेत उत्तर दिले होते. 
 
महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांनी या लग्नावर सडकून टीका करताना अग्रलेखात शंकरराव मोहिते पाटलांना 'लक्षभोजने' ही उपाधी लावली ती या नेत्याला कायमची चिकटली. 
 
सुप्रिया पवार आणि सदानंद सुळे यांचे बारामतीतले १९९१ सालचे लग्न गाजले ते वेगळ्या अर्थाने. 
 
वधुपिता होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार आणि वऱ्हाड मंडळींत पंतप्रधान चंद्रशेखर, माजी पंतप्रधान राजीव गांधी, जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला वगैरेंचा समावेश होता. 
 
 
मोस्ट सुटेबाल बॉय वा मोस्ट सुटेबल गर्ल त्यांची लग्ने गाजणारच. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितिजावर असे अनेक तारे आता अवतरले आहेत 
 
सत्तरच्या दशकात आजच्या सारखी समाजमाध्यमे नव्हती तरी राजेश खन्ना आणि `बॉबी’ डिंपल कपाडिया यांचे लग्न अनेकांच्या पचनी पडले नव्हते. त्याच्या बरेच वर्षे आधी `मदर इंडिया'त सुनिल दत्तच्या आईची भूमिका केल्यानंतर नर्गिसने सुनील दत्तशी लग्न केल्यावर अशाच काही कोलाहल झाला होता असे म्हणतात 
 
महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या घरातल्या लग्नाची चर्चा मागच्या आठवड्यात वृत्त वाहिनींवर झाली. काय ते लग्न आणि काय ते एकेकाचे आहेऱ .. 
 
कालपरवा विश्वसुंदरी सुश्मिता सेन आणि `आयपीएल' जनक ललित मोदी यांचे एकत्रित फोटो झळकल्यावर अशीच नवी चर्चा झाली.  

Camil Parkhe

Wednesday, September 21, 2022

 फसलेली, अल्पकालीन ठरलेली, मोडून काढलेली राजकीय बंडाळी

गेल्या सहा दशकांच्या काळात महाराष्ट्राने अनेक यशस्वी, फसलेली, अल्पकालीन ठरलेली, मोडून काढलेली, केवळ मनात असलेली राजकीय बंडाळी अनुभवली आहे. महाराष्ट्रात किंबहुना त्याकाळात सगळ्या देशात गाजलेले एक मोठे बंड म्हणजे शरद पवार यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना घालवून जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने १९७८ साली सत्ता हस्तगत केली तेव्हाचे. 
 
तेव्हापासून भारतीय राजकारणात शरद पवार हेच केवळ एकमेव विश्वासघातकी, बेभरवशाचे, पाठीत खंजीर खुपसणारे आणि बाकीच्यांनी सत्तेसाठी अनेकदा पक्ष, आघाडी बदलली, पुनरागमन केले ते मात्र अगदी साधू, संत असे चित्र निर्माण केले आहे हे खूप हास्यापद आहे. आपल्याच नेत्यांविरुद्ध, पक्षांविरुद्व बंड करुन, पारंपारिक विरोधकांशी हातमिळवणी करुन सत्तेवर येणाऱ्या राजकीय नेत्यांची देशात भलीमोठी यादीच आहे.
 
आपल्या संसदीय लोकशाहीत पक्षाविरुद्ध किंवा नेत्यांविरुद्ध बंडाळीचा गौरवशाली इतिहास तसा फार जुना आहे. पक्षातील बुजुर्ग नेत्यांनी 'गुंगी गुडिया' म्हणून पंतप्रधानपदावर प्रतिष्ठापना केल्यावर लगेचच इंदिरा गांधींनी या नेत्यांविरुद्ध बंडाळी केली होती. 
 
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करुन खुद्द पंतप्रधान गांधी यांनी आपला स्वतःचा उमेदवार वराहगिरी वेंकट गिरी यांना १९६९ साली राष्ट्रपतिपदी निवडून आणले होते. यापेक्षा यशस्वी बंडाळीचे दुसरे कुठले मोठे उदाहरण देता येईल?
 
शरद पवार यांच्याआधीच महाराष्ट्रातील काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणीबाणीनंतर इंदिरा गांधींविरुद्ध बंड करून, आपलाच पक्ष खरा असा दावा करून त्यांना पक्षातूनच बाहेर काढले होते हे अनेकांना माहितही नसेल. यापैकी काहींनी स्वतःचा पक्ष काढला होता. इंदिराजींना काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या या नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील वगैरे होते. 
 
आणिबाणीच्या काळात इंदिराजींनी ज्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले त्या शंकरराव चव्हाण यांनी तर इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर खासदार बाळासाहेब विखे यांच्याबरोबर महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस हा पक्षच काढला होता. 
 
इंदिराबाई लोकसभेच्या अधिक जागा मिळवून सत्तेवर परतल्याबरोबर शरद पवार वगळता ही सर्व नेतेमंडळी काँग्रेसमध्ये पुन्हा दाखल झाली होती. महाराष्ट्राप्रमाणेच देशभर सगळीकडेच असेच चित्र होते. 
 
या बंडांचा इतिहास पाहता सत्तेतल्या प्रथम क्रमांकाच्या जागेवर नजर असलेल्या, सत्तेत दुसऱ्या स्थानांवर असलेल्या व्यक्तींकडून किंवा आपल्याला सत्तेतून डावलले जात असल्याची भावना असलेल्या व्यक्तींकडून अशी बंडाळी होत असते असे दिसते. अनेकदा ही बंडाळी सत्ताप्रमुख असलेल्या नेत्यांच्या सर्वाधिक जवळच्या आणि विश्वासू व्यक्तींकडूनच होते हे आणखी एक विशेष. 
 
पंतप्रधान मोरारजी देसाईंची जागा घेणारे चौधरी चरणसिंग, पंतप्रधान राजीव गांधींचे जवळचे नेते विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर अशी देशपातळीवर काही उदाहरणे देता येतील. 
 
राज्यात छोटेमोठे बंड करणारे, कुठल्याशा नावाने पक्ष किंवा विचारमंच काढणाऱ्यांची संख्या भरपूर आहेत. पंतप्रधान राजीव गांधींच्या नजरेतून उतरल्यावर बाळासाहेब विखे यांनी पक्षांतर्गत असाच मंच काढला होता, गोविंदराव आदिक यांनीही असाच प्रयत्न केला होता. आपले उपद्रवमुल्य पक्षश्रेष्ठींच्या नजरेत आणून देण्याचा माफक हेतू यामागे असायचा. 
 
महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील हे कायम राजकीय युद्धाच्या किंवा बंडाळीच्या पावित्र्यात असत. आणिबाणीनंतर काँग्रेसच्या पराभवानंतर वसंतदादा यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा अर्स काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांच्या युतीचे सरकार चालवले आणि त्यानंतर शरद पवार यांनी. 
 
