Wednesday, April 27, 2022

`निरोप्या'कार आर्चबिशप हेन्री डोरिंग

बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली ‘दर्पण’ मासिक सुरू करून मराठी वृत्तपत्रकारितेचा पाया रोवला. त्यानंतर मराठी भाषेत अनेक नियतकालिके सुरू करण्यात आली. यापैकी बहुतेक नियतकालिके आज काळाच्या ओघात गडप झाली आहेत. ‘ज्ञानोदय’ हे 1842 साली सुरू झालेले नियतकालिक आजही पुण्यातून प्रसिद्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वळण या आजही अत्यंत आडवळणाच्या ठिकाणी असलेल्या खेडेगावी फादर हेन्री डोरिंग या येशूसंघीय जर्मन धर्मगुरूने ‘निरोप्या’ हे मासिक 1903 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू केले. हे मासिक अजूनही पुण्यातून प्रकाशित होत आहे.

4 जानेवारी 1881 पासून गोपाळ गणेश आगरकर यांच्या संपादकत्वाखाली ‘केसरी’ हे नियतकालिक सुरू झाले. त्यामुळे सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेल्या मराठी नियतकालिकांमध्ये ‘निरोप्या’ या मासिकाने या एप्रिल २०२२ महिन्यात एकशेविसाव्या वर्षांत पदार्पण केले आहे ही बाब कौतुकास्पद आहे.
मराठी भाषिक कॅथोलिक समाजाची आध्यात्मिक गरज भागविणाऱ्या, या समाजातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वृत्त पुरविणाऱ्या या मासिकाची महाराष्ट्रातील विविध भागातील त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यातील मराठी भाषक ख्रिस्ती वाचक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. यावरून या मासिकाची लोकप्रियता लक्षात येते.
हिंदू मागासवर्गीय जातींतून नव्यानेच ख्रिस्ती धर्मात आलेल्या अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या समाजासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नियतकालिक सुरू करणारे फादर हेन्री डोरिंग हे धर्मगुरू निश्चितच द्रष्ट्ये मिशनरी होते हे यावरून दिसून येते. ‘निरोप्या’च्या या संस्थापकाचे त्यामुळे मराठी भाषिक ख्रिस्ती समाजावर आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेवर मोठे ॠण आहेत.
विशेष म्हणजे ‘ज्ञानोदय’ आणि ‘निरोप्या’ ही मराठीतील दोन्ही दीर्घायुषी मासिके मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाची मुखपत्रे आहेत. ‘ज्ञानोदय’ हे रेव्ह. हेन्री बॅलन्टाईन या अमेरिकन धर्मगुरूने सुरू केलेले नियतकालिक प्रॉटेस्टंट समाजात, तर ‘निरोप्या’ हे कॅथोलिक समाजात प्रामुख्याने वितरित केले जाते. या मासिकांचा खप केवळ ख्रिस्ती समाजापुरताच मर्यादित असला तरी महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराचे या नियतकालिकांत प्रतिबिंब उमटत असल्याने संपूर्ण मराठी समाजाची ही मासिके एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत.
हेन्री डोरिंग यांचा जन्म जर्मनीत बोकोल्ट येथे 13 सप्टेंबर 1859 रोजी झाला. 1882 मध्ये त्यांना गुरुदीक्षा मिळाली. 1895 मध्ये फादर डोरिंग यांचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीपाशी असलेल्या वळण येथे आगमन झाले. वळण शेजारी असलेले केंदळ हे गाव अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या खेडेगावातूनच कॅथोलिक मिशनरींनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वप्रथम धर्मप्रसार सुरू केला. आज अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, बीड, पुणे या जिल्ह्यात मराठी भाषिक कॅथोलिक ख्रिस्ती समाजाची मोठी संख्या आहे. यापैकी बहुसंख्य लोकांनी पूर्वाश्रमीच्या हिंदू महार या अस्पृश्य जातीतून ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला.
फादर डोरिंग वळण येथे आले तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्य नुकतेच सुरू झाले होते. अस्पृश्य जातीतून अनेकजण ख्रिस्ती धर्मात येत होते तरी केवळ धर्मांतरामुळे त्यांच्या सामाजिक वा शैक्षणिक परिस्थितीत एकदम मोठा बदल होत नव्हता. या नवख्रिस्ती समाजाला शिक्षित करण्यासाठी मिशनऱ्यांनी प्राथमिक शाळा सुरू केल्या. या नवसाक्षरांसाठी ख्रिस्ती धर्माचे ज्ञान देण्यासाठी मग या मिशनऱ्यांनी स्वतः मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि नंतर या भाषेत धर्मशिक्षणाची पुस्तकेही तयार केली.
फादर डोरिंग वळणला येण्याआधीच काही मिशनऱ्यांनी मराठी भाषेत धर्मशिक्षणाची काही पुस्तके लिहिली होती असे दिसते. अहमदनगर आणि नजिकच्या जिल्ह्यातील कॅथोलिक समाजातील पहिल्या पुस्तकाचा मान ‘लहान कॅथेखिसम’ या धर्मशिक्षणविषयक पुस्तकाला मिळतो. या पुस्तकाच्या लेखकाच्या नावाची नोंद मिळत नसली तरी या पुस्तकाचे लेखक केंदळ वळणमध्येच काम करणारे फादर दालिंग असावेत असे फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांनी म्हटले आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असणारे आणि रोम येथील विद्यापीठात तौलनिक धर्मशास्त्राचे प्राध्यापक असणारे फादर शेळके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्यावर संशोधन केलेले आहे.
फादर शेळके पुढे म्हणतात की, फादर डोरिंग केंदळ वळण येथे स्थायिक झाले तेव्हा त्यांना स्थानिक लोकांमध्ये ‘सुभक्तीसार’ या शीर्षकाचे धर्मशिक्षणाचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे असे आढळले.
फादर डोरिंग यांच्या आधी म्हणजे 1892 च्या मध्यास केंदळ येथे आलेल्या फादर फ्रान्सिस ट्रेनकाम्प यांनी ‘सुभक्तीसार’ हे पुस्तक 1895 पूर्वी लिहून प्रसिद्ध केले. फादर ट्रेनकाम्प यांनी मराठी भाषेचा चांगला अभ्यास केला. या पुस्तकासाठी त्यांनी पुण्या-मुंबईच्या पुस्तकात आढळणाऱ्या भाषेऐवजी अहमदनगर जिल्ह्यात प्रचलित असलेल्या बोलीभाषेचा वापर केला. थोडेफार शिक्षण झालेले नवख्रिस्ती लोक या पुस्तकाचा वापर करत. देवळात मिस्साच्या वेळी प्रार्थना करण्यासाठीही धर्मगुरू या पुस्तकाचा वापर करत असत.
धर्मकार्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या फादर डोरिंग यांना केवळ ‘लहान कॅथेखिसम’, ‘मोठे कॅथेखिसम’ या भाषांतरित आणि ‘सुभक्तीसार’ या पुस्तकांचाच उपयोग करावा लागत असे. त्याकाळी मिशनऱ्यांना आपल्या घरापासून लांबवर असलेल्या खेडेगावात उपदेशासाठी, मिस्सासाठी जावे लागत असे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना ख्रिस्ती धर्माचे मराठीतून धर्मज्ञान देण्यासाठी त्याकाळी मराठी भाषेत पुस्तकेच नसल्याने या भाषेत धर्मविषयक साहित्याची निर्मिती करण्याची गरज फादर डोरिंग यांना भासू लागली. अशा प्रकारचे साहित्य नसल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना ख्रिस्ती धर्माची शिकवण देणाऱ्या धर्मशिक्षकांना किंवा पालकांना त्यांचे कार्य करणे कठीण जात होते.
या समस्येवर उपाय म्हणून फादर डोरिंग यांनी मराठी भाषेतून धर्मविषयक माहिती देणारे मासिक सुरू करण्याचे ठरविले. येशूसंघाच्या अधिकाऱ्यांनी या मासिकासाठी आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. अशाप्रकारे 1903 च्या एप्रिल महिन्यात फादरनी ‘येशूच्या अतिपवित्र हृदयाचा निरोप्या’ या आपल्या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.
तेव्हापासून पहिल्या महायुद्धाच्या काळातील काही वर्षांचा अपवाद वगळता ‘निरोप्या’ आजपर्यंत नियमितपणे प्रकाशित होत आहे. येसूसंघ या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या मालकीचे हे नियतकालिक असल्याने केवळ एक अपवाद वगळता गेली १२० वर्षे येशूसंघीय धर्मगुरूच या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
फादर डोरिंग यांनी ‘निरोप्या’सुरू केल्यानंतर या मासिकात लिहिण्यासाठी स्वतःच्या मराठी भाषेच्या ज्ञानात अधिक भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषेतील शब्द, हिंदू धर्मसाहित्यात वापरले जाणारे शब्द तसेच संकल्पना ते शिकले. या ज्ञानाचा वापर करून आपले मासिक नवसाक्षर नवख्रिस्ती लोकांसाठी अधिकाधिक उपयुक्त करण्याचा ते प्रयत्न करू लागले.
फादर डोरिंग हे या मासिकाचे संपादक आणि लेखकही होते. सुरुवातीच्या काळात ‘निरोप्या’ मुंबईतील ‘एक्झामिनर’ प्रेसमध्ये छापले जात असे. ‘निरोप्या’च्या पहिल्या अंकाची एकूण दहा पाने होती आणि त्यात पाच विषयांवर लेख होते. एप्रिल महिन्यासाठी प्रार्थनेचा विषय, पवित्र मिस्साचा चाकर होणे, लिओ तेरावे परमगुरुस्वामींचा (पोप) सण, तुझे राज्य येवो आणि एक रक्तसाक्षी (हुतात्मा) हे ते पाच विषय होत.
राहुरी तालुक्यातील एका आडवळणाच्या ठिकाणी ‘निरोप्या’च्या संपादकांचे वास्तव्य होते आणि त्यांचे मासिक तर मुंबईतून प्रसिद्ध होत होते. त्यामुळे अंक वेळेवर छापला जाईल यासाठी संपादकांना खास प्रयत्न करावे लागत असत. आपल्या या मासिकाचा चौथा अंक तर खुद्द संपादक महाशयांनीच सरळ स्वतःच्या हाताने लिहून काढला होता असे दिसते. हा अंक त्यावेळी का छापला गेला नाही हे आजही स्पष्ट होत नसले तरी या मासिकाच्या हस्तलिखित प्रतींवरून आपले नियतकालिक वेळेवर प्रकाशित झाले पाहिजे याबद्दल फादर डोरिंग विशेष आग्रही होते हे दिसून येते.
‘निरोप्या’तून ख्रिस्ती संतांची चरित्रे आणि ख्रिस्ती जगातील विविध घडामोडींविषयी लेख असत. शंभरी गाठलेल्या या मासिकात आजही ही सदरे प्रसिद्ध होत आहेत. त्याशिवाय ख्रिस्ती अध्यात्मात अभिजात वाङ्मय समजल्या जाणाऱ्या खाळेीींंळे लहीळीींळ या लॅटिन पुस्तकाचा अनुवादही त्यांनी या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध केला. ‘ख्रिस्तानुवर्तन’ या नावाने या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायापर्यंत हे पुस्तक ‘निरोप्या’तून प्रकाशित केले गेले.
दर महिन्याला नियमितपणे प्रभूचा संदेश घेऊन ‘निरोप्या’ हे चिमुकले मासिक अहमदनगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील खेड्याखेड्यांतून प्रवासाला निघत असे. त्याकाळी पुस्तकांची किंवा मासिकांची वानवाच असल्याने या छोट्याशा नियतकालिकाने शंभर वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागातील ख्रिस्ती धर्मीय वाचकांची वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली असणार.
1907 मध्ये फादर डोरिंग यांची पुणे धर्मप्रांताचे महागुरुस्वामी किंवा बिशप म्हणून नेमणूक झाली. केंदळ वळण येथे असताना त्यांना केवळ आपल्या धर्मग्रामाची जबाबदारी सांभाळावी लागे. बिशप झाल्यानंतर त्यांना आता संपूर्ण पुणे धर्मप्रांतात येणाऱ्या विविध जिल्ह्यांच्या धर्मग्रामांचे धर्माधिकारी म्हणून काम पाहावे लागत असे. त्याकाळच्या पुणे धर्मप्रांतात पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली वगैरे जिल्ह्यांचा परिसर येत असे. बिशप म्हणून डोरिंग यांची जबाबदारी अनेक पटींनी वाढली तरीसुद्धा या साहेबांनी ‘निरोप्या’ चे संपादन आणि लेखन सोडले नाही. ‘निरोप्या’च्या संपादकांची धर्मगुरुपदावरून महाधर्मगुरुपदावर बढती होऊन पुण्याला बदली झाली तसे या मासिकाचे प्रकाशनस्थळही पुण्याला हलविण्यात आले.
पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले तेव्हा बिशप डोरिंग पोपमहाशयांना भेटण्यासाठी रोम येथे गेले होते मूळचे जर्मन असलेल्या बिशपांना ब्रिटिशांची वसाहत असलेल्या आपल्या कर्मभूमीत परतणे अशक्य झाले. पोपनी जपानमधील हिरोशिमा धर्मप्रांताचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांची 1921 साली नेमणूक केली. या काळातच आर्चबिशप हे ख्रिस्ती महामंडळातील आणखी एक उच्च पद त्यांना देण्यात आले.
जपानमध्ये नेमणूक झाल्यानंतरही आपल्या कर्मभूमीत परतण्याची डोरिंग यांची तीव्र इच्छा असावी असे दिसते, कारण ब्रिटिश सरकारची परवानगी मिळताच त्यांनी पुन्हा 1927 साली पुणे धर्मप्रांतातील मराठी ख्रिस्ती समाजाचे मेंढपाळ म्हणून पुन्हा एकदा सूत्रे हाती घेतली.
पुण्यात परतल्यानंतर केवळ सहाच महिन्यात म्हणजे जून 1928 मध्ये त्यांनी बंद पडलेल्या ‘निरोप्या’चे पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने प्रकाशन सुरू केले. ‘निरोप्या’ त्याच्या गुरूप्रमाणेच (येशू ख्रिस्ताप्रमाणे) पुनरुत्थित झाला’’ असे या घटनेचे फादर ख्रिस्तोफर शेळके यांनी वर्णन केले आहे.
‘निरोप्या’ हे मराठी भाषिक कॅथोलिक समाजाचे सर्वात पहिले मुखपत्र. गेले एक शतक हे मासिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कॅथोलिक कुटुंबांमध्ये नियमितपणे जात आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या या समाजातील अनेक कुटुंबांना दररोज वर्तमानपत्र घेण्याचीही ऐपत नाही. मात्र अगदी वाजवी वर्गणी असलेले हे मासिक या कुटुंबातील लहानथोरांची वाचनाची भूक भागवत आहे. त्यादृष्टीने आर्चबिशप डोरिंग यांनी या समाजास मोठे उपकृत करून ठेवले आहे यात शंकाच नाही.
1981 साली या मासिकाची वार्षिक वर्गणी केवळ तीन रुपये हेाती आणि किरकोळ अंकाची किंमत तीस पैसे होती. आज 2022 साली रंगीत मुखपृष्ठ असलेल्या आणि एकूण 32 पाने असलेल्या या मासिकाची वार्षिक वर्गणी दोनशे रुपये आहे.
आर्चबिशप डोरिंग यांच्या ‘निरोप्या’ने मराठी भाषिक कॅथोलिक समाजात वाचनाची आवड निर्माण करण्याबरेाबरच या समाजात लेखकांच्या आणि कवींच्या पिढ्या निर्माण करण्याचेही मोठे योगदान दिले आहे. मराठी सारस्वतात पुढे मोठे नाव कमाविणाऱ्या अनेक कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लेखकांना त्यांच्या उमेदवारीच्या काळात ‘निरोप्या’ ने त्यांना हक्काचे एक व्यासपीठ मिळवून दिले. आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, कवी विश्वासकुमार आदी नामवंत साहित्यिकांचा ‘निरोप्या’च्या लेखकांमध्ये समावेश होतो.
आपले साहित्य आणि नाव पहिल्यांदाच छापून आल्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव मलासुद्धा ‘निरोप्या’मुळेच लाभला. माझा पहिला लेख होता वि.स, खांडेकर यांना त्यांच्या `ययाती' कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला याबद्दल. साल होते १९७४ आणि माझे वय १५ वर्षे.
एखाद्या नियतकालिकाच्या प्रकाशन स्थळात अगदी क्वचितच बदल होतात. ‘निरोप्या’च्या शंभर वर्षांच्या आयुष्यात मात्र असे प्रसंग अनेकदा घडून आलेले दिसतात. याचे कारण म्हणजे ‘निरोप्या’चे मालकीहक्क असणाऱ्या येशूसंघाचे धर्मप्रांताधिकारी यांच्यामार्फत ‘निरोप्या’च्या संपादकांची नेमणूक केली जाते. नव्या संपादकांच्या नियुक्तीनंतर हे मासिकही ते संपादक ज्या धर्मग्रामात कार्यरत असतात तेथून प्रसिद्ध होत राहिले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील केंदळ वळण, श्रीरामपूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, सातारा जिल्ह्यातील कराड, त्याचप्रमाणे नाशिक वगैरे ठिकाणी ‘निरोप्या’चे कार्यालय सातत्याने स्थलांतरित होत राहिले.
या विविध जिल्ह्यांतील ख्रिस्ती धर्मियांनी अर्थातच त्यामुळे ‘निरोप्या’ची साथ सोडली नाही. त्यांच्या अनेक पिढ्यांनी या चिमुकल्या नियतकालिकावर आपली वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली आहे.
‘निरोप्या’कार आर्चबिशप डोरिंग यांनी मराठी साहित्याला आणखी एक मोठे योगदान दिले आहे. सतराव्या शतकात गोमंतकात मराठी भाषेत लिहिले गेलेले ‘क्रिस्तपुराण’ हे अस्सल देशी महाकाव्य त्यांनी महाराष्ट्रात उजेडात आणले. ‘क्रिस्तपुराणा’ची रचना फादर थॉमस स्टीफन्स या मूळच्या इंग्रज येशूसंघीय धर्मगुरूंनी 1616 साली केली. मात्र त्याकाळात गोव्यात देवनागरी मुद्रणकला विकसित झाली नसल्याने त्यांना ते छापावे लागले.. रोमन लिपीत असल्याने मराठी सारस्वताचे या अभिजात वाङ्मयाकडे तीन शतके लक्षच गेले नाही.
आर्चबिशप डोरिंग यांनी या महाकाव्याचा अभ्यास केला व या साहित्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या पुराणातील येशू ख्रिस्ताच्या चरित्रावर आधारित काही भागांचे देवनागरीत लिप्यांतर करून त्यांच्या तीन पुस्तिका प्रकाशित केल्या. अशाप्रकारे मराठी भाषेत असूनही रोमन लिपीमुळे मराठी भाषिकांपासून दुरावलेल्या या महाकाव्याचा निदान काही भाग तरी आर्चबिशप डोरिंग यांच्यामुळे प्रथमतःच मराठी भाषिकांना प्राप्त झाला. हे संपूर्ण महाकाव्य 1956 साली शांताराम बंडेलू यांनी देवनागरीत आणून य. गो. जोशी यांच्या प्रसाद प्रकाशनाने प्रकाशित केले.
मराठीत साहित्यसंपदा असणारे आजचे पुण्याचे बिशप थॉमस डाबरे हे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांचे उत्तराधिकारी आहेत. फादर भाऊसाहेब संसारे हे `निरोप्या'चे विद्यमान संपादक आहेत


