Thursday, December 21, 2023

 मोगलाई आणि अमरावती 

                                       

आम्ही मोगलाईतले म्हणजे मराठवाड्यातले. माझा जन्म आणि बालपण पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर येथे गेले तरी नाळ मात्र कायम गंगेपलिकडे असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या आजोळशी राहिली. या मोगलाईतली भामाठाण, पैठण, नागमठाण, वरखेड, बोरसर, लासूर, महालगाव वैजापूर, गंगापूर अशी अनेक नावे बाई-दादांच्या अन आजोळच्या लोंकांच्या बोलण्यातून कायम कानावर पडायची. गंमत म्हणजे वरीलपैकी बहुतेक ठिकाणी मी कधीही गेलेलो नाही वा त्यांचे भौगोलिक स्थान मला आजही माहित नाही.
अधूनमधून सणावाराला माळीघोगरगाव येथून पायपीट करत आमचे आजोबा म्हणजे गोविंदराव शिनगारे टिळकनगर श्रीरामपूरला स्थायिक झालेल्या मार्थाबाई आणि अनुसयाबाई या आपल्या दोन्ही लेकुरवाळ्या लेकींसाठी पुरणपोळ्यांचे आणि इतर खाद्यपदार्थांचे टोपले घेऊन दुपारी बारापर्यंत आमच्या घरी पोहोचायचे. बहुधा भल्या सकाळी गरमागरम पुरणपोळ्याचे टोपले फेट्यावर ठेवून घेऊन ते या पायी प्रवासाला निघत असत. या सगळ्या ऐकिव गोष्टी.
याचे कारण म्हणजे मी जन्मायच्या खूप वर्षे आधीच आजोबा अचानक गेले. एका सकाळी शेतमळ्यात घराबाहेर झोपलेल्या आजोबांचे शरीर काळेनिळे पडलेले दिसले होते, बहुधा विषारी सर्पदंशाने. आजीचे - आईची आई - जिच्याबाबत कधी एक शब्द ऐकलेला आठवत नाही, तिचे तर आजतागायत नावसुद्धा माहित नाही.
दहापंधरा वर्षांपूर्वी बाई असताना काहीही निमित्त नसताना मुद्दामच तिच्याबरोबर तिच्या माहेरी गेलो होतो. तेव्हा शांत्वनमामांच्या थोरल्या मुलाला माझ्या मामेभाऊ शाहूला सहज `आपले शेत कुठपर्यंत आहे ? ' असे विचारले तेव्हा त्याने दोन दिशेला हात उभारुन लांबवरपर्यंतची शेतीची जागा दाखवली होती. ``बहुधा साठ-पासष्ट एकरांपर्यंत असावी,'' असे तो म्हणाला होता.
विशेष म्हणजे ही हाडुळकीची शेती नव्हती. तेव्हा त्यावेळी नाशिकजवळच्या नांदूर-मधमेश्वर धरणाचे पाणी नुकतेच घोगरगावाला पोहोचले होते. तशी शेतात विहीर होती, गरजेनुसार मोटेने पिकांना पाणी दिले जात होते.
विहिरीतून चार बैलांच्या मदतीने मोटेने विहिरीतून पाणी काढून या शेतातल्या भाजीपाल्यांना, वांगे, काकडी वगैरेंना पाणी दिले जाताना मी पाहिले आहे. आता धरणाच्या पाण्याने शेती पूर्णतः बागायती झाल्याने सालातून तीनदा पीक घेणे आज शक्य झाले आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना शाहूभाऊने आमच्या नजरेसमोर जमीनीतून उपटलेला डहाळ, गव्हाच्या कोवळ्या लोंब्या असे कायकाय दिले होते.
बाईची ही तिच्या माहेरची शेवटची गाठभेट ठरली. त्यानंतर घोगरगावातल्या त्या शेतमळ्यात आजपर्यंत मी पाय ठेवलेला नाही.
आता नक्की संदर्भ आठवत नाही मात्र आमच्या आईवडलांच्या संभाषणात अनेकदा येणारा एक शब्द म्हणजे `मोगलाई' हा होता. मोगलाई हा शब्द ऐकून तेव्हा शालेय वयातला मी अचंबित व्हायचो. (तिथल्या `राजवाडा' या शब्दाचा नेमका अर्थ मला तसा फार लवकर समजला होता).
`आम्ही मोगलाईतले', `मोगलाईतला अमुकअमुक परिसर' असे शब्दप्रयोग व्हायचे. ''ही काय मोगलाई हाई काय?'', ''मोगलाई लागून गेली काय?'' असे वाक्प्रचार कानावर पडायचे.
दिल्लीतले मुघल साम्राज्य आणि औरंगाबाद जिल्ह्यातली मोगलाई ही नक्की काय भानगड आहे, असा मला प्रश्न पडायचा. नंतरनंतर कळायला लागले कि ही मोगलाई म्हणजे हैदराबाद निजामाच्या अमलाखालील मराठवाडा वगैरे प्रदेश म्हणजे मोगलाईतील भाग. अहमदनगर जिल्ह्यातल्या सीमेवरची गोदावरी म्हणजे गंगा ओलांडली कि हा मोगलाईचा भाग सुरु व्हायचा.
घोगरगावच्या फादर गुरियन जाकियरबाबांचे मी चरित्र लिहायला घेतले तेव्हा अगदी पहिल्यांदा 'मोगलाई' हा शब्द त्याच्या समर्पक अर्थासह तोही इंग्रजी पुस्तकांत मी पहिल्यांदा वाचला आणि या शब्दाविषयीच्या माझ्या कुतूहलाला अखेरीस पुर्णविराम मिळाला.
मी वाचलेल्या कुठल्याही मराठी पुस्तकांत `मोगलाई' या शब्द या अर्थाने वापरलेला माझ्या वाचनात आलेला नाही. मी वाचलेले बहुतेक लेखक पुण्यामुंबईतले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले असावेत यामुळेही हे असेल कदाचित.
दुसरा नेहेमी कानावर पडणारा शब्द म्हणजे अमरावती आणि अमरावतीचे बिशप. त्याकाळात औरंगाबाद जिल्हा आणि गोदावरी नदीपलीकडचा परिसर अमरावती डायोसिसमध्ये म्हणजे धर्मप्रांतात होता. औरंगाबाद धर्मप्रांताची निर्मिती खूप अलिकडची, १९७७ सालची, पण तोपर्यंत मी माझे घर आणि श्रीरामपूर सोडून गोव्यात फादर होण्यासाठी गेलो होतो
ऐंशीच्या दशकाआधी खूप, खूप वर्षांपुर्वी अखंड नागपूर धर्मप्रांत होता. नागपूरचे फ्रान्सलियन बिशप यांच्या अखत्यारीतला. फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु विशाखापट्टणम येथून मिशनकार्य करण्यासाठी नागपूर आणि वऱ्हाडात पोहोचले होते आणि तेथून ते मोगलाईचे अखेरचे टोक असलेले औरंगाबाद जिल्ह्यात माळीघॊगरगाव येथे १८९२ साली काम करण्यासाठी पोहोचले होते. ही त्यांची मिशनकामाची सीमाहद्द कारण तेथून पुढे अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मुंबईत जर्मन असलेल्या जेसुईट धर्मगुरुंची हद्द.
युरोपातल्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दर्यावर्दी देशांत आपापसांत झगडे नको म्हणून मध्ययुगात पोपमहाशयांनी संपूर्ण जगाची चक्क दोन भागांत वाटणी केली होती ! एक-दुसऱ्यांच्या हद्दीत आक्रमण टाळण्यासाठी.