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात शरद पवार काँग्रेसमध्ये परतल्यावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले, तेव्हा पायउतार झालेल्या वसंतदादांनी आपला बंडाचा झेंडा कायम ठेवला. त्यांना राज्याबाहेर ठेवण्याच्या हेतूने राजीव गांधींनी त्यांची राजस्थानला राज्यपालपदी नेमणूक केली तर तिथल्या राजभवनातून मुख्यमंत्री पवार यांना आणि राजीव गांधींना त्रास देण्याचे काम वसंतदादांनी चालूच ठेवले. मात्र त्यातूनही पुरते समाधान होईना तेव्हा राज्यपालपदाचा चक्क राजीनामा देऊन ते महाराष्ट्रात परतले होते ! 
 
काँग्रेस काळात मुख्यमंत्री शरद पवार यांच्याविरुद्ध बंडाळी करुन त्यांचे सहकारी असलेले रामराव आदिक, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख हे दिल्लीत हाय कमांडला भेटायला गेले होते, मात्र या सर्वांना लगेचच उपरती झाली आणि हे बंड शमले. 
 
राज्यात अनेक वर्षे मंत्री असलेले विलासराव देशमुख हे आपल्या लातूर मतदारसंघात १९९५ साली निवडणूक हरले आणि त्यानंतर त्यांनी त्याकाळात सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर विधान परिषदेवर येण्याचा प्रयत्न केला, ही निवडणुकसुद्धा ते हरले. 
 
पुढच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यावर हेच विलासराव देशमुख काँग्रेसचे मुख्यमंत्री एकदा नव्हे दोनदा बनले. राजकारणात अशा अविश्वनसनीय अनेक घटना होतात. 
 
छगन भुजबळ हे शिवसेनेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध बंडाळी करणारे पहिले मोठे नेते. या बंडानंतर शिवसैनिकांचा उद्रेक टाळण्यासाठी त्यांना अनेक दिवस भूमिगत राहावे लागले होते, नंतरच्या विधानसभा निवडणुकीत तरुण शिवसेना नेते बाळासाहेब नांदगावकर यांनी त्यांचा माझगावमध्ये पराभव केला होता, आणि भुजबळ यांना नाशिक जिल्ह्यात सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला होता. 
 
शिवसेनेविरुद्व गद्दारी करणाऱ्या भुजबळ यांना निवडणुकीत पराभूत करणारे नांदगावकर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत.
 
भुजबळ यांच्या तुलनेत नारायण राणे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला नाही, कारण राणे आपल्या कोकण बालेकिल्ल्यात राजकीयदृष्ट्या सुरक्षित होते. त्यांच्याबरोबरच्या निम्हण वगैरे नऊ आमदारांनी टप्प्याटप्प्याने राजीनामे देत नंतर काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून आले. 
 
भारतीय जनता पक्षाने राणेंचा आणि काँग्रेसचा हाच फॉर्मुला आपल्या `ऑपरेशन लोटस' साठी गोवा, कर्नाटक वगैरे राज्यांत वापरला आहे. 
 
भारतीय वायुदलाचे माजी पायलट असलेले सुरेश कलमाडी एकेकाळी शरद पवार यांचा `खास माणूस' म्हणून ओळखले जायचे. पवारांनी कलमाडी यांना दोनदा राज्यसभेत पाठवले, पवार महाराष्ट्रात आणि कलमाडी दिल्लीत असा त्यावेळी व्यवहार असायचा ( नंतर प्रफुल्ल पटेल यांनी ती जागा सांभाळली.) नव्वदच्या दशकाच्या अखेरीस पवार आणि कलमाडी यांचे बिनसले आणि कलमाडी यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध अघोषित बंड पुकारले. 
 
पवार यांनी १९९९ साली काँग्रेस सोडली तेव्हा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जाणार नाही याची कलमाडी यांनी पुरेपूर काळजी घेतली. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर पुणे शहराचे `कारभारी' म्हणून सुरेश कलमाडी यांनी जागा घेतली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्यास कलमाडी यांच्यामुळे अंमळ उशीरच लागला. 
 
केंद्रातल्या २०१४च्या सत्तांतराआधी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अनेक महिने आतल्या आत धुमसत होते. प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनानंतर पक्षातल्या काही नेत्यांनी त्यांची कोंडी केली, त्यांना अडगळीत टाकले आहे अशी त्यांची भावना झाली होती. याबद्दल अधूनमधून प्रसारमाध्यमांतून त्यांची वक्तव्ये यायची. बंड करुन पक्ष सोडण्याचाही त्यांनीं विचार केला होता, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना या निर्णयापासून परावृत्त केले ते म्हणतात. 
 
पक्षातल्या आपल्या जवळच्या साथीदारांकडूनच आपल्याला दगाफटका होऊ शकतो हे चाणाक्षपणे ओळखून अशा संभाव्य सगळ्या प्रतिस्पर्ध्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे एकापाठोपाठ काटा काढला. 
 
`ओबीसींचे मुख्यमंत्री' असा शब्द उच्चारणारे एकनाथ खडसे यात सर्वप्रथम होते, `पहिली महिला मुख्यमंत्री' असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे, 'मराठा मुख्यमंत्री'चे दावेदार विनोद तावडे यांची वर्णी नंतर लागली आणि बाकीचे मग सुतासारखे सरळ झाले. 
 
फडणवीस यांना या घडीला पक्षांतर्गत एकही स्पर्धक नाही यातच सर्व काही आले. 
 
अडीच वर्षांपूर्वीचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि आपले काका शरद पवार यांच्याविरुद्धचे फसलेल्या किंवा वेळीच आवरते घेतलेल्या बंडाचे गौडबंगाल राजकीय विश्लेषकांना आजही समजले नाही. या रात्रीच्या आणि पहाटेच्या खेळातले मुख्य खेळाडू अजित पवार, देवेन्द्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेच भविष्यकाळात, या बंडातील खेळी कुणाची आणि काय होती यावर प्रकाश टाकू शकतील. मात्र असे होणे असंभव दिसते. 
 
भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत किंवा सरकारविरोधी बोलण्याची हिम्मत एक सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याशिवाय इतर कुणीही करु शकत नाही. अशी हिम्मत तेव्हाचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी दाखवली आणि पक्षाचा अन पदाचा राजिनामा देऊन ते काँग्रेसमध्ये आले. आपली बंडाची खुमखुमी कायम आहे हे पटोले अधूनमधून दाखवत असतात. 
 
भाजपने गेल्या काही वर्षांत एकामागून एक अशा अनेक राज्यांत आपले सरकार स्थापन करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र यापैकी एकही राज्यांत मुख्यमंत्र्यांविरुद्ध कधी कुरबुर ऐकू येत नाही. उलटपक्षी हा पक्षच आपणहून कसलीही पूर्वसूचना न देता या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी करत असतो. 
 
काँग्रेसच्या काळात काय घडायचे हे आठवून पहा. त्याकाळात काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पक्ष निरीक्षक या नावाची एक फौज कायमस्वरूपी तैनात असायची. कुठ्ल्या न कुठल्या राज्यांत मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रारी असायच्या आणि जी के मूपनार, वायलर रवी, आर एल भाटिया वगैरे पक्षाचे सरचिटणीस ही आग बुझवायला तातडीने रवाना होत. 
 
अनेकदा हे पक्षांतर्गत बंडखोर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पोसलेले असायचे, राज्यातले मुख्यमंत्री स्वयंभू होऊ नये म्हणून ! हल्ली भाजपच्या राजवटीमध्ये कुठल्याही राज्यांत असे स्वयंभू, मनसबदार मुळी नसतातच. 
 