1949 मध्ये वृद्धत्वामुळे आर्चबिशप डोरिंग यांनी निवृत्ती स्वीकारली आणि त्यांच्या जागी अँड्र्यू डिसोझा या धर्मगुरूंनी पुण्याचे पहिले भारतीय बिशप म्हणून सूत्रे हाती घेतली. ‘निरोप्या’तून शेवटचे बोधपत्र लिहून या मेंढपाळाने आपल्या कळपाचा निरोप घेतला. ‘निरोप्या’च्या अंकात प्रसिद्ध झालेले हे बोधपत्र पुढीलप्रमाणे आहे.
‘येशू ख्रिस्तामध्ये अतिप्रिय लेकरांनो, ईश्वराने तुम्हांस पुष्कळ वर्षे माझ्या हवाली केले, तरी आता तुम्हांस माझा शेवटचा सलाम सांगण्याची वेळ आली. 42 वर्षांपूर्वी 10वे प्रिय परमगुरुस्वामी यांनी मला पुण्याचे महागुरू म्हणून नेमिले आणि बायदरलीदन बिशपच्या जागी मला पुणे धर्मप्रांताचा अधिकार दिला.
सात वर्षे माझ्या कळपामध्ये शांतीने काम करता आले. मग पहिले महायुद्ध सुरू झाले, त्यावेळी मी परमगुरुस्वामींची भेेट घ्यायला रोम शहरी गेलो होतो. पुण्याला परत जाण्याचे माझे सर्व प्रयत्न व्यर्थ निघाले. मला माझ्या प्रिय लेकरांपासून लांब राहणे भाग पडले.
युद्ध संपल्यावर परमगुरुस्वामींनी मला जपान देशाला पाठविले. हिरोशिमा शहराचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांनी मला नेमिले. शेवटी 1927 साली ब्रिटिश सरकारने मला पुण्याला परत जाण्याची परवानगी दिली. तेव्हापासून मी पुन्हा तुम्हांमध्ये राहात होतो.
दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नवीन अडचण व त्रास उत्पन्न झाला. काही तरुण फादर, जर्मन नागरिक असल्याकारणाने, त्यांस सरकारने कैद्यांच्या छावणीत ठेवले आणि बिशपचा व्यवहारदेखील जरा कठीण झाला. या अवघड दिवसात विश्वासी आणि फादर लोकांचा विश्वासूपणा, प्रेम ही मला मोठ्या समाधानाची व शक्तीची कारणे होती. त्यांची आस्था आणि साहाय्य शेवटपर्यंत उपकारी मनाने मी विसरणार नाही.
युद्ध संपल्यावर माझ्या वृद्धपणाचा परिणाम अधिकाधिक मजवर झाला. प्रवास करणे मला कठीण झाल्यामुळे सर्व मिशनस्थानांची भेट वेळोवेळी घेता आली नाही. म्हणून माझ्यापासून हे भारी ओझे काढण्यास आणि उत्साही खांद्यावर ठेवण्यास परमगुरुस्वामींची विनंती करण्यास मला योग्य वाटले. त्यांनी माझी विनंती मान्य करून अंद्रू डिसोजा फादर यांस माझ्या जागी महागुरू म्हणून नेमले. त्यांची दीक्षा 24 ऑगस्टला झाली आणि या दिवसापासून ते महागुरूचा अधिकार चालवू लागले. ते तुमची चांगली काळजी घेतील.
म्हणून माझ्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हास माझा शेवटचा बोध करितो. तुम्ही विश्वासात स्थिर राहून आपल्या विश्वासाप्रमाणे वर्तन करा. तुमच्यापुढे नवीन संकटे आहेत. येशूच्या हृदयाची आणि प.मारियेच्या निष्कलंक हृदयाची भक्ती बाळगत जा. ती तुमची रक्षण करतील. तुमच्या नवीन महागुरुस्वामींसाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हांसाठी रोजरोज प्रार्थना करीत जाईन, अशी खातरी मी तुम्हाला देतो. ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.”
                                                                                                                    - हेन्री आर्चबिशप

निवृत्तीनंतर 17 डिसेंबर 1951 रोजी आर्चबिशप डोरिंग यांचे निधन झाले. पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलमध्ये त्यांची समाधी आहे. जर्मनीतून महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकून, स्थानिक निरक्षर आणि अर्धशिक्षित ख्रिस्ती समाजाला ज्ञानार्जन करणारे आर्चबिशप डोरिंग हे आज विस्मृतीत गेले असले तरी ‘निरोप्या’च्या रूपाने त्यांचे स्मारक त्यांच्या कळपाच्या भेटीस आजही दर महिन्याला नियमाने येत आहे.