मोगलाईतल्या गंगेपलीकडे अहमदनगर, पुण्या-मुंबईत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे जर्मन, स्विस, ऑस्ट्रेलियन धर्मगुरू कार्यरत होते त्याप्रमाणे विदर्भात, अमरावती आणि मराठवाड्यात फ्रान्समधल्या फ्रान्सलियन संस्थेचे धर्मगुरू कार्यरत होते. या संस्थेच्या कागदपत्रांतून आणि रोजनिशीतून विसाव्या शतकातील येथील ख्रिस्ती मिशन कामाबाबत, शैक्षणिक संस्थाबाबत माहिती मिळते.
फ्रेंच फ्रान्सलियन धर्मगुरु फ्रान्सिस मॉगे ( Francis Moget) यांनी Vagabonds for God : A story of the Catholic Church in India (1846-1907) प्रकाशनवर्ष १९९० आणि Shepherds for Christ : A story of the Catholic Church in Central India 1907-1960) प्रकाशनवर्ष १९९४ हे दोन ग्रंथ विविध संदर्भ आणि रोजनिशींच्या आधारे लिहिलेले आहेत.
सामाजिक आणि आर्थिक जीवन अभ्यासण्यासाठी अशा प्रकारचा ऐतिहासिक दस्तऐवज किती महत्त्वाचा आहे हे सांगायलाच नको. याच दोन पुस्तकांच्या आधारावर मी स्वतः ``घोगरगावचे जाकियरबाबा : मराठवाडा कॅथोलिक धर्मप्रांताचा इतिहास' हे पुस्तक मराठी आणि इंग्रजीत लिहिले आहे.
पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुध्दातसुद्धा तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारतातल्या सर्व शत्रुराष्ट्रातील नागरिकांना म्हणजे जर्मन जेसुईट धर्मगुरूंना तुरुंगात वा छावणीत टाकले होते. अशा कठीण आणि युद्धस्थसमयी मोगलाई, अमरावती आणि नागपूर येथील फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु फादर गुरियन जाकियर आणि मेरी बेर्जे पुण्यातल्या आणि इतर जर्मन जेसुइट धर्मगुरूंच्या मदतीला धावले आणि येथील चर्चचे काम पाहिले.
यापैकी फादर बेर्जे यांनी १९१७ साली जन्मलेल्या माझ्या वडलांचा माळीघोगरगाव येथे बाप्तिस्मा केला होता. बाप्तिस्मा सर्टिफिकेटवर फादर बर्जे यांचे आणि गॉडफादरचेही नाव आहे. आपल्याकडे लग्नात नवरीला उचलून मांडवात आणण्यासाठी नवरीच्या मामाची - खऱ्या किंवा मानलेल्या - मामाची गरज असते तसेच बाप्तिस्मा करताना गॉडफादर ( आणि कधीकधी गॉडमदरसुद्धा) पाहिजेच.
पहिल्या महायुद्धात जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरिक असलेले पुण्याचे बिशप हेन्री डोरींग रोममध्येच अडकल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नागपूरचे बिशप फ्रान्सिस कॉपेल बैलगाडीने प्रवास करत मजल दरमजल करत पुण्याला, खडकी, संगमनेर आणि राहाता येथे तीन वेळेस म्हणजे १९१६, १९१७ आणि १९१९ला आले होते !
अन याची परतफेड म्हणून महायुद्ध संपल्यानंतर १९२६ला जपानमधील हिरोशिमातून भारतात परतलेल्या पुण्याचे आर्चबिशप हेन्री डोरींग हे ८ जानेवारी १९३३ रोजी मोगलाईतल्या माळीघोगरगावला मुलांमुलींना कन्फर्मेशन सांक्रामेंत देण्यासाठी पोहोचले होते. कारण नागपूरचे बिशप कॉपेल त्यावेळी आजारी होते.
कॅथोलिक लोकांच्या जीवनात धर्मप्रांत आणि बिशप यांचे एक अतूट नाते असते कारण आयुष्यात किमान एकदा तरी भाविक लोक काही क्षण बिशपांच्या अगदी जवळ येत असतात. याचे कारण म्हणजे सप्त स्नानसंस्कारांपैकी एक असलेल्या दृढीकरण किंवा confirmation हे सांक्रामेंत केवळ बिशपमहोदयच देऊ शकतात. बाप्तिस्मा, लग्नविधी, अंत्यसंस्कार वगैरे सांक्रामेंतासाठी कुठलाही दिक्षित धर्मगुरु पौराहित्य करू शकतो.
इतर धर्माच्या तुलनेत ख्रिस्ती धर्मात सश्रद्ध लोकांच्या जीवनात धर्मगुरूंचे अधिक महत्त्वाचे स्थान असते. विशेष महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ती धर्मात कुणाही व्यक्तीला- हो कुणालाही - धर्मगुरु होता येते, हे पद किंवा अधिकार विशिष्ट समाजघटकाचे नसतात. आता माझेच उदाहरण आहे. कधीकाळी मीसुध्दा गोव्यात फादर होण्यासाठी गेलो नव्हतो का?
तर एकेकाळी अमरावती धर्मप्रांत खूप महत्त्वाचा होता कारण या हद्दीत ख्रिस्ती लोकसंख्या भरपूर होती, या भागात अनेक ख्रिस्ती मंदिरे होती. माझ्या आजोळी माळीघोगरगाव येथे 1927 साली गॉथिक वास्तू शैलीत बांधलेले भव्य आणि सुंदर चर्च आहे. चर्चचे नाव आहे ख्रिस्त राजा मंदिर.... Church of Christ the King... आजही अशाप्रकारचे भव्य आणि सुंदर बांधकाम नवलाईची बाब ठरते. या बांधकामासाठी नेवाशाहून खास काळे पाषाण मागवण्यात आले होते.
या भागातील ख्रिस्ती लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची अनेक सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक कारणे आहेत.
तर सांगायचा मुद्दा असा कि आम्ही जसे मोगलाईतले तसेच एकेकाळच्या अमरावती धर्मप्रांतातले सुद्धा .
मागच्या आठवड्यात अमरावती येथील बिशपांचे कॅथेड्रल किंवा आसनपीठ (कॅथेड्रॉ म्हणजे आसन, seat ) असलेल्या चर्चमध्ये दुपारी पाचच्या दरम्यान चर्चबेलचा घंटानाद झाला.
त्याचवेळेस व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकामध्येसुद्धा घंटानाद झाला होता.
अमरावती डायोसिसच्या नव्या बिशपांची पोप फ्रान्सिस यांनी नेमणूक केली हे जाहीर करण्यासाठी हा घंटानाद होता.
अमरावतीच्या नव्या बिशपांच्या नेमणुकीची बातमी इथेच फेसबुकवर लगेचच पाचदहा मिनिटांत मला कळाली आणि अमरावतीशी असलेल्या माझ्या खूप जुन्या नातेसंबंधांना उजाळा मिळाला.
अमरावती धर्मप्रांताचे हे नवे बिशप आहेत पुणे धर्मप्रांताचे आताचे व्हिकर जनरल (धर्मसत्तेत पदश्रेणीत बिशपानंतर दुसऱ्या क्रमांकाचे) फादर मॅल्कम सिक्वेरा.
पुढच्या महिन्यात प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारीला, अमरावतीचे नवे बिशप म्हणून त्यांचा दीक्षाविधी होईल.