यशस्वी बंद करण्यात, योग्य वेळी बंडाची तलवार म्यान करण्याचे भान असलेला आणि आपल्याविरुद्धचे बंड मोडून काढण्याचा अनुभव शरद पवार यांच्यासारखा इतर कुणालाही नाही. 
 
सत्तरच्या दशकात पहिले यशस्वी बंड करुन सत्तेवर आल्यावर १९९९ साली पवारांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बंड करून दुसऱ्यांदा नवीन पक्ष काढला. मात्र केवळ सहा महिन्यात काँग्रेस आणि सोनिया यांच्याशी हातमिळवणी करुन त्यांनी आपला सवतासुभा कायम ठेवला तो आजतागायत. लालू प्रसाद यादव यांच्यानंतर काँग्रेसशी एकनिष्ठ राहणारे देशातले ते दुसरे मोठे राजकारणी नेते. 
 
यावेळच्या महाविकास आघाडी सरकारविरुध्द्च्या ताज्या बंडातसुद्धा शरद पवार आपले राजकीय कौशल्य आणि अनुभव कसा पणाला लावतात (किंवा लावत नाहीत), हे पाहावे लागेल.  
 
Camil Parkhe 

 शिरुभाऊ लिमये. समाजवादी चळवळीतीनेते


ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस पुण्याला आलो. गोव्यातल्या ` द नवहिंद टाइम्स' सारख्या म्हटलं तर राज्यपातळीच्या म्हटलं तर जिल्हा पातळीवरच्या इंग्रजी दैनिकात काम केले होते. `इंडियन एक्सप्रेस' या राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकात काम करू लागल्यावर विहिरीत आणि तलावात पोहण्यातला फरक ध्यानात आला. 
 
गोवा खूप छोटे आणि पुणे तर कायम राष्ट्र पातळीवरच्या बातम्या पुरवणाऱ्या घटनांची आणि लोकांची एक मोठी खाण होती.
 
कारण इथं सर्वच क्षेत्रांतील दिग्गज मंडळी होती. डॉ जयंत नारळीकर, डॉ गोविंद स्वरुप, नानासाहेब गोरे, मोहन धारिया, नरुभाऊ लिमये, शरद पवार, विठ्ठलराव गाडगीळ. जयंतराव टिळक. डॉ बाबा आढाव, पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, ज्योत्स्ना भोळे, विद्या बाळ, पु ल देशपांडे, डॉ जब्बार पटेल, डॉ मोहन आगाशे वगैरे. मी पुण्यात येण्याआधी काही महिन्यांपुर्वी एस. एम. जोशी यांचे निधन झाले होते. 
 
वर उल्लेख केलेल्या व्यक्तींपैकी दोनतीन अपवाद वगळता सर्वांची भेट घेऊन त्यांची मुलाखत घेण्याची किंवा त्यांचे कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मला लाभली. 
 
यामध्ये एका व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व मात्र का कुणास ठाऊक मला क्वचित प्रकाशझोतात येताना दिसले. `लो प्रोफाईल' म्हणता येईल असेच या व्यक्तीचे वर्णन करता येईल.
 
पुण्यातल्या या व्यक्तीची फाशीची सजा अगदी थोडक्यात चुकली. त्याशिवाय गोवा मुक्ती आंदोलनात नानासाहेब गोरे यांच्यासह त्यांना पोर्तुगाल राजवटीने बारा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. 
 
ती व्यक्ती होती शिरुभाऊ लिमये. 
 
प्रथमदर्शनी शिरुभाऊंचे व्यक्तिमत्त्व `लो प्रोफाईल' दर्शवणारे होते. पुण्यातील समाजवादी चळवळी ते एक प्रमुख नेते, मात्र दुसऱ्या फळीचे, ज्येष्ठतेत त्यांच्या आधी नेहेमी एस एम जोशी आणि नानासाहेब गोरे यांचा क्रमांक लागायचा. 
 
पृथ्वीतलावरील वातावरण दुसऱ्या महायुद्धाने तापले होते, त्यावेळची ही घटना. जगातील सर्वात प्रबळ सत्ता असलेल्या ब्रिटीश साम्राज्याच्या अस्तित्वालाच हिटलरच्या नाझी सैन्याने धोका निर्माण केला होता. ब्रिटीश स्वतः चे केवळ साम्राज्यच नव्हे तर इंग्लंडचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी निकराची झुंज देत होते. विशेष म्हणजे, याचवेळी भारतातील काही क्रांतिकारक देशातील ब्रिटीश सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत होते.
 
या सुरुंगाचाच एक भाग म्हणून १९४३ च्या २४ जानेवारीस पुण्यातील "कॅपिटॉल' चित्रपटगृहात बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यात काही ब्रिटीश व्यक्ती ठार झाल्या. क्रांतिकारकांनी घडवून आणलेल्या या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशात प्रचंड खळबळ उडवून टाकली. चौकशीची सूत्रे ताबडतोब फिरू लागली. चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती काही धागेदोरे लागले आणि यथावकाश या बॉम्ब कटात सामील झालेल्या सर्व आरोपींना अटकही झाली. 
 
या गाजलेल्या कटाचे प्रमुख आरोपी होते, समाजवादी नेते शिरुभाऊ लिमये.
 
'कॅपिटॉल बॉम्बकट प्रकरण' म्हणून पुढे प्रसिद्ध झालेल्या या कटातील आरोपींवरील आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे होते. 
 
या खटल्यातील आरोप शाबित झाल्यास आरोपींना फाशीची सजा अटळ होती. अटक झाल्यानंतर बॉम्ब कटातील आरोपी क्रमांक एक म्हणून हाताला, पायाला आणि कंबरेला साखळदंड बांधलेल्या अवस्थेत शिरुभाऊ लिमये येरवडा तुरुंगाच्या कोठडीत दिवस मोजत होते.
 
कॅपिटॉल बॉम्बस्फोट खटला ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, संपूर्ण देशातील स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाची घटना. स्वतंत्र देश म्हटला की, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज आलेच. त्याकाळी चित्रपटगृहात प्रत्येक चित्रपटाच्या अखेरीस 'गॉड सेव्ह द किंग' या ब्रिटीश राष्ट्रगीताची तबकडी लावण्यात येई. या ब्रिटीश राष्ट्रगीताऐवजी चित्रपटाच्या अखेरीस 'जनगणमन'ची तबकडी लावण्यात यावी अशा आशयाची भित्तीपत्रके राष्ट्रवादयांनी पुण्यातील सर्व चित्रपटगृहांच्या आवारात चिकटविली होती. 
 
पुण्यातील लष्करी कॅम्पमध्ये असणाऱ्या वेस्टएण्ड आणि कॅपिटॉल या चित्रपटगृहांत चित्रपट पाहण्यासाठी त्याकाळात अनेक ब्रिटीश लष्करी अधिकारी आणि शिपाई आपल्या कुटुंबियासमवेत जात असत. 'गॉड सेव्ह द किंग' हे ब्रिटीश राष्ट्रगीत सुरू झाले म्हणजे सर्व प्रेक्षकांना या राष्ट्रगीताच्या आदरास्तव उभे राहावे लागे. 
 