( ख्रिस्ती मिशनरींचे योगदान- कामिल पारखे (वितरण सुगावा प्रकाशक) मधील एक प्रकरण )

Tuesday, April 12, 2022

शंभर रुपये किलो दराने पुस्तकांची विक्री


शहरात नव्यानेच सुरु झालेल्या विविध गृहोपयोगी, हस्तकला आणि बचतगटांच्या कलाकृतींच्या आणि उत्पादनांच्या प्रदर्शनाला गेलो होतो. दरवर्षी आमच्या शहरात वर्षांतून दोनदा महिन्याभराच्या कालावधीसाठी भरणाऱ्या या प्रदर्शनाला बायकोसह मी आवर्जून जात असतो, त्याचे कारण आम्हा दोघांनाही शॉपिंग करणे आवडते आणि दुसरे म्हणजे नित्योपयोगी असणाऱ्या अनेक वस्तू - अगदी कपडेसुद्धा - येथे स्वस्त दरांत मिळकत असतात. तर परवा या प्रदर्शनाला गेलो आणि अंग अगदी आनंदाने मोहोरून गेले.

पाचशे चौरस मिटर क्षेत्राच्या आसपास भरलेल्या त्या प्रदर्शनाला लोक अगदी उत्साहाने आले होते आणि ते पाहून आनंद होण्याचे कारण तसे वेगळेच होते. जवळजवळ दोनअडीच वर्षांच्या खंडानंतर हे प्रदर्शन भरले होते आणि इतक्या दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच लोक तोंडाला मास्क लावून की होईना पण मोठ्या संख्येनें जमले होते. कोरोनाच्या साथीमुळे गेली अनेक महिने अशाप्रकारे कुठल्याही कार्यक्रमाला एकत्र येणे शक्य झाले नव्हते.पण आता कोरोनाचे संकट नियंत्रणात आले आहे हे समोरच्या लोकांच्या गर्दीवरुन स्पष्ट होत होते.
माझ्या मनात घोळत असलेल्या या भावना तिथे जमलेल्या इतर लोकांमध्ये असण्याची शक्यता होती. एकदिड तासांच्या भ्रमंतीनंतर प्रदर्शनास्थळाच्या एका कोपऱ्यात `एक्झिट' असे बाणाच्या चिन्हाने दर्शवलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. सामान घेऊन कारच्या दिशेने वळण्याआधी प्रवेशद्वारापाशीच असलेल्या एका स्वतंत्र दालनाकडे माझे लक्ष गेले आणि मी जागच्याजागी थिजलो.
गेली अनेक वर्षे या प्रदर्शनाला मी येत असलो तरी अशा प्रकारचे स्वतंत्र भव्य दालन मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्या दालनाचे नाव वाचून त्या क्षणी मला काय वाटले हे व्यक्त करणे खूप अवघड आहे.
त्या दालनाच्या प्रवेशदारात ठळकपणे लिहिले होते. ``शंभर रुपये किलो दराने पुस्तकांची विक्री''
विविध विषयांवरची पुस्तके विकत घेऊन वाचण्याचे वेड मला माझ्या लहानपणापासून लागलेले असले तरी मला त्या दालनाकडे जाऊसे वाटेना. दोन्ही हातांत विविध वस्तूंनी भरलेल्या पिशव्या घेऊन मी त्याच जागेवर थिजून राहिलो होतो याचे कारण कि वाचण्यायोग्य पुस्तकांची किलोंच्या मापाने विक्री ही कल्पनाच मला खिन्नखिन्न करुन गेली होती.
गोव्यात आणि कोकणात अनेक ठिकाणी बांगडा, सार्दिन वगैरे मासळी वाट्याने विकतात, इतरत्र ही मासळी किलोच्या मापाने विकली जाते, काही ठिकाणी केळी डझनावार विकली जाते तर काही ठिकाणी किलोने विकली जातात. एक वर्षांपूर्वी दमण येथे मेथीची भाजी किलोने विकली जाते हे पाहून असाच मी गारगार झालो होतो. तरीसुद्धा हे सर्व ठीक आहे पण पुस्तकांची किलोंनी विक्री ?
पुस्तकांचे मूल्य कसे मोजले जावे याविषयी काही ठोकताळे असू शकत नाही. अनेकदा अभ्यासासाठी नोट्स घेतलेल्या जुन्या वह्या रद्दीत काढाव्या लागतात तेव्हा त्या वह्यांचे खरेखुरे मूल्य त्या परिश्रमपूर्वक नोट्स तयार करणाराच जाणत असतो. तीच बाब वर्षानुवर्षे गोळा केलेल्या पुस्तकांचीही असते.
दहापंधरा वर्षांपूर्वी मेकॅनिकल इंजिनीरिंगचे पदवीधर असलेले एक स्नेही सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आणि आपल्या सरकारी निवासस्थानाचा ताबा देण्याआधी त्यांनी आपल्याकडे असलेल्या तांत्रिक विषयांवरील पुस्तकांचा मोठा संच हुबळी येथील इंजिनियरिंग असोसिएशनकडे सुपूर्द केला. देशात विविध ठिकाणी आणि त्याचप्रमाणे परदेशांत कामानिमित्त गेल्यावर ही पुस्तके त्यांनी जमा केली होती.
काही वर्षांनी परदेशातील एक इंजिनियरने या वाचनालयाला भेट दिली असता या संग्रहाकडे त्याचे लक्ष गेले आणि इतकी अमूल्य असलेली पुस्तके कोठून मिळवली आणि या पुस्तकांच्या फोटोकॉपीज मिळू शकतील का अशी विचारणा त्याने ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यावेळी वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांना त्या पुस्तकांचे खरेखुरे मूल्य समजले !
ब्रिटिश जेसुईट धर्मगुरु असलेल्या फादर थॉमस स्टिफन्स यांनी गोव्यात सतराव्या शतका च्या सुरुवातीला 'ख्रिस्तपुराण' या मराठी महाकाव्याची रचना केली. देवनागरी लिपीत मुद्रणकला विकसित झाली नसल्याने हे पुस्तक पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात रोमन लिपीत छापण्यात आले, त्या दृष्टीने मराठीतील हे पहिले छापील पुस्तक. या ख्रिस्तपुराणाची देवनागरी लिपीतील एक प्रत जस्टीन एडवर्ड ॲबट यांना लंडनमधील स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज एका ग्रंथालयात आढळली.
कोण हे जस्टीन एडवर्ड ॲबट?
अहमदनगर येथे अनेक वर्षे राहिलेल्या अमेरिकन मिशनरी ॲबट यांनी अमेरिकेत परतल्यावर `पोएट्स ऑफ महाराष्ट्र' ही ग्रंथमाला लिहून मराठी संत वाड्मय इंग्रजीत आणण्याचे फार महत्त्वाचे योगदान दिले आहे. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या उभारणीसाठी आपल्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी त्याकाळात तीन हजार डॉलर्सची मदत केली होती. त्यांचे तैलचित्र भारत इतिहास संशोधन मंडळात आजही आहे.
माझ्या 'ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या पुस्तकात जस्टीन एडवर्ड ॲबट यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे.
तर लंडनमधल्या ख्रिस्तपुराणाच्या देवनागरी लिपीतील प्रतीविषयी याविषयीचे एक पत्र ॲबट यांनी मुंबईतल्या The Times of India इंग्रजी दैनिकात १९२५ साली लिहिले. काही दशकानंतर या जुन्या पत्राविषयी संदर्भ मिळाल्यावर पुण्यात पेपल सेमिनरीत प्राध्यापक असणारे फादर हान्स स्टाफनर यांनी लंडनमधल्या देवनागरी लिपीतील या ख्रिस्तपुराणाची मायक्रोफिल्म मिळवली आणि त्यातून देवनागरी ख्रिस्तपुराणाच्या दोन प्रती केल्या,
त्यापैकी एक प्रत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर वाचनालयात ठेवण्यात आली आहे. दुसरी प्रत नारायण पेठेतल्या स्नेहसदन जेसुईट संस्थेत आहे !
काही पुस्तकांचे मुल्य ठरविणेसुद्धा शक्य नसते हे यावरुन दिसून येईल.
माझ्या शहरातल्या एका वाचनालयात गेली अनेक वर्षे मी जात आहे. काही वर्षांपूर्वी या वाचनालयात पुस्तके निवडण्यासाठी, बदलण्यासाठी येणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा आणि इतरांचा चांगला राबता असायचा. गेली काही वर्षे मात्र तिकडे कुणी फिरकतही नाही. पुस्तके शोधण्यासाठी ओळीने लावलेल्या कपाटांकडे मी जातो तेव्हा उडणाऱ्या धुळीपासून संरक्षणासाठी तोंडाला रुमाल लावावा लागतो. तिथे शेल्फवर रांगेत रचून ठेवलेल्या पुस्तकांना खूप काळ कुणी हातही लावलेला नाही हे लगेच कळते. मात्र पुस्तकांचे नाव आणि विषय पाहून यापैकी कुठले पुस्तक आधी वाचायला घ्यावे असा गोंधळ उडावा इतकी ही पुस्तके अमूल्य आणि दुर्मिळ आहेत.
अलिकडेच `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' या जेसुईट फादर टोनी जॉर्ज यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रस्तावना वाचत होतो. `स्वातंत्र्यपूर्व काळातील (१८५० ते १९५०) धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तींची आत्मनिवेदने : सामाजिक आणि वाड्मयीन अभ्यास'' हा या पुस्तकाचा विषय आहे. या पुस्तकासाठी संशोधन करताना त्यांना फार महत्त्वाचा ग्रंथऐवज अहमदनगर कॉलेजमध्ये मिळाला.
मुंबईत अंधेरीइथल्या `विनयालय' या जेसुईट संस्थेतल्या प्राध्यापक असलेल्या फादर टोनी जॉर्ज यांनी लिहिले आहे: ''अहमदनगर कॉलेजच्या पुराभिलेख शाखेमध्ये नगरहून निघून गेलेल्या अनेक प्रोटेस्टंट मिशनरींची ग्रंथसंपदा पोत्यांत बंदिस्त होती. त्या जीर्णावस्थेत असलेल्या ज्ञानातून अभ्यासाविषयाचे ग्रंथ निवडले. परंतु ते हातांतच कोसळत असत, झेरॉक्स, फोटोमध्ये त्यांना बंदिस्तही करता येत नव्हते. ते बरेचसे हातांनी लिखित स्वरुपात उपलब्ध केले.''
अशाच स्वरुपाची कितीतरी अमुल्य असलेली ग्रंथसंपदा कितीतरी खासगी, निमसरकारी किंवा सरकारी वाचनालयांत धूळ गोळा करत असेल याची कल्पना करता येते. क्वचितच एखादा रत्नपारखी येतो आणि त्यातून आपल्याला हवे असलेले रत्ने निवडून, गोळा करून जातो.
रस्त्यांवर फुटपाथवर विक्रीला असलेल्या जुन्या पुस्तकांच्या गठ्ठ्यांमधून खूपदा दुर्मिळ असलेली पुस्तके मिळतात याचा अनुभव अनेकांना आलेला असतो.
पुण्याला गेलो कि `सकाळ' ऑफिसातून परतताना शनिवारवाड्याजवळच असलेल्या `साधना' च्या पुस्तक स्टॉलला मी नेहेमी भेट देतो. तेथे गेल्यावर लगेच आत न शिरता त्या आवारातच दाराबाहेर टेबलावर ठेवलेल्या जुनी पुस्तके, स्मरणिका, दिवाळी ग्रंथ आणि गौरव ग्रंथ मी चाळतो. निम्म्या किंमतीत ही पुस्तके असतात. या टेबलावर ठेवलेली कितीतरी मौल्यवान पुस्तके आणि इतर अंक मी गोळा केलेली आहेत.
त्यामुळेच त्या प्रदर्शनात किलोच्या मापात पुस्तके विकली जाताना पाहून माझ्या भावना संमिश्र होत्या. छापून झालेली, नवीकोरी असलेली ती शेकडो पुस्तके स्वस्त आणि किलोच्या दरात विकून टाकून निदान काही वाचकांना तरी वाचनसंस्कृतीचा लाभ मिळवून देण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता. न जाणो, त्या पुस्तकांतून काही जणांना ज्याचे मोलही करता येणार नाही असा आनंद आणि लाभ मिळू शकेल.
काही महिन्यांपूर्वी मीसुद्धा माझ्याकडची कितीतरी जुनी इंग्रजी आणि मराठी पुस्तके अशीच ग्रंथालयांना आणि इतरांना देऊन टाकली होती. ही पुस्तके `चांगल्या घरात' जावी एव्हढीच एक भावना होती.
त्या प्रदर्शनस्थळांतील विविध दालनांकडे गर्दीचे लोंढे दिसत होते तर पुस्तकविक्रीच्या या प्रशस्त दालनात काही मोजकेच लोक दिसत होते. इतर भरगच्च दालनांतल्या विक्रीला असलेल्या वस्तू आणि या दालनातील विक्रीला असलेली पुस्तके यांना मात्र एकाच तराजूच्या तागडींमध्ये मोजता येणार नव्हते हे नक्की. त्यांचे वेगळे मूल्य जाणण्यासाठी पारख करणारी दृष्टी मात्र हवी.