Camil Parkhe

 

‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’

दोनशे वर्षांपूर्वी ( नेमके म्हणजे २० डिसेंबर १८३१ साली ) अमेरिकन मिशनरींनी अहमदनगर येथे आपले केंद्र उघडले आणि धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून तेथे शाळा सुरु केल्या.
रेव्ह. हॉलीस रीड यांच्या पत्नीने तिथे मुलींची शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना स्थानिक लोकांनी वरील प्रश्न विचारला होता.
अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राचा आज २० डिसेंबर स्थापना दिन. त्यानिमित्त ज्येष्ठ लेखक अशोक हिवाळे यांनी जुन्या दस्तऐवजातून संकलन केलेली ही माहिती मी इथे देतो आहे.
``१८३१ मध्ये अहमदनगर मिशन ठाणे सुरू करणार्या पहिल्या मिशनरींपैकी रेव्ह. हॉलिस रीड हे एक मिशनरी होते. अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राच्या १८८१ साली साजरा झालेल्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रेव्ह. हॉलीस रीड यांनी अमेरीकेतून आपल्या आठवणी लिहून पाठवल्या होत्या. त्या स्मरणिकेतील हा भाग :
``२० डिसेंबर १८३१ रोजी आमच्या प्रारंभीच्या छोट्या टोळीने अहमदनगरमध्ये आमचे तंबू ठोकले; आमच्या टोळीत मिस्टर आणि मिसेस ग्रेव्हज, मिस्टर हर्वे, आणि मी आणि माझी पत्नी यांचा समावेश होता. मिस्टर ॲलन आणि मी अशा दोघांनी आधी दख्खन पठाराचा पुनर्विचार केला होता आणि हे ठिकाण पसंतीचे स्थान म्हणून निवडले होते.
आणि जेव्हा मी तुमच्या तरुण मुलींच्या बोर्डिंग स्कूलकडे पाहतो, तेव्हा त्या बोर्डिंगस्कूलची सर्व सोयींनीयुक्त इमारत, पुस्तके आणि फर्निचर आणि त्यातील आंतरराष्ट्रीय आदर्श पातळीचे (आयएसओ) विद्यार्थी, तेव्हा मला मिसेस रीड यांनी मुलींसाठी पहिली छोटी शाळा सुरू करण्यासाठी केलेले पहिले प्रयत्न आठवले.
पुन्हा, मोहरीच्या छोट्या दाण्याचे कसे झाड झाले आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यांमध्ये कसे वावरत आहेत याची मला आठवण झाली.
मुलींची शाळा सुरू करण्याच्या मिसेस रीडच्या प्रयत्नांकडे मूळ रहिवाशांनी एक परिपूर्ण मूर्खपणा म्हणून पाहिले आणि काहींनी त्यांची खिल्ली उडवली.
त्यांनी तिला विचारले की, ‘‘गाढवाला वाचायला शिकवता येईल का? तसे असेल तरच एखादी स्त्री शिकू शकेल.’’
तर्क आणि मन वळवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, तिने शेवटला उपाय म्हणून पैशांचा युक्तिवाद वापरला.
जी मुलगी दररोज शाळेला येईल तिला एक पैसा मिळेल. या युक्तिवादाचा उपयोग करून एक लहान शाळा स्थापन करण्यात आली. पैसे (कदाचित दहा पैसे) आठवड्याच्या शेवटी प्रत्येकीला दिले गेले.
लवकरच मुलींना शाळेला येण्यात स्वारस्य वाटू लागले - काही वाचायला शिकल्या. सुरुवातीला त्यांच्या पालकांना आश्चर्य वाटले, परंतु लवकरच या नवीन आणि अनपेक्षित विकासाचा अभिमानही वाटू लागला. आणि मग पैसा मिळो अगर न मिळो मुली शाळेत नियमितपणे येऊ लागल्या.''
परंतु प्रवाह नेहमीच सुरळीत वाहतो असे नाही. स्त्रीशिक्षण हे ब्राह्मण आणि उच्च जातींनी अतिशय संशयास्पद मानले होते आणि खालच्या जातींनीही ते अत्यंत अनिच्छेने व्यवहार्य किंवा आवश्यक म्हणून स्वीकारले होते. हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम होता. त्याची उपयुक्तता कोणीही पाहू शकत नव्हते आणि त्याच्या यशामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात अपयश आले नाही. त्यामुळे मुलींच्या शाळांकडे पुरोहित फारच संकुचितपणे पाहत. आणि अशा योजनांना मोडून काढण्यासाठी वेळोवेळी सर्व प्रकारची कटकारस्थाने आखली जात.
याचे एक उदाहरण पाहा : एके दिवशी सकाळी मिसेस रीड शाळेला नेहमीप्रमाणे भेट देत असताना, तिला एक वर्ग रिकामा आढळला. एकही विद्यार्थिनी दिसत नव्हती.
बाई आश्चर्यचकित होऊन तेथेच रेंगाळत असताना शिक्षक येऊन हजर झाले. आणि शाळेचा वर्ग रिकामा का आहे याचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, अशी अफवा पसरली आहे की मुलींना थोडेफार प्रशिक्षण देऊन व त्यांच्यात बदल करून त्यांना दूर पाठवून गुलाम म्हणून विकण्यासाठी त्यांच्या घरातून काढून एकत्र आणण्याचा बाईंचा हेतू होता. त्यामुळे त्यांचे पालक त्यांना शाळेतून घेऊन गेले. ''
१८७८ सालच्या मराठी मिशनचा अहवाल दयाळूपणे माझ्याकडे पाठवला आणि गेल्या ५० वर्षांपूर्वीच्या छोट्याशा सुरुवातीची सध्या सुरू असलेल्या विस्तृत आणि उदात्त कामाशी तुलना केली, तेव्हा मी आश्चर्याने आणि निर्विवाद कृतज्ञतेने उद्गारलो, ‘‘पाहा, देवाने केवढे कार्य केले आहे!’’
हा अहवाल पाहून माझे हृदय भरून आले आणि मी म्हटले, अरे! त्या येणार्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त मला तुमच्याबरोबर असायला पाहिजे होते. म्हणजे आपण सर्वांनी मिळून त्या प्रिय मिशनमध्ये असलेल्या देवाच्या सामर्थ्यशाली हाताने केलेले कार्य इतरांना सांगितले असते. मी तिकडे आलोच तर परत अमेरिकेला माघारी येणार नाही. परंतु माझा प्रिय बंधू हर्वे याच्या कबरेच्या बाजूला मला पुरण्यात यावे, अशी मी अपेक्षा करीन.''
अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर केंद्राच्या स्थापना दिनानिमित्त अहमदनगर येथे आज एक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
Camil Parkhe

Wednesday, December 13, 2023

                                                    प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
माझ्या पिढीतल्या लोकांना १ ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आठवणार. कारण या दिवशी शाळांत टिळकांवर वक्तृत्व स्पर्धा असायची. मी सुद्धा एकदा या वक्तृत्वस्पर्धेत पहिल्यांदा (आणि अखेरीस) भाग घेतला होता.

टिळकांना त्याच्या हयातीत लोकमान्यता मिळाली. त्या तुलनेत अनेक इतर सामाजिक आणि राजकीय पुढारी तसे दुलर्क्षित राहिले. टिळकांचे न. चिं. केळकर लिखित खंडात्मक चरित्र १९२१ साली म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर एका वर्षात प्रसिद्ग झाले. महात्मा जोतीराव फुले यांचे चरित्र पंढरीनाथ सीताराम पाटील लिखित चरित्र १९२७ साली, जोतिबांच्या निधनानंतर चार दशकांनी प्रसिद्ध झाले.
महात्मा गांधी यांचे पहिले चरित्र त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरवातीलाच लिहिले गेले होते. अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेले गांधीजींचे हे चरित्र १९१८ साली प्रसिद्ध झाले होते आणि या चरित्राला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना होती.
गोव्यात मी मुंबई विद्यापिठाचा बीएचा आणि एमचा तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असताना टिळकांचे गीतारहस्य प्रकरण १८ वे मला अभ्यासाला होते. भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या माझ्या अभ्यासात जोतिबा फुले यांच्या विचारांची कधीच गाठभेट झाली नाही.
धनंजय कीर यांनी लिहिलेले जोतिबा फुले यांचे पहिले समग्र चरित्र १९६७ साली प्रसिद्ध झाले, कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला शब्द पाळून हे चरित्र लिहिले असे कीर यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लिहिले आहे. नाही तर जोतिबांचे कार्य आणि विचारधन लोकांपर्यंत पोहोचायला आणखी काळ लोटला असता.
मात्र जोतिबा फुले यांना `राजकीय विचारवंत' हा दर्जा देण्यास खुद्द कीर यांनीच आखडता हात घेतला आहे, तसे त्यांनी लिहिले आहे. जोतिबा फार तर सामाजिक कार्यकर्ते होते असा कीर यांचा सूर आहे.
महात्मा फुलेंच्या महानतेकडे दुर्लक्ष करण्याच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रात त्यांच्या विचारधनाकडे दुर्लक्ष झाले आणि केवळ शहरांत आणि गावोगावी भाजीमंडईंना त्यांचे नाव देऊन, पुतळा उभारून त्यांची उपेक्षा केली गेली.
जोतिबांच्या आणि सावित्रीबाईंच्या कार्याची महती जगाला पटायला खूप कालावधी लागला. अजूनही या दोन महान व्यक्तींची समग्र म्हणावी अशी चरित्रे लिहिले गेली नाहीत.
सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर येथील सिंथिया फरारबाई आणि पुण्यात आपल्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाईंना अद्यापनाचे पदवी शिक्षण देणाऱ्या रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांचे चरित्र अभ्यासताना ही उपेक्षा मला प्रकर्षाने जाणवली.
जोतिबा किंवा सावित्रीबाई यांची विविध चरित्रे लिहून झाली आहेत, मात्र जोतिबा आणि सावित्रीबाई यांचे शिक्षक आणि प्रेरक असणाऱ्या स्कॉटिश मिशनतर्फे पुण्यात शाळा चालवणाऱ्या जेम्स मिचेल, मिसेस मार्गारेट शॉ मिचेल आणि त्यांचे सहकारी जॉन मरे मिचेल यांचा नामोल्लेख या चरित्रांत क्वचितच आढळतो.