मात्र चित्रपटगृहात 'जनगणमन'ची तबकडी लावण्यास चित्रपटगृहांच्या मालकांनी स्पष्ट नकार दिला. शिरुभाऊंनी आणि पुण्यातील इतर राष्ट्रवादी मंडळींनी कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे निश्चित केले.
 
पूर्वनियोजित कटाप्रमाणे कॅपिटॉल चित्रपटगृहात दिनांक २६ जानेवारी १९४३ रोजी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे ठरले होते; पण याच दिवशी बॅरिस्टर आप्पा पंत (स्वातंत्र्योत्तर काळातील भारताचे प्रसिद्ध मुत्सद्दी राजदूत) याच चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यास येणार असे कळले आणि हा बॉम्बस्फोट दोन दिवस आधीच घडवून आणण्यात आला.
 
या बॉम्बस्फोटाने ब्रिटीश सत्तेला प्रचंड हादरा बसला. चौकशीची सुत्रे वेगाने फिरू लागली आणि या कटाचे खरेखुरे सुत्रधार कोण याचीही चौकशी अधिकाऱ्यांना लवकरच कल्पना आली. चित्रपटगृहात बापू साळवी याने बॉब ठेवला होता, तरी हा कट शिजविण्यामागे शिरूभाऊचा प्रमुख सहभाग होता हे गुपित नव्हतेच. 
 
वातावरण तापू लागले तसे 'महाराष्ट्र सोडून भूमिगत होऊन मद्रासला वा शांतिनिकेतनला जा.' असा सल्ला शिरुभाऊंना त्यांचे समाजवादी पक्षातील सहकारी अच्युतराव पटवर्धन यांनी दिला होता.
 
या बॉम्ब कटातील एक आरोपी भाल वायाळ यास अटक झाल्यानंतर त्याच्यावर दडपण आणून ब्रिटीश चौकशी अधिकाऱ्यांनी त्यास माफीचा साक्षीदार बनविले. वायाळ याची आई त्यावेळी पुण्याच्या फुले मंडईमध्ये भाजी विकायची. त्यावेळचे मंडईमधील वातावरण पूर्ण काँग्रेसमय होते. 
 
वायाळ माफीचा साक्षीदार बनला आणि शिरुभाऊ आणि कटाची सर्व माहिती पोलिसांच्या हाती पडून आरोपींना फाशीची अथवा जबर शिक्षा होणार अशी चिन्हे दिसू लागली. 
 
याचवेळी खुद्द वायाळच्याच आईने वायाळला शपथ घातली की, काहीही झाले तरी शिरुभाऊविरुद्ध न्यायालयात साक्ष देऊ नकोस.
 
या खटल्यातील आरोप सिद्ध झाला तर शिरुभाऊंना मृत्यूदंडाची शिक्षा होणार हे सर्वांनाच कळून चुकले होते.
 
याचवेळी एक अनपेक्षित घटना घडली. तुरुंगाच्या कोठडींची कौले शाकारण्याचे काम त्यावेळी चालू होते. 
शिरुभाऊंच्या कोठडीची कौले उतरली जात असतानाच छतावरून अचानकपणे कागदाचे एक भेंडाळे खाली पडले आणि शिरुभाऊंच्या काळजाचा एक ठोका चुकला. 
 
चिठ्ठी उघडून पाहतो तो काय? माफीचा साक्षीदार बनलेल्या वायाळतर्फे ही चिठ्ठी पाठविण्यात आली होती. माफीचा साक्षीदार बनून पोलिसांना या बॉव्मस्फोटामागील माहिती दिल्याबद्दल वायाळला पश्चाताप झाला होता. आणि सद्य परिस्थितीत या कटातील इतर आरोपींची निर्दोष सुटका करण्यासाठी काय करता येईल अशी विचारणा वायाळने या चिठ्ठीत केली होती.
 
हे प्रकरण कोर्टात नंतर अनेक दिवस चालले आणि अखेरीस शिरुभाऊंसह सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष म्हणून मुक्तता करण्यात आली. 
 
शिरूभाऊ अगदी फाशीच्या तख्तानजिक जाऊन फाशीच्या दोराची गाठ त्यांच्या मानेवर बसण्याआधीच तेथून सुखरूप परत आले आणि स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यासाठी पुन्हा मोकळे झाले.
 
स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्रात आघाडीवर असणाऱ्या नेत्यांमधील एस. एम. जोशी आणि शिरुभाऊ लिमये हे दोघे ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या मते 'अत्यंत खतरनाक ' व्यक्ती होत्या. त्यामुळे शक्य झाल्यास, या दोघांना कुठल्याही तुरुंगात एकत्रितरित्या ठेवायचे नाही हा अलिखित नियम नेहमीच पाळला जाई
 
"यामुळे एसेम आणि मी कुठल्याही तुरुंगात सहा महिन्यांच्यावर एकत्र राहिलो नाही, लवकरात लवकर आम्हांपैकी एकाला दुसऱ्या तुरुंगात हलविण्याचेच तुरुंग प्रशासनाचे सतत प्रयत्न असत." माझ्याशी बोलताना शिरूभाऊ म्हणाले .
पुण्यात स्वयंसेवक संघाचे नेते नियमितपणे शाखा भरवत, तरुण पिढींसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत. या शाखेतील शिस्त, संचलन आणि बौद्धीक वर्गाकडे तरुण पिढी आकर्षित होणे साहजिकच होते, 
 
" काकासाहेब गाडगीळ त्यावेळचे पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ काँग्रेसनेते; काकासाहेबांच्या घरी सतत कॉंग्रेसचे यज्ञकुंड पेटलेले आणि त्यांचा मुलगा मात्र धर्माचे राजकारण करणाऱ्या संघाच्या शाखेत जातो, ही गोष्ट मला पटली नाही आणि ही बाब मी काकासाहेबांच्या पत्नींकडे बोलून दाखविली, काकांसाहेबांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर छोट्या विठ्ठलाचे संघात जाणे बंद झाले." त्यावेळच्या घटनांना उजाळा देत शिरुभाऊ मला सांगत होते.
 
धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद तरुण पिढीच्या मनात बिंबविण्यासाठी आणि तरुणांना समाजबांधणीच्या विधायक कार्यासाठी जुंपण्यासाठी एखादी शिस्तबद्ध संघटना स्थापन करण्याची गरज त्यांना भासू लागली. आपले हे विचार त्यांनी चळवळीतील आपले सहकारी एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे यांच्याजवळ बोलून दाखविले. 
 
त्या दोघांनीही शिरुभाऊंची कल्पना ताबडतोब उचलून धरली आणि यातूनच नंतर राष्ट्र सेवा दल या संघटनेचा जन्म झाला,'' शिरुभाऊ सांगत होते. .
 
दुसरे म्हणजे सेवा दलासारखी अत्यंत शिस्तबद्ध संघटना काँग्रेसलाच खाऊन टाकील की काय, अशी भीती शंकरराव देव वगैरे नेत्यांना वाटत असे. 
 