Monday, March 28, 2022

 कुठल्याही प्रसंगांचे, घटनांचे वार्तांकन करताना तो विषय नीट समजावून घ्यावा


सभापती दयानंद नार्वेकरांने आपयले तुका, बेगिन व्होस,'' त्या दिवशी सकाळी साडेनऊच्या आसपास मांडवीच्या काठावर असलेल्या गोवा सचिवयातल्या प्रेसरुमध्ये मी आलो आणि 'राष्ट्रमत' या मडगावहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाचे मुख्य वार्ताहर बालाजी गावणेकर यांनी हा बॉम्बगोळा माझ्यावर टाकला.

हो, वरकरणी या वाक्यात काही भीतिदायक दिसत नसले तरी गावणेकरांना मला आणि त्यावेळी त्या प्रेसरूमध्ये असलेल्या हजर असणाऱ्या इतर बातमीदारांना त्या वाक्यातील दाहकता कळण्यासारखी होती.

त्याकाळात म्हणजे १९८५च्या आसपास पणजीत आदिलशाहाच्या मध्ययुगीन राजवाड्यात त्याकाळच्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय, मंत्रालय आणि विधानसभा हॉलसुद्धा होते. पणजी जेटीजवळचा आजही भक्कम असलेला हा राजवाडा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो, मात्र गोव्याच्या पाचसहा शतकांच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेलया या इमारतीची बहुतेकांना फारशी माहिती नसते. गुजरातजवळ असलेल्या दमण आणि दीवच्या प्रत्येकी एक आमदारासह या केंद्रशासित प्रदेशाचे एकूण २८ आमदार असत आणि मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यासह पाचसहा मंत्री असत.

त्या दिवसांत गोवा, दमण आणि दीवच्या विधानसभेचे अधिवेशन या हवेलीवजा इमारतीत चालू होते आणि प्रेसरुमध्ये आज सकाळी मी आल्याआल्या 'मला सभापती नार्वेकरांनी बोलावले आहे' असा निरोप मला मिळाला होता.

तो निरोप ऐकून प्रेसरुममधल्या इतर बातमीदारांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरांनी पाहिले होते. विधानसभा अधिवेशनाच्या बातम्या देतांना आजच्या आमच्या इंग्रजी दैनिकात नवहिंद टाइम्समध्ये मी काय गडबड करुन ठेवली आहे याची ना त्यांना ना मला काही कल्पना होती. पण प्रेसरुमध्ये वावरणाऱ्या आणि दररोज विविध प्रकारच्या बातम्या देणाऱ्या त्या पत्रकारांना असे कुणाकडून भेटण्यासाठी समन्स यावे यात फार काही वावगे दिसले नाही. गोवा विधानसभेच्या सभापतींनी बोलावले आहे असे कळल्यावर मी मात्र गर्भगळीत झालो होतो. त्याला कारणही तसेच होते.

नवहिंद टाइम्समध्ये कॅम्पस रिपोर्टर आणि क्राईम-कोर्ट रिपोर्टर म्हणून तीनचार वर्षे काम केल्यानंतर गोवा, दमण आणि दीव सरकारचा अक्रेडीटेड जर्नालिस्ट म्हणून अलिकडेच मला कार्ड मिळाले होते. त्यामुळे या केंद्रशासित प्रदेशाच्या सचिवालयातून विविध बातम्या देण्याची आणि विधानसभेच्या अधिवेशनाचे वृत्तांकन करण्याची मला आता मुभा मिळाली होती. त्याकाळात पत्रकाराच्या कारकिर्दीत असे कार्ड मिळणे, विधानसभेच्या वा संसदेच्या अधिवेशनांचे वृत्तांकन करण्याची संधी मिळणे हा काहींच्या दृष्टीने परमोच्च बिंदू असायचा. पणजी, मुंबई किंवा राजधानी दिल्लीत राजकिय बिट् सांभाळणाऱ्या पत्रकारांमध्ये आताही बहुधा अशीच परिस्थिती असावी.

गेली काही दिवस मी गोवा, दमण आणि दीव विधानसभेच्या अधिवेशनाला हजेरी लावत होतो. त्या दुमजली इमारतीची शान काही औरच होती. लाकडी जिन्यावर अंतरलेला लाल गालिचा, मजबूत लाकडी फळ्यांचा मजला, तेथून गॅलरीत उभे राहिल्यास खाली रस्त्यालगत संथ वाहणाऱ्या मांडवी नदीचा दिसणारा प्रवाह, इमारतीच्या एका बाजूला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा पूर्णाकुर्ती पुतळा आणि दुसऱ्या बाजूला एका महिलेला संमोहित करणाऱ्या ऍबे डी फरीया याचा पुतळा.

या इमारतीच्या अगदी मध्यवर्ती भागात विधानसभा हॉल होता. हॉलच्या दोन्ही बाजूला समोरासमोर बसणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार, अगदी पुढे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री आणि सर्वांत पुढे विधानसभा सभापती आणि त्यांचा अधिकारी वर्ग. सभापतींच्या आसनाच्या समोर अगदी विरुद्ध टोकाला आम्हा पत्रकारांची गॅलरी.


विधानसभेच्या आमदारांना जी काही कागदपत्रे, ठराव दिले जात त्याच्या प्रती आम्हा बातमीदारांनाही मिळायच्या.

विधानसभेच्या अधिवेशनात त्याकाळात झिरो अवर म्हणजे शून्य प्रहरला, प्रश्नोत्तराच्या तासाला आणि लक्षवेधी सूचनांच्या कामकाजाला सर्वाधिक महत्त्व असायचे, बातमीदारांना त्या थोडक्याच अवधीत कितीतरी बातम्या मिळायच्या, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या वक्तृत्वशैलीचा आणि संसदीय कौशल्याचा या काळात कस लागायचा. या सर्व वेगवान घडामोडी आपापल्या वाचकांसमोर कशा पद्धतीने मांडायच्या, कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे याचे अधिवेशन कव्हर करणाऱ्या विविध वृत्तपत्रांच्या बातमीदारांसमोर आव्हानच असायचे.

विधानसभेत बातमीदार म्हणून मी नव्यानेच प्रवेश केल्याने नवहिंद टाइम्सचे या इंग्रजी दैनिकातील माझे वरिष्ठ बातमीदार प्रमोद खांडेपारकर आणि र. वि. प्रभुगावकर हे पहिल्या फळीवर राहून बातम्यांचे नियोजन आपसांत वाटून घेत होते. माझ्याकडे केवळ बघ्याची भूमिका म्हणजे निरीक्षण करण्याचे काम होते. हातात मिळालेले ते कागदांचे बांड म्हणजे वर्षभर पुरेल अशा बातम्यांचा किंवा बातम्यांच्या कच्चा मालाचा खजिना असतो हे मला नंतर अनुभवाने कळाले. यात तारांकित प्रश्न आणि त्यांची संबंधीत मंत्रालयाने वा खात्याने दिलेली उत्तरे असायची. पहिल्या काही दिवसांत या छापील मजकुराच्या आधारे काही छोट्याशा बातम्या मी दिल्या होत्या.

काही दिवसांनंतर मध्यांतरानंतर खांडेपारकर आणि प्रभुगावकर दोघेही विधानसभेच्या हॉलबाहेर पडले. बहुधा तो शुक्रवार असावा, त्यादिवशी आमदारांना खासगी विधेयके म्हणजे पक्षरहीत विधेयके मांडण्याची परवानगी असायची. दिल्लीत संसदेतही शुक्रवारी अशीच प्रथा असते. त्यामुळे त्यादिवशी फार महत्त्वाचे कामकाज नसायचे.

सदनातून बाहेर पडताना खांडेपारकर मला म्हणाले, '''कामिल, होल्ड द फोर्ट !''

अशाप्रकारे नवहिंद टाइम्सच्या वतीने किल्लेरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आल्याने खूष होऊन मी सरसावून पुढील कामकाज अगदी लक्षपूर्वक पाहू लागलो. थोड्या वेळाने विधानसभेच्या कर्मचाऱ्यांनी आणखी काही कागदपत्रे आम्हा बातमीदारांना वाटली. तोपर्यंत तिथले पत्रकार कक्ष जवळजवळ निम्मे रिकामे झाले होते, सदनातील मंत्र्यांची आणि आमदारांची संख्याही खूप रोडावली होती. बहुधा आता काही महत्त्वाचे कामकाज राहिले नसावे.

सभापतींनी कुठल्याशा ठरावावर उपस्थित आमदारांची म्हणजे सभागृहाची अनुमती मागितली तेव्हा 'आये' आये असा सदनातून उपस्थित आमदारांचा संमतीदर्शक औपचारिक प्रतिसाद मिळाला होता. थोड्याच वेळाने सभापतीमहाशयांनी त्या दिवसासाठी सदनाचे कामकाज स्थगित केले. सभापती उठून मागे आपल्या दालनात गेले तसे इतर बातमीदारांसह मीसुद्धा तळमजल्याच्या प्रेसरुमकडे लाकडी जिन्याने जाऊ लागलो. संध्याकाळी ऑफिसात जाऊन विधानसभेच्या अधिवेशनाची दोन पॅराग्राफची एक बातमी मी दिली आणि माझ्या नेहेमीच्या क्राईम आणि कोर्टच्या बातम्याही टाईप केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी विधानसभेच्या प्रेसरुममध्ये आलयावर सभापतींना ताबडतोब भेटावे मला हा निरोप मला मिळाला होता !

`आलिया भोगासी, असावे सादर' अशी मी मानसिक तयारी करण्याची गरज होती

सभापतींच्या दालनात गेलो तेव्हा कळाले की विधानसभा खात्याच्या सचिवांना माझ्याशी बोलायचे होते. भेटताक्षणी त्यांनी त्यादिवशी आमच्या `नवहिंद टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एक कलमी आणि केवळ एक परिच्छेदाच्या त्या बातमीचा उल्लेख केला. गोवा, दमण आणि दीव विधानसभेने पंचायतीराजसंबंधी एक विधेयक संमत केले आहे अशी ती बातमी होती.

कुठलेही विधेयक सभागृहाने संमत होण्याच्या विविध पायऱ्या असतात, त्यापैकी पहिल्या पायरीत विधानसभेने ते विधेयक सभागृहात केवळ मांडायला परवानगी दिली होती, त्यावर चर्चा आणि मतदान वगैरे काहीही झाले नव्हते, त्यामुळे त्यावर मतदान होण्याचा किंवा ते संमत होण्याचा मुळी प्रश्नच नव्हता.

सचिवांनी मला हे सांगितले आणि पुढच्या वेळी सभागृहाचे काळजीपूर्वक वृत्तांकन करण्याची त्यांनी मला सूचना केली. एव्हढ्यावरच यावर पडदा पडला. मी हुश्श्य केले.

हे तसे काही गंभीर प्रकरण नव्हते, त्यामुळे सभागृहाचा अवमान किंवा सभागृहाचा हस्तभंग वगैरे मुद्दे निर्माण होत नव्हते.

सचिवालयाच्या पहिल्या मजल्यावरुन त्या लाकडी पायऱ्यांवरील लाल गालिच्यावर चालत जड मनाने मी खाली प्रेसरुममध्ये आलो तेव्हा तेथील बहुतेक पत्रकार माझ्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होते. माझ्या त्या बातमीबाबत त्यांच्यात नक्कीच काहीतरी शिजले होते. आतापर्यंत माझ्या डोक्यात चाललेल्या त्या एका प्रश्नाचा मात्र या शंकेने आता उलगडा होऊ शकत होता.