असे का व्हावे. जोतिबांना एक दृष्टे विचारवंत, तत्त्ववेत्ते आणि समाजसुधारक म्हणून लोकमान्यता मिळायला इतका उशीर का लागावा ?
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा सोमवार, नोव्हेंबर २० ला पन्नासावा स्मृतिदिन आहे. महात्मा जोतिबांच्या कार्याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे याबद्दल प्रबोधनकारांनी खूप आधी म्हणजे १९२५ सालीच संताप व्यक्त केला होता.
आजच्या `लोकसत्ता’त प्रसाद माधव कुलकर्णी यांनी प्रबोधनकारांवर लेख लिहिला आहे, त्यात म्हटले आहे : ``धारदार लेखणी आणि तडफदार वाणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. प्रबोधनकार यांच्या धारदार लेखणीने आणि तडफदार वाणीने अनेकांचे वस्त्रहरण झाले. ‘’
महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या हरी नरके संपादित `आम्ही पाहिलेले फुले’ या ग्रंथात खालील लेख समाविष्ट आहे. त्यावरून प्रबोधनकारांच्या धारदार लेखणीचे दर्शन होते. ( महात्मा फुले यांचा पुण्यात पुतळा उभारण्याचा ठराव पुणे नगरपालिकेत फेटाळला गेला होता त्याचा संदर्भ पहिल्या वाक्यात आहे.)
``जेध्यांच्या ठरावाला हाणून पाडायला व फुल्यांची निंदा मनसोक्त करायला त्यांच्याच जातभाईपैकी काही 'मांजराच्या डावल्या त्यांनी पुढे आणल्या. म्युनिसिपालिटीत ब्राह्मणेतरांची बहुसंख्या असताना ठराव का हो नापास होतो ? म्हणून पृच्छा करणारांपैकी बरेच अजागळ व पुष्कळ लुच्चे असतात. लुच्चांना खरी मख्खी माहीत असते. आजपर्यंत कोणत्या लहान मोठया पापात कोब्रांनी प्रत्यक्ष भाग घेतला आहे? हंडी आपण शिजववायाची, पण फोडावयाची मात्र भलत्याकडून! आपण स्वच्छ नामा निराळे !! शपथेला मोकळे!!!
खरा सुधारक हा जवळ जवळ बंडखोरच म्हणला तरी चालेल. त्याचे बंड रुढींच्या विरुध्द असते. त्याचा मारा प्रचलीत लोककल्पनांवरच असल्यामुळे लोकमान्यतेचा तो प्रथम संन्यास करून कडव्या निश्वयाने कार्यक्षेत्रात उडी घेतो, अर्थात लोकांना तो अप्रिय असतो. त्याचे सत्यशोधन लोकांच्या अनादरास पात्र होते. त्याला कर्तव्याची चाड असते, लोकजागृतीची तळमळ असते, सत्यावर त्याचा अढळ विश्वास असतो, पण तो कोणाच्या अभिप्रायाची पर्वा बाळगीत नाही. त्यामुळे ज्यांच्या कल्याणाविषयी तो झगडत असतो, तेच त्याला अतोनात विरोध करतात. त्याचा छळ करतात. वेळी त्याचा प्राणही घेतात. जोतीराव फुले या उच्च समाजसुधारक कोटीतले महात्मा होते.
ते टिळकांप्रमाणे बी.ए.एलएल. बी. नसले तरी हिंदुसमाज व धर्मात त्यांनी कितीतरी पट श्रेष्ठ कामगिरी केलेली आहे. ते लोकमान्य झाले नाहीत; हीच त्यांच्या श्रेष्ठ कर्तव्याची साक्ष आहे. लोकमान्य होणे सोपे, पण जोतीरावांचे एकादे मत नुसते प्रतिपादन करणे फार कठीण. लोकमताला वळण देण्याचे काम लोकमान्यतेच्या भरी पडणाऱ्यांच्या हातून जगात आजपर्यंत घडलेले नाही. आणि हे काम करणारे लोकहितवादी, भागवत, आगरकर, कर्वे, शिंदे, शाहू छत्रपति वगैरे सुधारक लोकक्षोभाला बळी पाडल्यावाचून राहिले नाहीत.
जोतीराव बोलून चालून कड़वा सुधारक. त्याला कसली लोकमान्यता? आणि त्याच्या अस्तित्वाची तरी कोण दाद घेतो? आपला आजा कोण होता हे नातवाला सुध्दा भाडोत्री भटजवळून शिकण्याचा प्रसंग तेथे लोकमान्यतेच्या चौघड्यापुढे बिचाऱ्या फुले सुधारकांच्या चरित्राची टिमकी लोकांना काय माहित असणार? भटांजवळून शिकण्याचा प्रसंग, तेथे लोकमान्यतेच्या चौघड्यापुढे बिचाऱ्या फुले सुधारकांच्या चरित्राची टिमकी लोकांना काय माहीत असणार?"
[`प्रबोधन', सप्टेंबर १९२५ प्रबोधनकार ठाकरे संपादक]
Camil Parkhe

 

महात्मा फुले यांच्या प्राथमिक जडणघडणीत दोन व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे, त्या दोन्हीही व्यक्तींबाबत आज काहीही माहिती उपलब्ध नाही. त्या दोन व्यक्ती म्हणजे गोविंदराव फुले यांचे शेजारी उर्दू शिक्षक गफार बेग मुनशी आणि धर्मोपदेशक किंवा सरकारी अधिकारी असलेले लिजिट साहेब. गोविंदरावांनी आपल्या हुशार मुलाचे शिक्षण पुन्हा सुरु करावे असा आग्रह या दोन सदगृहस्थांनीं केला, गोविंदरावांनी त्यांचे ऐकले आणि लहानगा जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जाऊ लागला आणि एका महात्म्याचा अशा प्रकारे जन्म झाला.

सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वांची जडणघडण करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या नावांचा फुले दाम्पत्त्यांच्या चरित्रांत अगदी ओझरता उल्लेख होतो, कधी तर अनुल्लेखाने त्यांना टाळले जाते. मात्र असे करण्याने सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची समग्र चरित्रे आतापर्यंत लिहून झालेली नाहीत. या दोन महान व्यक्तींची ही एकप्रकारे उपेक्षाच आहे.
जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळॆत शिकले, वडलांनी घराबाहेर काढल्याने आणि नंतर स्वतःच्या शाळा चालवताना अर्थार्जनासाठी स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जोतिबा अर्धवेळ शिक्षकाची नोकरी करत असत असेही उल्लेख अनेक चरित्रकार करतात.
स्कॉटिश शाळेत जोतिबांना शिकवणाऱ्या या स्कॉटिश मिशनरींची नावे मात्र कुठेही झळकत नाहीत.
जोतिबा फुले आपले मित्र सदाशिवराव गावंडे यांच्याबरोबर अहमदनगरला अमेरिकन मराठी मिशनच्या सिंथिया फरारबाई यांच्या मुलींच्या शाळेला भेट देतात, त्यांच्याशी सविस्तर बोलणे होऊन, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण पुण्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या असे स्वतः जोतिबा लिहितात. धनंजय कीरलिखित महात्मा फुले चरित्रात यावर दोन-अडीच पाने आहेत.
फरारबाईंचे पूर्ण चरित्र कागदपत्रांच्या रुपात गेले एक शतकभर उपलब्ध आहे. तर या `मिस सिंथिया फरार' कोण याविषयी बहुतेक फुले चरित्रकार मौन बाळगतात.
उपलब्ध दस्तऐवजाच्या आधारे अलीकडेच सावित्रीबाईंच्या शिक्षिका असलेल्या सिंथिया फरारबाईंचे चरित्र आणि कार्य याविषयी माहिती देणारे पुस्तक मी स्वतः लिहिले आहे.
रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन यांच्यासह रेव्हरंड जेम्स मिचेल हे स्कॉटिश मिशनरी पुण्यात १८३० पासून कार्यरत होते. जेम्स मिचेल यांनी आपल्या निधनापर्यंत वीस वर्षे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनची जवळजवळ एकखांबी धुरा वाहिली. जोतिबांना आपल्या स्कॉटिश शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकवणाऱ्या जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांचे यांचे केवळ ओझरते उल्लेख फुले दाम्पत्याच्या चरित्रांत आढळतात.
मुलींच्या शाळा चालवणाऱ्या जोतिबांचा पुण्यात जंगी सत्कार झाला, त्याकाळच्या वृत्तपत्रांत त्या कार्यक्रमाला हजर असणाऱ्या प्रतिष्ठित देशी आणि परदेशी व्यक्तींच्या यादीत जोतिबाचे शिक्षक असलेल्या रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांचे नाव साहजिकच झळकते.
सावित्रीबाईंनीं पुण्यात स्कॉटिश मिशनरी मिचेलबाई यांच्याकडे अद्यापनाचे धडे घेतले असे हरी नरके आणि इतर अभ्यासक लिहितात. सर विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर साक्ष देताना आपल्या लेखी इंग्रजी निवेदनात आपण आपल्या शाळा मिचेलबाईंकडे चालवण्यासाठी दिल्या आणि त्या शाळा आजही (१८८२) चालू आहेत असे जोतिबा फुले म्हणतात.
तर नॉर्मल स्कुल चालवणाऱ्या या मिचेलबाई कोण? रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी असलेल्या ( मार्गारेट शॉ) मिचेलबाईंबद्दल उपलब्ध ग्रंथांत आणि दस्तऐवजात कितीतरी माहिती आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून मिचेलबाईंची उपेक्षा केली जाते.
रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या मदतीसाठी मुंबईहून नंतर रेव्हरंड जॉन मरे मिचेल पुण्यात आले, मेजर थॉमस कँडी यांच्या गैरहजेरीत ते पूना कॉलेजचे (डेक्कन कॉलेज) प्रिन्सिपल आणि संस्कृत-मराठी विभागाचे प्रमुख होते.
महात्मा फुले यांचे एक महत्त्वाचे चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यानी `चटईचा विटाळ' या संदर्भात जोतिबांनी जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत पाठवलेल्या एका महार मुलाची अत्यंत हृदयद्रावक कथा सांगितली आहे.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेली आणखी एक घटना धनंजय कीर यांनी सांगितली आहे.
कीर यांनी लिहिले आहे : `रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली. त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत. आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"
पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."
या दोन्ही घटनांचे वर्णन कीर यांनी जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्राच्या आधारे केले आहे आपले आत्मचरित्र आणि इतर कितीतरी लिखाण करणारे जॉन मरे मिचेल यांच्या या साहित्याचा मात्र फुले चरित्रकार प्राथमिक चरित्रसाधने म्हणून मुळी विचारच करत नाहीत.
खूप जुनी, शंभर-दीडशे वर्षांपूर्वी अमेरिकन मराठी मिशनची आणि स्कॉटिश मिशनची पुण्यामुंबईत मराठीत आणि इंग्रजीत लंडनमध्ये आणि अमेरिकेत प्रकाशित झालेली अनेक पुस्तके आणि कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. मात्र या साहित्याचा फुले दाम्पत्याची प्राथमिक चरित्रसाधने म्हणून का वापर केला जात नाही याचे आश्चर्य वाटते.
जॉन मरे मिचेल यांचे सर्वात महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी भारतात केवळ मुस्लिम मुलींसाठी असलेली शाळा पुण्यात चालवली, या शाळेत तब्बल ७० मुली होत्या आणि त्याहून विशेष म्हणजे जॉन मरे मिचेल या मुलींना फी सुद्धा आकारत असत.
त्याकाळी म्हणजे १८६२ ला शाळेत येणाऱ्या मुलांमुलींसाठी पैशाची रक्कम, खाणेपिणे , कपडेलत्ते पुरवणे अशी आमिषे दाखवावी लागत, फुले दाम्पत्याला सुद्धा असे करणे भाग पडले होते.
मात्र जॉन मरे मिचेल यांची मुस्लिम मुलींसाठी शाळा भारतातील हा असा पहिला प्रयोग नव्हता. त्याआधी कितीतरी वर्षे आधी स्कॉटिश मिशनरी वजीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरु केली होती. रेव्हरंड वजीर बेग यांना भारतातील मुस्लिम मुलींच्या आधुनिक शिक्षणाचे जनक म्हणता येईल. ही शाळा अल्पावधीत - बहुधा अल्प प्रतिसादाने - बंद पडली होती.
ही सर्व माहिती अनेक पुस्तकांत उपलब्ध असली तरी स्त्रीशिक्षणाच्या ग्रंथांत आणि जवळजवळ सर्वच फुले दाम्पत्याच्या चरित्रांत या माहितीचा उल्लेखच आढळत नाही.
स्त्रीशिक्षणाबाबत फुले दाम्पत्याने केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची माहितीपूर्ण असलेली आणि समग्र म्हणावीत अशी चरित्रे आजही लिहिली जात नाही याचे वैषम्य वाटते.