शिस्तबद्ध आणि लढाऊ संघटनांचे अहिंसावाल्या काँग्रेसजनांना अगदी वावडे होते. त्यामुळे राष्ट्र सेवा दलाच्या कुठल्याही कार्यक्रमात दलाच्या कार्यकर्त्यांना कडक लष्करी बाण्यानं 'सावधान!' असा आदेश दिला तरी काँग्रेसनेते दचकत आणि जरा हळू आवाजात म्हणा' असे सांगत असत,'' असे शिरुभाऊ सांगतात.
 
'पुण्यात नुकत्याच (१९९३) पार पडलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने जुन्या पिढीतील माझ्यासारख्या व्यक्तींच्या तरुण लोकांबद्दलच्या आशा-आकांक्षा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. " असे शिरुभाऊ म्हणतात.
 
ब्रिटीशांनी १९४७ साली भारतातील सत्तेचा त्याग केला; पण त्यानंतरही कित्येक वर्षे भारतीय स्वातंत्र्य अपूर्णच राहिले होते. गोवा, दमण आणि दीव हे चिमुकले प्रांत १९४७ सालानंतरही पोर्तुगीजांच्याच अंमलाखाली होते. 
 
पुण्यामध्ये गोवा मुक्ती सहाय्यक समिती स्थापन करण्यात आली. केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या समितीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा म्हणजे नानासाहेब गोरे, जयंतराव टिळक, र. के. खाडीलकर, रामभाऊ म्हाळगी आणि महादेवशास्त्री जोशी यांचा समावेश होता. 
 
गोवा मुक्तीची मागणी करण्यासाठी भारताच्या काना-कोपऱ्यांतील सत्याग्रहींच्या तुकड्या गोव्यात पाठवून गोवा मुक्तीची मागणी करण्याचे समितीने ठरविले होते.
 
सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीने नानासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली गोवा हद्दीत प्रवेश केला. तुकडीचे नेते म्हणून नानासाहेबांना अटक झाली व इतर सत्याग्रहींना भरपूर मारपीट करून पोर्तगीज सैनिकांनी नंतर भारताच्या सीमेवर आणून सोडून दिले. 
 
यानंतर ताबडतोब शिरुभाऊंच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींच्या दुसऱ्या तुकडीने गोव्याच्या दिशेने कूच केले. सेनापती बापटदेखील या तुकडीत सामील झाले होते. १५ ऑगस्ट १९५५ रोजी हजारो सत्याग्रहींच्या मोठ्या संख्येने गोव्याच्या हद्दीत शिरून तेथे सत्याग्रह करण्याचा निर्णय गोवा मुक्ती सहाय्यक समितीने घेतला होता. 
 
सत्याग्रहींनी गोव्यात प्रवेश केल्यानंतर पोर्तुगीजांच्या गोळीबारांत शेकडो लोक प्राणमुखी पडतील म्हणून त्यावेळचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजीभाई देसाई यांनी भारतीयांनी गोवा हद्दीत प्रवेश करण्यावर बंदी घातली.
सत्याग्रहींना बेळगाव वा गोवा हद्दीवर पोहोचता येऊ नये म्हणून ट्रक वगैरे वाहनांनी प्रवासी नेण्यासही परवानगी नाकारण्यात आली. तरीही शेकडो सत्याग्रही बेळगावला पोहोचलेच. 
 
यानंतर जे काही घडले तो इतिहासच आहे. 
 
गोव्याच्या हद्दीवर म्हणजे पत्रादेवी, सुर्ला, तेरेखोल आणि दोडामार्ग वगैरे ठिकाणी पोर्तुगीजांनी केलेल्या बेछूट गोळीबारात वीस सत्याग्रही जागीच ठार झाले, तर नऊ जखमींचे नंतर निधन झाले. अनेक सत्याग्रही या गोळीबारात जबर जखमी झाले होते. 
 
सरहद्दीवर हा सत्याग्रह चालू होता, त्यावेळी शिरुभाऊ आणि सत्याग्रहींच्या आधीच्या तुकडीचे नेते गोव्याच्या तुरुंगात होते.
 
शिरुभाऊ आणि सत्याग्रहींच्या इतर नेत्यांविरुद्ध पोर्तुगीज लष्करी न्यायालयात खटला चालविण्यात आला व त्या सर्वांना बारा वर्षांची तुरुंगवासाची सजा फर्माविण्यात आली. 
 
शिरुभाऊ आणि नानासाहेब गोरे यांच्या व्यतिरिक्त या नेत्यांमध्ये मधु लिमये, जगन्नाथराव जोशी, भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून नंतरच्या काळात निवडणूक लढविणारे त्रिदीपकुमार चौधरी वगैरेंचा समावेश होता.
 
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील उंच टेकडीवरील असलेल्या आग्वाद किल्ल्यातील तुरुंगात शिरुभाऊ आणि इतर नेत्यांना ठेवण्यात आले होते. 
 
बारा वर्षांच्या तुरुंगवासाची सजा झालेल्या या सर्व कैदयांना एके दिवशी पणजी शहरातील आल्तिनो येथील तुरुंगात नेण्यात आले. नेहमीच्या त्यांच्या कैद्याच्या पोशाखाऐवजी यावेळी त्यांना स्वतःचे पोशाख घालावयास दिले होते. शिरुभाऊंसह नानासाहेब गोरे, मधु लिमये, त्रिदीबकुमार चौधरी व इतर कैदी यावेळी फार काळानंतर प्रथमत:च एकमेकांना अशा मोकळ्या वातावरणात भेटत होते, परस्परांशी चर्चा करत होते. 
 
विशेष म्हणजे अधिक अनौपचारीकता निर्माण करण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांनी या भेटीच्या वेळी चहा, बिस्कीटे आणि इतर फराळाचीही व्यवस्था केली होती.
 
शिरुभाऊ आणि इतर कैदी असे आपसात चर्चा आणि हास्यविनोद करत असताना वृत्तपत्रांचे काही छायाचित्रकार या सर्वांची छायाचित्रे टिपत होते. " हा सर्व प्रकार आहे तरी काय? असे शिरुभाऊंनी मधु लिमये यांना विचारलेसुद्धा. तुरुंगातून आपणा सर्वांची सुटका करण्याचा आदेश आला आहे की काय, अशी शंकाही या कैद्यांच्या मनात येऊन गेली होती.
 
काही काळानंतर या सर्व कैद्यांची त्यांच्या तुरुंगाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली, त्या प्रत्येकांना पुन्हा त्यांचे कैद्याचे पोशाख वापरण्यास देण्यात आले आणि तेव्हा कुठे आजच्या या अनपेक्षित 'पाहुणचारा 'मागे पोर्तुगीज प्रशासनाची कुठलीतरी चालबाजी असावी याची कल्पना या सर्व कैद्यांना आली. 
 
या प्रकारानंतर काही दिवसांतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध वृत्तपत्रांमध्ये शिरुभाऊ वगैरे कैद्यांची पोर्तुगीज तुरुंगात कशाप्रकारे छान बडदास्त ठेवण्यात येते, यासंबंधीचे वृत्त छायाचित्रांसह प्रसिद्ध झाले!
स्थानिक लोकांच्या उठावाबाबत पोर्तुगीज राजवट शेजारच्या ब्रिटिश राजवटीपेक्षा अधिक क्रूर गणली गेली होती. मात्र तुरुंगात काही काळ गेल्यानंतर कळाले कि हुकूमशाह सालाझारच्या राज्यघटनेत फाशीची मुळी तरतूदच नव्हती, आणि हे ऐकून दिलासा वाटला असं शिरुभाऊंनी मला सांगितले ते आजही आठवते. 
 