कुठल्याही वृत्तपत्रातील एखादी बातमी कुठल्या बातमीदाराने दिली आहे किंवा एखादा नावाशिवाय प्रसिद्ध झालेला स्तंभ व लेख कुणी लिहिला आहे हे केवळ त्या वृत्तपत्रातल्या लोकांनाच माहिती असते, ती माहिती कुठल्याही कारणांसाठी बाहेर खुली करणे हे वृत्तपत्रीय आचारसहिंतेविरुद्ध आणि नैतिकतेविरुद्ध मानले जाते.

भारतीय पत्रकारितेतील यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक यांनी 'केसरी'चे संपादक म्हणून घेतलेली भूमिका. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या 'केसरी' त प्रसिद्ध झालेला ब्रिटिश सरकारविरोधी अग्रलेख त्यांनी स्वतः लिहिलेला नसतानासुद्धा संपादक म्हणून त्या अग्रलेखाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यासाठी दोषी ठरवले जाऊन शिक्षा झाल्यावर मंडाले येथे तुरुंगवासही भोगला असे म्हटले जाते.

असे असताना त्या दिवसाची `नवहिंद टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेली ती फॅक्युअली रॉंग म्हणजे वास्तवाशी विसंगत, चुकीची असलेली ती बातमी मीच दिली हे विधानसभा खात्याच्या त्या अधिकाऱ्याला कसे कळाले असेल?

मला पडलेल्या या प्रश्नाचा तेथील एका पत्रकाराने ताबडतोब खुलासा केला आणि सगळे जण हसत सुटले. त्या बातमीदारांत सर्वांत ज्युनिअरमोस्ट असलेल्या मला शरमिंदे होऊन का होईना त्या पण हास्यकल्लोळात सहभागी व्हावेच लागले.

प्रेसरुममधल्या बालाजी गावणेकर या एका ज्येष्ठ पत्रकार मित्राने माझ्या या चुकीबद्दल सोनाराकडूनच माझे कान टोचवून घ्यावे म्हणून त्या सकाळी विधानसभा खात्यातील त्या अधिकाऱ्याला सहभागी करवून घेऊन हा गंमतीदार बनाव घडवून आणला होता. मग माझ्यावरील तणाव घालवण्यासाठी त्या पत्रकार मित्राने लगेचच माझ्यासह तेथील पाचसहा पत्रकारांसाठी चहा मागवून हा प्रकरणाचा शेवट गोड केला होता.

तरीसुद्धा मला या घटनेने खूप काही शिकवले. कुठल्याही प्रसंगांचे आणि घटनांचे वार्तांकन करताना तो विषय नीट समजावून घ्यावा आणि मुख्य म्हणजे त्या त्या बिट्सवर काम करणाऱ्या विविध दैनिकांतील वरिष्ठ पत्रकारांच्या बातम्या नेहेमी वाचाव्यात हा धडा मी त्यातून शिकलो. अर्थात प्रत्येक बिट्सवर काम करताना सुरुवातीला काही टक्केटोपणे खावे लागतातच हे सुद्धा नंतर क्राईम आणि कोर्ट, शिक्षण, डिफेन्स, उच्च न्यायालय, बिझिनेस वगैरे बिट्स हाताळताना अनुभवाने लक्षात आले.

Sunday, March 27, 2022

दुर्लक्षित दलित ख्रिस्ती समाज 

पुतण्याचे लग्न आटोपून मी आमच्या विस्तारीत कुटुंबियांसह म्हणजे माझा थोरला भाऊ, सगळ्या वहिनी, तिन्ही बहिणी,  त्यांच्या लेकीबाळी आणि काहींची नातवंडे  यांच्यासह बसने नवरदेवाच्या घरी औरंगाबादच्या दिशेने चाललो होतो.  खूप वर्षांनंतर आणि आनंदी घटनेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आता एकत्र आलो होतो आणिनात्यांतल्या त्या शोडषवर्षीय तरुण लोकांच्या सळसळत्या उत्साहाची आम्हालाही लागण होत होती. गाण्याच्याभेंड्या खेळून झाल्या होत्या, चुलतभाऊ, चुलतबहिणी, आत्या, आजी, चुलते, चुलतआजे, वगैरेबरोबर वेगवेगळ्या सेल्फी घेऊन झाल्या.

त्यादिवशी श्रीरामपूरचे पारखे टेलर यांच्या विस्तारीत कुटुंबातील प्रत्येक घटकातील किमान एक सभासद बसमधील या प्रवासात सहभागी होता. माझी सर्वात मोठी वहिनी आपल्या मुलांसह, मुलींसह आणि त्यांच्या पोरांबाळीसह तिथे होती. गोव्यातली नन असलेली माझी बहीण ``सिस्टर'ताई आणि बाकी दोघी विवाहित बहिणी आपल्या मुलांसह आल्या  होत्या.  लग्नानंतर पोरीबाळींचे आडनावे बदलल्याने त्या ग्रुपमधले काही जण आता तोरणे, लोखंडे, साळवे  वगैरे आडनावे लावत असली तरी त्यांचे मूळ हे श्रीरामपूरचे पारखे टेलर यांचे कुटुंब होते.  

मोठ्या लवाजम्यामध्ये माझ्या दोन्ही वहिनी आंणि एक बहीण वयाने माझ्यापेक्षा  मोठ्या असल्या तरी पुरुषांमध्ये वयाने सर्वांत ज्येष्ठ माझा भाऊ आणि त्यानंतर मी होतो.आम्हा भावंडांच्या वयात खूप मोठा फरक असल्याने या भावाबहिणींच्या मुलांमध्ये- नातवंडाच्या  आपापसांतीलनातेसंबंधांविषयी बऱ्याच गंमतीदार संभाषणे व्हायची. उदाहरणार्थ, एकाच वयाची असलेली दोन मुलांमध्ये मामा-भाच्याचे नाते आहे. श्रीरामपूर, मुंबई, पुणे, गोवा, औरंगाबाद, अहमदनगर, शेवगाव, पढेगाव अशा लांबच्याअंतरावरील ठिकाणी राहणे असल्याने भेटण्याची संधी तशी चारपाच वर्षांनी केवळ लग्नकार्यानिमित्ताने.      

या सर्व पोरांपोरींत सर्वांत अल्लड आणि बोलकी असलेली राणी मग बसच्या पुढील भागातली एक सिट पकडून अधिकच बोलती झाली. बारावी पास होऊन आता अहमदनगरमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेणारी ही राणी म्हणजे माझ्या थोरल्या भावाच्या मुलीची - पिंटीची- मुलगी.  माझ्या मुलीच्या वयाच्या ती आसपास असली तरी नात्यानेतशी ती माझी नातच.   

या राणीने तिची एक कल्पना किंवा प्रकल्प त्या धावत्या बसमध्ये सर्वांना ऐकवला.

तर राणीची कल्पना तशी भन्नाटच होती.

बसमध्ये बसलेल्या आम्हा सगळ्यांकडे स्वतः उभे राहून पाहत राणीने आपली कल्पना मांडली. तिचे म्हणणे थोडक्यात असे होते.

बारावी पास झाल्यावर स्वतः राणीने नर्सिंगचे ट्रेनिंग पूर्ण केले होते आणि आता ती मुंबईत कुठल्याशा दवाखान्यात काम करत होती. तिची धाकटी बहीण पूजा सुध्दा सध्या अहमदनगरमध्येच नर्सिंगचा अभ्यासक्रम करत होती.राणीचा मामा म्हणजे माझा पुतण्या एका मोठ्या दवाखान्यात ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांच्या मदतीला असतो. त्याची आई म्हणजे माझी थोरली वहिनी आणि राणीची आजी गेली कित्येक वर्षे एका मॅटर्निटी होममध्ये`आया; म्हणजे मावशी म्हणून काम करते आहे. माझी दोन नंबरची वहिनी आणि आजच्या लग्नातल्या नवरदेवाची आई सरकारी दवाखान्यात स्टाफ नर्स म्हणून नोकरी करुन नुकतीच निवृत्त झाली होती. त्या वहिनीचा धाकटा मुलगा  म्हणजे या नवरदेवाचा भाऊ औरंगाबाद येथे कुठल्याशा नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षित शिक्षक आहे. माझी धाकटी बहीण ख्रिस्ती मिशनसंस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते आहे. त्याशिवाय माझ्या दोन नंबरच्या थोरल्या भावाचा एक मुलगा एका वैद्यकीय लॅबमध्ये क्षेत्रातले कुठलेही प्रशिक्षणकेले नसल्याने त्याचे `असिस्टंट'  हे पद कसले असेल याबद्दल अटकळ करणे सहज शक्य आहे. मात्र त्याचीबायको प्रशिक्षित नर्स म्हणून  नोकरीला आहे. 

मी स्वतः जेसुईट फादर म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी दहावी परीक्षेनंतर श्रीरामपूरचे  घर सोडले होते पण पदवीशिक्षणानंतर त्याकाळी एक आगळेवेगळे असलेले, माझ्या नजरेतील कुणीही काम केले नव्हते असे इंग्रजी पत्रकारितेचे क्षेत्र मी निवडले होते. माझ्याप्रमाणेच माझी बायको पदव्युत्तर असून शाळेत सुपरवायझर किंवा उपप्राचार्याच्या पदावर आहे. आमच्या मुलीने जर्मन विषयात शिक्षण घेतले आहे. माझ्या दुसऱ्या लहान बहीणीनेमाझ्यासारखेच धार्मिक जीवन निवडले होते आणि आता ती सिस्टर म्हणून गोव्यातील त्यांच्या संस्थेच्या शाळेत कोकणी शिकवते आहे. त्यामुळे आम्हा तिघांचे कुटुंब आणि गोव्यातली ही शिक्षिका असलेली `सिस्टरताई या बहुसंखिय  वैद्यकीय क्षेत्रातील कुटुंबियांत अल्पमतात होतो.

तर आपल्या पारखे कुटुंबातील मंडळी वैद्यकीय क्षेत्रात विविध पातळ्यांवर काम करत आहेत, तर मग आपणस्वतःचे हॉस्पिटल उघडण्यास काय हरकत आहे असा राणीचा सवाल होता. 

आमच्या पारखे क्लॅनविषयी तिने जे काही सांगितले ते खरेच होते.

``अरेच्चा, खरंच कि, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं आत्तापर्यंत! ''  मी म्हणालो.   

''वैद्यकीय क्षेत्रातले एव्हढे अनुभवी आणि प्रशिक्षित `कुशल’  लोक आपल्याच घरात आहे तर  मग आपण आपलाच दवाखाना उघडायला काहीच हरकत नाही.'';

`हां, ते  सगळं खरं हाय.  पन  मंग या दवाखान्यात तुमी  डाक्तर कुठून आननार? आतापर्यंत मागच्या सिटवर शांतपणे बसलेली आणि सत्तरीकडे वाटचाल करणारी माझी थोरली बहीण आक्का म्हणाली.

तोपर्यत या चर्चेत उत्साहाने बोलणारे सर्व जण या प्रश्नानंतर गप्पगार झाले.

या विषयाला तोंड फोंडणारी राणी तर या प्रश्नाने भांबावलीच होती. सतरा-अठरा वर्षांच्या त्या पोरीने दवाखान्यासाठी अत्यावश्यक असलेल्या डॉक्टर या पदाचा विचारच केला नव्हता !  

पण ती शांतता काही वेळच टिकली. आपल्या या प्रस्तावित दवाखान्यासाठी डॉकटर कुठून आणायचे या जटील प्रश्नावर काथ्याकूट करावी याची गरज तिथल्यापैकी कुणालाही भासली नाही. स्वस्थ व शांत बसणे ठाऊक नसलेल्या राणीने का तिच्या बहिणीने मग दुसऱ्या कुठल्या तरी विषयाकडे आपला मोहरा वळवला आणि पुन्हा त्याधावत्या बसमध्ये गडबडगोंधळ आणि हास्यकल्लोळ सुरु झाला.

बसमधला तो उत्साही गडबडगोंधळ आणि संभाषण मात्र माझ्या डोक्यावरुन जात राहिले. आमची बस गोदावरी-प्रवरा नदींच्या संगम असलेल्या कायगाव टोक येथे पोहोचली तेव्हा गंगेचे ते विशाल पात्र पाहण्यासाठी काही क्षण माझ्या विचारांची तंद्री मोडली होती. औरंगाबादला नवरदेवाच्या घरी पोहोचेपर्यंत मी गपगप्पच होतो.