Camil Parkhe


पुण्यात स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत महात्मा जोतिबा फुले शिकले, सावित्रीबाई यांनी स्कॉटिश मिशनरी मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये अद्यापनाचे शिक्षण घेतले असा उल्लेख फुले दाम्पत्याचे अनेक चरित्रकार करतात.

हंटर शिक्षण आयोगासमोर दिलेल्या लेखी निवेदनात जोतिबा फुले म्हणतात की त्यांनी आपल्या शाळा मिसेस मिचेल यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्या अन् या शाळा आजही (१८८२ साली ) चालू आहेत.
याच निवेदनात जोतिबा म्हणतात की ``ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या वसतिगृही शाळॆत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे''.
या स्कॉटिश मिशन शाळेतील जोतिबा फुले यांचे शिक्षक कोण होते, फुले यांनी स्कॉटिश मिशन शाळेत काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली ती शाळा चालवणारे मिशनरी कोण याचा उल्लेख कुठल्याही फुले चरित्रांत चरित्रकार करत नाही.
जोतिबांनी सुरु केलेल्या शाळा पुढे चालवण्याची जबाबदारी घेणाऱ्या या मिसेस मिचेल कोण?
मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा सुरु करणाऱ्या जोतिबांचा पुण्यात १८५०च्या दशकाच्या. सुरुवातीला जंगी सत्कार करण्यात आला, शालजोडीही भेट म्हणून देण्यात आली.
या कौतुक समारंभाला हजर असलेल्या शहरातील देशी विदेशी प्रतिष्ठित व्यक्तींची नावे त्याकाळच्या वृत्तपत्रांत झळकतात. फुले चरित्रांत ही नावे येतात, त्यामध्ये रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल ही नावे आहेत.
जोतिबांबरोबर या कामात त्यांना साथ देणाऱ्या सावित्रीबाई यांचाही या कार्यक्रमात सत्कार व्हायला हवा होता, तो झाला की.नाही हे आता कळणार नाही. हंटर आयोगातल्या निवेदनात हे शिक्षणकार्य आपल्या पत्नीच्या मदतीने केले असा सावित्रीबाईंना त्यांचे श्रेय देताना, त्यांचे ऋण मान्य करताना जोतिबा स्पष्ट उल्लेख करतात. जोतिबा या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात लिहितात:
``सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन १८५४ ( १८५३) च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनीं कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले. ’’
कोण आहेत हे जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल? काय म्हणून हे मिशनरी दांपत्य जोतिबांच्या सत्काराला उपस्थित होते?
हेच ते रेव्हरंड जेम्स मिचेल जोतिबांचे शिक्षक, ज्यांच्या स्कॉटिश शाळेत जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात इंग्रजी शिकले. ( जोतिबांचे हंटर कमिशनला दिलेले इंग्रजी निवेदन मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यांचे या भाषेवरील प्रभुत्व त्यातून दिसते.)
आणि जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस मिचेल म्हणजे सावित्रीबाईंच्या शिक्षिका मिसेस (मार्गारेट शॉ ) मिचेल.
यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाईंनी शिक्षकिणिचा (अद्यापनाचा ) अभ्यासक्रम पूर्ण केला ! याच मिसेस मिचेल यांनी जोतिबा दांपत्याने सुरू केलेल्या शाळा पुढे चालवल्या.
आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा असा भर मांडवात सत्कार होताना या मिशनरी मिचेल दाम्पत्याच्या भावना काय असतील याची आपण केवळ कल्पना करू शकतो.
स्कॉटलंडहून रेव्हरंड जेम्स मिचेल भारतात १८२९ साली आले. रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन आणि जेम्स मिचेल या दोघांनी पुण्यात स्कॉटिश मिशनचे कार्य पुण्यात १८३० साली सुरु केले, येथे शाळा सुरू केल्या.
याच शाळांत जोतिबा फुले, त्यांचे मित्र (आणि नंतर त्यांच्या समाजकार्यातले सहकारी) सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे यांचे शिक्षण झाले असे धनंजय कीर आणि इतर फुले चरित्रकार लिहितात.
जेम्स मिचेल यांच्या जोडीला पुण्यात नंतर रेव्हरंड जॉन मरे मिचेल आले. तिथल्या संस्कृत कॉलेज (नंतर पूना कॉलेज आणि आताचे डेक्कन कॉलेजचे) प्रिन्सिपल किंवा व्हिझिटर बनले आणि जोतिबा फुले यांचे घनिष्ट स्नेही बनले.
जॉन मरे मिचेल यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्याकाळच्या सामाजिक स्थितीचा तो एक उत्तम दस्तऐवज आहे, मात्र फुले दाम्पत्याच्या बहुतेक चरीत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
जोतिबांच्या चरित्रातील उल्लेख होणाऱ्या `चटईचा विटाळ' आणि `वर्गातल्या अस्पृश्य विद्यार्थ्याना ढेकळाने मारणारे पंतोजी' वगैरे घटना या जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलेल्या आहेत.
अलीकडेच मी जोतिबा फुले यांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि सावित्रीबाई यांच्या अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर येथील शिक्षिका मिस सिंथिया फरारबाई यांचे चरित्र लिहिले.
आता जोतिबांचे शिक्षक असलेल्या रेव्हरंड जेम्स मिचेल यांचेही चरित्र लिहिले आहे. हे चरित्र जेसुईट धर्मगुरूंच्या संस्थेतर्फे `स्नेहसदन', पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या `निरोप्या' मासिकाच्या या महिन्याच्या (डिसेंबर २०२३) नाताळ विशेषांकात प्रसिद्ध झाले आहे.
विशेष म्हणजे `निरोप्या' हे मराठी पत्रकारितेतील एक सर्वांत दीर्घायुषी (स्थापना १९०३) नियतकालिक आहे.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्रावर आधारित त्यांचे सविस्तर चरित्र मी लिहिले आहे, तेसुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल.

Camil Parkhe

Monday, September 18, 2023

नव्या तंत्रज्ञानाप्रमाणेच नव्या पिढीचेसुद्धा कौतुक

 कामिल सर.. मी अमुक अमुक... शकुंतला परांजपे यांच्याविषयी तुम्ही बोलाल का?