याउलट ब्रिटिश हिसेंत दोषी ठरलेल्या क्रांतीकारकांना सरळसरळ फाशी देत असत. 
 
इंटरनॅशनल अम्नेस्टीच्या आदेशाप्रमाणे पोर्तुगीज सरकारने अनेक राजकीय कैद्यांची सुटका केली, त्यांच्यामध्ये शिरुभाऊ व त्यांच्यासह असणारे इतर नेते यांचाही समावेश होता. तुरुंगवासाची शिक्षा अडीच वर्षे भोगल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.
 
गोवा मुक्ती आंदोलनासाठी खस्ता खाल्लेल्या शिरुभाऊ लिमयेंसारख्या शेकडो स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न १९६१च्या डिसेंबर महिन्यात अनपेक्षितरित्या साकार झाले. 
 
साता समुद्रापलिकडील आपल्या वसाहतीवरील हक्क सोडावयास पोर्तुगीज सत्ताधीश ॲंतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझार तयार नाही आणि अहिंसात्मक मार्गामुळे गोमंतकीय आणि इतर भारतीय सत्याग्रहींना नाहक आपले प्राण गमवावे लागतात, ही बाब पंतप्रधान नेहरुनाही पुरते कळून चुकली होती. त्यामुळे भारतीय सेनेस गोवा मुक्तीसाठी गोवा, दमण आणि दीवच्या सरहद्दीच्या दिशेने कूच करण्यास त्यांनी आदेश दिले.
 
भारतीय सेनेने हाती घेतलेल्या 'ऑपरेशन विजय' या कारवाईस जवळजवळ कुठेच प्रतिकार झाला नाही आणि १९ डिसेंबर रोजी जवळजवळ साडेचारशे वर्षे गोव्यात गौरवाने फडकणारा पोर्तुगीज झेंडा पणजी इथल्या सोळाव्या शतकाच्या आदिलशाह पॅलेसवरुन उतरवून तिथे भारतीय तिरंगा फडकावण्यात आला 
 
त्या दिवशी भारतीय स्वातंत्र्यातील अपूर्णता दूर करण्यात आली होती.
 
##
 
(`उत्तुंग' व्यक्तिचित्रसंग्रह - लेखक कामिल पारखे ( प्रकाशक संजय सोनवणी, १९९३) मधील एक प्रकरण )
 
Camil Parkhe

Thursday, September 15, 2022

 इंग्लंडच्या राणी साहिबा एलिझाबेथ द्वितीय.

 जगातल्या तीन पदांवरील व्यक्तींविषयी गेली काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर कायम औत्सुक्य राहिलं आहे. ही तीन पदे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, रोमस्थित पोप आणि इंग्लंडच्या राणी साहिबा एलिझाबेथ द्वितीय.

आता एलिझाबेथ राणी काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे आणि प्रिन्स चार्ल्स राजे झाल्यानंतर या पदाविषयी भविष्यकाळात असं औत्सुक्य राहील काय याविषयी शंका आहे. 
 
पोप जॉन पॉल दुसरे यांच्या सत्तावीस वर्षांच्या पेपसीच्या काळानंतर आणि पोप बेनेडिक्ट आल्यानंतर या पदाचे वलय कमी झाले होते. पोप जॉन पॉल यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत आपली मोठी छाप उमटवली होती. जगभर अनेक राष्ट्रांना आणि राष्ट्रप्रमुखांना भेटी देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 
 
भारताच्या दोन दौऱ्यांत पोप जॉन पॉल पंतप्रधान राजीव गांधी आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भेटले होते. त्यांचा मायदेश पोलंड आणि इतर देशांतील कम्युनिस्ट राजवट संपवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या धक्कादायक निवृत्तीनंतर त्यांची जागा घेणाऱ्या पोप फ्रान्सिस यांनी या पदाला पुन्हा गत वलय मिळवून दिलं आहे. राजे चार्ल्स इंग्लंडच्या राजेपदाबाबत असं काही करतील का हे आता पाहावं लागेल. 
 
जगभर आपल्या पदाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवण्याचं कर्तुत्व फार मोजक्या व्यक्तींचं असतं. एके काळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर हे याबाबतीत प्रसिद्ध होते. यामुळेच पद सोडल्यानंतर सुद्धा जगभर त्यांची व्याख्यानं होत असत. त्यांच्या पुस्तकांना मागणी असते. नव्वदी पार केलेल्या किसिंजर यांनी अलीकडेच एक नवं पुस्तक लिहिलं आहे. 
 
पंतप्रधान पंडित नेहरु आणि त्यांच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पण जगभर नाव कमावलं होतं आणि बांगलादेश निर्मितीनंतर इंदिराबाईंनी जगभर आपला वचकसुद्धा निर्माण केला होता.
इंग्लंडचा राजा अथवा राणी इंग्लंडबरोबरच ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतर काही स्वतंत्र, सार्वभौम देशांचा राजा/ राणी किंवा राष्ट्रप्रमुख असतो. 
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेत अमेरिका आणि इंग्लंडच्या राज्यघटनांच्या काही चांगल्या तरतुदींचा समावेश केला आहे. मात्र इंग्लंडच्या राणीला इंग्लंडच्या इतर पूर्वीच्या वसाहती राष्ट्रांप्रमाणे भारताच्या राष्ट्रप्रमुख म्हणून कायम ठेवले नाही. कॉमनवेल्थ परिषदेचा एक सदस्य म्हणून राणीला या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणून स्वीकारले, बस इतकेच. 
 
पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सत्तेवर पुनरागमन झाल्यानंतर भारतात कॉमनवेल्थ राष्ट्र प्रमुखांची परिषद झाली. इंग्लंडची राणी या परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष. त्यावेळी प्रिन्स फिलिप यांच्यासह त्या नवी दिल्लीत आल्या होत्या. महाराष्ट्र टाइम्सने श्रीपाद ब्रह्मे यांच्या लेखाबरोबर आज हा फोटो वापरला आहे. 
 
या कॉमनवेल्थ परिषदेचे राष्ट्र प्रमुख नंतर गोव्यात चार दिवसांसाठी आले. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर अर्थात होत्याच. या ऐतिहासिक परिषदेचे वार्तांकन मी `द नवहिंद टाइम्स'साठी केलं. राणीसाहेब आणि प्रिन्स फिलिप मात्र दिल्लीहून लंडनला परतले होते. या दोघांविषयी वार्तांकन करण्याची माझी संधी हुकली.
 
प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना स्पेंसर यांच्या जगभर गाजलेल्या शाही विवाहाचे आमच्या पणजी इथल्या `द नवहिंद टाइम्स' इंग्रजी दैनिकाने कसे केले, या लग्नाचा फोटो आम्ही त्याकाळात दुसऱ्याच दिवशी कसा वापरला याविषयी मी इथं लिहिलं आहेच. त्याकाळात दुसऱ्या शहरांतल्या, देशांतल्या घटनांचे फोटो चारपाच दिवसांनंतर मिळायचे.
राणी साहिबा आपल्या हयातीतच अगदी पदग्रहण केल्यापासून एक दंतकथा बनल्या होत्या. तसं पाहिलं तर हे इंग्लंडची राणी किंवा राजा हे पद अगदी विचित्र आहे. घटनात्मक आहेच शिवाय वंश परंपरेनुसार. शिवाय राजा आणि राणी हे इंग्लंडच्या चर्चचे प्रमुख म्हणजे पोपच. आहे की नाही गंमत ?
 