पत्रकारितेच्या पेशात असतानाच मी गेली अनेक वर्षे मराठी आणि इंग्रजीत पुस्तके लिहित आलो आहे आणि महाराष्ट्रातील आणि गोव्यातील ख्रिस्ती समाज हा माझ्या लिखाणाचा एक खास विषय आहे. माझ्या भावाच्या नातीने - राणीने - तिच्या नकळत त्या संभाषणात सर्वांच्या लक्षात आणून दिले होते कि आम्हां नातलगांत कुणीही एमबीबीएस किंवा कुठलाही डॉक्टर नाही.

कळीचा मुद्दा असा आहे कि केवळ आमच्या जवळच्या नातेवाईकांतच नाही तर मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमच्या मराठी ख्रिस्ती समाजात किंवा विशेषकरून कॅथोलिक ख्रिस्ती समाजात एमबीबीएस पदवीअसलेला एकही डॉकटर माझ्या पाहण्यात आणि ऐकिवात नाही.  

वकिलीची सनद असलेले लोक आमच्या या समाजात गेल्या काही वर्षांत पैशाला पायलीभर मिळतील इतके झालेत, तुलनेने खूप उशिराने का होईना, पण  पीएचडी पदवी मिळवणारे  काही जण हल्ली समाजक्षितिजावर उगवताना दिसू लागलेत.

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत मराठवाड्यात, विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात अमेरिकन आणि युरोपियन मिशनरींच्या प्रभावाने ख्रिस्ती झालेल्या समाजघटकाविषयी मी हे  लिहित  आहे. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींमधून प्रामुख्याने हे ख्रिस्ती धर्मांतर झाले.  औरंगाबाद जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर  जिल्ह्यांत  महार समाजातील तर मराठवाड्यातील उरलेल्या जिल्ह्यांत म्हणजे जालना, लातूर, बीड वगैरे जिल्ह्यांत आणि सातारा, सांगली कोल्हापूर जिल्हयांत  मातंग समाजातील लोक ख्रिस्ती धर्माकडे वळले.  या धर्मांतरित ख्रिस्ती लोकांना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जातीने म्हणजे महार ख्रिस्ती किंवा मांग वा मातंग  ख्रिस्ती असे संबोधण्याची प्रथा होती. ग्रामीण भागांत आजही ही प्रथा चालूच आहे.  

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ख्रिस्ती लोकसंख्या लक्षणीय असली तरी  डिसोझा, गोन्सालवीस, फर्नांडिस अशी पोर्तुगीज वळणाची आडनावे असलेला  हा समाज प्रामुख्याने गोवा आणि इतर भागांतून स्थलांतरीतझालेला आहे. येथे स्थानिक पातळीवर कुठल्याही काळात ख्रिस्ती धर्मांतर झालेले नाही. 

कुठलीही सरकारी कार्यालये, बँका, शिक्षणसंस्था आणि व्हाईट कॉलर जॉब्स म्हणता येतील अशा कुठल्याही पदांवरया मराठी ख्रिस्ती समाजातील माणसे दिसत नाहीत. असली तर चतुर्थश्रेणीतील पदांवर हे लोक असतात.  हा,ख्रिस्ती मिशनसंस्थांतर्फे चालू असलेल्या विविध शहरांत आणि गावांतल्या शाळांत शिक्षिका आणि दवाखान्यांत नर्स एवढ्या पदांपर्यंतच त्यांची झेप गेली आहे. जसे केरळी ख्रिस्ती महिला भारताच्या कानाकोपऱ्यांत आणि जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी प्रामुख्याने नर्सची नोकरी करताना दिसतात. 

बाकी एमपीएससी, आयएएस, आयपीएस वगैरे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन या प्रदेशातील कुणी मराठी ख्रिस्ती व्यक्ती कलेक्टर, पोलीस कमिशनर वा सुपरिटेंडंट या पदावर अजूनही आलेली नाही.  एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन तहसिलदार किंवा प्रांत पद सुद्धा त्यांच्या नजरेत येऊ शकत नाही तर कलेक्टर वा पोलीस कमिशनर या पदांबद्दल बोलायलाच नको.  वर लिहिलेल्या जिल्ह्यांतील या समाजातील मुलां-मुलींना आजही परीक्षेच्या वेळी वह्या-पुस्तके समोर ठेवून, कॉप्या वापरण्याची सवलत देऊनसुद्धा दहावी पास होताना घाम फुटतो, ती मुलेमुली पदव्या किंवा स्पर्धा परीक्षा कशा उत्तीर्ण होणार ?

याचे कारण काय असू शकेल?     

हे लोक पूर्वाश्रमीचे अस्पृश्य म्हणजे दलित असले तरी ख्रिस्ती असल्यामुळे त्यांना आरक्षण नसते. मात्र त्यांच्या गळ्यातले दलितत्वाचे लोंढणे धर्मांतरानंतरही कायम असल्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय वगैरे क्षेत्रांत प्रगती साधणे त्यांना अजूनही शक्य नाही.

पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर सोलापूर, कोल्हापूर  जिल्ह्यांत,  मराठवाड्याच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात सामुदायिक धर्मांतरे झाली. त्यामागे केवळ आध्यात्मिक प्रेरणा होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पंडिता रमाबाई, रेव्ह्. नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, रेव्ह. नीळकंठशास्त्री नेहेम्या गोऱ्हे , बाबा पदमनजी वगैरे सुशिक्षित व्यक्तींच्या धर्मांतरात अध्यात्मिक परिवर्तन घडले हे नि:संशय. 

अस्पृश्य जातीजमातींच्या सामुदायिक धर्मांतराबाबत मात्र असे म्हणता येणार नाही. ज्या लोकांच्या वैयक्तिक वा सामाजिक जीवनात देव-धर्म, देऊळ, धर्मग्रंथ या संकल्पनांना कधीही प्रवेश नव्हता, अशा समाजातून वाळीत टाकलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचे अध्यात्म आधी समजून घेऊन नंतर हा धर्म स्वीकारला असे म्हणणे वास्तव्यास धरून होणार नाही.

धर्मांतरामागची कारणे आणि प्रेरणा यांचे अविनाश डोळस यांनी पुढील शब्दांत विश्लेषण केले आहे : “ब्रिटिश राजवटीत अनेकांनी जातीव्यवस्थेने दिलेले नीचपण झुगारून त्यातून मुक्त होण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. अनेक आदिवासी लोकांनीही शिक्षणासाठी, आपुलकीच्या मिळणाऱ्या वागणुकीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. मिशनरी लोकांनी उपेक्षित, गरीब लोकांसाठी डोंगरदऱ्यांत शाळांची स्थापना करुन त्यांच्यापर्यंत शिक्षण नेऊन एक ऐतिहासिक कार्य केले आहे. या कार्याचा परिणाम म्हणून भारतात अधिकाधिक दलित, आदिवासी मंडळी ख्रिस्ती झाली आहेत.”

महाराष्ट्रातील वा इतर कुठल्याही ठिकाणी सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे आध्यात्मिक परिवर्तनाने झाली असा दावा खुद्द ख्रिस्ती धर्मगुरू किंवा चर्चही करत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील प्रेषितकार्याचा इतिहास लिहिणाऱ्या फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांचे विश्ले्षण पुढीलप्रमाणे आहे: ”कॅथोलिक श्रध्देचा निरनिराळ्या भागात कसा प्रारंभ झाला हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. क्वचित प्रसंगीच आध्यात्म्याने सुरूवात झालेली दिसते असे खुद्द पवित्र शुभसंदेशातही आपल्याला दुसरं दिसत नाही. लोक येशूच्या भोवती गर्दी करू लागले. कारण त्याने आजाऱ्यांना बरे केले, मेलेल्यांना पुन्हा उठविले, अशुध्दांना त्याने शुध्द केले आणि भाकरी वाढविल्या. लोकांचा जमाव त्याच्याकडे आल्यानंतरच त्याने त्यांचे लक्ष शाश्वत मुल्याकडे ओढून घेतले. ”तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवता म्हणून तुम्ही माझ्याकडे आला असे नाही, तर मी तुम्हांला भाकर दिली म्हणून तुम्ही आलात.” त्यानंतरच मग येशू अध्यात्म्याकडे वळून ’नश्वर अन्नासाठी झटू नका. त्याऐवजी चिरकालीन अन्नासाठी प्रयत्न करा’ असे त्या लोकांना सांगतो.”

’कॅथोलिक मिशनरींकडे लोक प्रथम वळले ते धर्म भावना मनात ठेवून नव्हे’ असे पुण्यातील सेंट विन्सेंट स्कूलचे माजी प्राचार्य फादर केनेथ मिस्किटा आणि फादर थॉमस साळवे यांनीही ’जेसुईट 2005’ या वार्षिक अंकात स्पष्ट म्हटले आहे. मिशनरींकडे वळण्याचा त्यांचा हेतू पोटापाण्याचा व सामाजिक मानसन्मान हा होता असे या त्यांनी म्हटले आहे. 

धर्मांतरामागची कारणे काहीही असोत, ही सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतरे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातीलएक मोठी सामाजिक क्रांती होती. प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्दचा तो एक मोठा विद्रोह होता. त्यावेळच्या अन्याय्य स्थितीतून सुटका करून घेण्याचा धर्मांतर एक मार्ग होता. विशेष म्हणजे या दलितांना मुक्तीचा हा मार्ग दाखविणारा त्यांच्यामध्ये कुणीही मोझेस नव्हता. एका गावात एक धर्मांतर झाले आणि त्या धर्मांतराचे ऐहिक, सामाजिक आणि आर्थिकही फायदे त्याच्या नातेवाईकांना, भाऊबंदांना लक्षात आले आणि त्यांनीही मग तोच मार्ग पत्करला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सामुदायिक ख्रिस्ती धर्मांतराची ही लाट महाराष्ट्रात वर नमूद केलेल्या जिल्ह्यांत चालू राहिली. खेड्यापाड्यांत, आडवळणाच्या छोट्याशा वस्तींवर अहिंसेच्या मार्गाने अगदी संथपणे झालेल्या या क्रांतीची त्यावेळच्या उच्चवर्णियांनी साधी दखलही घेतली नाही. या सामाजिक क्रांतीमागची बहुविविध कारणे, त्याचा समाजाच्या इतर घटकांवर झालेला परिणाम आणि वरच्या जातींच्या अरेरावीस आणि सर्वच क्षेत्रांतील मक्तेदारीस अनेक शतकांनंतर पहिल्यादाच मिळालेले आव्हान याचे समाजशास्त्रज्ञांनी व इतर संशोधकांनी आतापर्यंत विश्लेषण केलेले नाही.

हे धर्मांतर रोखण्यासाठी अस्पृश्य जातींना त्यांना हवा तो आत्मसन्मान द्यावा किंवा अन्याय समाजव्यवस्था बदलावी असेही त्यावेळच्या समाजधुरिणांना वाटले नाही. त्यानंतर येवला येथे 1935 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची गर्जना केली तेव्हाही हे सामुदायिक धर्मांतर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीच. धर्मांतराच्या घोषणेनंतर तब्बल दोन दशकांनी बाबासाहेबांनी आपली धर्मांतराची प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणली 

देशाचे पारतंत्र्य संपून भारताने स्वत:ची राज्यघटना बनविली तेव्हाच या देशात ज्या समाजघटकांवर शतकोनुशतके सामाजिक, धार्मिक आणि अन्य प्रकारचा अन्याय झाला अशा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य किंवा मागासवर्गिय घटकांना आरक्षण देऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न झाला.  डॉ, बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार असलेली भारताची राज्यघटना अमलात आल्यापासून म्हणजे १९५० पासून हिंदू धर्मातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना अनुसूचित जातींना (शेड्यल्ड कास्ट्स) आरक्षणाची सुविधा आणि इतर सवलती देणे सुरु झाले. 