चारपाच दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांत मला अचानक महत्त्व आले होते, अनेकांनी माझी मुलाखत घेतली होती, काहींनी माझा तो जुनाच लेख पुन्हा प्रसारीत केला होता. राष्ट्रपातळीवरच्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) ने माझ्यावर खास लेख केला असल्याने राष्ट्रीय पातळीवर तो बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झाला होता.
विषय होता इंटरनॅशनल फेमस, अनेक तरुणींना आपल्या मोहजालात अडकवून त्यांची हत्या करणाऱ्या खतरनाक गुन्हेगार आणि `सेलिब्रिटी क्रिमिनल' असे वलय प्राप्त झालेल्या चार्ल्स सोबराजची नेपाळच्या तुरुंगातून सुटका झाली होती आणि आता म्हातारा झालेला तो मायदेशी फ्रान्सला रवाना होणार होता. तिहार तुरुंगातून पलायन करून फरार झालेल्या चार्ल्स सोबाराजला गोव्यात पर्वरी येथे पकडणारे मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे योगायोगाने सिंगापूरहून काही दिवसांसाठी मुंबई-पुण्यात परतले होते, त्यामुळे त्यांची अनेकांनी मुलाखत घेतली होती.
बैलगाड्याबरोबर नळ्याची पण यात्रा होत असते, इंग्रजीत "Basking in reflected glory" असे म्हणतात. त्याप्रमाणे चार्ल्स सोबराज आणि माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांच्यावर यानिमित्ताने प्रकाशझोत होता, आणि त्याच संदर्भात माझीसुद्धा मुलाखत घेतली जात होती.
याचे कारण म्हणजे जेव्हा मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांच्या टिमने पर्वरीत `ओ कोकेरो' हॉटेलात सोबराजच्या अक्षरशः मुसक्या आवळल्या आणि त्याला जेरबंद करून खासगी टॅक्सीतून मध्यरात्री गोव्यातून मुंबईला नेण्याची तयारी सुरु होती तेव्हा त्या रविवारी रात्री साडेनऊच्या आसपास तिथे म्हापशात मी हजर होतो. चाळीस वर्षांपूर्वी ..
त्या मुलाखतींनंतर लगेच आठवड्याभरात पुन्हा त्याच मराठी दैनिकाच्या कार्यालयातून मला मुलाखतीसाठी विचारणा होत होती आणि यावेळी निमित्त होते शकुंतला परांजपे यांची जयंती.
आणि या विषयावरच्या दुसऱ्या तज्ज्ञ म्हणून आणखी एक व्यक्ती होत्या. शकुंतलाबाईंप्रमाणेच सेलिब्रिटी असलेल्या त्यांच्या कन्या सई परांजपे...
आता शकुंतला परांजपे आणि माझे नेमके काय नाते? तर नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला शकुंतलाबाई आणि माझी चांगली गट्टी जमली होती. आमच्या दोघांच्या वयांत साठ वर्षांचा फरक होता. त्या आयुष्याच्या नव्वदीकडे वाटचाल करत होत्या आणि मी तिशीकडे.
त्यावेळी मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये कामाला होतो, बातमीदार म्हणून शकुंतलाबाईना पद्मभूषण मिळाले तेव्हा त्याची मी मुलाखत घेतली होती. आणि दुसरे म्हणजे आम्ही दोघे सख्खे शेजारी होतो. पुण्यात डेक्कनला शकुंतलाबाई परांजपे या हॉटेल वैशालीमागच्या आपल्या `पुरुषोत्तम' बंगल्यात म्हणजे परांजपे बंगल्यात राहत होत्या आणि त्याच फर्ग्युसन रोडच्या दुसऱ्या बाजूला ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी (BCL) मागे रानडे इन्स्टिट्युटसमोर हॉटेल हिलव्हयुच्या लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर मी राहायचो. त्यामुळे लेखाच्या बातमीचा संदर्भात नियमितपणे त्यांना भेट द्यायचो.
त्यावेळी या भेटी दरम्यान त्या मला आपल्या विदाऊट फिल्टर पनामा सिगारेट ऑफर करायच्या आणि मग त्यावेळी चेन स्मोकर असलेल्या मला माझी फोर स्केेअर सिगारेट ओढायची परवानगी आणि धाडसही नसायचे. तोपर्यंत शकुंतलाबाईंच्या स्वभावाची मला चांगली ओळख झाली होती. .खूप काही सांगता येईल ते मी माझ्या शकुंतलाबाईंवरच्या लेखात लिहिले आहे.
आणि त्याच लेखाच्या संदर्भात मला आज या दैनिकाच्या हापिसातून फोन आला होता. त्यासंदर्भात माझी पॉडकास्ट मुलाखत घेतली जाणार होती.
माझ्या सवयीप्रमाणे नेहेमीप्रमाणे मी नमनालाच घडाभर तेल ओतले आहे. मुद्द्यावर येतो. विषय चार्ल्स सोबराज किंवा शकुंतलाबाई परांजपे किंवा अस्मादिक पण नाही.
मुलाखत सुरु करण्यापूर्वी प्राथमिक चर्चेत मुलाखतकर्त्या तरुणीला विचारले कि तिने माझे शकुंतलाबाई परांजपे यांच्यावर लिहिलेले लेख वाचले आहेत का?
अपेक्षेप्रमाणे होकारात्मक उत्तर आले, पण त्याहून अधिक धक्कादायक माहिती समोर आली.
त्या मुलीने शकुंतलाबाईंच्या नामांकित कन्येची म्हणजे अर्थातच सई परांजपे यांची मुलाखत बेळगाव येथे झाली तेव्हा आपल्या पालकांसह तिने ऐकली होती.
त्यानंतर तिने त्या मुलाखतीतला एक प्रसंग मला सांगितला.
"छोटी सई शाळेत जायची तेव्हा अनेक महिला तिला विचारायच्या. ``तुझे वडील कोण गं ? काय करतात ते? तुझी आई कपाळावर कुंकू का लावत नाही..?"
एक ना एक, भाराभर चौकशा..
घरी आल्यावर छोटी सई आपल्या आईला शकुंतलाबाईना हे सांगायची. त्यावर खमक्या शकुंतलाबाई परांजपे यांनी आपल्या लहानगीला एक जालीम उत्तर शिकवले.
पुढच्या वेळेला त्या बायांनी सईला घेरले आणि तिच्या वडलांविषयी विचारले तेव्हा आईने शिकवल्याबरहुकुम सईने आपल्या कंबरेवर एक हात ठेवला, दुसरा हात हवेत प्रश्नांकित पद्धतीने उंचावत प्रतिप्रश्न केला.
"पण तुम्ही या चांभारचौकशा कशाला करता?"
त्या दिवसानंतर शाळेत सईला या नाना प्रश्नांपासून सुटका मिळाली. "
त्या दैनिकाच्या छोट्याशा स्टुडिओत मुलाखतकर्त्या मुलीने आपली खुर्ची सोडून, उभे राहून आणि कंबरेवर हात ठेवून साभिनय हा प्रसंग सादर केला तेव्हा मी थक्क झालो होतो.
आपल्या विषयाचे त्या तरुण पत्रकार मुलीला पूर्ण ज्ञान होते, मी काही त्या विषयातला तसा तज्ज्ञ नव्हतो. केवळ एक व्यावसायिक गरज म्हणून समोर मला ठेवून ती आपले काम करत होती याची मला तेव्हा जाणिव झाली.
या आधुनिक काळातील नवी पिढी माहिती, ज्ञान आणि कौशल्य या बाबतीत किती पुढे गेली आहे याची हा प्रसंग एक चुणूक होता.
(खूप म्हणजे तिसेक वर्षांनंतर, सई मोठ्या झाल्यानंतर आपल्या वडलांना रोम (`रोमा' ) विमानतळावर भेटल्या, तेव्हाचा प्रसंग त्यांनी `नोएल' या लेखात रेखाटला आहे. ''ए मुली, तुझे वडील कुठे असतात ग? " या वाक्याने मला बेजार केले होते'' असे त्यांनी या लेखात लिहिले आहे. ``बापलेकी'' या पद्मजा फाटक, दिपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस संपादित मौज प्रकाशनच्या पुस्तकात हा लेख मी अलीकडेच वाचला. -सौजन्य: मुक्ता अशोक टिळक, नाशिक , सई परांजपे यांचा हा लेख वाचताना तो सर्व भूतकाळ जिवंत उभा राहिल्यासारखा वाटला. )
या प्रसंगाने पत्रकारितेच्या क्षेत्रात चार दशके घालवलेल्या मला खूप काही शिकवले. या क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाविषयी आणि महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रातील नव्या पिढीबाबत..
दोन्हीही खूप, खूप आश्वासक आहेत..
सुरुवातीच्या काळात मराठी माध्यमातल्या असलेल्या मी बीए झाल्यानंतर पणजीला `द नवहिंद टाइम्स'मध्ये थेट इंग्रजी पत्रकारीतेत पाऊल टाकून पणजीला द नवहिंद टाइम्स मध्ये अनेक वर्षे टक्केटोपणे खात हळूहळू काय प्रगती केली ते मलाच माहित आहे.. आताच्या पिढीला पाण्यात उतरल्यावर लगेच पोहायला सुरुवात करावी लागते.
त्यामुळेच नव्या तंत्रज्ञानाप्रमाणेच नव्या पिढीचेसुद्धा खूप कौतुक वाटते.
`महाराष्ट्र टाइम्स'च्या मटा गोल्ड पॉडकास्ट ने या आठवड्यात एक वर्षपूर्ती केली. त्यानिमित्त ही टिपण्णी..
^^^

Saturday, August 26, 2023

 