धर्मप्रमुख म्हणून इंग्लंडच्या आर्च बिशप ची नेमणूक राणी किंवा राजा करतो, जसं पोप बिशप आणि कार्डिनल यांची नेमणूक करतात तसे. इंग्लंड हे धर्माधिष्ठित राष्ट्र आहे. चर्च ऑफ इंग्लंड हा इंग्लंडचा राजधर्म आहे, त्या अर्थाने इंग्लंड हे सेक्युलर राष्ट्र नाही हे अनेकांना माहितीही नसते. 
 
ख्रिस्ती धर्मात चर्च ऑफ इंग्लंड किंवा अँग्लिकन चर्च हा नवा पंथ निर्माण झाला तो इंग्लंडच्या राजामुळेच. राजा आठव्या हेनरीच्या घटस्फोटाला पोप क्लेमेंट सातवा मान्यता देईना, म्हणून या राजाने सोळाव्या शतकात हा पंथ स्थापन केला. 
 
या राजघराण्यातील सर्व विवाह, बाप्तिस्मा, अंत्यविधी अत्यंत काटेकोरपणे विशिष्ट चर्चमध्ये होत असतात. इंग्लंडचा भावी राजा किंवा राणी धार्मिक नसेल किंवा नास्तिक असेल, किंवा दुसऱ्या धर्माचा, पंथाचा असला तर अँग्लिकन चर्चचा धर्मप्रमुख कसा बनेल असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
 
एलिझाबेथ राणी साहिबा फार बोलत नसायच्या, मात्र त्यांचं सूचक मौनसुद्धा बातमी बनायची. त्यांचा पेहराव, कॅप, गळ्यातला हार याविषयी लिहिलं जायचं. त्यांच्या शेजारी कोण आणि कसे म्हणजे कुठल्या क्रमाने उभे
 
राणीला भेटायला कसं जायचं, तिथं कसं वागायचं याविषयी खूप शिष्टाचार असायचे, राणीच्या हातात नेहेमी हातमोजे असायचे. राणीसाहिबावर असं खूप लिहिलं गेलं आहे. तरी त्यांच्या बाबतचे औत्सुक्य कमी होत नाही. 
 
त्यामुळं `इंडियन एक्स्प्रेस'मधला त्यांच्या विषयीचा लेख मी अधाशाप्रमाणे वाचून काढला. नंतर ही ओबिट लिहिणाऱ्या बातमीदाराचं नाव पाहिलं आणि `न्यूयॉर्क टाइम्स'चा तो लेख आहे हे पण पाहिलं. 
 
मृत्यूलेख लिहिणं हे एक खास कसब असतं.

 
Camil Parkhe, September 9, 2022

Thursday, September 8, 2022

 बाबा पदमनजी 

 

मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार म्हणून बाबा पदमनजी सुपरिचित आहेत. तत्कालीन समाजातील विधवांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी 1857 साली ‘यमुनापर्यटन‘ ही कादंबरी लिहून त्यांनी मराठी भाषेत कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा पाया घातला. 

जवळजवळ सव्वाशे पुस्तके लिहून बाबांनी मराठी साहित्यातील कोश, निबंध, आत्मचरित्र वगैरे वाङ्मयप्रकारांची दालने समृद्घ केली. 
 
बाबा पदमनजी त्या काळातील एक प्रमुख समाजसुधारकही होते. आपल्या साहित्यातून त्यांनी प्रचलित विविध घनिष्ट सामाजिक रीतिरिवाजांवर टीका केली. पेशवाईचा अस्त होऊन ब्रिटिश आमदानीच्या काळात महाराष्ट्रातील समाज जीवनास नवी दिशा देणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये बाबा पदमनजींचा समावेश होतो.
 
बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे 1831 च्या मे महिन्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. मात्र त्या काळात प्रचलित असलेल्या प्रथेमुळे त्यांनी आपल्या आडनावाचा वापर केला नाही. बाबा पदमनजी हे कासार जातीचे होते. त्यांचे वडील पदमनजी माणिकजी यांनी दक्षिण कोकणात सब असिस्टंट सर्व्हेअर व बिल्डर म्हणून काम केले होते, नंतर त्यांची बेळगावात बदली झाली. 
 
बेळगावातच लंडन मिशनच्या शाळेत बाबा पदमनजींनी शिक्षण घेतले. 1847 साली वर्षभर त्यांचे एडन येथे वास्तव्य होते. तेथून परल्यानंतर 1849 साली त्यांनी मुंबईतील काळबादेवी गायवाडी येथील फ्री चर्च विद्यालयात प्रवेश घेतला. या विद्यालयात नारायण शेषाद्री हे मूळचे चित्पावन ब्राह्मण समाजातील, पण नंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेले शिक्षक शिकवित असत. 
 
या काळातच बाबा पदमनजी यांची हिंदू समाजातील चालीरीतींविषयी, जातिभेदांविषयीची मते बदलत गेली. त्याकाळात अत्यंत गुप्त रीतीने स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचे ते सभासद बनले. . मात्र त्याकाळात समाजसुधारणांबाबत कर्मठ मंडळींचा कडवा विरोध लक्षात घेऊन परमहंस मंडळीच्या स्थापनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असे. 
 
मात्र या मंडळीच्या एका सभासदाने या सभेच्या सदस्यांची यादीच प्रसिद्ध केली. 
 
परमहंस मंडळीच्या सभासदांच्या या यादीने त्याकाळात समाजात मोठी खळबळ निर्माण केली होती. या सभेच्या सदस्यांचा ख्रिस्ती धर्माकडे कल आहे, हे सर्व सभासद लवकरच ख्रिस्ती होणार अशीही वदंता सगळीकडे पसरली.
बाबा पदमनजींच्या वडिलांनी त्यामुळे बाबांना ताबडतोब घरी म्हणजे साताऱ्याजवळील उडतरे गावी बोलावून घेतले. बाबा पदमनजींनी 3 सप्टेंबर 1854 रोजी म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी बेळगाव येथे बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 
 
आपण धर्मांतर का केले याची कारणे बाबांनी ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात दिली होती. या धर्मांतराचे वृत्त तत्कालीन अनेक मराठी नियतकालिकांतही प्रसिद्ध झाले.
 
सोळा वर्षे बाबांचे पुण्यात वास्तव्य होते. पुण्यात ते बराच काळ फ्री चर्चच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत.
बाबा पदमनजींचे महात्मा जोतिबा फुले यांच्याशी चांगले संबंध होते. बाबा पदमनजी हे अनेकदा बी.पी. किंवा बा.प. या आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी लेख लिहित असत. महात्मा फुल्यांच्या ‘ब्राम्हणाचे कसब’ या पुस्तकाला बाबांनी प्रस्तावना लिहिली होती व प्रस्तावनेखाली बी.पी. अशी सही केली होती. 
 