अस्पृश्यता किंवा जातिभेद केवळ हिंदू धर्मात आहेत असे म्हणता येणार नाही, भारतीय संस्कृतीचा तो भाग आहे. `जात नाही ती जात''  अशी म्हण आहे ती यामुळेच. अस्पृश्य किंवा कुठल्याही जातीतील व्यक्तीने शीख, ख्रिस्ती किंवा बुद्ध धर्म स्विकारला म्हणजे लगेचच त्या व्यक्तीची जात गाळून पडली असे होत नाही वा त्यांचा सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा बदलला असे होत नाही.  अस्पृश्य समाजावर झालेल्या अन्यायाचे पारिमार्जन वा नुकसानभरपाई म्हणून त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर क़ाळात त्यांना आरक्षण आणि विविध सवलती लागू करण्यात आल्या.

सुरुवातीला केवळ हिंदु समाजातील दलित घटक़ांना असलेले हे आरक्षण नंतर म्हणजे 1956 साली दलित शीखांना लागू करण्रात आले. शीख धर्मातही चर्मकार वगैरे अस्पृश्य जाती असल्याने घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपतींकरवीखास आदेश (प्रेसिडेन्शियल ऑर्डर ) काढून १९५६ पासून दलित शिखांना आरक्षण सुविधा सुरु झाली. माजी केंद्रीय गृहमंत्री बुटा सिंग या दलित शीख समाजातील एक मोठे नेते. अलिकडॆच पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच दलित शीख असलेल्या  चरणजीतसिंग चानी यांची निवड झाली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक दलितांनी १९५६ साली नागपुरात बौद्ध धर्मात प्रवेश केला. हिंदु धर्माचा त्याग करून बौध्द धर्माचा स्वीकार केल्यानंतर या बौद्ध समाजास त्यांच्या धर्मांतराच्या नावाखाली आरक्षण आणि इतर सवलती नाकारण्यात आल्या.  या धर्मांतरीत बौद्धांचा आरक्षणावरचा हक्क गेला. दुदैवाने बाबासाहेब आंबेडकरांचे महानिर्वाण झाल्यामुळे हा विषय संसदेत घेण्यासाठी दुसरा नेता नव्हता.   

स्वतंत्र महाराष्ट्राची 1960 साली निर्मिती झाली तेव्हा मात्र राज्य सरकारने आपल्या खास अधिकाराचा वापर करून नवबौध्द समाजाला आरक्षणादी सवलती चालूच ठेवण्याचा एक अत्यंत पुरोगामी असा निर्णय घेतला. 

जनता दलाच्या राजवटीत पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या बौद्ध समाजावरील हा अन्याय दूर केला आणि १९९० पासून धर्मांतरानंतरही नवबौध्द समाजाला आरक्षणाच्या सुविधा पूर्ववत चालू झाल्या.  या समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आला.  धर्मांतराने दलित समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीत कुठलाही बदल घडून येत नाही, त्यामुळे आरक्षणावरील त्यांचा नैसर्गिक आणि न्याय्य हक्क कायम राहतो, हे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अधोरेखीत झाले होते. 

दलित शिखांच्या बाबतीत आणि दलित बौध्दांच्या बाबतीत सरकारने ज्या तत्वाच्या आधारावर आरक्षण लागू केले ते तत्व मात्र दलित ख्रिस्ती समाजाच्या बाबतीत आजतागायत अक्षरश बासनात गुंडाळून बाजूला ठेवण्यात आले आहे. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य ख्रिस्ती लोकांबाबत याबाबत पक्षपात केला गेला आहे. देशात समतेची आणि कायद्याची व्यवस्था येऊनही दलित ख्रिस्ती समाज मात्र अजूनही आरक्षण आणि सवलतीच्या बाबतीत अस्पृश्यच ठरवण्यात आला. यांचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यावतीने या हक्कांसाठी झगडणारा कुणीही राजकीय नेता नव्हता. हा दलित ख्रिस्ती समाज आपली स्वतःची व्होट बँक असू शकतो आणि त्यादृष्टीने त्यांच्यासाठी काही करावे असा विचार कुठल्याही राजकीय पक्षाने केला नाही .  

दलित ख्रिस्ती समाजाच्या बाबतीत असा अन्याय स्वातंत्र्योत्तर काळात सात दशके होत असताना हा समाज मात्र मूग गिळून बसला आहे. याबाबत त्यांच्यात राजकीय जागृतीसुद्धा नाही. या दलित ख्रिस्ती समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांच्या पाठीमागे राहणारी वा त्यांच्या प्रश्नांसाठी भांडणारी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पातळीवरची कुठलीही सामाजिक संघटना, राजकीय शक्ती संघटना नाही. 

मूळचे आदिवासी असलेल्या ख्रिस्ती समाजाला मात्र अनुसूचित जमातीला (शेड्यल्ड  ट्राइब्स  किंवा एस. टी )  लागू असलेले सर्व आरक्षण आदी सुविधा  १९५० पासूनच लागू आहेत. याचे कारण कि ईशान्य प्रांतांतील ख्रिस्तीबहुल मिझोराम, नागालँड वगैरे सर्व राज्यांतील लोक विविध आदिवासी जमातीतील आहेत. धर्मांतरित, ख्रिस्ती असले तरी त्यांनी आरक्षण आदी सुविधांवरचा हक्क वाजवून घेतला आहे.  माजी लोकसभा सभापती पी. ए. संगमा,छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा  ही भारतातील  आदिवासी ख्रिस्ती समाजातील  काही प्रमुख नावे.

दलित ख्रिस्ती समाजाला दलित शिखांप्रमाणेच त्याकाळात आरक्षण दिले गेले नाही.  याचे कारण म्हणजेत्याकाळात खुद्द ख्रिस्ती पुढाऱ्यांनी आणि धर्माधिकाऱ्यांनीही मांडलेले मत.  प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ जेसुईट फादर जेरोम डिसोझा हे घटना परिषदेचे सदस्य होते. दलित ख्रिस्ती लोकांना आरक्षण देण्याविरुद्ध त्यावेळी भुमिका घेतल्याबद्दल नंतर ख्रिस्ती पुढाऱ्यांना आणि कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना आता पस्तावा करण्याची वेळ आली आहे. 

बेजवाडा विल्सन हे भंगी (मेहतर) समाजातील दलित ख्रिस्ती. सफाई कर्मचारी आंदोलनाचे नेते असलेल्या आणि कर्नाटकात जन्मलेल्या विल्सन यांना काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या रमण मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विल्सन यांनी लहानपणी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे भंगीकाम केले होते. दलित गणलेल्या अशा अनेक जातींचे लोक ख्रिस्ती समाजात आहेत.

अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत हरेगाव, संगमनेर, घोगरगाव, बोरसर वगैरे भागांत मिशनरींनी स्वातंत्र्यपूर्व काळातच प्राथमिक शाळा उधडल्या होत्या. तरीसुध्दा या जिल्ह्यांतील अनेक गावांतील कॅथोलिक समाजातील पदवीधरांची पहिली पिढी उगवण्यासाठी विसाव्या शतकातील सातवे किवा आठवे दशक उजाडावे लागले. समाजात शैक्षणिक वारशाचा पूर्ण अभाव, त्यामुळे शिक्षणाबद्दलची पालकांची अनास्था, हलाखीची आर्थिक स्थिती यामुळे मिशनाच्या शाळेतील या मुलांची प्राथमिक शिक्षणाच्या पुढे मजलच जात नव्हती.

राहुरीजवळ वळण येथे 1936 साली स्थापन श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे स्थलांतर झालेल्रा संत तेरेजा बॉईज स्कूलमध्ये माध्यमिक विभाग सुरू होण्रासाठी 1980 साल उजाडावे लागले ही घटनाच बरेच काही सांगून जाते. 

आज देशभर विविध राज्यांत ओबीसी जातींना आरक्षण देण्याच्या मुद्दयावर आंदोलने  सुरू आहेत .देशात आरक्षणाच्या मुद्द्यावर असे रणकंदन पेटत असतांना दलित ख्रिस्ती समाजाची स्वत:ची अशी भूमिका मात्र समाजासमोर आणि राजकिय नेतृत्वासमोर प्रभावीपणे मांडली जात नाही. 

पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य असलेल्या ख्रिस्ती समाजाने स्वत:ला दलित म्हणवून घ्यावे कि नाही याबद्दल बराच काळ चर्चा झाली होती. दलित या शब्दामागे एक प्रकारचा स्टिग्मा आहे, दलितत्व कलंकित आहे, त्यामुळे धर्मांतरानंतर पुन्हा आपण त्या स्थितीत जायला नको असा विचार ख्रिस्ती समाजातील काही विचारवंतांनी मांडला आहे. 

1970 च्या दशकात फादर लिओ देसाई, फादर मॅथ्यू लेदर्ले आणि प्रगत पदवीधर संघटना या ख्रिस्ती युवकांच्यासंघटनेने दलित ख्रिश्चनांना आरक्षण मिळावे या मुद्यावर महाराष्ट्रात अगदी रान उठविले होते.. त्यांच्या प्रयत्नामुळेच मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काळात  महाराष्ट्र सरकारने 1978 साली दलित ख्रिस्ती समाजाचा इतर मागासवर्गिय वर्गांत (ओबीसी) मध्ये समावेश केला.  मात्र अनुसूचित समाजास लागू असणारे आरक्षणादी सवलती मात्र या समाजास मिळाल्या नाहीत.

पुढे रेव्ह. अरविंद निर्मळ यांनी महाराष्ट्रात या बाबतीत दलित ख्रिस्ती समाजात जागृती करण्याचे फार मोठे योगदान केले आहे.

आरक्षणावरचा दलित ख्रिस्ती समाजाचा नैसर्गिक हक्क शाबीत करण्यात मात्र हा समाज अयशस्वी ठरला आहे. या समाजाची सध्याची लढ्याची एकाकी पध्दत अशीच चालू राहिली तर या प्रयत्नांना यश मिळेल कि नाही याबाबतही मला शंकाच वाटते. रेव्ह. अरविंद निर्मळ यांचे एक फार मोठे योगदान म्हणजे त्यांनी दलित ख्रिस्ती समाजास देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख दलित प्रवाहात, आंबेडकरवादी चळवळीत सामील होण्यास प्रवृत्त केले. दलित समाजाचे प्रश्‍न मांडणाऱ्या सुगावा प्रकाशनाचे प्रा.  विलास वाघ आणि, उषाताई वाघ, अविनाश डोळस वगैरेसारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी दलित ख्रिस्ती समाजाच्या प्रश्‍नांची जाण करून दिली, आणि त्याचबरोबर शोषित समाजघटकांच्या संघर्षात दलित ख्रिस्ती समाज त्यांच्याबरोबरीने आहे, हे त्यांनी ठामपणे वेगवेगवेगळ्या व्यासपीठांवर मांडले.

हिंदु, शीख आणि बौद्ध धर्मातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाप्रमाणेच दलित ख्रिस्ती समाजाचाही अनुसूचीत जातींमध्ये समावेश करावा आणि अनुसूचीत जातींसाठी दिले जाणारे आरक्षण आणि इतर सवलती दलित ख्रिस्ती समाजास लागू करण्यात यावे अशी एक फार जुनी मागणी आहे. अशी मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सध्या चालू आहे. आरक्षणादी सवलती हिंदू धर्मीय दलितांना दिल्या जातात, त्याचप्रमाणे दलित शीखांना आणि नवबौध्दांनाही दिल्या जातात, तर मग दलित ख्रिश्‍चनांना या सवलती का दिल्या जात नाही, याची विचारणा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारकडे केली, तेव्हा या प्रश्‍नाचे समर्पक उत्तरच सरकारकडे नव्हते.

अस्पृश्य म्हणून शतकानुशतके दलित समाजावर खूप अन्याय झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या अन्यायाची नुकसानभरपाई म्हणून पूर्वाश्रमीच्या दलित आणि आदिवासी समाजाला आरक्षणादी सुविधा लागू झाल्या.  इतर दलित समाजाला दिल्या जाणाऱ्या आर्थिक आणि इतर सवलती दलित ख्रिस्ती समाजाला नाकारल्या आहेत आणि हा अन्याय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा दशके अजूनही चालूच राहिला आहे. त्यामुळेच दलित ख्रिस्ती समाजाची शैक्षणिक क्षेत्रातील अशा प्रकारचा अनुशेष निर्माण झाला आहे. दलित ख्रिस्ती समाजाला आरक्षणसुविधा लागू केली तरच या समाजाची प्रगती होऊ शकेल. अन्यथा या समाजावर पिढ्यानपिढ्या झालेला अन्याय प्रगतीच्या अनुशेषाच्या स्वरूपात यापुढेही चालूच राहील.