मध्ययुगीन काळात, ब्रिटिश आमदानीत आणि नंतरही भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक संस्कृतीतील विविध जातींनी आणि जमातींनी प्रवेश केला आणि तिथे आपले पाय मजबूत रोवले. हे कसे घडले त्याची ही त्याची ही कथा.
केरळ राज्यात ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकापासून आहे. तिथले ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक असलेल्या संत थॉमसचा वारसा सांगतात. सोळाव्या आणि सतराव्या शतकांत युरोपियन मिशनरींनी गोव्यात, मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वसई येथे आणि दक्षिण भारतात मदुराई वगैरे परिसरांत धर्मप्रसार केला तेव्हा या धर्मांतरीत लोकांनी आपल्याबरोबर आपल्या जाती, जमाती आणि या जातीजमाजातींशी निगडित असलेल्या प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजात आणल्या. ख्रिस्ती मिशनरींनी आणि त्यांच्या धर्माधिकाऱ्यांनी हे धकवून घेतले. पोर्तुगिजांची गोव्यात राजवट असल्याने तिथे धर्मांतरानंतर काही प्रमाणात या प्रथापरंपरांना आळा बसला, मात्र पोर्तुगीज राजवट या धर्मांतरीतांच्या मूळ जातीजमाती आणि त्यासंबंधी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरा समुळपणे नष्ट करु शकली नाही हेसुद्धा तितकेच खरे.
दक्षिण भारतात ख्रिस्ती ब्राह्मणांनी जानवे घालणे, शेंडी राखणे, कपाळावर भस्म चोपडणे¸संन्याशी, गुरू म्हणून भगवी वस्त्रे परिधान करणे हे ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत की सुसंगत आहे याबाबत उहापोह मदुराईत आणि अगदी इटलीमधल्या रोमपर्यत चालला होता. या प्रकरणात असले हे प्रकार नवधर्मांतरीत ख्रिस्ती समाजात रूढ करणाऱ्या इटालियन जेसुईट फादर रॉबर्ट डी नोबिली यांचे धर्मगुरुपदाचे तसेच बाप्तिस्मा करण्याचे अधिकार निलंबित करण्यात आले होते.
मात्र याबाबत दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर रोमस्थित पोपमहाशयांनी अखेरीस रॉबर्ट डी नोबिली यांचे म्हणणे मान्य केले. अशाप्रकारे आडपडद्याने का होईना जातीव्यवस्थेने ख्रिस्ती समाजात प्रवेश केला आणि यथावकाश तेथे मग मजबूत बस्तान बसवले.
देशाच्या इतर भागांत मध्यगीन काळात आणि अव्वल ब्रिटिश अमदानीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला आणि त्याकाळात हा धर्म खऱ्या अर्थाने राष्ट्रपातळीवरचा आणि इथल्या सर्व - वरच्या, मध्यम स्तरावरच्या आणि खालच्या गणल्या जाणाऱ्या - जातींचा आणि जमातींचा बनला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या मुंबई बंदरात तीन अमेरीकन मिशनरींनी १२ फेब्रुवारी १८१२ रोजी मुंबई बंदरात पाऊल ठेवला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलात असलेल्या भारतात ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर असलेली बंदी ब्रिटीश संसदेने १८१३ला उठवली. त्यानंतर अमेरिकन आणि स्कॉटिश मिशनरींनी मुंबईत आणि नजिकच्या परिसरांत भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराचे, आधुनिक शिक्षणाचे आणि त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रबोधनाचे नवे युग सुरु झाले.
आधुनिक भारतात प्रवेश करणारे आद्य परदेशी मिशनरी असलेल्या गॉर्डन हॉल यांनी आपल्या घरात आश्रय दिलेल्या एका आफ्रिकन मुलाचा -डॅनियलचा - १२ जुलै १८१८ रोजी बाप्तिस्मा केला, आधुनिक काळात ख्रिस्ती मिशनरींनी भारतात केलेला हा पहिला बाप्तिस्मा. मात्र बाप्तिस्मा करणारे आणि स्विकारणारी व्यक्ती दोघेही परदेशी होते.
या काळात ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणारी पहिली एतद्देशीय व्यक्ती मुसलमान होती हे या अमेरिकन मराठी मिशनचा इतिहास वाचला कि स्पष्ट होते. मोहंमद कादिन किंवा कादेर यार खान या मुळच्या हैदराबादचा असलेल्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मुस्लीम व्यक्तीचा मुंबईत २५ सप्टेंबर १८१९ रोजी बाप्तिस्मा झाला.
मॅन्युएल अंतोनिओ या रोमन कॅथोलिकाचा १८२५ साली पुन्हा एकदा प्रोटेस्टंट पंथात बाप्तिस्मा देण्यात आला आणि हेसुद्धा `धर्मांतर' असेच गणले गेले. उमाजी गोविंद या चांभार व्यक्तीने १८२७ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
स्कॉटिश मिशनरींनी कोकणात हर्णै आणि बाणकोट येथे मिशनकार्य म्हणजे शाळा चालवणे आणि धर्मप्रसार करणे सुरु केले. डोनाल्ड मिचेल, जॉन कुपर, जेम्स मिचेल, ए क्रॉफर्ड आणि रॉबर्ट नेस्बिट हे ते स्कॉटिश आद्य मिशनरी.
इथल्या समाजात जात किती खोलवर रोवलेली आहे याचा अनुभव या आद्य मिशनरींना खूप लवकर आला. ही घटना १८२७च्या आसपासची आहे. या मिशनरींच्या मिशनकामाला यश येऊन एका हिंदु व्यक्तीने ख्रिस्ती धर्म स्विकारला होता. त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही आठवड्यांनीं या मिशनरींनी प्रभुभोजनाचा म्हणजे येशु ख्रिस्ताच्या `लास्ट सपर’ किंवा शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ केला जाणारा विधी चर्चमध्ये आयोजित केला होता. या विधीसाठी सर्व जण एकत्रित बसले होते.
प्रभुभोजन सुरु होणार तोच नव्यानेच ख्रिस्ती झालेला तो माणूस तटदिशी उभा राहिला, ''नाही, नाही. मी माझी जात इतक्या लवकर सोडणार नाही,'' असे म्हणत त्याने त्या चर्चबाहेर धूम ठोकली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हा पुराण सांगणारा ब्राह्मण ख्रिस्ती झाला होता. उच्चवर्णीय ब्राह्मण जातीतल्या मराठी लोकांपैकी ख्रिस्ती झालेला हा पहिला माणूस. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिकने लढवला होता.
प्रभु समाजातील दाजिबा निळकंठने ५ डिसेंबर १८३० रोजी ख्रिस्ती समाजाची दीक्षा घेतली,. कोकणातील देवाचे गोठणे येथील एक ब्राह्मण बाबाजी रघुनाथ मराठे बाणकोट २० नोव्हेंबर १८३१ रोजी ख्रिस्ती झाला.
ब्राह्मण बाबाजी रघुनाथचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेचच त्याचा एका ब्राह्मण विधवेशी विवाह झाला. लग्नाआधीच ते दोघे एकत्र राहत होते, म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते.
त्याकाळात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते. या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पाच दशकांनंतर १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही बहुधा पहिलीच घटना असावी. महर्षी केशव धोंडो कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या आश्रमातील गोदू या विधवेशी १८९३ ला पुनर्विवाह केला होता तो तब्बल सहा दशकांनंतर.
बाबाजी रघुनाथ या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
ब्राह्मण विधवेचा हा पुनर्विवाह ज्या दिवशी झाला त्याच दिवशी त्याच चॅपेलमध्ये (प्रार्थनामंदिरात ) आणखी एक मोठी किंवा त्याहून अधिक क्रांतिकारक घटना घडली होती. ती म्हणजे ब्राह्मण बाबाजी रघुनाथला बाप्तिस्मा देण्यात आला त्याच दिवशी महार जातीच्या गोपी या महिलेचेसुद्धा ख्रिस्ती धर्मात स्वागत करण्यात आले. हिंदू धर्मातील दोन विरुद्ध असलेले टोक अशाप्रकारे पहिल्यांदाच ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे.
अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगर शहराच्या वेशीच्या आत सर्वप्रथम बाप्तिस्मा केला तो त्यांच्याकडे डॉ. ग्रॅहॅम यांनी सुपूर्द केलेल्या पुअर हाऊसमधील दृष्टिहीन, मूकबधिर, अपंग आणि अनाथ लोकांचा. कुटुंबियांनी आणि समाजाने टाकून दिलेल्या या अनाथ आणि अपंग व्यक्तींच्या मूळ जातीजमाती काय होत्या हे कळणे अशक्य आहे. या डॉ. ग्रॅहॅम यांनीच अमेरिकन मिशनच्या लोकांचे अहमदनगर शहरात १८३१ साली स्वागत केले होते.
मुंबईत उच्चभ्रु गणल्या जाणाऱ्या पारशी समाजातील काही तरुणांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती, कोर्टकचेऱ्यासुद्धा झाल्या होत्या.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