त्याशिवाय महात्मा फुले यांच्या ‘शिवाजीचा पोवाडा’ या पुस्तकाची प्रूफेही बाबांनी तपासली होती.
 
बाबा पदमनजी त्याकाळात ख्रिस्ती समाजात खूप लोकप्रिय होते असे दिसून येते. त्यांच्या धर्मातरास 40 आणि 50 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी हा प्रसंग साजरा करण्यासाठी खास समारंभ झाले होते व या समारंभाचे वृत्तान्तही प्रसिद्ध झाले होते.
 
त्यांनी स्वतःही काही नियतकालिकांचे अनेक वर्षे प्रकाशन केले. ‘उदयप्रभा’, ‘सत्यदीपिका (धाकटी), ‘सत्यदीपिका (थोरली)’, सत्यवादी, कुटुंबमित्र आणि ऐक्यदर्शक पत्रिका ही बाबांनी चालविलेली नियतकालिके. 
 
समाजाचे उपेक्षित घटक असणाऱ्या बालविधवा आणि महिलांच्या उन्नतीसाठी महात्मा फुल्यांनी कार्य सुरू केले तेव्हा त्यांना प्रचंड सामाजिक प्रक्षोभास तोंड द्यावे लागले. अशावेळी बाबांनी आपल्या या स्नेह्यास पाठबळ पुरविले.
‘सत्यदीपिका’ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारखे ख्रिस्ती मिशनरी आणि ` ज्ञानोदय’ सारख्या मिशनरींच्या मुखपत्राने जोतिरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली, असे ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांनी आपल्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड पहिला) या ग्रंथात नमूद केले आहे.
 
मराठी साहित्यातील कादंबरी, शब्दकोश, निबंधसंग्रह, चरित्रे, आत्मचरित्र, मृत्युलेख वगैरे विविध वाङ्मयप्रकारांत मोलाची भर टाकणाऱ्या बाबा पदमनजींना आपल्या या साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होण्याचे भाग्य लाभले. अर्थात यासाठी त्यांची जाहिरातपद्धती आणि ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रभावी पद्धती उपयुक्त ठरल्या. 
 
आपल्या या साहित्यकृती अधिकाधिक वाचकांपर्यंत जाण्यासाठी बाबा प्रकाशनपूर्व सवलीची किंमत, भरपूर जाहिरात वगैरे मार्केटिंग तंत्रांचा कुशलतेने वापर करत. त्यामुळे त्यांच्या हयातीत ‘यमुनापर्यटन‘च्या तीन आवृत्या हातोहात खपल्या. 
 
आपल्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीत ही कादंबरी कुणी खरेदी केली याची बाबांनी सरळसरळ यादीच प्रकाशित केली. या यादीमध्ये दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, लोकहितवादी, महात्मा जोतिबा फुले, शेख दाऊद गुलाम महंमद, शिक्षणतज्ज्ञ रेव्ह. जॉन विल्सन, रेव्ह. नारायण शेषाद्री, मराठी शब्दकोशकार जेम्स टी. मोल्सवर्थ आदी त्याकाळच्या नामांकित व्यक्तींचा समावेश होता.
 
या सामाजिक पुढाऱ्याचे वयाच्या 75 व्या वर्षी म्हणजे 29 ऑगस्ट 1906 रोजी मुंबईत निधन झाले. मुंबईतील शिवडी येथे त्यांचा पार्थिव देह पुरण्यात आला.
 
एखाद्या वाङ्मयप्रकारातील पहिली वहिली कृतीच मोठी प्रक्षोभक, वादग्रस्त आणि तत्कालीन समाजातील एखाद्या महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नाचा वेध घेणारी क्वचितच असते, ‘यमुनापर्यटन‘ ही पहिली वहिली कृती त्यादृष्टीने अपवादात्मकच म्हणाली लागेल, असे बाबा पदमनजींचे चरित्रकार डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर यांनी म्हटले आहे. 
 
एकोणिसाव्या शतकात विधवांची स्थिती आणि त्यांचा पुनर्विवाह हा अत्यंत ज्वलंत सामाजिक विषय होता. विधवांच्या प्रश्नावर लिहिलेल्या या कादंबरीस बाबांचे एक स्नेही आणि समाजसुधारक दादोबा पांडुरंग यांनी छापील 27 पानांची संस्कृतमध्ये प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेचा 18 पानांचा मराठीतील सारांशही बाबांनी आपल्या या कादंबरीबरोबर प्रसिद्घ केला. 
 
विधवांच्या पुनर्विवाहाची गरज दादोबा पांडुरंगांनी आपल्या या प्रस्तावनेत मांडली. त्यामुळे ‘यमुनापर्यटन‘ या कादंबरीद्बारे समाजात विधवाविवाहाबाबत जागृती करण्याचा कादंबरीकाराचा हेतू होता हे स्पष्ट होते. बाबांनी आपल्या या कादंबरीचे उपशीर्षक ‘हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण‘ असे ठेवले त्यावरूनही हेच स्पष्ट होते.
 
बाबा पदमनजींनी ‘शब्दरत्नावली‘ या नावाचा समानार्थी शब्दांचा कोश अथवा थिसॉरस 1860 साली प्रसिद्घ केला. मराठी भाषेतील हा पहिलाच समशब्दकोश. इंग्रजी भाषेतील ज्येष्ठ कोशकार पीटर मार्क रॉजेट थिसॉरस या प्रसिद्घ समानार्थी शब्दांच्या कोशाच्या धर्तीवर ‘शब्दरत्नावली‘ची निर्मिती करण्यात आली आहे. 
 
विशेष म्हणजे रॉजेट थिसॉरसची पहिली आवृत्ती 1852 साली प्रसिद्घ झाली. त्यानंतर केवळ आठ वर्षातच रेव्ह. पदमनजींनी आपला ‘शब्दरत्नावली‘ कोश प्रसिद्घ केला. 
 
मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी मराठी भाषेतील एक प्रमुख कोशकर्ते म्हणूनही ओळखले जातात. संस्कृतमध्ये ‘निघंटु‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शब्दकोश या वाङ्मयप्रकाराचा मराठीत सर्वप्रथम पाया रेव्ह. विल्यम केरी या बॅप्टिस्ट मिशनरीने 1810 साली रचला. 
 
बाबा पदमनजी यांनी 1860 साली इंग्लीश आणि मराठी कोशाचा संक्षेप (A Comprehensive Dictionary-English and Marathi) या नावाचा त्यांचा पहिला शब्दकोश प्रसिद्घ केला. बावीस हजारांहून अधिक शब्द असलेल्या या कोशाची दुसरी आवृत्ती 1870 साली तर तिसरी आवृत्ती 1889 साली प्रसिद्घ झाली.
 
पुण्याच्या भवानी पेठेत बोहरा दफन भूमी जवळ त्यांच्या नावाने चौक आहे.
 
 
  ^^
 
 
( संदर्भ : ‘बाबा पदमनजी' : काल व कर्तृत्व’-डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई 400 032 (1979).
 
^^^
( `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' , लेखक कामिल (पारखे (वितरक सुगावा प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती २०१७) मधील एक प्रकरण )