त्यामुळेच आपल्या नात्यातल्या डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली स्वतःच्या परिवारातील वैद्यकीय कुशल आणिप्रशिक्षित लोकांना घेऊन दवाखाना उघडण्यासाठी माझ्या भावाच्या नातीला  राणीला अजून खूष काही वर्षे वाटपाहावी लागणार आहे.  

 पत्रकारांसाठी असलेल्या सेवासुविधां

                                        Indian Express Pune Resident Editor Prakash Kardaley

ही खूप, खूप वर्षांपूर्वीची घटना आहे, १९९०च्या आसपासपासची म्हणजे तीस वर्षांआधीची. माझ्या पत्रकारितेतील कारकिर्दितील गोवा-पर्व आटोपून मी पुण्याला नव्यानेच सुरु झालेल्या `इंडियन एक्सप्रेस'ला रुजू झालो होतो. निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांनीच मला औरंगाबादच्या `लोकमत टाइम्स'मधून बोलावून या राष्ट्रीय पातळीवरच्या इंग्रजी दैनिकात आणले होते.

`लोकमत' वृत्तसमूहाला त्याकाळात न्यायमूर्ती पालेकर वेतन आयोग माहितच नव्हता. कर्दळे यांनी मात्र या पालेकर वेतन आयोगानुसार बातमीदाराच्या वर्गात सर्वात शेवटची म्हणजे सर्वाधिक रक्कम असलेली वेतनश्रेणीचा पगार मला दिला होता, म्हणजे त्याकाळात पुण्यातल्या एक्सप्रेस कार्यालयात बातमीदारांमध्ये माझा पगार सर्वाधिक होता. एक्सप्रेसमध्ये त्यावेळी सिनियर रिपोर्टर किंवा चिफ रिपोर्टर या पदांवर कुणीच नव्हते. आम्ही सर्व बातमीदार - मुले आणि मुली - तिशीच्या आतले होतो.
`लोकमत टाइम्स'मध्ये महिना बाराशे पगार मिळवणारा मी आता इंडियन एक्सप्रेसमध्ये सर्वात खालच्या पदावर असूनही माझा महिना अडीच हजार रुपये पगार होता ! आणि याविषयी तक्रार असण्याची गरजच नव्हती.
माझ्या माहितीनुसार पालेकर वेतन आयोगाची अंमलबजावणी करणाऱ्या पुण्यातल्या अगदी `केसरी' आणि `सकाळ' या दैनिकांतही बातमीदारांना इतका पगार नव्हता, याचे कारण त्यावेळी एक कोटी रुपये वार्षिक उलाढाल (!) असणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या सर्वात वरच्या वेतनश्रेणीत असायच्या.
तर पुण्यात स्थिरस्थावर झाल्यावर म्हणजे स्वतःचे बिऱ्हाड केल्यानंतर मी पिंपरी चिंचवडहून पुण्याला कॅम्पात दररोज प्रवास करु लागलो. पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (पीएमटी ) निगडी-हडपसरच्या बसने अर्ध्या तासाच्या या प्रवासाला एकमार्गी साडेतीन रुपये लागायचे. दररोज सात रुपये प्रवासखर्च.
काही दिवसांनंतर कोणी तरी मला भरवून दिले कि पीएमटी मार्फत पत्रकारांना मोफत प्रवासासाठी पासेस दिले जातात.
बहुतांश वेळेला पत्रकारांसाठी असलेल्या अशा सेवासुविधांचा फायदा भुरटे पत्रकारच म्हणजे पूर्णवेळ पत्रकार नसलेले लोक उपटत असतात. एकवेळ पूर्णवेळ श्रमिक पत्रकार असलेल्या पत्रकारांना कधीच न मिळणाऱ्या या सेवासुविधा या भुरट्या पत्रकारांना मिळतात, याचे कारण बहुतांश वेळेस वृत्तपत्र कार्यालयात नोकरीला असलेल्या पत्रकारांना सरकारचे accreditation- अधिस्वीकृती - नोंदणी मिळत नाही, गावोगावची ही भुरटी पत्रकार मंडळी मात्र accredited - अधिस्वीकृत - असतात,
दहा टक्क्यात घर मिळवायला, एसटीतून फुकट प्रवास करायला, अतिशय आलिशान असलेल्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये आरामात राहायला ही accredited मंडळी पात्र असतात. तर मुद्दा असा होता कि मुळात पूर्णवेळ श्रमिक पत्रकार नसलेली मंडळी पत्रकारांसाठी असलेल्या पीएमटी च्या मोफत प्रवासाच्या पासचा लाभ घेत असतील तर आपण खरेखुरे पत्रकार - बातमीदार- असताना हा पास का मिळवू नये ?
अशी मनाची तयारी करुन मग मी निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांना या सिटी बसच्या मोफत प्रवासासाठी इंडियन एक्सप्रेसच्या कोट्यातल्या पाससाठी शिफारसपत्राची मागणी केली. प्रत्येक दैनिकासाठी अशी दोन मोफत पासेस त्यावेळी असायची.


कर्दळे यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले आणि संपादक आणि पत्रकार या नात्याने आपण स्वतः अशा मोफत पास आणि सवलती घेण्याविरुद्ध आहोत असे स्पष्टपणे मला सांगितले.
इंडियन एक्सप्रेस हा वृत्तपत्र समूह पत्रकारांना आणि इतर वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार चांगला पगार, वर्षाला जवळपास दिडदोन महिन्यांच्या पगारी रजा, प्रवास भत्ता, घरभत्ता देते. त्यामुळे पत्रकारांनी सरकारकडून वा कुणाकडूनही फुकटच्या सेवासुविधा घेऊन त्यांचे मिंधे होऊ नये, आणि अशाप्रकारे बातम्या देताना अशाप्रकारे कुठलेही मिंधेपण किंवा भिती नसावी, (No favour or fear ) असे आपले मत आहे असे कर्दळे यांनी मला सांगितले.
''But Camil, if you are nonetheless still keen on having this PMT pass, I will issue an official letter to the PMT administration..."" कर्दळे म्हणाले.
मात्र तरीही मला गरज असल्यास किंवा त्यांच्या मताशी मी सहमत नसल्यास संपादक म्हणून माझ्या नावाने शिफारस पत्र देण्यास ते तयार होते.
मी मात्र पीएमटीचा फुकट पस मिळवण्याबाबत ठाम होतो.
कर्दळे यांचे शिफारस पत्र घेऊन मी पीएमटी जनरल मॅनेजरला स्वारगेट ऑफिसात भेटलोही. मात्र त्या एका भेटीनंतर मी याबाबत पाठपुरावा केला नाही आणि अशाप्रकारे स्वतःचे हातपाय चिखलात बरबटून घेण्यापासून वाचलो.
पत्रकारांसाठी असलेल्या विविध जंकेटस चा लाभ घेण्याविरुद्ध मी कधीही नव्हतो, अशा खूप junkets चा मी लाभार्थी आहे. अशाच जंकेटचा फायदा घेऊन तिनेक वर्षांपूर्वी थायलंड सरकारने आयोजित केलेल्या दहा दिवसांच्या थायलंड भेटीत सकाळ वृत्तसमूहाच्या `सकाळ टाइम्स' चे आणि भारताचेही मी प्रतिनिधित्व केले. जगातल्या सत्तरेक पत्रकारांमध्ये भारतातल्या पाच मोजक्या पत्रकारांमध्ये माझा समावेश होता. पण तो जंकेटसचा विषय वेगळा, त्याविषयी पण एकदा सविस्तर लिहिन. .
महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या आमदारांना मुंबईत फुकट नाही पण सत्तर लाख रुपयांत घर देण्याविषयीची चर्चा येथे वाचली आणि हे एक जुने प्रकरण आठवले.

Tuesday, March 22, 2022

होळी म्हटलं की मला शेडगे काकू, पुरण पोळी आठवतात..

होळी म्हटलं की मला खूप वर्षे आमच्या शेजारी असणाऱ्या शेडगे काकू आठवतात.. आमची लेक अदिती त्यांना काकू म्हणायची म्हणून आम्ही सगळे जण त्यांना शेडगे काकू म्हणायला लागलो..
आम्ही दोघे नोकरीला असल्याने अदिती चार महिन्यांची झाल्यापासून पाळणाघरात राहिली. जॅकलीन सकाळी साडेसातला शाळेत जायची, मग साडे दहापर्यंत मी अदितीला आंघोळ घालून तिचे कपडे करुन तोंडाला पावडर आणि काजळ लावून श्रद्धा गार्डन कॉलनीत असलेल्या पाळणाघरात न्यायचो. तिला तिथे झोपवून नंतर इंडियन एक्स्प्रेसला कामावर जायचो. दुपारी साडेतीनपर्यंत जॅकलीन अदितीला घरी न्यायची.
अदिती थोडी मोठी झाल्यावर आणि तिला कळायला लागल्यावर मात्र गडबड व्हायला लागली. याचे कारण म्हणजे...
शनिवारी रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी अदितीचा वावर पूर्ण दिवस शेडगे काकूंकडे असायचा. शेडगे. काकूंनी. शेंगदाणे जिरे आणि इतर कायकाय घालून केलेले पोहे, साबुदाणा खिचडी अदितीला खूप आवडायची..
त्यामुळे सोमवारी आणि इतर दिवशी पाळणाघरात गेलो कि माझे कपडे आणि बॅग आपल्या चिमुकल्या हातांत घट्ट पकडून अदिती म्हणायची.

'' No, No. Don't leave me here.. I will stay with Shedge Kaku... I won't trouble Shedge Kaku.. Don't leave me here...''

आज हे लिहिताना काळीज तिळतिळ तुटते तर त्यावेळी काय होत असेल कल्पना करा.. काळजावर भलामोठा दगड घट्ट ठेवून डोळ्यातले पाणी लपवत मी बस स्टॉपकडे निघायचो..
तर होळीच्या दिवशी शेडगे काकूंकडून आम्हा तिघांना पुरण पोळी, चमचमीत आमटी आणि भजे यायचे.. होळीच्या दिवशी आमच्या घरी जेवणासाठी गॅस पेटवला जात नसे..
शेडगे कुटुंबात दरवर्षी गणपती बसवला जायचा तेव्हा त्या अकरा दिवसांत अदितीला बोलावल्यानंतरच तिथे आरती सुरु व्हायची आणि अदितीच्या हातात घंटी असायची.. ''घालीन लोटांगण'' सुरु झालं की अदिती त्यासर्वांबरोबर गोलगोल फिरायची. दिवा असलेलं आरतीचं ताट समोर आल्यावर नमस्कारही करायची, नंतर खोबरे, पेढे असा प्रसाद खायची. गणपती विसर्जनाला शेडगे कुटुंबाबरोबर अदितीसह आम्ही दोघेही चिंचवडगावातल्या पवना नदीच्या घाटावर असायचो.
अदिती पाचवी-सहावीत असेल तेव्हा आम्ही समोरच्याच इमारतीत मोठ्या घरात राहायला आलो. काही वर्षांपुर्वी शेडगे कुटुंबसुद्धा भोसरीपाशी स्वतःच्या बंगल्यात राहायला गेले आणि आमचा त्यांचा दररोजचा संपर्क तुटला..
शेडगे काकूंच्या दोन्ही मुलांच्या आणि मुलीच्या लग्नासाठी आम्ही त्यांच्या गावाला सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावला आवर्जून गेलो होतो. गावातली ती लग्ने अदितीने खूप एन्जॉय केली.
अदितीला मात्र शेडगे काकुंचे पोहे, साबुदाणे खिचडी आणि होळीच्या सणाच्या पुरण पोळी, आमटी आणि भजे नेहेमी आठवत असतात.
काल रात्री श्रद्धा गार्डन कॉलनीतल्या होळी पेटल्या तसे जॅकलीनला मी शेडगे काकूंची आणि पुरणपोळींची आठवण करुन दिली..
अदितीशी काल फोनवर होळीच्या सुट्टीबाबत बोलणे झालं होतं ..
होळीनिमित्त तिलाही शेडगे काकू आणि त्यांच्या पुरणपोळी, आमटीची ती चव आठवली असेलच... ..