या दोन पारशी तरूणांपैकी होरमसजी पुढे ख्रिस्ती धर्मगुरू झाला, स्कॉटलंडमध्ये धर्मशिक्षण पुर्ण केले आणि भारतात दीर्घकाळ मिशनकार्य केले, त्यांनी आपले आत्मचरित्रसुद्धा लिहिले आहे.
मुंबईत परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याचा अंमल सुरु झाला होता, या कायद्यासमोर न्यायालयात आणले जाणारे सर्व फिर्यादी आणि समान होते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आले आहे असा आरोप करणारे कलम असणारे `हेबीअस कॉपर्स' चा खटला या निमित्ताने भारतात पहिल्यांदाच चालवला गेला असणार.
रेव्हरंड नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले.
सोराबजी खारसेटजी लांगराना हा मुंबईतला पारशी तरुणही त्यानंतर लगेचच ख्रिस्ती झाला. फ्रान्सीना सांत्या या निलगिरी प्रदेशातील तोडा आदिवासी जमातीच्या असलेल्या मात्र ब्रिटिश रेजिमेंट अधिकारी सर फ्रान्सिस फोर्ड आणि त्यांची पत्नी कोर्नेलिया यांनी सांभाळलेल्या मुलीशी सोराबजी याचे लग्न झाले. सोराबजी १८७८ ला आपली सरकारी नोकरी सोडून पूर्ण वेळ ख्रिस्ती मिशनरी बनले. त्यांच्या पत्नीने फ्रान्सीना सांत्या यांनी पुण्यात बालवाडी (नंतरची व्हिक्टोरिया स्कुल), इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळा सुरु केल्या .
सोराबजी हा पारशी ख्रिस्ती तरुण आणि त्यांची तोडा आदिवासी पत्नी फ्रान्सीना सांत्या यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे भारतातली पहिली महिला वकिल कॉर्नेलिया सोराबजी यांचे हे दोघे पिता आणि माता.
जॉन विल्सन यांचे परमस्नेही असलेल्या व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची मुलगी वेणुबाई हिने वैधव्यानंतर एका ख्रिस्ती कुटुंबाच्या सहवासात राहून शिक्षण घेतले आणि तिने ख्रिस्ती धर्मही स्वीकारला होता.
पंजाबचे राजा रणजितसिंग यांच्या मृत्युनंतर ब्रिटिशांनीं पंजाबचे राज्य खालसा केले. रणजितसिंहांचा पंधरा वर्षांचा मुलगा युवराज दुलिपसिंह दुलिपसिंह ख्रिस्ती होतो आणि काहीं काळानंतर इंग्लंड येथेच स्थायिक होतो. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेणारा युवराज दुलिपसिंह हा पहिला सेलिब्रिटी किंवा वलयांकित शीखधर्मीय. भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर या दुसऱ्या वलयांकित व्यक्ती.
पंजाबमध्ये आणि संपुर्ण भारतात ख्रिस्ती धर्मप्रसार करणाऱ्या मिशनरींमध्ये साधू सुंदरसिंग या मूळच्या शीखधर्मीय असलेल्या गूढवादी किंवा मिस्टिक धर्मगुरुचा समावेश होतो.
अहमदनगरच्या हरिपंत ख्रिस्ती या देशस्थ ब्राह्मण तरुणाचा १३ एप्रिल १८३९ रोजी बाप्तिस्मा झाला.
१८५४ साली हरिपंत रामचंद्र खिस्ती आणि रामकृष्ण विनायक मोडक यांचा धर्मोपदेशक म्हणून दीक्षाविधी झाला. महाराष्ट्रात इतद्देशियांपैकी धर्मोपदेशक म्हणून दीक्षा मिळणारे ते पहिलेच दोन तरुण. येथील मराठी समाजात ख्रिस्ती धर्मप्रसार करणारे इथल्या मातीतील हे पहिले दोन मिशनरी. यापैकी रामकृष्णपंत विनायक मोडक हे अनेक चित्रपटांत कृष्णाच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांचे पणजोबा.
हरिपंत खिस्ती हे इंग्रजीतील `सगुणा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी लिहिणाऱ्या आणि खालावलेल्या प्रकृतीमुळे वैद्यकीय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागणाऱ्या कृपा सत्यनाथन या महिलेचे वडील. ``सगुणा : अ स्टोरी ऑफ नेटिव्ह ख्रिश्चन लाईफ'' ही कादंबरी १८८७ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत लिखाण करणारी कृपा सत्यनाथन ही पहिली भारतीय स्त्री-कादंबरीकार .
त्याकाळात पुण्यामुंबईत स्कॉटिश आणि अमेरिकन मिशनरींच्या संपर्कात आलेल्या अनेक सुशिक्षित ब्राह्मण व्यक्तींनी ख्रिस्ती धर्म स्विकारला आणि इथल्या उच्चभ्रू समाजात धोक्याची घंटा लावली. यथावकाश योग्य ती पावले उचलून आणि विविध सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक मंडळे / समाज स्थापन करुन ख्रिस्ती धर्माचे हे आक्रमण रोखण्यास बऱ्यापैकी यश आले.
त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींनी आपला लक्ष महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील दुर्लक्षित, उपेक्षित, गावच्या वेशीबाहेर हुसकावून लावलेल्या समाजघटकांकडे वळवले. मिशनरींच्या सुदैवाने त्यावेळी तरी या लोकांना मिशनरींनी जवळ करण्याबाबत, त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक गरज पुरवण्याबाबत समाजातील पुढारलेल्या वर्गांचे काही एक आक्षेप नव्हते.
यानंतर अनेक मातंग आणि महार लोकांनी सामुदायिकरीत्या प्रभूच्या राज्यात प्रवेश केला. शिऊरचा भागोबा काळेखे हा मातंग जातीतला पहिलाच धर्मांतरीत होता. अहमदनगरच्या चर्चमध्ये भागोबाने पहिल्यांदा पाऊल ठेवले त्या क्षणाला त्या देवळात कमालीचे उत्साहाचे औत्सुकाचे वातावरण होते.
भागोबा पूर्वी तमासगीर होते. या पार्श्वभूमीमुळे त्यांनी मराठीत अनेक ख्रिस्ती गायने लिहिली. ख्रिस्ती धर्मातील अस्सल मराठी गायनांची रचना करण्याचा मान अशाप्रकारे भागोबा यांच्याकडे जातो.
या ख्रिस्ती धर्मात ब्राह्मण, धनगर, तेली, साळी, मराठा, मातंग, महार, कायस्थ प्रभू, आणि इतर कैक जातीजमातींचे लोक गुण्यागोविंदांचे नांदू लागले. `यमुनापर्यटन' ही मराठी भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे कासार जातीचे. पंडिता रमाबाई, निळकंठशास्त्री नेहेम्या गोरे, मराठी पंचकविंमध्ये समावेश असणाऱे रेव्हरंड नारायण वामन टिळक वगैरे नामवंत मंडळी चित्पावन ब्राह्मण होती.. पुण्यात भर पेठवस्तीत म्हणजे कसबा पेठेत ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च आहे हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता.
अशाप्रकारे ख्रिस्ती समाजात स्वतःला सारस्वत ब्राह्मण म्हणवून घेणारे लोक आहेत त्याचप्रमाणे रेड्डी ख्रिस्ती आहेत, अय्यंगार, नायर, नंबुद्रीपाद ख्रिस्ती आहेत आणि पुर्णो संगमा यांच्या कुटुंबासारखे ईशान्य भारतातील आदिवासीसुद्धा ख्रिस्ती आहेत.
कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या कॅथोलिक चर्चच्या धर्माधिकाऱ्यांच्या संघटनेची पुण्यात १९९२ साली बैठक झाली तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि `लोकसत्ता’त पुर्ण पानभर जाहिरातीत देशातील या सर्व बिशपांचे नावांसहीत फोटो छापण्यात आले होते तेव्हा जातीजमाती दर्शवणाऱ्या नावांची ही यादी वाचून मला स्वतःला धक्काच बसला होता.
ईशान्य भारतातल्या काही राज्यांत ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहेत आणि जवळजवळ सर्वच लोक आदिवासी आहेत आणि त्यांना अनुसूचित जमातींना लागू असणाऱ्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
विविध जतिजमातीतील लोकांनी आपल्या आधीच्या चालीरीती म्हणजे लग्नकार्य आणि इतर सांस्कृतिक प्रथापरंपरा ख्रिस्ती समाजातही आणल्या आहेत. उदाहरणार्थ लग्नकार्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, खाद्यसंस्कृती वगैरेवगैरे.
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातल्या ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जातीच्या सवलती नसल्या तरी भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः खानदेश, पालघर जिल्हा वगैरे भागांतल्या सर्व आदिवासी ख्रिस्ती लोकांना अनुसूचित जमातीच्या सर्व सुविधा आणि आरक्षण लागू आहेत.
अशाप्रकारे उच्च वर्णीय ब्राह्मण, विविध तथाकथित ओबीसी समाजातील तसेच दलीत आणि आदिवासी अशा विविध जाती आणि जमातींचा देशातील आणि राज्यातील ख्रिस्ती समाजात समावेश होतो.
ख्रिस्ती समाजात अशाप्रकारे विविध जाती जमाती अगदी खुल्या स्वरूपात अस्तित्वात असल्या तरीसुद्धा ख्रिस्ती धर्मात मात्र जातीभेद नाही असे ठोसपणे म्हणता येते.
हे नंतर अगदी सविस्तरपणे पुढल्या पोस्टमध्ये…